Tuesday, 15 July 2025

आयुष्याचा शेवटचा काळ कसा जायील ?

 || श्री स्वामी समर्थ ||


शनी वार्धक्याचा कारक आहे. रवीपासून सगळ्यात दूर असलेला हा ग्रह आपल्याला आयुष्याच्या संध्याकाळी भेटतो . थोडक्यात वार्धक्य दर्शवतो. शनी हा मंद गती ग्रह , शनै शनै प्रगती करणारा आणि म्हणूनच तो संयम ठेवायला शिकवतो. शनी प्रत्येक गोष्टीला विलंब करतो पण तो विलंब आपल्याला वाटत असतो खरा तो विलंब बसून प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळीच शनी करतो . तो जेव्हा गोष्टी घडवतो ती वेळ आपल्यासाठी उत्तम असते हे फक्त त्यालाच माहित असते . आपला संयम संपल्यामुळे आपल्याला तो उशीर वाटत राहतो . उशिरा देतो पण देत नाही असे कुठे म्हणतो ? जे देतो ते सर्वोत्तम देतो. पण तरीही आपण त्यालाच दुषणे ठेवतो कारण आपल्यात संयम नाही . 


एखाद्या मुलाचा विवाह जरी उशिरा झाला तरी ते त्याच्यासाठी उत्तम असते कारण कदाचित आधी होवून त्याला लाभणारा नसतो पण कारण पुढील काळ मात्र सुखाचा असतो . एखादा आजार झाला तरी विलंबाने बरा होतो . कारण शेवटी आजार हा आपल्या कर्माचा आरसा आहे. जितकी कर्म वाईट तितका विलंब अधिक . दवाखाना डॉक्टर दिसले आणि सुई टोचली कि कुणाला काय काय बोललो आहोत , कसे वागलो आहोत ते सगळे समोर उभे राहते आणि मग ३३ कोटी देवांच्या चरणी शरण जातो . 


ह्या सगळ्याची जाणीव करून देण्यासाठी आजार लगेच शनी कधीही बरे करत नाही. लगेच बरे झालात तर मग पुन्हा वाट्टेल तसे उधळायला मोकळे. सहमत ?


पत्रिकेत शनी धनु किंवा मीन राशीत असेल तर आयुष्याची संध्याकाळ शांततेत जाते. अश्या लोकांचा नोकरीत मान असतो सुस्थितीत सतत , सामाजिक कार्यातही भाग घेताना दिसतात . अष्टम भावात शनी असेल तर अनेकदा दीर्घ मुदतीचे आजार पण आयुष्यमान चांगले असते . शनिवार गुरूची शुभ दृष्टी असेल तर परिणामांची दाहकता कमी होते 

शनी हेच जीवनाचे अंतीम सत्य आहे . आयुष्यभर केलेल्या चुका , कुकर्म शेवटीच आठवतात तोपर्यंत मनुष्य मदमस्त , बेताल , बेफिकीरीत जगत असतो . कुणाचा बाप माझे वाकडे करणार आहे हाच अविर्भाव असतो . पण तुमचा बाप तुमच्या आधीच देवाने जन्माला घातला आहे हे विसरून कसे चालेल . कर्म शुद्ध असावे हाच शनीचा संदेश आहे. कुणाचे ५ रुपये जरी ठेवले तरी कर्म वाढले आणि त्याची परतफेड करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. 

ओम शनैश्चराय नमः


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Monday, 14 July 2025

जेव्हा आनंदाला लागते ग्रहण

 || श्री स्वामी समर्थ ||


विवाह आयुष्यातील आनंदाचा सोहळा. पण हा सोहळा उपभोगण्याचे भाग्य सगळ्यांना मिळत नाही हे दुर्दैव आहे. पण जे आहे ते आहे . प्रत्येकाच्या आयुष्यातील कुठलातरी एक कोपरा रिता असतो . शैक्षणिक प्रगती , नोकरी, परदेशगमन , व्यवसाय , अर्थार्जन , विवाह , वैवाहिक सुख , संतती , मानसिक स्थैर्य , शरीर संपदा ह्यातील काहीतरी एक गोष्ट एक तर मनासारखी नसते किंवा ती मिळतच नाही . 


