|| श्री स्वामी समर्थ ||
ग्रहमालिकेतील सर्व ग्रह मानवी आयुष्यावर काही ना काही परिणाम करतात. तो परिणाम कधी चांगला असतो तर कधी वाईट . अनेकदा शुभ ग्रहांच्या युत्या होतात तर कधी अशुभ . पण हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे ज्याला आजच्या भाषेत “ Passing Phase “ म्हंटले तर समर्पक होईल. त्यातील एक युती म्हणजे “ शनी मंगळ “ युती . ज्याला अनेकांनी अभद्र युती म्हणून सुद्धा संबोधले आहे. असो. आज सोशल मिडीयाचा परिणाम जनमानसावर प्रचंड आहे. पण अनेकदा अर्धवट माहिती , अपुरे ज्ञान हे घातक असते. हे सर्व विषय अत्यंत अभ्यासनीय आणि सखोल आहेत त्यामुळे नुसत्या एका लेखात किंवा संभाषणात त्यावर विश्लेषण करणे शक्य नाही. त्यामुळे अरे बापरे आता शनी मंगळ युती आहे असे म्हणून अनेकजण धसका सुद्धा घेतात ज्याची खरच गरज नाही .
एखादा नाक्यावर उभा असणारा मुलगा इतर मित्रांसोबत तिथे वेळ घालवत क्वचित सिगरेट ओढत उभा असला म्हणून तो वाईट आहे असे बोल्ड विधान करणे चुकीचे होईल कारण अनेकदा संकट समयी इमारतीतील किंवा आजूबाजूच्या लोकांना जसे रिक्षा आणून द्या , कुणी आजारी असेल तर दवाखान्यात पोहोचवा अश्या रोजच्या जीवनातील संकटात मदत सुद्धा करताना दिसतो . अगदी त्याच प्रमाणे शनी मंगळ नाही तर प्रत्येक ग्रहयोग हा नेहमी वाईट फळे देईल असे नाही .
मुळात आपल्या मूळ पत्रिकेत हे ग्रह कसे आहेत . तसेच दशा अंतर दशा कुणाची चालू आहे हेही पहिले पाहिजे.
कर्क आणि सिंह लग्नाला मंगळ हा योग कारक आहे.
शनी स्वतः मूलत्रिकोण राशीत असून शौर्य , धैर्य , जिद्द , धडाडी आणि उर्जेने परिपूर्ण असा मंगळ शनीला आलिंगन देण्यास येत आहे. शनी हा वायुतत्वाचा संथ , प्रत्येक गोष्टीत आपल्या संयमाची कठोर परीक्षा घेणारा , अध्यात्मिक , नीतिमान , सत्याची आणि न्यायाची कास धरणारा आणि कर्मवादी आहे. हि युती आयुष्यात संघर्ष देते पण त्यातून व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुद्धा उजळून काढते .
मंगळ तपस्वी आहे , मंगळ पत्रिकेत उत्तम असेल तर व्यक्ती उत्तम साधक सुद्धा होते कारण साधनेत सातत्य जिद्द लागते ती मंगळ प्रदान करतो. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचे धाडस माऊलीना प्रदान करणारा मंगळच होता .कुठलाही दृढ निश्चय हा मंगळा शिवाय अपूर्णच आहे. आयुष्यात असामान्य बदल घडवणारी हि युती आहे . मंगळ अग्नीतत्व आणि शनी त्याला हवा देणारा वायुतत्वाचा . गावाला चूल पेटवताना फुंकणीने फुंकले जाते ते पाहिलेच असेल सर्वांनी . अग्नी अधिक प्रज्वलित होण्यासाठी त्याला फुंकणीमधून मिळणारी वायूची हवेची जोड . आपल्या इच्छा आकांक्षा ( ज्या कधी चांगल्या किंवा वाईट सुद्धा असू शकतात ) त्यांना प्रोत्चाहन देणारा , आपल्या महत्वाकांक्षा फुलवणारा , आयुष्यात काहीतरी करायचे आहे हि भावना मनात उत्तेजित करणारी हि युती आहे. आपल्या शरीरात सळसळत असणारे रक्त उसळून त्याला प्रद्यूक्त करणारा शनी म्हणून ह्या युतीचा विचार टाळताही येत नाही . जोश असावा पण होश पण तितकाच असावा हेच हि युती दर्शवत आहे. जोशात होश घालवून बसलात तर आगीचा भडका उडेल . मंगल उग्र आहे ,त्यामुळे वाणी , कृती भावना ह्यावर संयम ठेवा . शरीरातील उष्णता वाढली कि ज्वर येतो आणि आणि त्यासाठी थंड पाण्याच्या घड्या कळपावर ठेवाव्या लागतात . ताप लगेच कमी होत नाही हळूहळू कमी होतो. सामाजिक जीवनात हि युती अंशतः धुमाकूळ घालते, न्यायव्यवस्था , सामान्य माणसाचे जगणे समस्यापूर्ण असते.
