|| श्री स्वामी समर्थ ||
हिंदू संस्कृती मध्ये विवाह हा 16 संस्कारातील एक संस्कार आहे. विवाहाच्या गाठी स्वर्गात जरी बांधल्या गेल्या असल्या तरी ते संपन्न ह्या भूतलावर होतात . विवाह हा आयुष्यातील सर्वात मोठा बदल . एक नवीन नाते जे अनेक अपेक्षा आणि स्वप्न उराशी घेवून येते . हे नुसतेच दोन जीवांचे मिलन नसून दोन कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिलन म्हंटले तर वावगे होणार नाही.
आज ज्योतिषीय दृष्टीकोणा तून ह्याकडे थोडे पाहूया . विवाह म्हंटला कि डोळ्यासमोर येते ते पत्रिकेतील सप्तम स्थान कारण तेच आपल्या जोडीदाराचे स्थान आहे. सप्तमस्थानात त्या दोघांचे मनोमिलन आहे म्हणूनच तिथे गोडवा जपणारी शुक्राची तूळ राशी आहे. आजवर जपलेली नाती आणि आता गुंफले जाणारे नवीन नाते ह्यात समतोल राखा असेच जणूकाही ह्यातून सूचित होते . द्वितीय भाव विचारात घ्यावा लागतो कारण तिथे आपले कुटुंब आहे. एक नवीन नाते घडत असताना कुटुंबात सुद्धा एका सदस्याची भर होते म्हणजेच कुटुंब वृद्धी होते आणि द्वितीय भाव कुटुंब दर्शवतो म्हणून तोही विचारात घ्यावा लागतो. विवाह मुळे व्यक्तीला होतो तो लाभ आणि इच्छापूर्ती म्हणून लाभ भाव आणि अनेकदा प्रणयाच्या रंगाची परिणीती विवाहात होते म्हणून 5 भाव सुद्धा पाहावा लागतोच .
जन्म हा मुळातच कामवासनेतून झालेला असतो आणि त्याचा प्रमुख ग्रह शुक्र , त्याला उर्जा देणारा मंगळ तसेच सप्तमेश आणि अर्थात गुरु ह्या ग्रहांचे पत्रिकेतील स्थान आणि विवाहाच्या समयी चालू असणारी महादशा अभ्यासावी लागते .
अनेकदा विवाहात फसवणूक होते मग आपण समोरच्या व्यक्तीला दोष देऊ लागतो . त्यांनी आमची फसवणूक केली . पण त्याने तुमचीच का फसवणूक केली ? कारण फसवणूक करून घेण्याचे किंवा फसण्याचे ग्रहयोग तुमच्याच पत्रिकेत आहेत म्हणून तुम्ही फसलात. पूर्वजन्मीचे हे संचित कर्म आहे . तुम्ही कुणाला तरी फसवलेत म्हणून आता कुणीतरी तुम्हाला फसवले . म्हणून इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतःच्या पत्रिकेतील योग नीट समजून घ्या .
विवाहासाठी स्थळे पाहताना पालक अनेक प्रश्न विचारात असतात त्यातील सातत्याने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “ आम्हाला साजेसे , हवे तसे स्थळ का नाही मिळत ? कुठे चेहरा पसंत नाही तर कुठे पत्रिका जुळत नाही . मग मनासारखे स्थळ मिळणार तरी कधी आणि कसे ? हे प्रश्न वर आणि वधूच्या पालकांना भेडसावत असतात .
विवाह हा सुद्धा योग आहे आणि जेव्हा त्याला पोषक अशी ग्रहस्थिती असते तेव्हाच असे योग जुळून येतात . हि ग्रहस्थिती नैसर्गिक रीतीने येते तेव्हाच विवाह जुळून येतो . आपण ओढून ताणून तर ग्रहयोग तयार करू शकत नाही . महादशा स्वामी त्याचा हक्क आणि अधिकार बजावणारच त्याला आपण डावलून काहीच करू शकत नाही. एखादा महादशा स्वामी विवाह ह्या घटनेचे समर्थन करतच नाही म्हणून मग अश्या ग्रहाची दशा वयाच्या 27 28 ला सुरु झाली आणि वयाच्या 43 45 पर्यंत असेल तर तेव्हड्या कालावधीत विवाह जमत नाही आणि ओढून ताणून केला तर यशस्वी होत नाही. योग्य वेळेची वाट पाहणे हेच आपल्या हाती असते . अनेकदा महादशा स्वामी पूरक असेल तरी योग्य अंतर्दशेची वाट पहावी लागते . दोन्ही योग जुळले तर विवाहा साठी मार्ग मोकळा होतो. स्थळ पसंत पडते . अनेकदा विवाह होतो पण पतिसुख कमी असते कारण कुठेतरी षष्ठेश ठाण मांडून पतीसुखात विघ्न आणत असतो मग अश्यावेळी नवरा परदेशी गेलाय पण पत्नीला त्याच्याकडे जाण्यासाठी विसा मिळत नाही . नवर्याची रात्रपाळीची नोकरी आणि पत्नीची दिवसाची , नवर्याची दुसर्या शहरात बदली होते पण पत्नी मुलांच्या शाळा आणि इतर गोष्टींमुळे त्याच्यासोबत जाऊ शकत नाही . ह्या गोष्टी सुद्धा आपण स्वीकारल्या पाहिजेत , पत्रिकेतील हे सर्व योग आपल्या पूर्व संचीताप्रमाणे आहेत आणि ते जाणून घेवून आहेत तसेच स्वीकारले तर त्यात शहाणपण आहे. प्रत्येक गोष्टीला उपाय नसतो त्यामुळे आहे ते स्वीकारले तर आयुष्य अधिक सुकर होयील. उगीचच लग्नात गुरु आला आणि सप्तमात गुरु आला मग विवाह होईल असे म्हणणे उचित होणार नाही कारण दशा स्वामी जोवर अनुकूल होत नाही तोवर योग येणारच नाही .
सप्तमेशासोबत असणारे पापग्रह , विशेषतः हर्शल नेप तसेच सप्तमातील आणि त्यावर दृष्टी टाकणारे पापग्रह सुद्धा विवाहात अनेक अडथळे निर्माण करतात . एखाद्या पत्रिकेत उत्तम विवाह सुख असेल तर उशिरा झाला तरी , विवाह उत्तम पार पडतो कारण मुळातच वैवाहिक सुख आहे म्हणून उत्तम वैवाहिक सुख असणार्या पत्रिका गुण मिलनासाठी येतात आणि विवाह संपन्न होतो.
एखाद्या पत्रिकेत वैवाहिक सुख दुरदुरपर्यंत दृष्टीक्षेपात नसेल तर तश्याच म्हणजे वैवाहिक सुख नसणाऱ्या पत्रिकाच सांगून येतात किंवा उत्तम पत्रिका आल्या तर त्यांचे गुण आपल्या पत्रिकेत जुळणार नाहीत . आपल्या पत्रिकेत जसे योग असणार तश्याच पत्रिका आपल्याला सांगून येणार .त्यामुळे मुळात आपले ग्रहमान खुल्या दिलाने स्वीकारता आले पाहिजे . उगीचच डोंगरा इतक्या अवाजवी अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून ठेवण्यात तसाही काही अर्थ नाही.
प्रत्येकालाच परीकथेतील राजकुमार हवा असतो .पण आपल्या नशिबाप्रमाणे मिळालेला जो कुणी आहे तोही राजकुमारा पेक्षा कमी नाही हा भाव ठेवला तर वैवाहिक सुख उत्तम लाभेल . विवाहच नाही तर आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा एक योग असतो आणि शहाणा माणूस योग्य वेळेची वाट पाहतो .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230