शिक्षण नोकरी ह्या प्रवासानंतर जेव्हा मुलगा कमावता होतो तेव्हा आई वडिलांचे सगळे लक्ष्य मुलाचे दोनाचे चार म्हणजेच विवाह कधी होईल ह्याकडे लागते. सुनबाई , जावई येण्याचे वेध लागतात आणि मग सगळीकडे नाव नोंदणी सुरु होते , नातेवाईक , जवळचे आप्त ह्यानाही चार ठिकाणी यंदा मुलाला कर्तव्य आहे अश्या प्रकारे सूचित केले जाते. तरुणाई सुद्धा आयुष्यातील नवीन वळणाची चाहूल लागल्याने खुश असते . मनात स्वप्नरंजन होत असते . थोडक्यात सगळे कुटुंब एक वेगळाच आनंद अनुभवत असते . पण अनेकदा ह्या आनंदाची सुरवात होण्याआधीच त्याला ग्रहण लागते जेव्हा अनेक स्थळे पाहूनही कुठेतरी काहीतरी अडते , नाडी दोष , सगोत्र , गुणमिलन आणि पुढील ग्रहमिलन ह्यातील उणीवा , आजकालची मोठी समस्या म्हणजे “ पगार किती “ . मुलाचा पगार आणि आर्थिक सुबत्ता हि पहिली अट ह्याचा अर्थ मुलगा इतर बाबीत कसाही असेल तरी चालणार आहे का? असो विषयांतर होत आहे म्हणून तूर्तास थांबते .

तात्पर्य असे कि विवाह उत्सुख मुले मुली अनेक प्रयत्न करूनही जेव्हा विवाह जुळत नाही तेव्हा हताश , निराश होतात. अश्यावेळी मग पत्रिका तपासून घेण्यासाठी किंवा असे का होत आहे हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडे मोर्चा वळतो .

विवाह हि आयुष्यातील सुखद घटना आहे . अनेकदा हे सुख परमेश्वराने अनेकांच्या ओंजळीत घातलेले नाही , भले त्यांना पैसा आणि इतर भौतिक सुखात कमतरता नसेल पण विवाहापासून अनेकांना वंचित ठेवले आहे. हे असे का? तर त्याला उत्तर नाही .हे आपले भोग आहेत आणि ते जितके लवकर स्वीकारू तितके आयुष्य पुढे जायील . पण ते स्वीकारणे खरच कठीण असते . एखाद्या मुलाच्या नशिबात विवाह नाही हे त्याच्या पालकांना सांगणे हे सांगणाऱ्या व्यक्तीला किती दडपण आणणारे आहे ह्याची कल्पना येणार नाही. 


आज पत्रिकेतील अश्या ग्रहस्थिती बघूया जिथे  विवाहाचे सुख नाही .कदाचित ह्या विषयावरील विश्लेषण अभ्यासकांना उपयोगी पडेल असा विश्वास वाटते . विवाह म्हंटला कि शुक्र आलाच . आपण विवाह आपल्या मनाच्या पसंतीने करतो म्हणजे चंद्र आला . विवाहासाठी थोरया मोठ्यांचा आशीर्वाद लागतो म्हणजे गुरु हवाच , सप्तम भाव शुद्ध हवा , शेवटी विवाह होणार कि नाही हे ठरवणारा दशा स्वामी हवा . त्याच्याशिवाय घटना घडणे अशक्य. 


पहिली ग्रहस्थिती – मेष लग्नाला चंद्राची दशा आणि चंद्र वृश्चिकेत बुधाच्या जेष्ठा नक्षत्रात . बुध स्वतः भाग्यात असून केतूच्या मुळ नक्षत्रात केतू चतुर्थ भावात .इथे चंद्र बुधाच्या नक्षत्रात असल्यामुळे मुख्यत्वे बुधाची फळे देणार बुध ३ ६ ९ ४ हि स्थाने देत आहे जी विवाहाची नाही . त्यात भरीस भर म्हणून वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र दशम भावात श्रवण नक्षत्रात जे वैवाहिक सुखात न्यूनता दर्शवते. दशम भावात शनी राहू अंशात्मक युतीत , शनी लाभेश लाभेश्याच्या व्ययात . पितृदोष , शुक्र दुषित , चंद्र अष्टम भावात , दशा स्वामी विवाहाच्या विरोधी भावाची फळे अश्या ग्रहस्थितीत चंद्राची दशा सोडून द्यायला लागेल तोवर वय होयील ४५ च्या आसपास . ह्या आधीची रवी आणि नंतर येणारी मंगळाची दशा सुद्धा विवाहासाठी पूरक नाही. 


