|| श्री स्वामी समर्थ ||
आपण जन्माला आलो कि आपल्याला अगदी रेडीमेड कुटुंब मिळते. आई
वडील काका मामा आजी आजोबा मावशी अशी अनेक नाती क्षणार्धात जोडली जातात . आपण ज्या
कुळात जन्माला येतो त्या कुळाची देवताही असते जीचे आपण आपली कुलस्वामिनी म्हणून
पूजन करतो. प्रत्येक घराण्यातील कुलस्वामिनी वेगळी असते आणि तिचे पूजन करण्याच्या
पद्धतीही वेगवेगळ्या असतात. अनेक ठिकाणी शुभ कार्याच्या वेळी किंवा देवीच्या
उत्सवात देवीचा गोंधळ घालण्याची प्रथाही पूर्वापार चालत आली आहे.
आपल्या घराचे जसे “ फमिली डॉक्टर ” असतात अगदी तशीच आपली
कुलस्वामीनी आपली आई असते जिला आपली नस अन नस माहित असते . त्यामुळे तिचे पूजन
सर्वार्थाने शुभच असते.
आपल्या रोजच्या उपासनेचा प्रारंभच कुलस्वामिनीच्या उपासनेने
, नामस्मरणाने झाला पाहिजे कारण तिचा मान सगळ्यात मोठा आहे. त्यांनतर इतर उपासना
,जपजाप्य आहे.
विवाहानंतर स्त्रीचे कुळ बदलते त्यामुळे तिने सासरच्या कुलस्वामिनीचे
पूजन करावे. पण आपण ज्या कुळात जन्माला आलो त्याही देवीचा विसर पडू नये आणि तिचेही
पूजन करावे असे माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे. नवरात्रात दोन्ही देवीच्या ओटी भरावी
तसेच आपल्या ग्राम देव्तेचीही ओटी भरावी .
आपल्या देव्हार्यात आपल्या कुलस्वामिनी आणि कुलदैवत ह्यांचे
फोटो , मूर्ती किंवा टाक ह्यापैकी काहीतरी एक असलेच पाहिजे त्याशिवाय देवघर अपूर्ण
आहे. देवीला रोज हळद कुंकू लावून आपल्याहि लावावे आणि घरातील वडील मंडळीना रोज
नमस्कार करावा. आपण केला तर आपले अनुकरण आपली पुढील पिढीही करेल आणि त्यांच्यावर
नकळत चांगले संस्कार होतील . हे संस्कारच पुढे त्यांना चांगला माणूस घडण्यास
उपयुक्त ठरतील.
आपल्या देवीच्या दर्शनाला निदान वर्षातून एकदातरी सहकुटुंब
जावून यावे, कारण शेवटी स्थान महत्व हे आहेच . अनेक कुटुंबात श्रावण किंवा
नवरात्रात सवाष्ण भोजन घालण्याची प्रथा आहे. सवाष्ण बोलवून खीर पुरणाचा स्वयपाक
करून देवीला नेवैद्य दाखवायचा , सवाष्णीची ओटी भरून तिला भोजन द्यायचे हा कुलाचार
आहे. आजच्या बदलत्या जीवन पद्धती नुसार ह्यातील अनेक गोष्टी काळाच्या पडद्याआड जात
आहेत. कुटुंबे विभक्त होत आहेत मग सुनांना वेळ नाही आणि सासूबाईना वयोमानपरत्वे
होत नाही ह्या सर्व सबबी पुढे येवून सवाष्ण भोजन किंवा साधे हळदीकुंकू सुद्धा केले
जात नाही .
पण शांतपणे विचार केला तर असे दिसून येयील कि आपल्याला वेळ
असतोच . हवी असते ती हे सर्व करण्याची इच्छा आणि तळमळ . आपल्या ह्या रूढी आणि
परंपरा ह्यामागे खूप मोठे शास्त्र आणि अर्थ आहे जो आपण समजून घेतला तर ह्या गोष्टी
आपण मनापासून नक्कीच करू ह्याची मला खात्री वाटते .
आपल्या घरातील नवीन आलेल्या सुनांना सासरच्या वडील मंडळींनी
आपल्या घरातील परंपरा , रिती सुरवातीलाच समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्याचे महत्वसुद्धा
. असे झाले तर त्या हौशीनी सर्व करतील .पण आपण तसे न करता सुनबाई शिकलेली आधुनिक
विचारसरणीची आहे ती काही करणार नाही हे गृहीत धरतो. कधीकधी माहेरी फारश्या प्रथा
नसतात त्यामुळे मुलीना अनेक गोष्टी माहित नसतात पण त्याचा अर्थ त्यांना काहीच
करायचे नसते असा लावणे किंवा तसा अर्थ काढून मोकळे होणे हे चूकच आहे.
आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्यच
आहे. त्यासाठी वर्षातून एकदातरी घरात हळदीकुंकू करावे . आलेल्या प्रत्येक स्त्रीला
देवी स्वरूप मानून तिचा मान ठेवावा. देवीचा आपल्या वस्तुत जागर आहे ह्याचे भान
ठेवून कुठल्याही स्त्रीचा अपमान किंवा धुसफूस , कुणाचीही निंदा करू नये नाहीतर
त्या हळदीकुंकू समारंभाला “ गॉसिप कट्ट्या ” चे स्वरूप येयील. हे सर्व टाळावे. श्रावण
, मार्गशीर्ष , नवरात्र अश्या पवित्र दिवसात “श्री सूक्ताचे ” पठण अवश्य करावे .कुंकुमार्चन
करावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते .
अनेक वेळा मनात असूनही अनेक गोष्टी मनुष्यबळ कमी म्हणून
घरात होत नाहीत मग अश्यावेळ आपल्या घरात काम करणाऱ्या स्त्रीला काहीतरी दान करावे
,निदान शिधा तरी द्यावा तसेच नवरात्रात जवळच्या देवीच्या मंदिरात सव्वा किलो हळद
कुंकू देवीला अर्पण करावे. दर्शनाला आलेल्या स्त्रिया ते लावतील आणि देवीला तुमची
हि सेवा पोहोचेल.
देवीची पूजा ,अभिषेक , नामस्मरण , सवाष्ण भोजन , तीर्थाटन
,हळदकुंकू , कुंकुमार्चन अश्या विविध प्रकाराने आपण देवीची आराधना , सेवा करू शकतो
.
मैत्रिणिनो, आपल्याला भिशी साठी ,मॉल मध्ये शॉपिंग ला खूप
वेळ असतो, नसला तर ह्या सर्व गोष्टींसाठी आपण आवर्जून वेळ काढत असतो ,जगभर फिरायला
आपल्याला वेळ असतो पण आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेसाठी आपल्याला अनेक कारणे, सबबी
सुचतात. मनुष्य हा ऐहिक सुखाचा भोक्ता आहे पण हे सर्व करताना आपली पारमार्थिक
शिदोरीही पुण्याने भरलेली हवी ह्याचे भान असले पाहिजे. पुढील जन्मात आपल्याला पुण्यसंचय
घेवूनच जायचे आहे .
ह्या सर्वाउपर प्रत्येक स्त्रीने दुसर्या स्त्रीचा आदर
करायलाही शिकले पाहिजे. आपल्या समाजात आज स्त्रीच स्त्रीची शत्रू झाल्यासारखे
चित्र बरेचदा दिसते. आपण स्त्रीचा सन्मान केला तर ते आपल्या देवीलाही आवडेल ,विचार
करा .
कुलस्वामीनीचा आपल्या घरावर ,कुटुंबावर ,मुलाबाळांवर वरदहस्त
असतो आणि तो अखंड राहावा म्हणून त्या आईचे नित्य स्मरण केले पाहिजे तसेच हा वारसा
आपल्या पुढील पिढीलाही सुपूर्द केला पाहिजे .
देवाची पूजा , नामस्मरण हे सर्व “ Old Fashion ” नाही तर तो कित्येक पिढ्यांचा पूर्वापार चालत आलेला वसा आहे. ह्या सर्वांमुळे कुलस्वामिनी आई आपल्यावर ,आपल्या लेकरांवर कृपाछत्रच धरते ह्यात दुमत नसावे. आपल्याला जसे जमेल तसे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या देवीचे नित्य स्मरण करत राहावे जे फलदायी आहेच आहे.
आपण कितीही “ Modern ” झालो तरी आपली पाळेमुळे आपल्या
संस्कृतीत भक्कम रुजलेली आहेत आणि त्याची जपणूक आपल्यालाच करायची आहे.
उद्या मार्गशीर्ष मासातील अखेरच गुरुवार आहे. आपल्या
कुलस्वामिनीच्या आशीर्वादाचे अभिलाषी असणारे आपण सर्वच उद्यापासून आपल्या कुलस्वामिनीच्या
सेवेत रुजू होऊया आणि तिच्या कृपाप्रसादाचा निरंतर लाभ घेवूया.जे आधीपासूनच सेवेत
असतील त्यांनी आपली उपासना वाढवावी आणि नसतील त्यांनी सुरवात करावी.
तुम्हाआम्हा सर्वांवर देवीची अखंड कृपा राहूदे हीच तिच्या
चरणी प्रार्थना.
आई अंबाबाईचा उदो उदो .
अस्मिता
लेख आवडल्यास जरूर अभिप्राय द्या.
#महालक्ष्मी#अंबाबाई#कृपा#प्रसाद#नामस्मरण#सौभाग्य#देवी#दर्शन#हळदीकुंकू
#देवीचागोंधळ
Dear Asmita,your artcli is indded very good,very good id underststement.I liked it very much.Now you have developed the art of writing really nice.I am proud of you.Think of publishing these articles eithrt in Maha Times or Loksatta.Wish you all the very best--kaka
ReplyDelete