|| श्री स्वामी समर्थ ||
आज लग्न हा जणू “ यक्षप्रश्न “ झाला आहे. मुलामुलींची वाढती वये आणि त्यांच्या अपेक्षांचे ( अवाजवी आणि अवास्तव ) ओझे आता पालकांना सुद्धा सोसवेनासे झाले आहे. आजवर मी केलेल्या अनेक विवाह गुण मिलन आणि समुपदेशनातून आलेले अनुभव आपल्यासोबत शेअर करत असते . असाच हा आलिकडचा अनुभव शेअर करावा म्हणून हा लेखन प्रपंच .
चार वर्षापूर्वी एका मुलीची पत्रिका पहिली होती . विवाहाची दशा लागली आहे म्हंटल्यावर तो संपन्न होणारच . काही भाव विरोधीही होते म्हणजे तडजोड सुद्धा करावी लागणार हे सूचित होत होते .स्थळे पाहणे चालू होते . काही स्थळे जुळली सुद्धा अगदी गुण , ग्रह पण मुलीच्या अटी बघा . तिला 10 लाख पगार होता त्यामुळे मुलाला 12 च्या पुढे पगार हवा . ठीक आहे पण त्याला 8 लाख पगार होता , भावंड नाहीत , आई वडिलांना पेन्शन , आर्थिक दृष्टीने समृद्ध कुटुंब , घरी अध्यात्मिक वातावरण अशी सर्व सुबत्ता होती , मुलगा मुलीला आवडला होता पण नको ती 12 लाखाची हवा डोक्यात गेली आणि स्थळ नाकारले का? तर म्हणे अजून चांगला मिळेल . पण असा विचार का नाही केला जात कि त्याचे 8 लाख आणि माझे 10 लाख मिळून 18 लाख झाले जे एक आनंदी संपन्न आयुष्य जगायला नक्कीच खूप आहेत . फक्त मी आणि माझा पगार करत राहण्यात काहीच अर्थ नाही कारण घर हे दोघांच्याही अर्थार्जानावर चालते . विवाहासाठी फक्त आणि फक्त आर्थिक स्थिती हा निकष नसावा असे वाटते . आजकाल मुलींच्या मिळकतिला match करणारे स्थळ मिळणे अनेकदा शक्य होत नाही, एकीकडे व्य वाढत जाते आणि सगळच पुढे कठीण होऊन जाते .
वरती उल्लेख केलेल्या उदा मध्ये आज 5 हून अधिक वर्ष झाली आहेत अजून तो 12 लाख मिळकत असलेला राजकुमार काही मिळाला नाही . ह्यातून घेण्यासारखा बोध असा आहे कि अपेक्षा कमी न होता वाढत जातात पण त्याचसोबत आपले वय सुद्धा वाढत जाते . वाढत्या वयामुळे मग कालांतराने स्थळे सुद्धा येयीनाशी होतात . एक वेळ अशी येते कि अपेक्षा समोर ठेवण्यासाठी समोर स्थळ च नाही. आजकालची पिढी हुशार शिकलेली ,जगभर फिरणारी नवनवीन क्षितिजे गवसणारी आहेत. मग विवाहाच्या बाबतीत जर काही ठिकाणी तडजोड केली तर तुमचेच आयुष्य मार्गी लागणार आहेत आणि तेही वेळेत .
आता ह्या मुलीच्या बाबत त्या मुलाचा पगार काही कायम 8 लाख राहणार नाही तो काळानुरूप वाढतच जाणार आहे , पुढे त्याला सुद्धा परदेशी जाण्याची संधी मिळू शकेल आणि ह्याउलट मुले लहान किंवा इतर काही प्रश्नांमुळे मुलीलाच नोकरी सोडावी लागली तर ? म्हणूनच फक्त आर्थिक बाजूवर लग्नाचा निकष न लावता इतर महत्वाच्या बाबी पहाव्यात जसे कौटुंबिक स्थिती , शिक्षण , कुठलेही व्यसन नाही ह्या गोष्टी सुद्धा लाख मोलाच्या आहेत . आता ह्या मुलाला 15 लाख पगार असता आणि तिने विवाह केला असता आणि पुढे जाऊन त्याची नोकरीच गेली असती किंवा त्याला व्यसने लागली असती तर “ पगार 12 लाख पेक्षा अधिक हवा “ ह्या so called अटीचे काय लोणचे घालायचे का? असो.