दुसरी ग्रहस्थिती – शुक्र पत्रिकेत लग्नी मुलगा देखणा हुरहुन्नरी पण मंगळ केतू युती भाग्यात त्यात मंगळ सप्तमेश , त्यामुळे मंगळ शत्रुराशीत केतू सारख्या विरक्त ग्रहासोबत . राहूची दशा आणि राहू स्वतः तृतीय भावात गुरूची फळे देणार त्यामुळे राहुने ३ ६ आणि केतूच्या नक्षत्रात असल्यामुळे ९ स्थान पण दिले . हि सर्व स्थाने वैवाहिक सुख देणार नाहीत पुन्हा भौतिक सुखात कमतरता नाही पण ती उपभोगण्यासाठी सहचारिणी चे सुख मात्र वंचित ठेवले. 

अनेकदा अतिगंड योग , प्रामुख्याने विष्टी करण ह्यांच्या शांती करून घ्याव्यात असे माझे मत आहे जर ते योग पत्रिकेत असतील तर . पत्रिकेत शनी ( वक्री )चतुर्थ भावात ज्याची लग्नातील शुक्रा वर दृष्टी. शनीची दृष्टी म्हणजे विलंब आलाच . राहूची दश सोडून द्यावी लागणार कारण राहू विवाह देत नाही .त्याधीची मंगळाची दशा त्यात विवाह झाला नाही कारण मंगळ राहुच्याच नक्षत्रात पुन्हा तेच चक्र फिरणार . 

तिसरी ग्रहस्थिती – गुरूची दशा गुरु व्यय भावात आणि चंद्राच्या नक्षत्रात चंद्र स्वतः चतुर्थात वृषभ राशीत असला तरी फळे देताना तो तृतीय भावाची देत आहे , म्हणजे दशा स्वामी ३ आणि ६ स्थानांचा कार्येश झाला . कुंभ लग्नाला गुरु तशीही विशेष फळे देत नाही . ह्या पत्रिकेत विशेष म्हणजे शनी लग्नेश असून दशम भावात पण स्तंभी आणि त्याची दृष्टी सप्तम भावावर जो विवाहाचा मुख्य भाव आहे . 


अश्या अनेक ग्रहस्थिती बघितल्या कि इतर सुखांची रेलचेल दिसते पण वैवाहिक सौख्याला दृष्ट  लागलेली असते. नोकरी उत्तम , सगळच उत्तम असलेला मुलगा फोनवर बोलत होता. त्याच्या आवाजावरून आणि विचारात असलेल्या प्रश्नांवरून त्याला लग्न करायची किती तळमळ इच्छा होती ते जाणवले. पण पुन्हा तेच विवाहाचा योगच नाही .

अश्यावेळी काय बोलावे सुचत नाही . पण उमीद पे दुनिया कायम है ... खरच अश्यावेळी डोळ्यात पाणी येते . अहो ज्योतिषी हा सुद्धा तुमच्यातलाच एक आहे त्यालाही संसार मुले सुख दुक्ख आहेत . आपण सगळेच संसारी लोक असून लहान लहान इछ्या पूर्ण झाल्या तरी खुश होतो , फार मोठे काही मागायचे नसते आपल्याला , फक्त आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या मुलांचा संसार नांदताना डोळे भरून पहावासा वाटतो .हि इतकीही इच्छा पूर्ण नाही का करणार महाराज आपली असे मनात येत राहते. 


त्याची पत्रिका मिटली आणि देवाजवळ प्रार्थना केली , आयुष्याची सुरवात आहे ह्या मुलांची असा राग धरू नकोस रे बाबा त्यांच्यावर देऊन टाक त्यांना काय हवे ते आणि पडूदेत अक्षता सर्व विवाह करणाऱ्या सर्व मुला मुलींच्या डोक्यावर ...पालक डोळ्यात प्राण आणून त्या क्षणाची वाट पहात आहेत बाबा. महाराजांनी लेकीची हि मागणी ऐकावी इतकीच विनम्र विनंती आहे त्यांच्या चरणी .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 


  



फक्त एक निम्मित्त ( राहूची खेळी यशस्वी झाली )

 || श्री स्वामी समर्थ ||


एक विचित्र घटना एका कुटुंबात घडली . अनेक वर्षाचा संसार अपत्य काहीच कमतरता नाही. आता नवरा बायको मध्ये वाद हे कधीतरी होणारच आणि ते झाले कि सुख अजून वाढतेच. पण घरातील स्त्रीला घरात काहीतरी एक गोष्ट अचानक समजली ज्याच्याबद्दल तिला पुसटशी माहिती नव्हती . ह्याबद्दल इथे अधिक लिहिणे उचित होणार नाही म्हणून लिहिता येत नाही . पण ते महत्वाचे नसून महत्वाचे हे आहे कि ती घर सोडून गेली .राहूची खेळी यशस्वी झाली .

पत्रिका पाहिल्यावर काय दिसले असेल ते तुमच्या लक्ष्यात आलेच असेल. गैरसमजाचे आणि मनात शंका आणि संशयाचे वादळ निर्माण करणारा “ राहू “ पत्रिकेत चांगलाच active होता त्यात दशा राहुचीच पूरक होती . इतक्या वर्षाचा संसार क्षणात मोडायची वेळ आली तर काय चित्र असेल ह्याची कल्पना करता येणार नाही . राहू ची दशा अजून बरीच वर्षाची आहे असे दिसले. राहूच्या दशेत झालेले नाते संबंधातील गैरसमज हे उग्र स्वरूप धारण करतात आणि राहू ते गैरसमज तसेच ठेवून त्यांच्यातील दुरावा कायम ठेवण्यात माहीर आहे. 


राहू हा बेमालूम फसवणारा आहे तुम्हाला काहीही कळायच्या आधीच तुम्ही फसलेले असता किंवा गैरसमजाचे भूत डोक्यात घोंघावत असते . त्यातून बाहेर येणे अशक्य असते. 

सुरळीत चाललेल्या आयुष्यात मोठा धक्का बसावा असे झाले . चतुर्थ भावात राहू आणि त्याचा भावेश शनी तृतीय भावात म्हणजे तो तृतीयाचीही जोरदार फळे देणार आणि तसेच झाले . सुनबाई घरातून निघून गेल्या . 

फक्त संसारात नाही तर आपल्या जवळच्या नात्यात एकंदरीत पारदर्शकता हवी तरच नाती टिकून राहतात नाहीतर उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही . एकदा विश्वास उडाला आणि मन मेले कि पुन्हा सुर जुळत नाहीत तसेच काहीसे ह्या घटनेबाबत झाले. दोघांच्याही पत्रिकेत शुक्र बेताचेच सुख देणारा पण तरीही राहू समोर कुणाचेही चालत नाही .

आयुष्यात फक्त एक निम्मित्त झाले आणि कुटुंबातील माणसांत दरी निर्माण झाली. राहुने आपला डाव साधला . नुसती कुटुंबात नाही तर कुटुंबातील माणसांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज निर्माण करणारा हा राहू आत्ताच कसा काय आपला डाव साधण्यास आला. ह्यालाच म्हणतात राहू दशा . काळ आणि वेळ कुणाला सांगून येत नाही त्यामुळे माणसाने उपासना आणि आपली कर्म शुद्ध ठेवावी . 

ह्या केस मध्ये पत्नी परत येणे कठीण आहे पण आलीच तर आयुष्यभर मनात संशयाची सुई घेवून वावरेल ज्याला खरच काही अर्थ असेल ? आपली सून माप ओलांडून घरात आली कि ती आपली झाली . तिचे कुळ बदलले . आपल्या मुलाच्या संसारात सुखाचे क्षण वेचणारी आणि त्याच्या आनंदासाठी ती आली आहे त्यामुळे तिच्या सोबत नात्यात कुठेही लपवा छापवी नको . तिच्याच नाही तर एकंदरीत नाती सहज सरल असावीत. 

ह्या जगात अनेक लोक आहेत जे बिचारे एकटे एकटे आहेत , त्यांना कुणीही नाही . म्हणूनच ज्यांची आपली माणसे आहेत , घरात गोकुळ आहे त्यांनी त्याची किंमत आणि जाणीव ठेवून तसे वागावे म्हणजे असे प्रसंग उद्भवणार नाहीत .

राहू हा राक्षस आहे आणि तुमचा नातेवाईक अजिबात नाही . राहूची दशा ज्यांनी भोगली असेल त्यांना हे समजेल. 


रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती होते कारण रोज नवीन व्याप आणि डोक्याला ताप . एखाद्या गजर्यातून  फुले निखळून पडावी अशी नाती आणि संबंध रोज = एक एक करून आपल्यापासून दूर जातात तीही केवळ एका गैरसमजाने जो आपण दूर करण्यात अयशस्वी ठरतो . राहू हि अदृश्य शक्ती आहे आणि जन्मभराची नाती एका गैरसमजामुळे कायमची तुटतात तेव्हा राहूच्या ताकदीचा अंदाज आपल्याला येतो . आपण काहीही करू शकत नाही . राहू हा तळतळाट आहे . पूर्वजन्मीचा शाप .महादेवाचे वरदान घेवून नवग्रहात आपली बैठक मांडणारे राहू केतू . आपल्या आयुष्याचे पूर्वीच्या अनेक जन्मांशी संधान बांधणारे राहू केतू . आयुष्यभर आपल्यासोबत वावरणारी आणि “ मी तुला चांगली ओळखते किंवा ओळखतो “ असे म्हणणारी आपलीच माणसे क्षणात परकी होतात कशी काय ? हीच तर आहे राहूची जादू . भ्रमित , संभ्रमित करणारा राहू कितीही सतर्क राहिलात तरी आपला डाव साधतोच .

आज राहूचे शततारका नक्षत्र आहे . पत्रिका बघताना राहू रुलिंग ला होताच

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Sunday, 13 July 2025

हृदयाचा बायपास

 || श्री स्वामी समर्थ ||



विचारातून होते आजारांची निर्मिती . मला कसलेही टेन्शन नाही स्ट्रेस नाही असे कितीही म्हंटले तरी ते असतेच. हा न दिसणारा स्ट्रेस अनेक मोठ्या आजारांची नांदी करतो. मी किती सुखी आहे हा मुखवटा घालून जगण्याची धडपड प्रत्येकात दिसते. आजची बदललेली जीवनशैली , आहार ह्या गोष्टी आजारांना कारणीभूत आहेत . आज फक्त वयातीत लोकांत नाही तर अगदी लहान वयातील तरुणाई मध्ये सुद्धा प्रचंड स्ट्रेस आहे आणि त्यातून असमाधान , उदासीनता , एकटेपणा , एकलेपणा , मानसिक अनारोग्य अश्यासारख्या गोष्टी फोफावत आहेत . कुणाकडे मन मोकळे करावे हेच समजत नाही कारण कुणी आपले वाटावे हा विश्वासच कुणाबद्दल मनात नाही . नात्यातील दिवसागणिक वाढत जाणारी दरी प्रत्येकाला मी आणि माझे कुटुंब ह्या कोषातच अडकवत आहे . एकमेकांची सुख दुखे वाटून घेण्याचा काळ मागे सरत आहे आणि त्यामुळे मनाच्या आजारांची समस्याही वाढत आहे. मन स्थिर नसेल कि त्याचा परिणाम आरोग्यावर झाला नाही तरच नवल. 


पूर्वीच्या काळी लोक शारीरिक कष्ट खूप करत असत . रोज नियमित व्यायाम , धावणे चालणे , घरातील कामे जसे अगदी जात्यावर दळण , घरातील अनेक कष्टाची कामे स्त्रिया स्वतः करत त्यामुळे त्यांचे शरीर आजारांना थाराच देत नसे. आजकाल सकाळी लवकर न उठणे हे सुद्धा अनेकांना भूषणाव वाटावे अशी स्थिती आहे. जगाचा चालक मालक पालक सूर्य असा आळशी झाला आणि वेळेवर आलाच नाही तर ? अवकाशातील ग्रह तारे आपल्या दैनंदिन आयुष्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत . विचार करण्यासारखी गोष्ट आहे . सूर्योदय येण्याच्या आधी चरचर सृष्टी त्याच्या स्वागताला तयार असते आणि आपण ? सकाळचा सूर्यप्रकाश किती महत्वाचा असतो ह्यावर भाषण द्यायचे पण उठायचे मात्र नाही हे सत्य आहे. 

पूर्वीच्या काळी मधुमेह , थायरोईड , B12 ची कमतरता हे ऐकायलाही मिळत नव्हते कारण योग्य आहार आणि चौकटीतील दैनंदिनी ., भरपूर आणि शांत झोप , माणसामाणसातील प्रेम , व्यायाम , सुधृड शरीरयष्टी आणि उत्तम पचनसंस्था . आजकाल कधीही उठा , पोट भरून घेण्याच्या नावावर  समोर येईल ते पोटात ढकला . पण ह्या सर्वांचा दूरगामी परिणाम तब्येती आपल्याही नकळत होत असतो . 

