Friday, 22 September 2023

केतू

 || श्री स्वामी समर्थ ||


कुंडली अभ्यासताना आपले लक्ष्य लग्न , लग्नेश आणि चंद्र ह्याकडे प्रथम जाते आणि त्यानंतर आपण सर्वच ग्रहांचा अभ्यास करतो. पण विशेष लक्ष्य जाते ते राहू आणि केतू ह्यांच्याकडे . सर्वसाधारण लोकात राहू आणि केतू म्हंटले कि लगेच घाबरणे, नकारात्मक विचार हि पहिली प्रतिक्रिया असते . माझी राहूची , केतूची दशा आहे आता माझे काही खरे नाही किंवा आता काय ? हे प्रश्न पडतात ह्याचे मुळात कारण आपला चुकीचा दृष्टीकोण आणि अर्धवट ज्ञान जे अधिक घातक असते. कुठेतरी काहीतरी वाचायचे आणि ते आपल्याच असे बाबतीत होणार हा चुकीचा निष्कर्ष काढायचा .असो .


राहू आणि केतूची पौराणिक गोष्ट सर्वाना माहित आहे. एका अमृताच्या थेंब प्राशन करून  ते आयुष्याची लढाई लढताना दिसतात . आपल्याला ज्या गोष्टींचा ध्यास आहे किंवा ज्या मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते त्या सर्व इच्छा राहू प्रेरित करतो आणि ज्या गोष्टींपासून आपल्याला विरक्त व्हायचे असते त्या केतू निर्देशित करतो. राहुकडे दृष्टी आहे त्यामुळे त्याला ह्या जगातील भौतिक सुखांची लालसा आहे आणि केतुकडे फक्त मन आहे तो मनाने ह्या जगाकडे पाहतो त्यामुळे केतू आपल्याला अंतर्मुख करतो.


आपल्या गतजन्मातील कर्माशी आपल्या ज्या जन्माची नाळ जोडलेली आहे आणि पूर्व जन्मीची कर्मे केतूच दर्शवत असतो .आपले प्रथम नक्षत्र सुद्धा “ अश्विनी “ आहे जे केतुचेच आहे . केतुकडे दृष्टी नाही त्यामुळे तो ह्या सुंदर जगाचा आस्वाद इच्छा असूनही घेवू शकत नाही पण त्याच्याकडे मनाचे नेत्र आहेत तो मनाने पाहू शकतो . मन म्हणजेच अंतर्मन म्हणूनच केतूच्या दशेत जातक विरक्त होऊन आपल्या आतमध्ये पाहणे म्हणजेच अंतर्मुख होत अध्यात्माकडे वळवतो. मुळातच पत्रिकेत गुरु चांगला असेल आणि केतुही तर नक्कीच उपासना ध्यान धारणा ह्याकडे व्यक्तीचा कल असतोच असतो. 

उपासना मारून मुटकून करून घेता येत नाही तर ती वृत्ती मुळातच व्यक्तीमध्ये असावी लागते आणि ती केतूच देतो .पूर्वजन्मीचा आरसा म्हणजे आपली पत्रिका आणि त्यानुसार असते ती आपल्या सर्वच ग्रहांची बैठक पण पूर्व जन्मीच्या कर्माचा हिशोब केतुकडे असतो ज्याला आपण संचित कर्म म्हणतो.

ज्या गोष्टीचा पूर्ण आस्वाद किंवा भोग आपण पूर्वीच्या जन्मात घेतले असतील त्या गोष्टी आणि आता ह्या जन्मात आपल्याला नको आहेत आणि त्याच गोष्टींपासून केतू आपल्याला विरक्त करतो . उदा केल्या जन्मात वडिलोपार्जित संपतीचा उत्तम उपभोग व्यक्तीने घेतला असेल तर ह्या जन्मात त्या व्यक्तीला त्याची हाव नसणार . वडिलोपार्जित संपतीसाठी त्याचा हव्यास किंवा हाव नसेल . आईवडिलांच्या इच्छे नुसार आपल्याला जे मिळाले आहे तो त्यांचा आशीर्वाद समजून तो आपले आयुष्य व्यतीत करेल .पण राहुला  गेल्या जन्मात हि संपत्ती उपभोगायला मिळाली नसेल तर तो मात्र ह्यासाठी हव्यास नक्कीच करेल. पण त्याला ती मिळेलच असेही नाही. ती मिळवण्यासाठी तो धडपड मात्र करत राहील.

राहुकडे हव्यास आहे desire आहे तर केतुकडे विरक्ती आहे. व्यक्तीकडे एखाद्या कलेसाठी रुची असेल पण त्यात तो पुढे जायील असे नाही हाच केतू आहे. अश्या लोकांमध्ये नैसर्गिक काही गोष्टी असतात पण ते त्या व्यक्त करणार नाहीत कारण केतू त्यांना त्या त्यापासून विरक्त करेल.

दशमात केतू असेल तर त्याने स्वताहून आपल्या कामात रुची घेतली तर ती व्यक्ती खूप यशस्वी होऊ शकेल. केतू ज्या स्थानात आहे तो भाव बघा . त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी तुम्हाला नैसर्गिक रित्या येत आहेत पण करायच्या नाहीत . पण त्या केल्या तर त्यात तुम्हाला यश नक्कीच आणि सहज मिळेल. 


मिथुन राशीत केतू असेल तर?  मिथुन रास हि बुधाची आहे आणि सोशल आहे . ह्या लोकांना इतरांच्या संपर्कात राहणे निसर्गतः आवडते पण त्या गोष्टी ते करत नाहीत म्हणजे इतरांच्या संपर्कात राहत नाहीत कारण त्यात केतू आहे . पण स्वताहून जर ह्या व्यक्ती सोशल झाल्या तर त्या इतरांच्या संपर्कात सहजतेने येतील आणि काहीच दिवसात अनेक फॉलोअर्स पण मिळवतील कारण संपर्क करणे किंवा संपर्कात राहणे हा त्यांच्यात नैसर्गिक असलेला गुण आहे ज्याचा वापर ते करतच नाहीत .

केतूला कळसावर असलेल्या पताकेचा मान आहे म्हणूनच वारकरी आपल्या लाडक्या माउलीचे दर्शन त्या पताकेत पाहतात आणि तृप्त होतात . पत्रिकेत गुरु चांगला असेल तर अध्यात्मिक प्रगती होईल पण केतुही जोडीला असेल तर तुमच्या मनाच्या तारा सद्गुरूंच्या हृदयाशी नक्कीच जोडल्या जातील.  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


 


1 comment:

  1. अगदी योग्य आणि पटण्यासारखे

    ReplyDelete