Wednesday, 28 August 2024

छोटी सोच

 || श्री स्वामी समर्थ ||

परमेश्वराने बुद्धी आणि विचार शक्ती सगळ्यांनाच दिलेली आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा हे अर्थात प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या आजूबाजूला अनेक माणसे रोजच्या जीवनात वावरताना दिसतात त्यातील काही विशाल हृदयाची , इतरांना मदत करणारी आणि दुसर्याच्या आनंदाने खुलणारी असतात . पण काही अत्यंत संकुचित मनाची , सतत एखाद्या गोष्टीची लपवा छपवी करण्याकडे कल असतो , स्वतःचे काहीही सांगायचे नाही पण दुसर्याच्या आयुष्यात खूप रस असणारी , दुसर्याचा सतत द्वेष करणारी , असूया , मत्सर , सतत दुसर्याला पाण्यात पाहणाऱ्या वृत्तीची असतात . अश्या व्यक्ती सतत राजकारण खेळत राहतात , ह्याचे त्याला त्याचे ह्याला , सतत सगळ्या बातम्या हव्या असतात त्यांना , कुणाबद्दल एक शब्द चांगल बोलणे ह्यांना जमत नाही किबहुना कुणाचे हि चांगले बघवत नाही , कुणाची प्रशंसा करणे तर खूप दूर राहिले. उलट दुसर्याचे वाईट झाले कि ह्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो . 


मुळात हि वृत्ती येते कुठून ? तर आपल्याच आयुष्यात अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत कि समोरच्याचे सुख टोचू लागते. जसे सगळ्यांना लक्ष्मीप्राप्ती होते पण आपल्याला रोजचा प्रपंच सुद्धा चालवता येत नाही . शिक्षण नाही म्हणून धड नोकरी नाही , पराकोटीचा अहम त्यामुळे शनीचे फटके पदरी पडणारच , तो कुणालाच सोडत नाही . आयुष्याची संध्याकाळ झाली तरी देवदेव करूनही स्वतःचे राहते घर होत नाही . मग भाऊ बंदकी आली त्यात अत्यंत हृणास्पद खालच्या पातळीचे राजकारण करून संपत्ती जमीन जुमला हडपणे . कारण स्वतःच्यात काहीच करण्याची धमक नाही . 

आपल्याला जे सुख आयुष्यात अपेक्षित असते ते दुरापास्त होते , अगदी रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टीत सुद्धा आनंद मिळत नाही तेव्हा माणसाची दुसर्यावर जळण्याची वृत्ती बळावते . दुसर्याचे कसे चांगले चालले आहे ते पाहवत नाही आणि त्यातूनच मग असूयेचा जन्म होतो आणि ती सर्वात प्रथम त्या व्यक्तीलाच मारते .  अहो जो तो आपापल्या कर्माचा कारक , प्रत्येकाला देवाने बुद्धी आणि दोन हात दिलेले आहेत . कष्ट करा आणि सन्मार्गाने जगा , जे आहे त्यात समाधान माना आणि परमेश्वराच्या सान्निध्यात राहा . पण नाही भौतिक सुखाची तीव्र लालसा आणि काहीच पदरी पडत नसल्यामुळे येणारे नैराश्य . ह्याचा परिणाम असा होतो कि सगळी आजारपणे  मागे लागतात . जेव्हा आपण दुसर्याचा मत्सर  करतो तेव्हा आपले स्वतःचेच हार्मोन्स बिघडतात आणि विचार दुषित होतात , विचारांचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावर व्ह्यायला लागला कि तो आपल्याला अगदी स्मशानापर्यंत सोडत नाही .

अत्यंत छोटी सोच असणार्या ह्या व्यक्तींनी कितीही देवाचे केले तरी त्यांचे कलुषित मन त्यांना देवाच्या द्वारापर्यंत कधीच नेत नाही , परमेश्वराला त्यांची हाक सुद्धा ऐकू येत नाही . दुसर्याचे लुबाडून घरात राजकारण करून आपण संपत्ती हडपू पण पुढे काय ? त्याचा विचार केलाय का कधी ? याच देही याच जन्मी आहे सर्व . आपण आपल्यापुरते जगायला शिकले पाहिजे . जे आहे ते आहे रोजचा दिवस नवनवीन संधी देण्यासाठीच येतो त्या घेवून कष्ट करत राहिले पाहिजे . एक दिवस आपलाही येणारच ह्यावर विश्वास ठेवला पाहिजे . दुनियादारी सोडून जरा आपल्या प्रपंचात लक्ष्य दिले तर बरे होईल. 

जे आपण पेरणार तेच उगवणार , तुम्ही जे देणार तेच तुम्हाला परत मिळणार त्यामुळे चांगले विचार मनात रुजवाल  तर तुमचे विचार , देहबोली सर्वच सकारात्मक होयील ह्यात शंकाच नाही . 

हि छोटी सोच कुठून येते ? तर पत्रिकेतील चंद्र दुषित असेल , बिघडला असेल , पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल , तर मनाच्या ठिकर्या उडतात . निर्णय क्षमता नसते , आई विक्षिप्त स्वभावाची , आजारी , मानसिकता बिघडलेली असते , गृहसौख्य , वाहन सौख्य नसते . सगळ्या सुखात उणीव . 

घरात अशांतता जाणवते आणि ती व्यक्तिमत्वावर उमटते . अश्या लोकांनी योगासने , ध्यान , साधना करावी . आपले शब्द भांडार जरा जपून वापरावे , विचार आचाराचा मेळ घालावा . शांत ठिकाणी बसून अंतर्मुख व्हावे , आवडते संगीत ऐकावे त्याने विचारांचे परिवर्तन नक्कीच होईल. आपले छंद जोपासावे , सत्कर्मात आपले योगदान द्यावे जसे झाडे लावणे . सर्वात मुख्य आपल्या विचारांची दिशा आपणच ठरवावी . मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये किंवा बोलूही नये. 

आपण दुसर्याचा केलेला तिरस्कार , मत्सर , हृणा , द्वेष , असूया अनेक अनेक आजारांच्या स्वरूपात दाम दुप्पटीने आपल्याच पदरात पडणार ह्याचा कदापि विसर पडू देवू नये . 

चंद्र शुद्ध करण्यासाठी महादेवाचा जप आणि अभिषेक करावा . आकाशातील चंद्राला ओवाळावे . सोमवारी पांढर्या वस्तूंचे किंवा गोड पदार्थांचे गरजू व्यक्तीला दान करावे .

आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगता यावे ह्यासाठी कर्म शुद्ध ठेवली पाहिजेत आणि ते सर्वस्वी आपल्याच हाती आहे नाही का?

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



Monday, 26 August 2024

कृष्णा आमचे मागणे थांबव..

 || श्री स्वामी समर्थ ||


कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वाना खूप शुभेछ्या . अष्टमी हि अपार सौंदर्याची तिथी आहे. कृष्ण तनामनावर राज्य करणारा , आपल्या हाकेला तत्पर धावून येणारा आणि आपल्या चेहऱ्यावर क्षणात स्मित आणणारा . कृष्णाचे आयुष्य आपल्याला घडवेल इतके जबरदस्त ग्रहयोग त्याच्या पत्रिकेत आहेत  . प्रभू श्रीराम , माऊलीआणि कृष्ण ह्यांच्या पत्रिकेत अखंड ज्योतिष सामावेल इतक्या त्या गहन आहेत . सामान्य माणसाच्या सीमारेखा जिथे संपतात तिथे संतांच्या पत्रिकांचे अध्ययन सुरु होते म्हंटले तर वावगे ठरू नये. 

कृष्णाने सहस्त्र स्त्रियांचे रक्षण केले पण आज तो आपल्या भेटीला येयील तेव्हा त्याला काय चित्र दिसणार आहे ? त्यानेच निर्माण केलेल्या विश्वात आज स्त्रीच असुरक्षित आहे . आजूबाजूला आज घडणाऱ्या घटना विशेष करून आपल्या भगिनींच्या वर होणारे अत्याचार मन हेलावणारे आहेत .  प्रत्येक स्त्री कधी मोकळा श्वास घेवू शकेल ??कुठे चालली आहे आपली मानसिकता आणि समाज ? ह्या आजच्या काळात त्या कृष्णाला , श्री गणेशाला सुद्धा यावेसे वाटणार नाही इतकी भीषण अवस्था  त्यांच्या भेटीला आहे . ते म्हणतील हेच शिकवले का मी तुम्हाला? असो.