अशीच अजून एक अट म्हणजे मुलाचे स्वतःचे घर हवे . का ? अहो 28 -30 वर्षांच्या मुलांकडे कुठून येणार 2 कोटीची स्वतःची घरे . कालांतराने होतील कि. दोघे मिळून घ्या कि घर पण सुरवातीला सगळा राजमहाल सजलेला हवा ह्या अटी असतील तर स्वतःच्याच घरात कायम रहायची वेळ येते विवाह जमत जमत नाही . पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब होती तेव्हा नव्हत्या ह्या अश्या अटी . कमी पैशात आणि कमीकमी सुखसोयी होत्या तरीही संसार झालेच कि .
आज आईवडील आपल्या मुलांमध्ये भेद करत नाहीत . मुलगा असो वा मुलगी दोघानाही समान वागणूक , दोघानाही उच्च शिक्षण देतात त्यामुळे आजकाल मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यानाही लाखांनी पगार आहेत . खरतर हि आनंदाचीच बाबा आहे पण विवाह करायची वेळ येते तेव्हा त्यांच्या बरोबरीचा विशेषतः आर्थिक बाबीत मुलगा नाही मिळाला तर विवाह रखडताना दिसतो . ह्याचा अर्थ मग आम्ही काय मुलीना शिकवायचेच नाही का त्यांना परदेशी नोकरी मिळाली तर त्यांना पाठवायचे नाही का? असा त्याचा चुकीचा अर्थ काढू नये . जरूर शिकवावे , कुटुंबासाठी ती अभिमानाचीच गोष्ट आहे पण त्यांनी विवाहात थोडी सर्वच दृष्टीने तडजोड सुद्धा करावी .
एका मुलीचे समुपदेशन केले , गुणमिलन ग्रह मिलन करून दिले. त्या दोघांनी जी स्थिती आहे ती स्वीकारली आहे . दोघेही अमेरिकेत वेगवेगळ्या भागात राहतात नोकरी निम्मित्ताने , अधून मधून भेटत राहतात , अजून मुल नाही पण दोघेही आनंदी आहेत जेव्हा भेटतात तेव्हा एकमेकांच्या सहवासात प्रेमाने राहतात . कारण दोघानाही नोकरी सोडायची नाही मग त्यांनी हा पर्याय स्वीकारला आहे. असो .
समाजात काय चालले आहे किंवा इतर विवाह कसे होत आहेत त्यापेक्षा योग्य त्या वेळी योग्य तडजोड स्वीकारून आपल्या आयुष्यात कश्याला प्राधान्य द्यायचे ह्याचा विचार केला तर योग्य वेळेस डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय राहणार नाहीत .
विवाह ह्या शब्दाचा दुसरा आणि खराखुरा अर्थ “ तडजोड “ हाच आहे. 10 12 भेटीत आणि खरेद्दीच्या वेळी सुद्धा तुमच्यातील गुण अवगुण एकमेकांना समजणार नाहीत ते विवाह पश्च्यात सहवासात राहिलात कि समजणार आहेत. ते स्वीकारून पुढे गेलात , थोडा संयम ठेवलात तर संसार सुखाचा होणार ह्यात दुमत नाही . पण मला परदेशातील मुलगा हवा , त्याचे स्वतःचे घर हवे , आईवडिलांची जबाबदारी नको अश्या अपेक्षा असतील तर एकदिवस स्थळेच येणार नाहीत ह्यचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. ह्यापेक्षा मुलगा निर्व्यसनी असणे , उत्तम कौटुंबिक परिस्थिती , त्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असणे , घरात चार मोठी माणसे ( ती आज काळाचीही गरज आहे ) , आपले मन समजून घेणारा आणि अपेक्षा विरहित प्रेम करणारा जोडीदार असेल तर इतर अपेक्षा सुद्धा तो कालांतराने पूर्ण करेल हा विश्वास ठेवुन पुढे जायला काय हरकत आहे ?
आयुष्यात परिस्थिती , पगार सारखा राहत नाही पण मला हेहे असेच हवे हा आडमुठे पणा असेल तर मग बोलणेच खुंटले. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो पण तो स्वीकारून पुढे जाणारे मोठे आणि खुले मन आपल्याजवळ असायला हवे. तीच आजची खरी गरज आहे. आत्ताचे 1-2 वर्षाचे गणित न मानता पुढील आयुष्याचा विचार करा . शेवटी माणूस समाधानी असला पाहिजे . प्रत्येकाची समाधानाची व्याख्या सुद्धा वेगवेगळी असते . बायकोने उत्तम स्वयपाक केला असे आवर्जून सगळ्यांसमोर कौतुक करणारा आणि प्रेमाने संसार करणारा मुलगा कदाचित खूप भौतिक सुखे तुमच्या पदरात नाही टाकू शकणार पण आयुष्यातील आणि संसारातील आनंद मात्र तो नक्कीच द्विगुणीत करेल असा विश्वास वाटतो .