सध्या मार्च अखेरपर्यंत शनी चा अस्त आहे त्यामुळे शनीपेक्षा मंगळाची ताकद अधिक आहे. तद्पश्च्यात दोघांची ताकद वाढेल त्यावेळी रक्ताचे विकार सांभाळणे , भावना ताब्यात ठेवाव्या लागतील . प्रत्येक वेळी शस्त्र हातात घेवून काम होत नाही तर संयम ठेवूनच ते होते हे शिकवणारी हि युती आहे. धाक दाखवण्यापेक्षा प्रेमाच्या दोन शब्दाने आयुष्य सुद्धा बदलून जाते . भगवान विष्णूनी मानवाला त्याच्या कर्माची फळे देण्यासाठी नवग्रहांचे रूप धारण केले आहे .त्यामुळे ग्रह हे देवांचीच रूपे आहेत त्यांना वाईट मानण्याचा प्रश्नच येत नाही . जीवनातील चढ उतार आपले आयुष्य समृद्ध करतात , लढणे हे तर जिवंत असण्याचे लक्षण आहे . सहमत ??
प्रत्येक वेळी काही वाईटच होईल असा विचार न करता “ अब जो भी होगा अच्छाही होगा “ असा विचार करायला काय हरकत आहे. आई रोजच ओरडते पण बाबांचा कधीतरीच एक फटका बसतो आणि आपण खरच अभ्यासाला लागतो . असेच कधीकधी ढेपाळलेल्या आपल्याला जागे करून जीवन जगायला लावणारी हि युती आपल्याला कार्यक्षम बनवत असते. रोज श्रीखंड पुरी दिली तर कंटाळा येयील मग कांदा भाजी खावीशी वाटतील . तसेच जीवनात संघर्ष करायला लावणारी युती असणे आपल्याच साठी उत्तम नाही का? निदान उठून कामाला तरी लागू . स्वामिनी सांगितलेच आहे कि “ शेत पिकवून खा “ .
शनी मंगळ युती आहे ना? मग सावध राहा कि ,आपले नामस्मरण वाढवा , स्वामींचे पाय घट्ट धरून ठेवा , जगायचे सोडून देणार कि काय आपण ? अर्थात नाही . उलट अजून जास्ती लढायची ताकद मंगळ देवून जायील. हि युती साधक घडवणारी आहे . परमार्थाची गोडी चाखवत त्याच वाटेने मार्गस्थ करणारीही आहे. आयुष्यात संकट आल्याशिवाय देव आठवत नाही ह्याची आठवण करून देण्यासाठी हि युती जीवनात कठीण प्रसंग आणते पण त्यातूनच आपण देवाच्या द्वारी उभे राहतो .शेवटी दोन हस्तक आणि एक मस्तक त्यालाच जोडायचे आहे हे सत्य त्यातूनच उलगडत जाते .
मनातील इच्छा विधायक असतील तर हातून समाजासाठी काहीतरी चांगले काम होईल पण इच्छा विध्वंसक असतील तर त्याला हवा मिळून नको तिथे उत्तेजना भडकतील हेही विसरून चालणार नाही. ह्या युतीचे कंगोरे अभ्यासण्या जोगे आहेत . मंगळ म्हणजे वेग आणि जोश त्यामुळे तो अपघाताचाही कारक आहे . ह्या काळात वाहन चालवताना जोशाची नाही तर होश ठेवण्याची आवश्यकता आहे नाहीतर अपघात होऊ शकतात . घरातील विजेची उपकरणे , ग्यासची शेगडी जपून वापरा . मंगळ हा रक्ताचा कारक आहे त्यामुळे राक्तासंबंधी आजार , HIGH BP असणार्यांनी काळजी घ्या , घाईत जिन्याच्या पायर्या उतरणे , बस साठी उगीच निरर्थक धावपळ टाळा. एक गेली दुसरी बस मागून येणार आहे . पण ती पकडायला आपण सुस्थितीत असणे महत्वाचे नाही का? मंगळ हा दुर्घटना , अपघात घडवणारा आहे . मंगळाच्या हातात शास्त्र आहे म्हणून तो सर्जरीचा कारक सुद्धा आहे. मंगळ हा हट्टीपणा तसेच अंगार म्हणजे विकोपाला जाणारा राग , जो संसारात उत्पात घडवतो त्यामुळे विवाह करताना ह्या युती किंवा प्रतीयुतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .
जीवनात जर ह्या युतीचे अभद्र परिणाम जाणवले जसे अचानक अपघात , भावंडांशी वाद , रागावर ताबा न ठेवता हातून झालेले प्रमाद तर समजा कर्माचा कारक असलेल्या शनीने तुम्हाला हे भोग भोगायला लावले आहेत . म्हणूनच रागावर ताबा मिळवून पुढे जा हे सांगणारी हि युती आहे.
पत्रिकेत शनी मंगळ युती असेल तर त्याचा बाऊ न करता त्याचा अभ्यास करावा , त्यावरील शुभ आणि अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या आणि हि युती कुठल्या भावात आहे तो भाव आणि त्याचा भावेश तपासावा. आपल्या पत्रिकेत शनी आणि मंगळ कुठे स्थित आहेत ते बघा . शनी किंवा मंगळाची दशा असेल तर सतर्क राहा . शनी वायू तेलाचा कारक आहे आणि मंगल स्फोटक आहे , ह्या दोघांचे मिलन आगीचा भडका सुद्धा उडवू शकते आणि योग्य रीतीने तुमच्यातील आत्मविश्वास जिद्द वाढवून हातून सत्कर्म सुद्धा घडवू शकते . कधी कधी वाईटातून सुद्धा चांगले होते . मंगल जोश आहे त्यामुळे जोशात येऊन कुणाला तरी शाब्दिक वार करून संकटे ओढवून घेवू नका . हे हॉट आणि कोल्ड युद्ध आहे .
प्रत्येक वेळी हि युती अशुभत्वाकडे नेणारीच असेल असे नाही . ग्रह त्याच्या प्रवासात दुसर्या ग्रहाला भेट देतात आणि चांगले किंवा वाईट परिणाम घडवतात पण ते तत्कालीन असतात . अश्या काळात घाबरून न जाता किंवा मनात कुठलेही कल्प विकल्प न आणता आपली नित्य सेवा , नामस्मरण , उपासना वाढवावी जेणेकरून आपले आत्मबल वाढेल . आपल्या मूळ पत्रिकेतील ग्रहस्थिती चंद्राचे रविचे बळ आणि लग्नेश सुद्धा महत्वाचा आहे. आळस झटकून कामाला लागा हेच हि युती सांगत आहे असा अर्थ काढून उत्साहाने कामाला लागुया .
आपण करत असलेल्या नित्य उपासने बरोबर खालील उपासना ह्या काळात उपयुक्त ठरेल .
1. कालभैरव अष्टक वाचणे
2. शनी महात्म पठण
3 . ओं नमः शिवाय हा जप
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment