Wednesday, 24 August 2022

ज्योतिष अध्ययन आणि विचारमंथन – भाग 1.

 || श्री स्वामी समर्थ ||



आज गुरुपुष्यामृतयोग आणि ह्या योगावर माझा 261 वा ब्लॉग माननीय गुरुवर्य श्री व दा भट सर ह्यांच्या ज्योतिष विश्वातील समर्पणाबद्दल लिहिताना मनापासून आनंद होत आहे. ज्योतिष कसे शिकावे आणि शिकवावे ह्याचे बाळकडू तुम्हाआम्हा सर्वाना पाजत अनेक पिढ्या घडवल्या त्या ह्या साधकाला हा ब्लॉग समर्पित .

ज्योतिष शास्त्राचे अध्ययन करणार्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि त्यात तरुण पिढी अधिक संखेने आहे ह्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आजच्या युवा पिढीला आपले आयुष्य घडवताना ह्या दैवी शास्त्राचा आधार घ्यावासा वाटतो आणि पर्यायाने त्याचे अध्ययन करावेसे वाटते ह्यासारखी चांगली गोष्ट ती काय . अध्ययन करायचे म्हंटले कि त्यासाठी उत्तम मार्गदर्शक लाभणे हे आपले भाग्यच.

अनेक जण ह्या शास्त्राचा अभ्यास प्रचंड उत्चाहाने , कुतूहलाने सुरु करतात पण ते आरंभशूर ठरतात . पण काही जण अगदी नेटाने मनापासून हे शास्त्र अवगत करण्यासाठी धडपडतात . कुठलेही शास्त्र हे एका क्षणात अवगत होत नाही . त्याला प्रचंड संयम लागतो कारण हि सुद्धा एक साधनाच आहे . तपश्चर्या म्हंटले तरी वावगे ठरू नये . 

अध्ययन करायचे म्हंटले कि त्यासाठी संदर्भ ग्रंथ हे पाहिजेतच . अनेक अभ्यासक मला कुठले ग्रंथ अभ्यासावेत ह्याबद्दल अनेकदा विचारतात . त्यामुळे आज एक विस्तृत लेख त्यावर लिहिण्याचा मानस प्रत्यक्षात उतरवताना आनंद होत आहे .

ज्योतिष शास्त्रातील अध्ययनासाठी माननीय गुरुवर्य श्री व. दा. भट हे नाव सहजरीतीने मनात येते . ज्योतिष शास्त्र हे सरांनी  लिहिलेल्या ग्रंथांमुळे एका वेगळ्याच उंचीवर गेले आहे ह्यात दुमत नाही . अनेक  ग्रंथांच्या 50 पेक्षा अधिक आवृत्त्या प्रसिद्ध होणे हा तुमच्या आमच्या सारख्या ज्योतिष प्रेमींसाठी एक मोठा राजयोग म्हंटला तर वावगे ठरू नये. अत्यंत साधी सोपी सामन्यातील सामान्य माणसाच्या मनाला भिडणारी रसाळ भाषा हे ह्या सर्व ग्रंथांचे वैशिष्ठ्य आहे. कुठल्याही क्लिष्ट किंवा अलंकारित भाषेचा उल्लेख नसल्यामुळे ग्रंथ चटकन हृदयाला भिडतात आणि आपल्या मनात कायमचे स्थान मिळवतात .

ज्यांनी ह्या शास्त्रात नुकतेच पदार्पण केले आहे किंवा अभ्यासाला सुरवात केली आहे अश्या सगळ्या नवश्या गवश्यासाठी सरांचे ग्रंथ म्हणजे अभूतपूर्व ज्ञानाची दालने उघडणारी गुरुकिल्ली आहे . ह्या शास्त्राचे ग म भ न गिरवणाऱ्या सर्वांसाठी सरांनी त्यांची ग्रंथरूपी शिदोरी बहाल केली आहे जी आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे . 

