Monday, 26 August 2024

कृष्णा आमचे मागणे थांबव..

 || श्री स्वामी समर्थ ||


कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वाना खूप शुभेछ्या . अष्टमी हि अपार सौंदर्याची तिथी आहे. कृष्ण तनामनावर राज्य करणारा , आपल्या हाकेला तत्पर धावून येणारा आणि आपल्या चेहऱ्यावर क्षणात स्मित आणणारा . कृष्णाचे आयुष्य आपल्याला घडवेल इतके जबरदस्त ग्रहयोग त्याच्या पत्रिकेत आहेत  . प्रभू श्रीराम , माऊलीआणि कृष्ण ह्यांच्या पत्रिकेत अखंड ज्योतिष सामावेल इतक्या त्या गहन आहेत . सामान्य माणसाच्या सीमारेखा जिथे संपतात तिथे संतांच्या पत्रिकांचे अध्ययन सुरु होते म्हंटले तर वावगे ठरू नये. 

कृष्णाने सहस्त्र स्त्रियांचे रक्षण केले पण आज तो आपल्या भेटीला येयील तेव्हा त्याला काय चित्र दिसणार आहे ? त्यानेच निर्माण केलेल्या विश्वात आज स्त्रीच असुरक्षित आहे . आजूबाजूला आज घडणाऱ्या घटना विशेष करून आपल्या भगिनींच्या वर होणारे अत्याचार मन हेलावणारे आहेत .  प्रत्येक स्त्री कधी मोकळा श्वास घेवू शकेल ??कुठे चालली आहे आपली मानसिकता आणि समाज ? ह्या आजच्या काळात त्या कृष्णाला , श्री गणेशाला सुद्धा यावेसे वाटणार नाही इतकी भीषण अवस्था  त्यांच्या भेटीला आहे . ते म्हणतील हेच शिकवले का मी तुम्हाला? असो.

आपले देवाकडील मागणे आणि संतांचे मागणे ह्यात किती फरक आहे बघा . दिसला देव कि माग त्याच्याकडे काहीतरी हि आपली नित्याची सवय  . पण मागून मागून काय मागणार तर भौतिक सुखाची न संपणारी यादी . मुलाचे लग्न होवूदे ..झाले लग्न मग आता नातवंड मागा . संपतच नाही हो आपले. का मागतो आपण ? कधी विचार केला का? खरतर त्याला सगळच माहित आहे कि आणि तो देणारच आहे , कारण तो द्यायलाच बसला आहे. पण आपण त्याच्याकडे न मागताही तो आपल्याला देणार हा विश्वासच हरवून बसलो आहोत आपण ...म्हणून सतत हे दे ते दे करत असतो . 


इतके जबरदस्त नामस्मरण वाढवा , अखंड नामात राहा कि मागायचा विसर पडेल आपल्याला आणि त्या नामस्मरणात इतकी शांतता , समाधान लाभेल जे मागूनही मिळणार नाही . तदपश्चात मागण्यासारखे काही उरणारच नाही . न मागताच सगळे वेळ आली कि आणि आपल्या भाग्याप्रमाणे मिळणारच , अनुभव घेवून पहा .

कृष्णाकडे आज जगण्याचे बळ मागुया आणि जिथे आपण सर्व सुरक्षितपणे वावरू अश्या समाजाची उभारणी करुया , स्त्रियांना सक्षम , खंबीर करुया . रांगोळ्या , स्वयपाक शिका पण आधी मार्शल आर्ट , कराटे शिका. आज स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे आहे . स्वतःचे अस्तित्व जपा आणि वृद्धिंगत करा आणि त्यासाठी एकच ढाल हवी ती म्हणजे नामस्मरणाची . रामरक्षा , हनुमान चालीसा , श्रीसूक्त , नामस्मरण ह्याचा अक्षरशः पाऊस पाडा , इतका कि तोच शोधात येयील आपल्याला. कोण बर माझ्या नामात इतका गुंगला आहे हे पाहून परमेश्वर सुद्धा हतबुद्ध होईल. पण करणार होण ? कधी सुरवात करणार आपण ? 

आकाशात एकटक बघा जरा अहो सगळे ग्रहतारे आपल्याच कल्याणासाठी बसले आहेत . गोलोकातील कृष्ण सुद्धा आपल्या बाळ लीला पाहून हसत असावा. विश्वासच नाही आपला , कश्यावरच नाही , ना आपण केलेल्या साधनेवर ना स्वतःवर . मन सैरभैर झाले आहे.  परवा एका मुलाने मला सांगितले मी एक माळ रोज करतो म्हंटले अरे वा छान आणि insta /सोशल मिडीयावर किती वेळ असतोस ? निरुत्तर . अहो सोशल मिडीया पण हवे काळाची गरज आहे ती पण म्हणून एक माळ ? त्याचा वेळ वाढवा , वेळ आहे आपल्याकडे तो कश्यात किती घालवायचे ते गणित कदाचित चुकतेय आपले. 


मग ह्या ज्योतिषाकडून त्या ज्योतिषाकडे आमची वारी सुरु ...कारण नामातील ताकद अनुभवलीच नाही आपण . तितका विश्वासच नाही आपला. नामस्मरण म्हणजे म्हतार्यांचे चाळे, वेळ घालवायचे साधन वाटते आपल्याला . मी माळ घेवू ? काहीतरीच ..अहो मित्र हसतील कि मला . चेष्टेचा विषय बनेल मी . चोरून देवळात जायचे कारण मित्र हसतील , म्हणतील तू IT मधला विद्वान देवळात कसला जातोस , बाहेर या ह्या सगळ्या भ्रमातून , स्वतःला सावरा आणि इतरानाही सावरायला मदत करा . ज्ञानेश्वरी , गीता , श्री गजानन विजय अहो जीवनाचे सार आहे ह्यात . प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडेल ह्यात तुमचे तुम्हालाच ,  ज्ञानाने परिपक्व व्हाल आणि एक समृद्ध जीवन सुद्धा जगाल. 

आज कृष्ण जन्म . त्याने असंख्य लढाया लढल्या , त्यातल्या अनेक आपल्याच माणसांच्या विरोधात . त्याला सगळे शक्य होते पण ..हा पण महत्वाचा आहे. संताना , ज्ञानेश्वरांना किती त्रास झाला. ज्यांनी भिंत चालवली , ज्यांनी बारा वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला पाणी आणले त्यांना काय शक्य नव्हते , पण त्यांनी आपल्याला काही शिकवण देण्यासाठी प्रपंचातील दाह सोसला.

आज कृष्णाकडे एकच मागुया.... बाबारे आमचे मागणे थांबव ....तुझ्या शक्तीवरचा आमचा विश्वास द्विगुणीत कर , तू आहेस आणि सतत आमच्यासोबत आहेस ह्याचे अनंत दाखले दिलेस तसेच देत राहा बाबा . 

श्रीकृष्ण समजणे सोपे नाही ...खचितच नाही ...

टीप : कृपया लेख नावासकट शेअर करावा हि विनंती . 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




No comments:

Post a Comment