आपले देवाकडील मागणे आणि संतांचे मागणे ह्यात किती फरक आहे बघा . दिसला देव कि माग त्याच्याकडे काहीतरी हि आपली नित्याची सवय  . पण मागून मागून काय मागणार तर भौतिक सुखाची न संपणारी यादी . मुलाचे लग्न होवूदे ..झाले लग्न मग आता नातवंड मागा . संपतच नाही हो आपले. का मागतो आपण ? कधी विचार केला का? खरतर त्याला सगळच माहित आहे कि आणि तो देणारच आहे , कारण तो द्यायलाच बसला आहे. पण आपण त्याच्याकडे न मागताही तो आपल्याला देणार हा विश्वासच हरवून बसलो आहोत आपण ...म्हणून सतत हे दे ते दे करत असतो . 


इतके जबरदस्त नामस्मरण वाढवा , अखंड नामात राहा कि मागायचा विसर पडेल आपल्याला आणि त्या नामस्मरणात इतकी शांतता , समाधान लाभेल जे मागूनही मिळणार नाही . तदपश्चात मागण्यासारखे काही उरणारच नाही . न मागताच सगळे वेळ आली कि आणि आपल्या भाग्याप्रमाणे मिळणारच , अनुभव घेवून पहा .

कृष्णाकडे आज जगण्याचे बळ मागुया आणि जिथे आपण सर्व सुरक्षितपणे वावरू अश्या समाजाची उभारणी करुया , स्त्रियांना सक्षम , खंबीर करुया . रांगोळ्या , स्वयपाक शिका पण आधी मार्शल आर्ट , कराटे शिका. आज स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे आहे . स्वतःचे अस्तित्व जपा आणि वृद्धिंगत करा आणि त्यासाठी एकच ढाल हवी ती म्हणजे नामस्मरणाची . रामरक्षा , हनुमान चालीसा , श्रीसूक्त , नामस्मरण ह्याचा अक्षरशः पाऊस पाडा , इतका कि तोच शोधात येयील आपल्याला. कोण बर माझ्या नामात इतका गुंगला आहे हे पाहून परमेश्वर सुद्धा हतबुद्ध होईल. पण करणार होण ? कधी सुरवात करणार आपण ? 

आकाशात एकटक बघा जरा अहो सगळे ग्रहतारे आपल्याच कल्याणासाठी बसले आहेत . गोलोकातील कृष्ण सुद्धा आपल्या बाळ लीला पाहून हसत असावा. विश्वासच नाही आपला , कश्यावरच नाही , ना आपण केलेल्या साधनेवर ना स्वतःवर . मन सैरभैर झाले आहे.  परवा एका मुलाने मला सांगितले मी एक माळ रोज करतो म्हंटले अरे वा छान आणि insta /सोशल मिडीयावर किती वेळ असतोस ? निरुत्तर . अहो सोशल मिडीया पण हवे काळाची गरज आहे ती पण म्हणून एक माळ ? त्याचा वेळ वाढवा , वेळ आहे आपल्याकडे तो कश्यात किती घालवायचे ते गणित कदाचित चुकतेय आपले. 


मग ह्या ज्योतिषाकडून त्या ज्योतिषाकडे आमची वारी सुरु ...कारण नामातील ताकद अनुभवलीच नाही आपण . तितका विश्वासच नाही आपला. नामस्मरण म्हणजे म्हतार्यांचे चाळे, वेळ घालवायचे साधन वाटते आपल्याला . मी माळ घेवू ? काहीतरीच ..अहो मित्र हसतील कि मला . चेष्टेचा विषय बनेल मी . चोरून देवळात जायचे कारण मित्र हसतील , म्हणतील तू IT मधला विद्वान देवळात कसला जातोस , बाहेर या ह्या सगळ्या भ्रमातून , स्वतःला सावरा आणि इतरानाही सावरायला मदत करा . ज्ञानेश्वरी , गीता , श्री गजानन विजय अहो जीवनाचे सार आहे ह्यात . प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडेल ह्यात तुमचे तुम्हालाच ,  ज्ञानाने परिपक्व व्हाल आणि एक समृद्ध जीवन सुद्धा जगाल. 

आज कृष्ण जन्म . त्याने असंख्य लढाया लढल्या , त्यातल्या अनेक आपल्याच माणसांच्या विरोधात . त्याला सगळे शक्य होते पण ..हा पण महत्वाचा आहे. संताना , ज्ञानेश्वरांना किती त्रास झाला. ज्यांनी भिंत चालवली , ज्यांनी बारा वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला पाणी आणले त्यांना काय शक्य नव्हते , पण त्यांनी आपल्याला काही शिकवण देण्यासाठी प्रपंचातील दाह सोसला.

आज कृष्णाकडे एकच मागुया.... बाबारे आमचे मागणे थांबव ....तुझ्या शक्तीवरचा आमचा विश्वास द्विगुणीत कर , तू आहेस आणि सतत आमच्यासोबत आहेस ह्याचे अनंत दाखले दिलेस तसेच देत राहा बाबा . 

श्रीकृष्ण समजणे सोपे नाही ...खचितच नाही ...

टीप : कृपया लेख नावासकट शेअर करावा हि विनंती . 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




Wednesday, 21 August 2024

चढता सुरज धीरे धीरे ....

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आजूबाजूला असंख्य चांगल्या वाईट घटना रोज घडत असतात . ह्या सर्वाचा आपल्या मनावर सुद्धा परिणाम होत असतो . कुणाचा विजा आला किंवा विवाह ठरला तर मन आनंदित होते प्रसन्न वाटते पण कुणाला गंभीर आजार किंवा तत्सम घटना घडली तर मन हळहळते . वाईट वाटत राहते आणि त्यात कुणी जवळचे असेल तर मग कित्येक दिवस त्याचा परिणाम आपल्या मनावर होत राहतो . पण असे का घडले ह्याचा विचार आपल्याला त्या व्यक्तीने केलेल्या पूर्व आयुष्यातील कर्मांपाशी नेतो त्यावेळीस असे वाटते कि इतकी वाईट कर्मे केली आहेत म्हणून हे फळ आहे , कदाचित झालेली शिक्षा कमीच आहे. 

आयुष्यात कुठलीच गोष्ट अशीच घडत नसते . प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतेच . ह्याचे मूळ कुठेतरी आपण केलेल्या कर्मातच असते . आपले राग लोभ , दुसर्या बद्दलच द्वेष , तिरस्कार , मत्सर अनेकदा पराकोटीला पोहोचतो आणि आपल्या हातून वाईट कृती किंवा बोलण्यातून समोरच्याला दुक्ख दिले जाते . पण ह्याचा परिणाम म्हणजे आपण आपले स्वतःचे “ कर्म “ वाढवून ठेवतो जे पुढे आपल्यालाच फेडावे लागते . 


आपल्याला दुखावणार्या , अपमानीत करणाऱ्या व्यक्ती खूप असतात , आजकाल तर गरजेपुरते इतरांना वापरून घेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे कारण माणसाची स्वार्थी वृत्ती खूप वाढली आहे . कामाशिवाय आजकाल बात नाही असो कलियुग आहे हे , ह्याहून वेगळे अपेक्षित नाहीच . पण अनेकदा चांगल्या व्यक्तींना त्रास होतो , त्यांच्या चांगल्या स्वभावाचा फायदा करून त्यांना फेकून दिल्याची भावना त्यांच्या मनात येते आणि  त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडून जातो . आपणही उलटा वार करू शकतो , फाडफाड बोलू शकतो , पण हे सर्व करून मिळणार काय ? पुन्हा आपण आपलेच कर्म वाढवून ठेवणार आणि मग ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणार .

गेल्या अनेक दिवसात घडलेल्या घटनांवरून माझा देवावरचा आणि शनी महाराजांवरचा  विश्वास कित्येक पटीने वाढलाय . शनी महाराज कुणालाही सोडत नाहीत . तिथे वशिला चालत नाही किंवा पैशाने त्यांना विकतही घेता येत नाही . योग्य वेळ आली कि ते शिक्षा करतात आणि अशी शिक्षा करतात कि दुनिया पाहत राहते , त्या शिक्षेची तीव्रता आणि दाह इतका भयंकर असतो कि त्यावरून समोरचचा सुद्धा चूक करताना दहा वेळा विचार करेल .

 शेवटी १०० अपराध झाल्यावरच शिक्षा होते , पण ती होतेच होते . शनीचे नियम कडक आहेत , त्यांनी शिक्षा सुनावली कि संपले सर्व काही , मग फक्त ती निमूटपणे भोगणे हेच आपल्या हाती राहते . तिथे माफी नाही कुणालाही नाही . 

मी कसाही वागेन आणि कुणीचा बाप माझे वाईट करू शकणार नाही ह्या भ्रमात माणसाने राहू नये हे सांगण्यासाठीच हा लेखन प्रपंच . आपल्याला अत्यंत प्रिय असणार्या व्यक्तीचा विरह , होत्याचे नव्हेत होणे हीच शनी महाराजांची शिक्षा आहे.

माणसे फेकून द्यायची फार हौस आहे ना ? द्या . मग बघा शनी तुम्हाला कुठे फेकून देतो ते . कुणाला कमी लेखू नका , कुणाच्याही परिस्थितीवर , व्यंगावर , अपयशावर हसू नका , कुणाची निर्भत्सना , निंदा करू नका . आपल्याला वेळोवेळी मदत करणाऱ्या लोकांचे ऋण मना आणि त्या ऋणात राहा . गोड बोलून सहानुभूती मिळवून आपली कामे करून घेवू नका . स्वाभिमानाने जग कारण आपली कष्टाची भाकरीच शेवटी गोड लागणार आहे . 

कश्याला राग करताय कुणाचा , इथेच सर्व सोडून द्यायचे आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच . विसरा आणि मुक्त व्हा ह्या षडरिपुंच्या ओझ्यातून . बघा कसे मोकळे मोकळे वाटेल आणि शांत झोप सुद्धा लागेल. कश्याला त्यांच्या शिक्षेस पात्र ठरायचे ? विचार करा . करोनाचा धक्का , फटका जग अजून पचवू शकला नाही आहे. लाखोंची खरेदी क्षणात करणारे रस्त्यावर आले बेघर झाले. 

का नाही बघवत आपल्याला दुसर्याचे चांगले. अहो माझ्याकडे सर्व मग नक्की कसला राग ? काय बघवत नाही आहे आपल्याला ? दुसर्याचा आनंद बघवत नाही कि त्यांची मुले परदेशात शिकायला जात आहेत ते बघवत नाही ? जो तो आपापल्या कर्माचा धनी , आपले पूर्वकर्म आपले आजचे आयुष्य घडवत आहे . मग आजचे कर्म जर उद्याचा आपला दिवस घडवणार असेल तर ते नक्कीच अधिक उत्तम असायला हवे ना ? पटतंय का? 

शनी मनावर आघात करणारच  , तुमची प्रिय वस्तू व्यक्ती हिरावून नेणार , तुम्ही इतरांना रडव्लेत ना त्यांचा अनादर केलात , निंदा केलीत , लोकांना पाण्यात पाहिलेत , भोग आता आपल्या कर्माची फळे .

रवी म्हणजेच सूर्य सकाळी उगवतो आणि आपल्या आशा पल्लवित होतात इतकी त्या सूर्यप्रकाशात ताकद आहे . मध्यानीला सूर्य डोक्यावर तळपत असतो तेव्हा त्याच्याकडे पाहणेही अशक्य असते . पण ह्या दोन्ही अवस्था सोडून संध्याकाळी तो अस्ताला जातो . ह्यावरून आपण काय शिकतो ? आपल्या आयुष्याच्याही ह्याच तीन अवस्था आहेत , पटतय का?  आपलेही आयुष्य बदलत जाणार , वय पुढे जाणार , शरीर खचणार आणि मन सुद्धा , आयुष्य काय कधी वळण घेयील कुणालाच सांगता येत नाही . निसर्ग सुद्धा जिथे शाश्वत नाही तिथे आपले आयुष्य काय ? घमेंड , अहंकार माणसाच्या आयुष्याची माती करण्यासाठीच आलेला असतो . मी म्हणजे कोण ? अरे तू कुणीच नाहीस कारण क्षणात ते काय करतील समजणार सुद्धा नाही . जरा पैसा आला कि आपले वागणे बोलणे इतके बदलते कि जसे काही कुणाची गरजच नाही आपल्याला . 

अहो गरज जन्मालाच घेवून आलेले आहोत आपण . म्हणूनच माणसात आनंद शोध , सगळ्यांना धरून राहा कारण शेवटी परमेश्वर माणसातच आहे. महाराजांच्या सेवेत राहून आपला अहंकार सुद्धा नष्ट होयील , वास्तवाची जाणीव होवून जगायला प्रवृत्त करेल हे नामस्मरण .

आजूबाजूच्या घटना पाहून मन व्यथित झाले. प्रथम १० रुपयाची चोरी मग १०० असे करत पुढे हे हात काय काय करतील कारण आपल्याला वाटते कुणी पाहत नाही आपल्याला , शिक्षा करणार कोण ? पण शनी महाराज आहेत आणि त्यांचे अस्तित्व अबाधित आहे. आपल्या कर्माचे फळ दिल्याशिवाय ते राहणार नाहीत . 


आपल्या आयुष्याची इतरांशी तुलना करणे बंद करा , जे आहे ते आहे. कुणाचा हेवा , तिरस्कार करून आपले भले निश्चित होणार नाही उलट संकटे आपली पाठ सोडणार नाहीत . आपल्याला त्रास देणार्यांना देव शिक्षा कधीही करत नाही ह्या चुकीच्या कल्पना उराशी बाळगू नका , वेळ आली कि शनी महाराज एका क्षणाचाही विलंब न लावता शिक्षा करतात , जन्मभराची अद्दल घडवतात . सगळा माज क्षणात उतरतो त्यामुळे कुणीही देवांच्या वरती जावून बसायचा प्रयत्न सुद्धा करू नये . वरील सूर्याचे उदा हेच आपले आयुष्य आहे . एकदिवस आपला अहंकार आणि माज उतरतोच उतरतो आणि तो असा उतरतो कि भल्या भल्यांची झोप उडते आणि इतरांना दशहत बसते . आयुष्य नेहमी तेच राहत नाही हेच आपल्याला सुर्यानेही शिकवले आहे .आपण सगळेच मातीतून आलो आणि मातीतच मिसळणार आहोत त्यामुळे मी मी करणे सर्व फोल आहे कारण ..

चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा .... 

आज शनीचेच उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे ...त्यांचीच आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230 







 


Wednesday, 14 August 2024

व्यय भाव – व्यय कि लाभ ???

 || श्री स्वामी समर्थ ||


जीवनाच्या अंतापर्यंत अभ्यास करत राहिले तरी परिपूर्ण होता येणार नाही इतके ज्योतिष शास्त्र सखोल आणि समृद्ध आहे. आपल्या पत्रिकेतील 12 भाव सर्प्रथम आपल्यापुढे येतात मग त्यात असणार्या राशी आणि सर्वात शेवटी त्यात वसलेले ग्रह .

प्रथम भाव आपले स्वतःचे अस्तित्व दर्शवतो . जन्माला येतो तेव्हाच हा भाव जागृत होतो . आपले आयुष्य वेगाने पुढे जाते , आयुष्याच्या सर्व अवस्था बालपण , तारुण्य , वृद्धावस्था सर्व काही पार करत शेवटच्या पायरीवर म्हणजेच मोक्षाच्या आणि व्यय भावाच्या पायरीवर आल्यावर येतो तेव्हा शरीर आणि मन दोन्ही थकलेले असते . इथे सर्व काही सोडून पुढे जायचे असते . जो भाव आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी समर्पित करणारा अनुभव देतो तो वाईट कसा असेल , हा विचार केला पाहिजे  . इथे शरीराची पाऊले आहेत आणि पावूलांवर जो नतमस्तक होतो तोच मोक्षपदास जातो अन्यथा पुन्हा प्रथम भावात येवून पुन्हा नवा जन्म आणि मग पुनरपि जननं पुनरपि मरणं हेच होत राहणार .


हा व्यय भाव पत्रिकेतील शेवटचा भाव इथे नतमस्तक व्हायचे असते ते जन्म दिलेल्या आपल्या पालकांसमोर , आयुष्यभर साथ देणाऱ्या आणि आपल्याला जीवनाच्या प्रवासात आनंद देणाऱ्या सगळ्यांसमोर आणि सरतेशेवटी आपल्या सद्गुरुंसमोर . आयुष्यात जे जे काही मिळवले ते इथेच सोडून द्यायचे . जोडीला येते ते फक्त आपले कर्म म्हणूनच जन्मापासून पुण्यसंचय , चांगली वृत्ती , नितळ मन आणि चांगली नियत असेल तर शेवटच्या पायरीवर सुद्धा मोक्षाचा आनंद अनुभवायला मिळतो .

हा मोक्ष भाव म्हणजेच व्यय भाव त्रिक भावात येत असल्यामुळे त्याचा समावेश “ वाईट स्थानातील एक भाव “ असाच होत जातो . पण तो चुकीचा आहे. कसा ते आज पाहूया ?

व्यय भाव आपल्याला  मोक्ष , तुरुंगवास , दवाखाना , परदेशगमन अनाठायी खर्च  अनेक विध गोष्टी ज्ञात होतात . प्रत्येक भाव , राशी आणि ग्रह आपल्यावर अनेक चांगल्या वाईट गोष्टींची उधळण करत असतात . आपले संपूर्ण आयुष्य ऋषी मुनींनी ह्या १२ खिडक्यात अगदी चपलख बसवले आहे . माणसाच्या मनात असा एकही प्रश्न नाही जो ह्या १२ भावांच्या पलीकडे आहे . जे काही आहे ते ह्यातच दडलेले आहे. आपल्याला फक्त ते शोधायचे असते इतकच .

व्यय भावातील ग्रहांच्या बद्दल आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते . तिथले शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह काय फल देतील असे प्रश्न आपल्याला पडत असतात . आज व्यय भावातील “ गुरु “ चा अभ्यास  करुया .

व्यय भावात जरी असला तरी गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. गुरु च्या दोन राशी धनु आणि मीन इथे असतील तर आपण गुरु स्व गृही आहे असे म्हणूया . कर्क राशीत गुरु उच्चीची वस्त्रे परिधान करतो तर मकर राशीत निचत्वाला जातो. गुरु हा मुळातच आकाश तत्वाचा ग्रह आहे. अर्थात हि सर्व फळे प्रामुख्याने मिळतात ती गुरूच्या दशा अंतर्दशेत .

व्ययातील गुरु राहू केतू ह्यांनी दृष्ट असेल किंवा त्यांच्या युतीत असेल , शनी च्या दृष्टीत असेल , शुक्राच्या राशीत असेल , वक्री असेल तर त्याच्या फळात कमतरता येणार. व्ययातील गुरूचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे असलेले ज्ञान मुक्त पणे इतरांना देत राहणे . धार्मिक यात्रा तसेच विदेश यात्रा हा गुरु करवेल.  गुरु शुभ स्थितीत असेल तर विवेक ज्ञान सद्विचार आणि समंजस पणा देयील. गुरु चांगला असेल तर विदेश यात्रा आणि त्यातून अर्थार्जन , संतती चे शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशगमन , 

गुरु धर्म किंवा मोक्ष त्रिकोणात येणाऱ्या राशींमध्ये व्ययात असेल तर आणि त्यांच्याच भावेशाच्या दृष्टीत असेल , कुठल्याही कुयोगात नसेल तर उत्तम व्यासंग , वक्ता होईल, एखादी मोठी धार्मिक संस्था चालवेल, मठाधीपती म्हणून काम करेल . व्ययातील गुरु शुद्ध असेल तर एखाद्या मठाचा देवळाचा कारभार बघेल पण बिघडलेला असेल तर ढोंगी असेल. मेवा खाण्यासाठी सेवा करेल , ढोंगी ,अज्ञानी पण दिखावा करणारा असेल. गुरु बिघडला असेल तर मग लोकांच्या पैशाचा दुरुपयोग , फ्रोड , धोका करून मग तुरुंगवास नशिबी येणे हे होणारच .  दुषित गुरु लिव्हर , मेदवृद्धी आजार देयील आणि दवाखान्याच्या फेर्याही करवेल . धननाश होईल , आजार पणावर अमाप खर्च होईल. शुभ गुरु उत्तम डॉक्टर , गणितज्ञ , विचारवंत , वकील , उत्तम सल्लागार , ज्ञानी व्यक्ती घडवेल .


धनु राशीचा व्ययातील गुरु चांगली नोकरी आणि चांगल्या ठिकाणी बदली करवेल . विदेशात उत्तम शिक्षण होईल . चांगले घर होईल . मीन राशीचा गुरु भाग्येश होवून व्ययात असेल तर सुद्धा परदेशगमन करवेल , परदेशात स्थाईक होईल , साधना , नामस्मरण भक्ती करेल . हाच गुरु मकर राशीत निचीचा असेल तर अमाप खर्च होईल , पैशाचा संचय होणार नाही . ह्या गुरुवर निचीच्या शनीची दृष्टी नको . पण हा नवमांशात बलवान असले तर चांगली फळे मिळतात . 

व्ययात गुरु उच्चीचा म्हणजेच कर्क राशीत असेल म्हणजेच इथे गुरु अष्टम भावाचा स्वामी असून विपरीत राज्योगात असेल तर परदेशगमन , यात्रा , संतती विदेशात अध्ययन किंवा नोकरीसाठी जाईल. गुरूच्या तीन दृष्टी आहेत पण त्या काय फळे देतील हे पहायच्या आधी गुरु शुभ आहे कि अशुभ हेही पाहावे लागेल. व्ययातील गुरूची दृष्टी चतुर्थ भाव , षष्ठ भाव आणि अष्टम भावावर असते . चतुर्थ भावावरील दृष्टी चांगले घर , जमीन जुमला गृहसौख्य देयील पण शुभ असेल तरच . तसेच षष्ठ भावावरील दृष्टी अशुभ असेल तर रोग ऋण शत्रू तयार करेल पण शुभ गुरु पासून घाबरण्याचे काम नाही . अष्टम भावावरील दृष्टी गूढ शास्त्रात प्रगती करेल ,वारसाहक्काने संपतीचा लाभ होईल, ज्योतिष शास्त्रात प्रगती , अचानक धन मिळेल . अशुभ असेल तर ह्या सर्वाच्या विपरीत घटना घडतील. 

वरील विवेचनावरून आपल्या लक्ष्यात आले असेल कि प्रत्येक वेळी गुरु हा शुभ असेलच असे नाही तो अशुभ सुद्धा असू शकतो . गुरु मित्र राशीत आहे कि शत्रू राशीत , लग्नेशाचा गुरु मित्र आहे कि शत्रू , पापग्रहांनी दुषित आहे का ? ह्या सर्वांवर गुरूचा फलादेश अवलंबून असतो . त्यामुळे सखोल अभ्यास आवश्यक असतो.

म्हणूनच गुरु लग्नात आला किंवा त्याची दृष्टी सप्तम भावावर येयील तेव्हा विवाह होईल हे भाकीत चुकीचे ठरू शकते . विवाह होण्यास इतर अनेक गोष्टींची सांगाड घालावी लागते . गुरु हे एक तत्व आहे मग त्याची रूपे आणि नावे अनेक असतील. मातृदेवो भव , पितृदेवो भव. आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु आहेत . आपले शाळेतील महाविद्यालयातील शिक्षक तसेच अखंड आयुष्याच्या प्रवासात भेटत जाणार्या सर्व ज्ञानी व्यक्ती सुद्धा गुरुसमान आहेत . सरतेशेवटी आपले सद्गुरू ज्यांचे बोट धरून आपला जीवन प्रवास सुरु आहे त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय काहीच शक्य नाही . 

आपापल्या पत्रिकेत गुरु कसा आहेत ते आपले आपणच तपासून पहा . दुषित असेल तर त्याला चांगला करण्यासाठी उपाय करा आणि चांगला असेल तर अजून चांगला करण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहा .

उपासना किती करू हा प्रश्नच येत नाही . बटाटे वडे खाताना विचारतो का किती खाऊ ?? हे अगदी तसेच आहे . आपण कलियुगात आहोत तासातासाला समस्या येत आहेत त्यातून मार्ग काढताना उपासना उपयुक्त ठरणारच , उपासना हा आपल्या जीवनाचा आधार आहे . तेव्हा जितका जमेल तितका जप करत राहा . अधिकस्य अधिकम फलं.


गुरूचा नवग्रह स्त्रोत्रातील बीजमंत्र म्हणणे ( किती वेळा ? तर जमेल तितका )

श्री स्वामी समर्थ हा जप किंवा आपल्या इष्ट गुरूंचा जप म्हणणे.

श्री गजानन विजय किंवा गुरूलीलामृत , साई चरित्र ग्रंथांचे पारायण रुपी सेवा 

धार्मिक स्थळांना भेट देवून सद्गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घेणे 

अखंड नामस्मरण सर्वात उत्तम .


आपल्या सर्वाना आयुष्यात मार्गदर्शक गुरु लाभूदेत आणि आपल्याकडून सद्गुरूंची सेवा अधिकाधिक होऊदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना . 

माझे आईवडील , माझे सर्व शिक्षक , सर्व वाचक वर्ग ह्यांना हा लेख सदर अर्पण करताना आनंद होत आहे. 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230







Sunday, 11 August 2024

कृपा दृष्टी

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या पत्रिकेतील प्रत्येक ग्रहाला दृष्टी आहे . म्हणजेच ते ज्या घरात आहेत त्याच्या बरोबर समोरच्या घरात ते आपली संपूर्ण दृष्टी टाकतात . पण मंगळ , शनी आणि गुरु ह्या ३ ग्रहांना मात्र विशेष दृष्टी प्रदान केली आहे त्याचसोबत राहुकेतुना सुद्धा आहे . आज त्याबद्दल आधी जाणून घेवूया .


आपल्या पत्रिकेतील गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे , गुरु ग्रह आकाराने बलाढ्य आहेच पण त्याला 5 7 आणि 9 अश्या 3 दृष्ट्या  दिलेल्या आहेत . म्हणजेच पत्रिकेत गुरु ज्या भावात स्थित असेल तिथून तो तिसर्या पाचव्या आणि नवव्या भावावर दृष्टी टाकणार . गुरूची दृष्टी हि नेहमीच अमृततुल्य आहे . गुरूची पाचवी आणि नववी दृष्टी विशेष मानली जाते .

