|| श्री स्वामी
समर्थ ||
ग्रहमालिकेतील सर्वात लहान ग्रह “ बुध “ हा राजकुमार आहे . राजकुमार म्हणजे लहान
मूल जे एकटे राहू शकत नाही त्यामुळे बुध प्रधान व्यक्ती सुद्धा एकट्या राहणे पसंत
करत नाहीत किबहुना राहूच शकत नाहीत . आपणही लहान मुलाला घरात एकटे ठेवुन जात नाही
. बुध सुद्धा राजासोबत म्हणजेच रवी सोबत राहणे पसंत करतो म्हणून पत्रिकेत रवी आणि
बुध एकच भावात किंवा पुढे मागेच असतात . लहान मुल नेहमीच सोबत असणार्या व्यक्तीचे
अनुकरण करते त्यामुळे बुध ज्या ग्रहासोबत असेल त्याचेही फळ प्रदान करतो. सोशल
मिडीयावर सतत संपर्कात राहणारे हे लोक असतात .
बुध हा शब्द आणि संवादाचा कारक त्यामुळे त्याला वाणी म्हंटलेले आहे. आपले उत्पादन
ग्राहकाला उत्तम रीतीने विकणाऱ्या लोकांचा बुध निश्चित चांगलाच असणार . हा बुध
उत्तम असेल तर कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त आशय आणि उत्तम संवाद कौशल्य असते पण
बिघडला असेल तर वायफळ गप्पा आणि अघळपघळ बोलणे असते . एखादी गोष्ट उगीच मोठी करून
सांगणे आणि बातम्या पसरवणे हे बिघडलेल्या बुधाचे काम आहे. बुधाची मिथुन रास तृतीय
स्थानात येते जिथून आपण जाहिरात क्षेत्र आणि मिडीया बघतो. बातम्या वेगाने वार्यासारख्या
( वायुतत्व ) पसरवणे ह्याच स्थानातील मिथूनेच्या बुधाचे काम . पूर्वीच्या काळी एका
गडावरून दुसर्या गडावर शिवाजी महाराजांचा दूत खलिता घेवून जात असे तो हा बुधच.
उत्तर दिशा बुधाकडे
आहे , बुध हा पृथ्वी तत्वाचा असून नपुंसक ग्रह
आहे. बुध प्रभावित व्यक्ती खूप विद्वान आणि उत्तम आकलनशक्ती असणार्या आपल्या
बहारदार प्रभावी वक्तृत्वाने समोरच्याला प्रभावित करणाऱ्या असतात . Multi-Talented असतात. बुध म्हणजे संवाद त्यामुळे हजरजबाबी
, शब्दांच्या कोट्या करणारे हे लोक असतात . म्हणूनच बुधाला बिरबलाची सुद्धा उपमा
दिली आहे. थोडक्यात काय वाकचातुर्य म्हणजे बुध . निसर्ग कुंडलीत बुधाच्या दोन राशी
अनुक्रमे मिथुन तिसर्या आणि कन्या षष्ठ स्थानात येतात . बुधाकडे पृथ्वीतत्व आहे
आणि पृथ्वी आपल्या पोटात अनंत गोष्टी साठवत असते . आपल्या निसर्ग कुंडलीत सुद्धा
षष्ठ स्थानात पोट येते जिथे कन्या हि बुधाची रास आहे . आपणही पोटात अन्न साठवतो
आणि गर्भ सुद्धा नऊ महिने इथेच स्थिरावतो .
मिथुन राशीकडे
लेखणी , मिडिया , अग्रीमेंट , कागदपत्रे , छपाई , हिरवी शाई दिलेली आहे . उत्तम
व्यावसायिक ,लेखक , संपादक , जाहिरात क्षेत्रात काम करणारे लोक , शाब्दिक कोट्या करणारे वकील , शिक्षक , अध्यापक
, वस्तू विकणारे मार्केटिंग करणारे आणि गणिती हे सर्व उत्तम बुध असणार्यांमध्ये येतील.
बुधाला सर्वात अधिक बिघडवणारा ग्रह म्हणजे राहू . राहू म्हणजे फसवणूक , खोटे बोलणे
, खोट्या सह्या , खोटी बनावट कागद पत्रे तयार करणे हे राहू बुधाचे षडयंत्र .
बुधाची मिथुन राशी तृतीय स्थानात येते जिथे आपले हात येतात . हातचलाखी करणाराही हा
बुधच आहे. बुधाकडे मज्जासंस्था आणि बुद्धी दिलेली आहे . बुद्धी फिरली तर नको ती
संकटे मनुष्य ओढवून घेतो आणि नको त्या गोष्टीत अडकतो किंवा फसतो .बुध पत्रिकेत चांगला
असेल तर प्रत्येक काम पूर्णत्वाला जायील नाहीतर नाही. बुध चांगला असेल तर बुद्धी
चांगली आणि चांगल्या बुद्धी असेल तर हातून चांगलीच कामे होणार अन्यथा नाही.
शब्दांची जादू हि व्यक्तीला चांगल्या किंवा वाईट मार्गात सुद्धा नेणारी असते ,
प्रलोभनात फसवणारी असते .
बुधाकडे त्वचा आहे
आणि त्वचेला एक प्रकारचा वास आहे आणि हा ओळखण्याचे चातुर्य श्वानाकडे असल्यामुळे
गुन्हेगाराला शोधण्यासाठी पोलीस दलाकडे श्वानपथक तैनात असते. बुधाकडे त्वचा आहे
आणि पत्रिकेत बुधासमोर चंद्र असेल तर स्वभावात चांचल्य , धरसोड वृत्ती आणि त्वचा
विकार संभवतात . चंद्राच्या किंवा बुधाच्या महादेशेत हि फळे प्रकर्षाने मिळतात .
बुध हा मेंदू ,
स्मरणशक्ती , मज्जासंस्था ,चयापचय क्रिया, थायरोईड ग्रंथी , वाचा , स्पर्श , फुफुस्से
, अभिव्यक्ती आहे. बुध म्हणजे संवाद आणि संवाद आला कि शब्द आलेच. वृश्चिक राशीत
खोल पाताळ आहे आणि गुड्डूप्प अंधार . बुध हा लहान मुल आहे तो तिथे घाबरणारच ना
त्यामुळे ज्यांचा बुध हा वृश्चिक राशीत असतो ते कमी बोलणारे , सहसा व्यक्त न
होणारे असतात . पण हाच बुध बिघडतो तेव्हा बोलण्यात तोतरेपणा ,अडखळत बोलणे ,
निद्रानाश , बुध त्वचेचा कारक असल्यामुळे कोड , मानसिक दौर्बल्य , झोपेचे
प्रोब्लेम ऐकू कमी येणे , स्मरणशक्ती कमकुवत करतो. बुध चांगला असेल तर उच्चार
स्पष्ट आणि अनेक भाषांवर प्रभुत्व असते .
बुधाला लहान मुलाची उपमा दिलेली असल्यामुळे मिथुन लग्न किंवा मिथुन राशीच्या
व्यक्ती त्यांच्या असणार्या वयापेक्षा लहान दिसतात कारण बुध वय लपवतो . बुध पत्रिकेत
सुस्थितीत असेल तर लहान मुलासारखे मस्तीखोर , क्रिएटीव्ह , कल्पनेत रमणारा पण
आनंदी , खोडकर स्वभाव असतो .
शब्द , संवाद आणि
बातम्या ह्यावर बुधाचाच अंमल असल्यामुळे ग्रंथलेखन , ज्योतिषी , संपादक , पुस्तक
विक्रेते , लहान मुलांची बाल गीते , एजंट , वकील , सेल्स मन, भाषा शिकवणारे , कुरिअर
मध्ये काम करणारे , निरोपे, गणिती , राजदूत , पोस्टखाते ,छपाई करणारे
,संगणकाचे व्यवसाय करणारे ह्यात येतात.
बुध जेव्हा वक्री
होतो तेव्हा जिव्हा म्हणजेच वाणी सांभाळणे आवश्यक असते . अनेकदा ग्रह वक्री असताना
कायम स्वरूपी परिणाम देतात . ह्या काळात कुणालाही बोलून शब्दानेही दुखवले तर
आयुष्यभराचे संबंध बिघडतील. बुधाकडे करारमदार आहेत त्यामुळे बुध वक्री असताना
अग्रीमेंट मध्ये फसवणूक , वाटाघाटी फिसकटणे हे प्रकार हमखास घडतात .ज्यांची बुध
राहू युती आहे त्यांनी आणि राहू महादशा चालू आहे बुध वक्री असताना विशेष काळजी
घ्यावी. फसवणूक होऊ नये म्हणून कागदपत्र तपासावे तसेच बोलून आपली पत आणि शब्द वाया
घालवण्यापेक्षा श्रवण भक्ती करावी .
ज्योतिषी , गणितज्ञ , समुपदेशक ह्यांच्या पत्रिकेत बुध उत्तम असावा लागतो . दुसर्यावर
आपला प्रभाव टाकणे हे बुधाचे कौशल्य आहे . उत्तम वक्तृत्व हेही बुधाकडेच आहे. तसेच
रोखठोक वाणी आणि परखड शब्द सुद्धा बुधाचीच देण आहे .
बुध हा बोलघेवडा आहे त्याच्याकडे हिरवी शाई आहे. बुध बिघडला असेल किंवा अधिक सक्षम
करायचा असेल तर बुधवारी (निदान 11 बुधवार ) गाईला हिरवा पाला किंवा पालक खायला
घालावा . हिरवे मुग दान करावेत आणि जेवणात सुद्धा हिरव्या पालेभाज्या समाविष्ट
कराव्यात . बुधवारी विष्णूचा जप करावा. दर पौर्णिमेला सत्यनारायणाचे पूजन करावे .
माणसाची बुद्धी सरळ
चालेल कि तिरकस ह्यावर आपले संपूर्ण आयुष्य आणि मिळणारे यश ,मानमरातब आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाचाही आनंद असतो. काहीही
झाले तरी चुकीचे निर्णय घेवून आपले सुंदर आयुष्य मातीमोल करू नये.
सौ. अस्मिता
दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment