Sunday, 4 August 2024

आपल्या आचार विचारांची लक्ष्मण रेषा म्हणजे उपासना

 || श्री स्वामी समर्थ ||


सैरभैर मनाचा लगाम म्हणजेच निष्काम उपासना

( कलियुगात उपासनेची आवश्यकता का ?  आवर्जून  वाचा आणि अभिप्राय कळवा )

जन्मल्यापासून आपण काय काय कर्म केली ह्याचा आपण स्वतःच अत्यंत प्रामाणिक पणे मोजमाप केले तर आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब दुसर्या कुणी मांडायची गरज उरणार नाही . आपणच आपले न्यायाधीश होऊ. किती लोकांचे अपमान केले आपण ? शब्दाने किंवा मनाने किती जणांचे वाईट चिंतले आपण , किती जणांची उधारी ठेवली आहे ? आई वडिलांशी कसे वागलो आहे ? अगणित उत्तरे आहेत आणि ती द्यायची आहेत आपली आपल्यालाच. 

आयुष्याच्या शेवटी अगतिक अवस्था नको असेल तर अगदी जन्मल्यापासूनच उपासना करावी . पूर्वीचे लोक  सोवळ्याने पूजा करायचे , जानवे घालायचे , मासिक धर्म पाळायचे ते वेडे होते म्हणून कि काय ? आपण त्या रूढीना हसतो पण त्यामुळेच आपल्या आयुष्याला वळण होते शिस्त होती .  त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीना काही शास्त्र असते , काही विचार असतात ते मानव कल्याण साठीच असतात . साधा गोडा मसाला करायचा तर त्याचेही प्रमाण आहे , नाहीतर त्याचेही रूप रंग चव बदलेल . आपलेही तसेच आहे. मन स्थिर नसेल तर आपण कश्याच्याही आहारी जायला वेळ लागणार नाही . अगदी व्यसनेच केली पाहिजे असे नाही . चुकीची संगतच नाही तर चुकीची विचारधारा हेही व्यसनच आहे मंडळी .

कुणीही मित्र आपल्याला फोन करतो आणि चल म्हंटले कि आपण लगेच येतो म्हणतो , मग ते लोणावळ्याची पावसाळी सहल असो किंवा अन्य काही . घरचे नाही म्हणत असतानाही जणू खेचल्या सारखे जातो . आपले स्वतःचे स्वतंत्र विचार , अस्तित्व मते असे नाहीतच का? असाच प्रश्न आजकाल पडत चाललाय . कुठलीही वस्तू त्या instaa वर दिसली घ्या लगेच विकत , लगेच gpay करून मोकळे . अहो हे मायावी जग झालय , आभासी , भुलवणारे , नको तिथे लक्ष्मी जातेय आपली , राहुने ताब्यात घेतलय आपल्याला . उठ सुठ खरेदीच्या मागे आहोत . शनिवार रविवार हॉटेल मधेच गिळणार आम्ही , घराची चव नकोशी झालेय , मोमोज म्हणायला मोठेपणा वाटतोय आणि सांज्याची पोळी म्हणायला लाज वाटतेय हे वास्तव आहे .

स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायची आजकाल नवीन फ्याशन आली आहे आणि मग शेअर मार्केट मध्ये पैसे डुबले कि मग येते घरातल्या मोठ्यांची आठवण . दारू प्यायला अक्कल लागत नाही आणि कारण तर अजिबात नाही. दारू प्यायला कारण शोधत असतात ते मिळाले कि चालले. मन ठिकाणावर नसल्याची आणि पत्रिकेतील चंद्र प्रमाणाच्या बाहेर बिघडल्याची हि लक्षणे आहेत . आज स्त्रिया घरात नोकरी सांभाळून प्रचंड काम करतात , शारीरिक आणि मानसिक सुद्धा पण त्यांना नाही हि असली कारणे मिळत .

आज कॅन्सर सारख्या आजाराच्या हॉस्पिटल मध्ये वाढ होत आहे . पूर्वी होती का इतकी हॉस्पिटल ? आज कमी पडत आहेत . का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे . ह्याला कारण आपले नकारात्मक विचार आणि  संपूर्णपणे बिघडलेली विचारसरणी , जीवनशैली , स्ट्रेस .पण तो येवू नये म्हणून आम्ही काहीही करणार नाही , झोप काढणार फक्त . कटू सत्य आहे .

मानसिक आणि शारीरिक दृष्टीने सुधृढ राहायचे असेल तर वेळेचे नियोजन आयुष्यात असायलाच हवे. आपले आचार विचार , योग्य तो आहार आणि त्याच सोबत व्यायाम , योगासने ह्याची योग्य ती सांगड घालता आली पाहिजे .  आम्हाला वेळ नसतो ह्या गोंडस ऱ्यापर मध्ये ज्यांना स्वतःला गुंडाळून ठेवायचे आहे त्यांना काहीच सांगणे नाही . ह्या सर्वात सगळ्यात मुख्य म्हणजे उपासनेचीही जोड हवी कारण तीच आपल्याला आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवते . बिघडलेल्या मनाचा लगाम   हाती घेणारी उपासना आहे. उपासना म्हणजे थोतांड नाही तर ती आपल्या जीवनाचा कणा आहे. पूर्वी च्या काळी सकाळी संध्या करणे , स्तोत्र म्हणणे , संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून शुभम करोति , मनाचे श्लोक हि साधना नित्याची होती . आजही आहे पण त्याचे प्रमाण कमी आहे. 

उपासना आपल्या विचारांची लक्ष्मण रेषा आहे. आज आपला संयम गेला आहे. आपल्याला संयमित करणारी उपासना का सर्व श्रेष्ठ आहे त्याचे मुळ कश्यात आहे आणि त्याचे महत्व समजण्यासाठी ती करायला सुरवात करणे महत्वाचे आहे. आपल्या पत्रिके नुसार काय करायला पाहिजे कुठल्या ग्रहाला बळकटी दिली पाहिजे ते सर्व नंतर . रोज कुलस्वामिनी , कुलाचे दैवत , श्री गणेश , आपले सद्गुरू ह्यांची उपासना नित्य हवी आणि त्यात खंड पडू नये. समस्या निर्माण झाली कि देवदेव करण्यात तसाही काही अर्थ नसतो. आजकाल एक माळ जप ( ज्यात आपले लक्ष नसते हे त्रिवार सत्य आहे ) केला तर देवाला विकत घेतल्यासारखा आव आणतो आपण , बघ बघ मी तुझे नाव घेतो आहे शेवटी तो पांडुरंग म्हणेल धन्य झालो बाबा आता नको घेवूस माझे नाव असाच अविर्भाव असतो आपला  . अहो आपले प्रोब्लेम बघा , कुलदेवीच्या दर्शन जातो का आपण ? नाही . 

पूर्वीच्या काळी स्त्रिया घर आणि ओसरी शेणाने सारवत असत . आपण निदान शनिवारी  चार चमचे गोमुत्र आणि २ चमचे हळद एकत्र करून घराचा उंबरठा तरी सारऊया . हे लेपन अनेक आजारांना चुकीच्या विचाराना आणि सर्वात मुख्य कुणाची घराला दृष्ट , नजर लागण्यापासून परावृत्त करते . किती वेळ लागतो हा उपाय करायला पण करणार कोण ? पूर्वीच्या काळात स्त्रियांना ओटीवर यायला मज्जाव होता .आता शेजारणीशी गप्पा मारायला आपल्याला घराचा उंबराच सापडतो .  सगळे सुख दुक्ख वैभव ज्या दरवाज्यातून आत येते त्या उंबरठ्यावर चक्क पाय ठेवून येतो आपण. एकीकडे लक्ष्मीची पावले लावायची आणि त्याच उंबरठ्यावर पाय ठेवायचा, काय म्हणायचे ह्याला. आजपासून घरात सर्वाना सांगा कुणीही उंबरठ्यावर पाय ठेवायचा नाही अगदी पाहुण्यांना सुद्धा सांगा . घर आपले आहे ना? 

आपले मन आज त्रासलेले आहे , अनेक प्रश्न आहेत पण ते निर्माण होण्यापूर्वीच आपण उपासक झालो तर त्याचे प्रमाण निश्चित कमी होईल . मन थार्यावर आणण्याचा एकमेव उपाय म्हणजे जप , देव दर्शन , पारायण आवश्यक आहे. उपासनेची विविध अंगे आहेत , जे कराल त्यात सातत्य ठेवा . 

प्रगत सोशल मीडियामुळे आज आपल्यावर जगातील आणि सर्वच क्षेत्रातील माहितीचा नुसता भडीमार होत आहे . पण त्यातील आपल्याला नक्की काय वेचायला हवे त्यापेक्षा काहीही वाचायचे आणि त्याच्या आहारी जायचे हे आजचे चित्र आहे . उदा गेल्या महिनाभरात मला ४-५ लोकांनी सांगितले कि आम्ही कुंभ विवाह केला पण विवाह अजून जुळला नाही लेकीचा . पण तुमच्या मुलीच्या पत्रिकेचा आणि कुंभ विवाहाचा काडीचाही संबंध नसताना केला कश्याला ? हे म्हणजे ताप आला कि घ्या क्रोसिन असे झाले . पण प्रत्येक तापावर क्रोसिनच उपयोगी पडेल असे नाही ना. 

मी तर फक्त स्वामी स्वामी करते आणि प्रत्येकाला त्यांच्या नामाची ओढ कशी लागेल तेच बघते ह्याचे कारण मला मिळालेली प्रचीती . सगळ्या नद्या जश्या सागराला मिळतात तशीच सगळी भक्ती आपल्या गुरूकडे जाते. त्यांनी ठरवले तर काय होणार नाही . 

जपजाप्य हे म्हतार्यांचे चोचले नाहीत तर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचे ते आद्य कर्तव्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला आईने नामस्मरण श्लोक शिकवले त्यात सातत्य ठेवले तर उत्तर आयुष्यात कसलेच प्रश्न येणार नाहीत आणि आलेच तर त्याच्याशी दोन हात करण्याचे मानसिक सामर्थ्य त्याला मिळत राहील. कुल दैवत माहित नसेल शोधून काढा , नक्कीच समजेल .

आयुष्यात निष्काम भक्ती चे अनन्यसाधारण महत्व आहे. मुखात त्यांचे नाव असणे आपल्याच भल्याचे आहे . प्रत्येक कर्म सुधारेल आपले. कुणाला काय बोलतोय त्या आधी विचार करायला शिकू आपण आणि हेच तर मर्म आहे साधनेचे . आपल्या रागावर , प्रलोभनात फसणाऱ्या आपल्या मनाला लागाम उपासनाच घालू शकते . उपासनेने अहंकाराची कवच कुंडले घालून जी मदमस्त होवून आपण फिरत असतो ती गळून पडतील. अहो जगायला पैसा हवा पण त्याचा बडेजाव किती ? मृत्युच्या शय्येवर असणार्या आपल्या आप्तेष्ठाला आपला पैसा नाही परत आणू शकणार , पण आपण आजवर केलेले दानधर्म आणि उपासना  नक्कीच फलश्रुत होईल. 

थोडक्यात काय तर आपल्या मनावर आणि विचारांवर संपूर्ण आपला स्वतःचाच ताबा असला पाहिजे , कुणीही कुठेही वाहवत जाता उपयोगी नाही आणि त्यासाठी मनाला बळकट करण्यासाठी उपासना नामस्मरण पारायण आणि सतत मनन चिंतन केले तर अशक्य ह्या जगात काहीही नाही. आपल्या सत्कर्मात आणि साधनेत रोज कण कण भर घालण्याची गरज आहे , कुणासाठी ??? अर्थात आपल्या स्वतःसाठीच . शेवटचा क्षण सुखाचा करायचा असेल तर उपासनेला पर्याय नाही . सहमत ?

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230


 



No comments:

Post a Comment