नैसर्गिक शुभ ग्रहाची दृष्टी त्या भावाला विशेष शुभत्व देणारी ठरते आणि त्यामुळे त्या भावा संबंधी असणारी शुभ फळे मिळतात. पाचव्या दृष्टीला महत्व आहे कारण आपण आपल्या गत जन्मात जे काही पुण्य केले आहे त्याची फळे गुरूची पाचवी दृष्टी आपल्याला देत असते म्हणून त्याची पंचम दृष्टी ज्या भावावर असते त्या भावाची फळे शुभत्वाकडे झुकणारी असतात . पण प्रत्येक लग्नाला हे तसेच घडेल का? तर नाही . शुक्राच्या तुळ लग्नाला गुरु हा तीन आणि सहा ह्या भावांचा कार्येश होतो आणि हे त्रीशडाय भाव आहेत त्यामुळे ह्या लग्नासाठी गुरु हा अनिष्ट ग्रह आहे .  गुरूच्या दशेत सर्वच घटना चांगल्या घडतील असे नाही तर गुरु पत्रिकेत कुठल्या भावांचा कारक आहे त्याप्रमाणे फलादेश मिळेल . म्हणूनच गुरूचा सखोल अभ्यास असणे महत्वाचे आहे. पत्रिकेत गुरु अर्थ त्रिकोणात आहे कि मोक्ष ? हेही पाहावे लागते . गुरूची फळे त्याचसोबत त्याची दृष्टी भावासोबत बदलणारी असते .

ज्योतिष शास्त्र शिकण्यासाठी गुरु ग्रहाची कृपा असावी लागतेच कारण गुरु म्हणजे ज्ञान आणि दैवी कृपा . प्रत्यक्ष गुरूंचा सहवास लाभणे आणि त्यांच्या सेवेची संधी मिळणे हे परम भाग्याचेच लक्षण आहे. उत्तम ज्योतिषी होण्याचे सुद्द्धा काही ठराविक योग असतात आणि ह्यात गुरूची कामगिरी किंवा स्थान हे अग्रेसर असते . ज्योतिष हे दैवी शास्त्र आहे . ह्या शास्त्राचे मार्गदर्शन ज्याच्याकडून व्हायचे असेल तिथेच जातकाची पावले वळतात . कुणी ह्या शास्त्राचे अध्ययन करावे हे सुद्धा ठरलेले असते . भविष्य कथन म्हणजे वाणी आलीच , आपले द्वितीय स्थान , आपले बोलणे इथे अति महत्वाचे असते. धन भावावर असणारी गुरूची दृष्टी हि ज्योतिष कथनात नक्कीच उपयुक्त ठरते अश्या लोकांना वाचासिद्धी असते आणि ते उत्तम ज्योतिष कथन करू शकतात .धनभावातील राशी आणि ग्रह हे देखील तितकेच महत्वाचे आहेत . उत्तम ज्योतिषी होण्यासाठी गुरूची वाचास्थानावरील पंचम दृष्टी त्यांच्या पूर्व जन्मातील पुण्याचे फळ देते . आत्माकारक ग्रह सुद्धा महत्वाचा आणि त्याचा अष्टम भावाशी असलेला संबंध व्यक्तीला व्यासंगी बनवतो . पंचम भाव हा सल्लागाराचा असल्यामुळे पंचम भावावरील गुरूची दृष्टी सुद्धा भविष्य कथनात महत्वाची आहे.

दिव्याखाली नेहमीच अंधार असतो आणि इतरत्र प्रकाश असतो त्याच प्रमाणे गुरु ज्या भावात असतो तिथे त्या भावाने दर्शवलेल्या फळात काहीतरी कमतरता राहून जाते आणि जिथे दृष्टी असते तो भाव उजळला जातो. पत्रिकेतील बुध हा आकलन शक्ती चा कारक आहे. बुध आणि गुरु ह्यांचे शुभयोग  व्यक्तीला उत्तम ज्योतिषी होण्यास मदत करतात . ह्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक योग आहेत त्याची माहिती नक्कीच घेत राहूया. 

वरील ग्रहांची स्थिती प्रामुख्याने पहिली जाते पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा ग्रहांचे काही योग व्यक्तीला उत्तम ज्योतिष ज्ञान आणि भाकीत खरे  ठरवण्यासाठी कार्य करतात . आपल्या आयुष्याचा एकंदरीत प्रवास जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने ह्या शास्त्राचे अध्ययन काही प्रमाणत तरी केले पाहिजे असे माझे मत आहे . अनेक वेळा अपुर्या ज्ञानामुळे ज्योतिष जे भविष्य कथन करतात त्याची प्रचीती जातकाला न आल्यामुळे त्याचा ह्या शास्त्रावरील विश्वास कमी होत जातो . त्यामुळे आपल्या स्वतःच्या पत्रिकेचा ज्योतिषाने सुद्धा अभ्यास करावा , आपला व्यासंग वाढवावा . ह्या शास्त्राचे अध्ययन आयुष्याला वेगळा आकार आणि दृष्टीकोन नक्कीच देयील. अपाय निश्चित होणार नाही . भविष्य कथन हि सामाजिक बांधिलकी सुद्धा आहे . जातकाचा पिंड , स्वभावाचे दर्शन त्याच्या पत्रिकेतून जेव्हा समोर येते तेव्हा त्याला काश्याप्रकारचे मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे हे ज्योतिषाला समजते आणि ते समजले तर एक व्यक्ती म्हणून ज्योतिषी आणि जातक सुद्धा आपापल्या आयुष्यात दोन दोन पावले पुढे जातील. 

ज्ञान देणारा आणि घेणारा ह्या दोन्ही साठी असणारी गुरूची भूमिका आज आपण पहिली . म्हणूनच नामस्मरण , आपली स्वतःची साधना उत्तम असेल तरच भविष्य कथन करता येयील ह्यात दुमत नसावे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

  



Sunday, 4 August 2024

आपल्या आचार विचारांची लक्ष्मण रेषा म्हणजे उपासना

 || श्री स्वामी समर्थ ||


सैरभैर मनाचा लगाम म्हणजेच निष्काम उपासना

( कलियुगात उपासनेची आवश्यकता का ?  आवर्जून  वाचा आणि अभिप्राय कळवा )

जन्मल्यापासून आपण काय काय कर्म केली ह्याचा आपण स्वतःच अत्यंत प्रामाणिक पणे मोजमाप केले तर आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब दुसर्या कुणी मांडायची गरज उरणार नाही . आपणच आपले न्यायाधीश होऊ. किती लोकांचे अपमान केले आपण ? शब्दाने किंवा मनाने किती जणांचे वाईट चिंतले आपण , किती जणांची उधारी ठेवली आहे ? आई वडिलांशी कसे वागलो आहे ? अगणित उत्तरे आहेत आणि ती द्यायची आहेत आपली आपल्यालाच. 

आयुष्याच्या शेवटी अगतिक अवस्था नको असेल तर अगदी जन्मल्यापासूनच उपासना करावी . पूर्वीचे लोक  सोवळ्याने पूजा करायचे , जानवे घालायचे , मासिक धर्म पाळायचे ते वेडे होते म्हणून कि काय ? आपण त्या रूढीना हसतो पण त्यामुळेच आपल्या आयुष्याला वळण होते शिस्त होती .  त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीना काही शास्त्र असते , काही विचार असतात ते मानव कल्याण साठीच असतात . साधा गोडा मसाला करायचा तर त्याचेही प्रमाण आहे , नाहीतर त्याचेही रूप रंग चव बदलेल . आपलेही तसेच आहे. मन स्थिर नसेल तर आपण कश्याच्याही आहारी जायला वेळ लागणार नाही . अगदी व्यसनेच केली पाहिजे असे नाही . चुकीची संगतच नाही तर चुकीची विचारधारा हेही व्यसनच आहे मंडळी .

कुणीही मित्र आपल्याला फोन करतो आणि चल म्हंटले कि आपण लगेच येतो म्हणतो , मग ते लोणावळ्याची पावसाळी सहल असो किंवा अन्य काही . घरचे नाही म्हणत असतानाही जणू खेचल्या सारखे जातो . आपले स्वतःचे स्वतंत्र विचार , अस्तित्व मते असे नाहीतच का? असाच प्रश्न आजकाल पडत चाललाय . कुठलीही वस्तू त्या instaa वर दिसली घ्या लगेच विकत , लगेच gpay करून मोकळे . अहो हे मायावी जग झालय , आभासी , भुलवणारे , नको तिथे लक्ष्मी जातेय आपली , राहुने ताब्यात घेतलय आपल्याला . उठ सुठ खरेदीच्या मागे आहोत . शनिवार रविवार हॉटेल मधेच गिळणार आम्ही , घराची चव नकोशी झालेय , मोमोज म्हणायला मोठेपणा वाटतोय आणि सांज्याची पोळी म्हणायला लाज वाटतेय हे वास्तव आहे .

स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायची आजकाल नवीन फ्याशन आली आहे आणि मग शेअर मार्केट मध्ये पैसे डुबले कि मग येते घरातल्या मोठ्यांची आठवण . दारू प्यायला अक्कल लागत नाही आणि कारण तर अजिबात नाही. दारू प्यायला कारण शोधत असतात ते मिळाले कि चालले. मन ठिकाणावर नसल्याची आणि पत्रिकेतील चंद्र प्रमाणाच्या बाहेर बिघडल्याची हि लक्षणे आहेत . आज स्त्रिया घरात नोकरी सांभाळून प्रचंड काम करतात , शारीरिक आणि मानसिक सुद्धा पण त्यांना नाही हि असली कारणे मिळत .

आज कॅन्सर सारख्या आजाराच्या हॉस्पिटल मध्ये वाढ होत आहे . पूर्वी होती का इतकी हॉस्पिटल ? आज कमी पडत आहेत . का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे . ह्याला कारण आपले नकारात्मक विचार आणि  संपूर्णपणे बिघडलेली विचारसरणी , जीवनशैली , स्ट्रेस .पण तो येवू नये म्हणून आम्ही काहीही करणार नाही , झोप काढणार फक्त . कटू सत्य आहे .

मानसिक आणि शारीरिक दृष्टीने सुधृढ राहायचे असेल तर वेळेचे नियोजन आयुष्यात असायलाच हवे. आपले आचार विचार , योग्य तो आहार आणि त्याच सोबत व्यायाम , योगासने ह्याची योग्य ती सांगड घालता आली पाहिजे .  आम्हाला वेळ नसतो ह्या गोंडस ऱ्यापर मध्ये ज्यांना स्वतःला गुंडाळून ठेवायचे आहे त्यांना काहीच सांगणे नाही . ह्या सर्वात सगळ्यात मुख्य म्हणजे उपासनेचीही जोड हवी कारण तीच आपल्याला आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवते . बिघडलेल्या मनाचा लगाम   हाती घेणारी उपासना आहे. उपासना म्हणजे थोतांड नाही तर ती आपल्या जीवनाचा कणा आहे. पूर्वी च्या काळी सकाळी संध्या करणे , स्तोत्र म्हणणे , संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून शुभम करोति , मनाचे श्लोक हि साधना नित्याची होती . आजही आहे पण त्याचे प्रमाण कमी आहे. 

उपासना आपल्या विचारांची लक्ष्मण रेषा आहे. आज आपला संयम गेला आहे. आपल्याला संयमित करणारी उपासना का सर्व श्रेष्ठ आहे त्याचे मुळ कश्यात आहे आणि त्याचे महत्व समजण्यासाठी ती करायला सुरवात करणे महत्वाचे आहे. आपल्या पत्रिके नुसार काय करायला पाहिजे कुठल्या ग्रहाला बळकटी दिली पाहिजे ते सर्व नंतर . रोज कुलस्वामिनी , कुलाचे दैवत , श्री गणेश , आपले सद्गुरू ह्यांची उपासना नित्य हवी आणि त्यात खंड पडू नये. समस्या निर्माण झाली कि देवदेव करण्यात तसाही काही अर्थ नसतो. आजकाल एक माळ जप ( ज्यात आपले लक्ष नसते हे त्रिवार सत्य आहे ) केला तर देवाला विकत घेतल्यासारखा आव आणतो आपण , बघ बघ मी तुझे नाव घेतो आहे शेवटी तो पांडुरंग म्हणेल धन्य झालो बाबा आता नको घेवूस माझे नाव असाच अविर्भाव असतो आपला  . अहो आपले प्रोब्लेम बघा , कुलदेवीच्या दर्शन जातो का आपण ? नाही . 

पूर्वीच्या काळी स्त्रिया घर आणि ओसरी शेणाने सारवत असत . आपण निदान शनिवारी  चार चमचे गोमुत्र आणि २ चमचे हळद एकत्र करून घराचा उंबरठा तरी सारऊया . हे लेपन अनेक आजारांना चुकीच्या विचाराना आणि सर्वात मुख्य कुणाची घराला दृष्ट , नजर लागण्यापासून परावृत्त करते . किती वेळ लागतो हा उपाय करायला पण करणार कोण ? पूर्वीच्या काळात स्त्रियांना ओटीवर यायला मज्जाव होता .आता शेजारणीशी गप्पा मारायला आपल्याला घराचा उंबराच सापडतो .  सगळे सुख दुक्ख वैभव ज्या दरवाज्यातून आत येते त्या उंबरठ्यावर चक्क पाय ठेवून येतो आपण. एकीकडे लक्ष्मीची पावले लावायची आणि त्याच उंबरठ्यावर पाय ठेवायचा, काय म्हणायचे ह्याला. आजपासून घरात सर्वाना सांगा कुणीही उंबरठ्यावर पाय ठेवायचा नाही अगदी पाहुण्यांना सुद्धा सांगा . घर आपले आहे ना? 

आपले मन आज त्रासलेले आहे , अनेक प्रश्न आहेत पण ते निर्माण होण्यापूर्वीच आपण उपासक झालो तर त्याचे प्रमाण निश्चित कमी होईल . मन थार्यावर आणण्याचा एकमेव उपाय म्हणजे जप , देव दर्शन , पारायण आवश्यक आहे. उपासनेची विविध अंगे आहेत , जे कराल त्यात सातत्य ठेवा . 

प्रगत सोशल मीडियामुळे आज आपल्यावर जगातील आणि सर्वच क्षेत्रातील माहितीचा नुसता भडीमार होत आहे . पण त्यातील आपल्याला नक्की काय वेचायला हवे त्यापेक्षा काहीही वाचायचे आणि त्याच्या आहारी जायचे हे आजचे चित्र आहे . उदा गेल्या महिनाभरात मला ४-५ लोकांनी सांगितले कि आम्ही कुंभ विवाह केला पण विवाह अजून जुळला नाही लेकीचा . पण तुमच्या मुलीच्या पत्रिकेचा आणि कुंभ विवाहाचा काडीचाही संबंध नसताना केला कश्याला ? हे म्हणजे ताप आला कि घ्या क्रोसिन असे झाले . पण प्रत्येक तापावर क्रोसिनच उपयोगी पडेल असे नाही ना. 

मी तर फक्त स्वामी स्वामी करते आणि प्रत्येकाला त्यांच्या नामाची ओढ कशी लागेल तेच बघते ह्याचे कारण मला मिळालेली प्रचीती . सगळ्या नद्या जश्या सागराला मिळतात तशीच सगळी भक्ती आपल्या गुरूकडे जाते. त्यांनी ठरवले तर काय होणार नाही . 

जपजाप्य हे म्हतार्यांचे चोचले नाहीत तर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचे ते आद्य कर्तव्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला आईने नामस्मरण श्लोक शिकवले त्यात सातत्य ठेवले तर उत्तर आयुष्यात कसलेच प्रश्न येणार नाहीत आणि आलेच तर त्याच्याशी दोन हात करण्याचे मानसिक सामर्थ्य त्याला मिळत राहील. कुल दैवत माहित नसेल शोधून काढा , नक्कीच समजेल .

आयुष्यात निष्काम भक्ती चे अनन्यसाधारण महत्व आहे. मुखात त्यांचे नाव असणे आपल्याच भल्याचे आहे . प्रत्येक कर्म सुधारेल आपले. कुणाला काय बोलतोय त्या आधी विचार करायला शिकू आपण आणि हेच तर मर्म आहे साधनेचे . आपल्या रागावर , प्रलोभनात फसणाऱ्या आपल्या मनाला लागाम उपासनाच घालू शकते . उपासनेने अहंकाराची कवच कुंडले घालून जी मदमस्त होवून आपण फिरत असतो ती गळून पडतील. अहो जगायला पैसा हवा पण त्याचा बडेजाव किती ? मृत्युच्या शय्येवर असणार्या आपल्या आप्तेष्ठाला आपला पैसा नाही परत आणू शकणार , पण आपण आजवर केलेले दानधर्म आणि उपासना  नक्कीच फलश्रुत होईल. 

थोडक्यात काय तर आपल्या मनावर आणि विचारांवर संपूर्ण आपला स्वतःचाच ताबा असला पाहिजे , कुणीही कुठेही वाहवत जाता उपयोगी नाही आणि त्यासाठी मनाला बळकट करण्यासाठी उपासना नामस्मरण पारायण आणि सतत मनन चिंतन केले तर अशक्य ह्या जगात काहीही नाही. आपल्या सत्कर्मात आणि साधनेत रोज कण कण भर घालण्याची गरज आहे , कुणासाठी ??? अर्थात आपल्या स्वतःसाठीच . शेवटचा क्षण सुखाचा करायचा असेल तर उपासनेला पर्याय नाही . सहमत ?

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230


 



Friday, 2 August 2024

उपासनांचा मेरुमणी “ श्रावण “

 || श्री स्वामी समर्थ ||




श्रावण ह्या नावातच अपार सौंदर्य आहे. श्रावण म्हंटले कि परमार्थाकडे आपल्याही नकळत मन ओढ घेते . अध्यात्माचा मनमुराद आनंद लुटण्याचा हा महिना प्रत्येकासाठी खास आहे. एखादी उपासना , ठराविक नामस्मरण हे सर्व करण्यासाठी सुरवात करायला “ श्रावण “ अगदी उंबरठ्यावर येवून पोहोचला आहे. रविवारी दिप पूजन झाले कि प्रतिपदा लागेल आणि श्रावण सुरु होईल. ह्या महिन्यातील प्रत्येक दिवस खास असतो .  

महादेवाची उपासना हे श्रावणाचे खास वैशिष्ठ . शिवामूठ वाहण्याचे आणि सोमवारच्या उपवासाचे व्रत अनेकांचे पिढ्यानपिढ्या असते . श्रावणसरी बरसत असतात आणि आपला बाजार वेगवेगळ्या हिरव्यागार भाज्यांनी आणि फुलांनी डवरलेला असतो . हा पाऊस हवाहवासा वाटतो . वातावरणातील गारवा भक्तीची ओढ लावणारा असतो. एकंदरीत पृथ्वी वरील ह्या काळातील निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल आणि आसमंतातून होणारी वृष्टी मनाला प्रसन्न करते . हे सर्वच मंगलमय वातावरण आपल्याला नामस्मरण , पारायण , उपासनेची ओढ लावते . 

स्त्रिया आपले ठेवणीतील दागदागिने , वस्त्रे बाहेर काढतात आणि मंगळागौर , शुक्रवारचे व्रत , देवीची ओटी एक ना दोन सर्वात रममाण होताना दिसतात . विविध पदार्थांची सुद्धा घराघरात रेलचेल असते त्यामुळे जिभेचे चोचले सुद्धा पुरवले जातात . 

असा हा भक्तीची , परमार्थाची ओढ लावणारा श्रावण आयुष्यातील आनंदात भर घालतो तेव्हा जगायला उत्साह येतो , मनात नवनवीन आशा पल्लवित होतात .

श्रावण मासात हे करून पहा 

१. एका गरजू  स्त्रीची ओटी भरावी  तिचा ५ धान्ये ( थोडक्यात शिधा द्या )

२. ज्यांना शनी किंवा राहूची दशा चालू आहे त्यांनी तेलाच्या लहान बाटलीचे दान करावे .

३. शनी वक्री आहे त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला पायातील चपला भेट द्या , छत्री द्या .

४ शाळकरी गरजू मुलाला ६ वह्या द्या त्याच्या शिक्षणाला मदत करा .

५ सर्वात श्रेष्ठ दान कुठले तर अन्न दान ..गरजू व्यक्तीला भोजन द्या.

६ कुठलाही दान धर्म करताना मनात परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावी आणि कुणाला तरी मदत करण्याची संधी तू मला दिलीस म्हणून कृतज्ञता सुद्धा असावी . आपण करत असलेल्या दान धर्माचा कदापि अहंकार येवू देवू नये , दान हे नेहमी गुप्त असावे , वाच्चता नसावी , कारण त्याचा आपल्याही नकळत आपल्यालाच अहंकार येतो.. मी हे केले आणि मी ते केले हे नकोच आहे आपल्याला. त्याने माझ्याकडून करवून घेतले , दान करायची त्याने मला बुद्धी दिली म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक व्हावे. 

७ दर शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीला वेणी गजरा आणि हळद कुंकू वाहून प्रार्थना करावी . श्रीसूक्त म्हणावे . येत नसेल तर youtube वर लावा चालेल . त्यामुळे घरातील स्पंदने , लहरी सकारात्मक होतील. मुले अभ्यासाला लागतील करून बघा . 

८ घराचा उंबरठा गोमुत्र आणि हळद ह्यांनी सारवावा. 

९ रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा लावावा . ऑफिस मधून उशीर होतो यायला हि सबब अजिबात नको रात्री १० वाजता आलात तरी लावा .

१० . रोज संध्याकाळी तुपाचे निरांजन लावून देवांना ओवाळावे , आवर्जून घरातील मुलांनी त्यावेळी तिथे असावे.

११. शनी राहू दशा असेल तर हनुमान चालीसा ला दुसरा पर्याय नाही . आपण कलियुगात आहोत , संकटांचे डोंगर आहेत तेव्हा एकदा म्हणून चालणार नाही . सकाळी ३ वेळा आणि संध्याकाळी ३ वेळा म्हणा . स्वतः म्हणा पण त्याआधी रामाचा जप करा कारण “ जिथे राम आहे तिथे मी आहे ..” हे हनुमानाचेच वचन आहे.  

१२. अनेक घरात संध्याकाळी रामरक्षा म्हंटली जाते . 

१३. निदान एक शुक्रवार तरी आपल्या कुलस्वामिनीला महानेवेद्य करावा. घरातील सर्वांनी तो प्रसाद घ्यावा.

१४ सत्यनारायण , लघुरुद्र , पवमान अश्या अनेक माध्यमातून घरोघरी देवतांचे पूजन होत असते . 

१५ माहेरवाशिणी साठी हा खास महिना त्यामुळे नुकताच विवाह झालेल्या आपल्या मुलीना घरी बोलवून ओटी भरावी .

१६ ढीगभर उपसानांचा घोळ घालण्यापेक्षा आपले संपूर्ण दिवसाचे नियोजन करावे आणि ठराविक व्रते करावीत पण त्यात सातत्य ठेवावे . रोज १६ वेळा श्रीसूक्त म्हंटले तर एक आवर्तन होते पण ते रोज करायला वेळ आहे का त्याचे गणित जमणार आहे का ? ह्याचा सारासार विचार करून करावे. उपासनेचा खेळ खंडोबा नको.

१७ आपापल्या कुटुंबाच्या चालीरीतींचे पालन करावे . 

१८ जिवती पूजन 

१९ आपल्या सद्गुरूंचे स्मरण तर आपल्या श्वासातच असले पाहिजे . त्यांच्याशिवाय आपला चेहरा सुद्धा आरशात दिसत नाही आपल्याला. जमल्यास त्यांचे दर्शन घेवूया . गुरूलीलामृत , श्री गजानन विजय ग्रंथ , श्री साई चरित्र अश्या ग्रंथांचे पारायण आवर्जून करावे .

श्रावण हा दानधर्म करण्याचा मास आहे. आपण नेहमी घेत असतो . देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही हेच जणू सांगण्यासाठी हा “ श्रावण मास “ येत असावा. 



देवासमोर दिवा लावून शांतपणे नामस्मरण करताना बाहेर कोसळणाऱ्या श्रावण सरी ...मनाला अपार गोडी आणि डोळ्यातून अश्रू नाही आले तरच नवल. महाराज आपल्या भक्तांच्या हृदयात नक्कीच प्रवेश करणार हा विश्वास ठेवून तन मनाने आपले जीवन त्यांच्या चरणी समर्पित करुया , आपला संसार त्यांच्या चरणाशी अर्पण करुया आणि बघा ते आपले आयुष्य सर्वार्थाने कसे खुलवतात . अहो आपण फार साधी माणसे आहोत . साधी भाजी २५ रुपयाची ३० रुपये झाली तरी आपले महिन्याचे बजेट कोसळते इतकी साधी आहोत . म्हणूनच आपण साधीच भक्ती करुया पण मनापासून संपूर्ण श्रद्धेने कुठलाही डामडौल देखावा न करता कारण तीच थेट आपल्या सद्गुरूंच्या  हृदयाशी पोहोचणार आहे. 

उपासनेला आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याची फलश्रुती देणारा हा साजिरा श्रावण येत आहे. उपासना आपले आयुष्य घडवतात , आपल्या मनाला आधार देतात , दान धर्म आपल्याला आपल्या संकुचित बुद्धीतून मुक्त करतो , देण्याचे महत्व शिकवणारा हा श्रावण .


का होत नाही माझ्या मुलाचा विवाह ..नक्कीच होणार , नोकरी मिळणार होती त्याही पेक्षा उत्तम मिळणार , माझे शरीर निरोगी आहे आणि सगळे आजार मी दूर पळवणार हि सकारात्मक भावना देणाऱ्या आणि आपल्या आराध्याच्या समीप नेणारा हा श्रावण आपल्यातील “ मी पणा ची “ कवच कुंडले टाकून देण्यासाठी तसेच उपासनेचे महत्व सांगण्यासाठी येत आहे. आपल्या घरासोबत आपले मन सुद्धा घासून पुसून लखलखीत करुया , मनातील द्वेष , राग , असूया , मत्सर , मोह , संकुचित मनोवृत्ती  ह्यांना कोसो दूर करून मन श्रद्धेने आणि भक्तीरसाने भरून टाकूया. 

चला तर मग आपल्या आवडत्या , सहज जमणार्या उपासना करुया आणि “ श्रावण सोहळा “ खर्या अर्थाने जगूया .

आपल्या सर्वांकडून सद्गुरू उत्तम उपासना करून आपल्याला परमार्थाची गोडी चाखण्याची संधी देतील ह्यात शंकाच नाही. 

असा हा श्रावण सोहळा आपल्या सर्वांचे आयुष्य समृद्ध करुदे , परमार्थीक गोडी आणि सुख प्रदान करुदे ,आपल्या सर्व इच्छा फलद्रूप होवूदे आणि निरंतर सेवेचे व्रत आचरणात आणण्यास मदत करुदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना . 

आपापल्या मैत्रिणी , नातेवाईक ह्यांचे whatsapp ग्रुप करून ठराविक नामस्मरण करा . आपल्या विचारात झालेले बदल आणि अनुभव कळवा .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  


Thursday, 1 August 2024

खेळ दशांचा

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्यात प्रत्येक गोष्ट अमुक एक वेळेतच घडत असते , ती कुठल्या वेळेला होईल हे सांगण्यासाठी दशा , अंतर्दशा आणि विदशा ह्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उत्तम ज्योतिषी तोच असतो ज्याला सद्य स्थितीची म्हणजेच दशेची जाण असते . दशा म्हणजे शेवटी काय तर परिस्थिती . कुठल्या स्थितीत काय घटना घडतील हे दशा च सांगू शकते . 

एखादा जातक जेव्हा पैशाचे नुकसान होते किंवा नोकरीतून अचानक निलंबन होते तेव्हा सर्वप्रथम ह्या मध्ये जातक अडकलाच का ? हे समजणे महत्वाचे असते . पुढे त्यातून तो कधी बाहेर येणार हेही दशाच सांगते .म्हणून जीवन म्हणजे दशांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला उत्तम समजून घेता येयील तो ह्या शास्त्रात निश्चित प्रगतीपथावर जायील .

विवाह झाला पण मुल होत नाही ते कधी होईल ? बघा विवाह झाला म्हणजे त्यासंबंधित असणारी दशा लागली म्हणून विवाह झाला पण पुढे अपत्य प्राप्तीसाठी सध्याची दशा अनुकूल नाही म्हणून अपत्य होण्यासाठी विलंब होतो. पटतय ना? म्हणूनच विवाहमिलन करताना नुसते गुण जमवून काय उपयोग , पुढच्या दश्या बघा कि . 


प्रत्येक दशा आयुष्यात सर्व काही देणार नाही . ज्या भावांशी दशा स्वामी निगडीत आहे त्याच संबंधातील फळ आपल्याला मिळेल . उदा 4 9 ची दशा परदेशात जावून उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तम पण ह्याच दशेत नोकरी मिळणार नाही कारण ह्या नोकरीच्या दशा नाहीत . अगदी असेच नाही जर ती व्यक्ती अध्ययन क्षेत्रात असेल तर त्या क्षेत्रात नोकरी मिळू शकेल. पण तेच क्षेत्र असेल तर आणि तरच . नवं भावाची दशा दशमाचे फळ देणार नाही .  जन्मल्यापासून व्यक्ती व्यसनाधीन नसते , ठराविक घटनांचा परिणाम होवून त्या दुक्खातून बाहेर येवू शकत नाही , ते दुक्ख पचवता येत नाही , अनेकदा अपयश सुद्धा पचवता येत नाही म्हणून व्यक्ती व्यसनात स्वतःला गुरफटवून टाकते कारण हेच त्या दशेचे फळ असते . 

अनेकदा अत्यंत चांगल्या माणसाला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते किंवा अगदी तुरुंगाची हवासुद्धा खायला लागते . अचानक ध्यानीमनी नसताना परदेशात नोकरी मिळते आणि परदेशगमन होते . एखादी दशा आजवरचे सगळे नाते संबंध तोडून मोडून टाकते ,एकटेपणा देते तर एखादी दशा गंभीर आजारपण देवून अंथरुणाला खिळवून ठेवते .

अनेकदा मुले हुशार असतात , आज्ञाधारक असतात पण अचानक काय होते माहित नाही पण आपल्याच धुंदीत राहायला लागतात , उलट बोलायला लागतात , घरी दिलेल्या पैशाचा हिशोब देताना धास्तावतात , अभ्यासातून लक्ष उडते आणि रात्ररात्र मोबाईल आणि घराच्या बाहेर राहायला लागतात . अहो संपूर्ण जीवन ज्या आईवडिलांनी मुलांसाठी राबराब राबून खर्च केले ते अश्याने हतबल होणार नाही तर काय होयील ?

नुसती पाच पंचवीस पुस्तके आणि नियम वाचून ज्योतिषी होता येत नाही . त्यासाठी परिस्थितीची उत्तम जाण असावी लागते . एखादा धनिक आपल्या मुलासाठी खूप डोनेशन देवून त्याला डॉक्टर बनवेल सुद्धा पण समोर रुग्ण आला तर त्याला कावीळ झाली आहे कि अजून काही हे त्याला सांगता आले नाही तर सर्व फोल आहे. 

ज्योतिषाने  जातकाला प्रश्न विचारून मागील ग्रहदशानी काय काय दिले ह्याची खात्री करून घ्यावी जेणेकरून पत्रिका बरोबर आहे ना ह्याचाही अंदाज येतो. जसे अनेकदा मागील दशा षष्ठ भावाशी निगडीत होती म्हणून आजारपण दिले पण आता पंचामाची दशा असल्यामुळे डॉक्टरांच्या औषधाचा गुण येवून आजार बरा झालाय .

एखादी दशा भरभरून देईल , आयुष्याचे सोने करेल तर एखादी उध्वस्त करेल, एखादी अंतर्मुख करायला लावेल तर एखादी मान सन्मान आदर यश मिळवून उच्च शिखरावर नेणारी असेल. पंचम भावाची दशा म्हणजे आपल्या पूर्व कर्माची ओळख करून देणारी  मग ती चांगली असोत अथवा वाईट . दशा समजण्यासाठी वर्ग कुंडलीचा सखोल अभ्यास पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही . अनेकदा कृष्णमुर्ती पद्धत ह्यावर अधिक सूक्ष्म प्रकाश टाकू शकते . 

दशा कुठली आहे हे न पाहता , नुसताच गुरु लग्नात आला आणि रवी सप्तमात आला म्हणून विवाह होईल हे सांगणाऱ्या ज्योतिषांचे भाकीत हमखास चुकते .

सरतेशेवटी एखाद्याचे मन समजायला , त्याच्या आयुष्यावर भाष्य करायला आणि त्याला मार्ग दाखवायला सुद्धा आपल्यावर गुरुकृपा असणे आवश्यक आहे. गुरुकृपा नसेल तर आपण नुसतेच शब्दांचे खेळ करणारे पुस्तकी पांडित्य करू पण गुरुकृपा असेल तर त्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचा उपाय त्याला सांगून त्याचे जीवन प्रकाशमय करू . प्रत्येक ग्रह नक्षत्र राशी आणि त्यांचे योग ह्यातून हे शास्त्र साकारले आहे , उपायांचेही तेच आहे. प्रत्येक वेळी विवाह जमत नाही म्हणून कुंभ विवाह केला तर विवाहयोग जुळून येयील का? समजून घ्या असे होत नसते , हाती काही लागत नाही पण पैसे मात्र खर्च होतात. पुस्तके ग्रंथ वाचून ज्ञान मिळेल पण त्याचा संदर्भ समोरच्या पत्रिकेत कसा लावायचा ह्याला गुरुकृपा लागते . गुरुकृपेशिवाय तुम्ही ह्या क्षेत्रात उभे राहूच शकणार नाही. गुरु म्हणजे ज्ञान जे आहे म्हणून पत्रिकेचे मर्म समजणार आहे. पंचम अष्टम भावाच्या दशेत व्यक्ती  ज्योतिष शास्त्राचा अभ्यास उत्तम करेल. 

लोक उपाय विचारतात पण हाच उपाय का? ते नाही विचारात . तसेच नेमका कश्यासाठी हाच उपाय करावा हेही समजून घेत नाहीत . सूर्याला अर्घ्य घाला म्हंटले तर लगेच हो म्हणतील पण का? ते काय करायचे आहे . असे आहे सर्व . आपल्याकडे पत्रिका आली कि तिला नमस्कार करावा कारण ती पत्रिका एका आत्म्याचा प्रवास आहे त्याचे वाचन करताना गुरूंचे स्मरण करावे. त्यांच्याच कृपेने सर्व उत्तम व्हावे अशी प्रार्थना करावी . कारण शेवटी तेच करते करवते आहेत . 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230