फलज्योतिष शिकताना सर्वप्रथम शास्त्राची तोंडओळख आणि परिचय ह्यासोबत पत्रिकेचा गोषवारा , 12 भाव , ग्रह ,नक्षत्र ह्या सगळ्या मुलभूत गोष्टींचा विचार सरांच्या “ कुंडली तंत्र आणि मंत्र भाग 1 आणि २ “ ह्या ग्रंथातून सहज उलगडताना दिसतो .असंख्य ग्रहयोगांची निर्मिती आणि त्याद्वारे फलित कथन करणारे “ फलित तंत्र “ , “ समग्र ग्रहयोग “ आणि “संचित दर्शन “, “ कुंडली एक अभ्यास “, “ असे ग्रह अश्या राशी “, त्याचसोबत “ पंचम स्थान “ ,” सप्तम स्थान “ ,” वृश्चिक लग्न “ ह्यासारख्या त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास ह्या शास्त्राचे अनेक कंगोरे आणि परिसीमा दर्शवणारा आहे. प्रश्नशास्त्रासाठी सुद्धा त्यांनी केलेले ग्रंथ रुपी मार्गदर्शन मोलाचे आहे. बदलत्या काळाप्रमाणे ज्योतिष संज्ञा सुद्धा बदलत आहेत आणि म्हणूनच आता पत्रिकेतील “ हर्शल नेप प्लुटो “ ह्या ग्रहांना डावलून चालणार नाही .

देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे ह्या उक्तीला धरून सरांनी त्यांच्या ज्ञानाचा वसा ग्रंथांच्या माध्यमातून समस्त ज्योतिष प्रेमींच्या सुपूर्द केला आहे. हातचे काहीही राखून ठेवले नाही . प्रत्येकाला अध्ययनाची दिशा दाखवणारे हे ग्रंथ अनमोल आहेत पण नुसते हे ग्रंथ वाचून झाले म्हणजे ज्योतिष आले असे म्हणता येणार नाही . ज्योतिष हे तर्कशास्त्र आहे आणि प्रत्येक विषयावरील किंवा घटनेवरील अध्ययनासोबत चिंतन मनन करण्याची सवय अभ्यासकांनी स्वतःला लावली पाहिजे , ह्याचा उल्लेख पावलोपावली सरांनी स्वतः त्यांच्या ग्रंथातून केला आहे. अनेक विषय हे चिंतनशील आहेत आणि त्यातूनच एखाद्या ग्रहयोगाचे रहस्य उलगडते . 

आजकाल अध्ययन करणे पूर्वीच्या काळापेक्षा सुलभ झाले आहे . आता इंटरनेट चे युग आहे . त्यामुळे युट्युब , whatsapp ह्या सर्व माध्यमातून जग अधिक जवळ आले आहे , त्यातून होणारी विचारांची देवाण घेवाण आपल्याला ज्योतिष जगतात वाटचाल करण्यास उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरत असते पण सरतेशेवटी आपले त्यातील वयक्तिक योगदान स्पृहणीय  आहे. प्रत्येक ज्योतिष जाणकार किंवा अभ्यासकांनी सरांची ग्रंथरूपी ज्ञानाची शिदोरी घेवून प्रवास सुरु केला तर फलादेशाची उंची समर्थपणाने गाठता येयील असा विश्वास वाटतो . 


मला चंद्र शुक्र समजले असे न म्हणता पुन्हा पुन्हा हे ग्रंथ वाचत राहिले तर त्यातून तुम्हाला हे ग्रह प्रत्येक वेळी नवनवीन रुपात भेटत जातील आणि अभ्यासाला विशिष्ठ लय आणि गती प्राप्त होईल. आज आपण असंख्य परीक्षा देतो आणि अनेक पदव्या प्राप्त करतो . पण एखादी पदवी एखाद्याला नेमकी कश्यासाठी दिली गेली आणि त्याने कुठले नवीन नियम किंवा सिद्धांत मांडले हे समजत नाही . ते हि जाणून घेतले पाहिजे किंबहुना त्यासंबंधी उहापोह झाला पाहिजे असे वाटते . त्यांनी लिहिलेले प्रबंध त्यातील विषय आणि त्यांचे संशोधन त्यातून तयार झालेले नियम , सूत्रे हि शास्त्राला किती पावले पुढे नेत आहेत हे समजले तर अभ्यासकांना त्याचा निश्चित फायदा होईल.

ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्म ह्या नाण्याच्या २ बाजू आहेत त्यामुळे प्रत्येक ज्योतिषाने वयक्तिक साधनासुद्धा केली पाहिजे. आपण स्वतः साधक नसू तर दुसर्याला आपण कशी उपासना सांगू शकणार . अध्यात्माची जोड असेल तर जातकाचे अंतरंग समजून घेण्याची कला लवकर साधते . 

चंद्रमा मनसो जातः ,चंद्र जितक्या वेगाने पळत असतो तितकेच कुंडली पाहताना ज्योतिषाचे मन आणि विचार सुद्धा . पण ह्या सर्वात फलादेश चुकू न देणे हे कसब आहे. एखाद्याच्या आयुष्यावर बोलायचे म्हणजे खचितच सोपी गोष्ट नाही . ते समर्थपणे पेलण्यासाठी सरांच्या ग्रंथांची शिदोरी नक्कीच उपयुक्त ठरते . ह्या सर्व ग्रंथांचे वैशिष्ठ म्हणजे जातकांच्या विचारांना योग्य दिशा देणे. ह्या ग्रंथ वाचनातून  शास्त्र शिकल्याचा नाही तर नवनिर्मितीचा सुद्धा आनंद मिळतो. सरांची ज्योतिष शास्त्रातील वाटचाल म्हणजे एका तपस्वीची वाटचाल . त्यांच्या ज्ञानापेक्षाही त्यांना समृद्ध करत गेले ते त्यांचे अनुभव आणि ते अगदी तसेच्या तसे अनेक उदाहरणातून त्यांनी आपल्या समोर कथन केले आहेत . त्यांनी ज्योतिषांच्या अभ्यासाला वेगळी दिशा देताना वेगळा विचारही करायला लावला जसे मेषेचा शुक्र असो कि मकरेचा शुक्र ...प्रत्येक गोष्टीत साधक बाधक विचार करायला ,आत्मचिंतन करायला भाग पाडले. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या ह्या ग्रंथांनी अनेक ज्योतिष प्रेमीना ज्ञानाचा वारसा मिळवून दिला. मला त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले नसले तरी त्यांच्या ग्रंथ वाचनातून मी समृद्ध होत गेले . 

ज्योतिष हि साधना नव्हे तर तपश्चर्या आहे . ह्या तपोमहर्शिनी त्यांचे संपूर्ण जीवन ज्योतिष तपश्चर्येत व्यतीत केले. प्रत्येक क्षणी मी इतरांना काय देऊ शकतो ह्याचा विचार करणाऱ्या सरांबद्दल लिहावयास माझी शब्दसंपदा तोकडीच पडेल. आज ज्योतिष अभ्यासकांनी कुठले मुलभूत ग्रंथ वाचावेत हा विषय आला म्हणून हा लेखन प्रपंच . ह्या शास्त्रात इतर असंख्य अभ्यासकांनी त्यांच्या ज्ञानाचे आणि अनुभवांचे योगदान दिलेलं आहे . लेखन सीमेमुळे सर्वांची नावे समाविष्ट करता येत नाहीत पण तरीही श्री (कै.) वसंतराव गोगटे आणि श्री. विजय हजारी ह्यांचा उल्लेख केल्याशिवाय लेखाची पूर्तता होणे अशक्य आहे. 

ज्योतिष हि दैवी विद्या आहे आणि ती शिकण्यासाठी समर्पण , चिकाटी , संयम आणि तळमळ हवीच हवी . ह्या सर्वांची मोट बांधली तर उत्तम गुरूंचा लाभ होऊन ज्ञानप्राप्ती हि होईल ह्यात शंकाच नाही . 

असंख्य ज्योतिष जाणकारांना आपल्या ज्ञानरुपी ग्रंथांच्या माध्यमातून ज्योतिषा सारख्या क्लिष्ट विषयाची गोडी लावून पिढ्याच्या पिढ्या तयार करणार्या ह्या प्रतिभावान गुरूना माझा साष्टांग दंडवत आणि त्यांच्या असामान्य प्रतिभेला , ज्ञानाला मानाचा सलाम .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क    : 8104639230






No comments:

Post a Comment