शेवटी आयुष्य एकट्याने व्यतीत करणे कठीण आहे. आपला जोडीदार आपल्या चौकटीत बसणारा मिळेलच असे नाही, कधी कधी आपल्या विचारांची चौकट बदलावी लागते तरच आयुष्याचा प्रवास आणि सहजीवन सुखमय होते . इथे कुणीही सर्वगुण संपन्न नाही ह्याचेही भान ठेवावे लागते . कालांतराने एकमेकांच्या सहवासात प्रेम वाढते आणि संसार फुलत जातो . खायीन तर तुपाशी नाहीतर उपाशी असे असेल तर मग राहा उपाशी आणि मग राहा एकटेच , काय करणार .
हा विषय खोल आणि मोठा आहे त्याला कंगोरे हि अनेक आहेत . आजकाल मुलामुलींची लग्नाची वये पाहून हे लिहावेसे वाटले. ज्योतिषाने नुसत्या पत्रिका पहायच्या नाहीत तर सामाजिक बांधिलकी , जाणीव ठेवुन आपली लग्न संस्था सुद्धा वाचवायची आहे. त्यासाठी उपवर मुला मुलींचे विवाह पश्च्यात आणि विवाहा च्या आधी योग्य समुपदेशन करायचे आहे आणि समाजाचे ऋण फेडायचे आहे. मुलांना आपल्या आयुष्यातील पुढील खाचखळगे आधीच समजले तर ते आधीच सतर्क राहतील. नुसते आपले मानधन मिळाले कि गुण किती जुळतात ते सांगणे केवळ हि व्यवहारी वृत्ती नसावी .
आता तुम्ही म्हणाल मुलांनी नाही का तडजोड करायची ???? सगळे काही मुलींनीच करायचे का? तर नाही . अर्थात मुलांनाही ती करायलाच लागते . पण आपल्या संस्कृती प्रमाणे मुलगी मुलाच्या घरी जाते आणि अश्यावेळी तिलाच अधिक तडजोड करावी लागते . पण सुरवातीलाच इतक्या अटी असतील तर पुढे कसे होणार हा प्रश्न पडतो , किबहुना इतक्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि त्या चौकटीत बसणारा राजकुमार मात्र मिळत नाही ..फक्त पैसा , ब्लॉक ह्यापलीकडे सुद्धा त्या मुलाकडे तो माणूस म्हणून कसा आहे , त्याचे विचार किती सुस्पष्ट आहेत , जीवनातील चढ उतारांवर तो कशी साथ देयील हे पाहणे अधिक आवश्यक वाटते . पैसा मिळवता येतो , घर सुद्धा घेता येते पण माणसाचे मन , नियत शुद्ध असणे हा निकष सर्वात उच्च असणे आवश्यक आहे .
माझ्या पाहण्यात आणि समाजात ह्या गोष्टी मी अनेकदा पहिल्या आणि म्हणून हे लिहावेसे वाटले , ह्या विचारांशी सगळे सहमत असतील असे नाही किबहुना असावेत असा आग्रह सुद्धा नाही . अनेकदा मुले सुद्धा अनेक अवाजवी अपेक्षा ठेवतात आणि चांगल्या मुलींची स्थळे हुकतात , उपवर मुलांनी आणि मुलीनी ,दोघांनीही ह्यावर विचार करावा . आज पालकांना आपल्या मुलांचे विवाह कसे संपन्न होतील ह्याचे दडपण खूप आहे. लग्नाची गाठ बांधायची आहे , विचारांचा गुंता सोडवला तर अनेक विवाह योग्य वयात होतील असे वाटते . सहमत ??????
आपण जागतिक महिला दिन साजरा करत आहोत . सर्वाना महिला दिनाच्या शुभेछ्या . विवाहासाठी योग्य स्थळांचा शोध घेत असणार्या सर्व उपवर वधू आणि वरांना त्यांच्या मनासारखा जोडीदार लवकर मिळूदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230