बदललेल्या जीवनशैलीत अपुरी झोप , रात्री झोप येत नाही म्हणून मोबाईल वरती सर्फिंग करत राहणे जो मेंदूच्या आजारांचा  धोका वाढवतो , दृष्टीवर परिणाम करवतो , अति विचार मनाला सैरभैर करतात . रात्री झोपताना १० मिनिटे मेडीटेशन केले तर आपण सोशल मिडीयावर नाही म्हणून मुंबई पुणे बंद नाही होणार . 

आज आपण हृदया संबंधी आजारांची ज्योतिष शास्त्रीय कारणे बघुया . एखाद्या गोष्टीची चिंता मागे लागणे म्हणजे विचारांचा ( toxic ) गुंता मनात असणे. मन म्हणजे चंद्र आणि चंद्र प्रामुख्याने दुषित झाला तर मन सैरभैर होते . चंद्र शनी युती , चंद्र राहू /केतू युती त्रासदायक . अनेक वेळा गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत आणि मग संताप चिडचिड , अपेक्षाभंग ह्यामुळे मन उदास निराश होते . आरोग्याचा विचार आपण रवी ह्या ग्रहावरून करतो. काल पुरुषाच्या कुंडलीत पंचम भावात रवीची सिंह राशी येते त्यावरून आपण आपले मन हृदय बघतो . चतुर्थ भावावरूनही अनेक जण हृदय बघतात . 


शरीरातील रक्ताभिसरण हे प्रामुख्याने शनी आणि रवी ह्यांच्याकडे आहे . पत्रिकेतील शनी मंगळाचा कुयोग तसेच दृष्टी संबंध बायपास ची स्थिती निर्माण करू शकतो त्याला पूरक गोचर भ्रमण आणि दशा असेल तर शक्यता बळावते . गोचर राहू केतू ह्यांचाही विचार करावा लागतो .


शनी हा आकुंचन आणि प्रसरण करणारा आहे . आपले हृदय सुद्धा आकुंचन प्रसरण ह्या क्रिया सातत्याने करत असते . रक्तामध्ये ब्लॉक म्हणजे अडथळा निर्माण झाला तर रक्ताचा प्रवाह विस्कळीत होतो आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. मनस्ताप देणारे किंवा मृत्यू सम पिडा देणारे अष्टम भाव ( शस्त्रक्रिया )आणि १२ वा भाव ( दवाखाना , वैद्यकीय उपचार ) , दुषित शनी रवी जर पत्रिकेत असतील आणि ६ १२ च्या दशा अंतर्दशा असतील तर बायपास करण्यास पूरक ग्रहस्थिती समजावी . शस्त्रक्रिया म्हणजे मंगळ आलाच . चंद्र हा मनावर आणि पर्यायाने आरोग्यावर परिणाम करतो म्हणून बायपास शस्त्रक्रियेच्या दिवशी चंद्र हा स्थिर तत्वाच्या राशीत असावा. 

प्रामुख्याने शनीचे कार्य हे हृदयाच्या झडपांची उघडझाप करण्याचे आहे. तिथे शनी बिघडला तर नलीकांच्या मध्ये अडथळे निर्माण होतात. शनी हा प्रत्येक गोष्टीत विलंब करणारा ग्रह आहे त्यामुळे शनीमुळे झालेले आजार हे दीर्घकालीन असतात . शनीचा प्रभाव सूर्य त्याचसोबत ४ ५ आणि रोगांचा भाव ६ वा तपासावा लागतो .

शनीची दशा असेल आणि शनीचा संबंध ५ ,६ व्या भावाशी असेल तसेच शनी सिंह नवमांशात असेल तरीही हृदयासंबंधी विकार होण्याची शक्यता असते. तापट व्यक्तींच्याही पेक्षा वरून शांत दिसणाऱ्या व्यक्ती जास्त प्रमाणात ह्या विकारांना आजारी पडतात . वरवर शांत असतात पण अंतर्मनात खळबळ असते . म्हणून धबधब्यासारखे माणसाने मोकळ्या मनाने बोलले पाहिजे . वृश्चिक राशीतील बुध हा व्यक्तीला मूक अबोल करतो त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्व सतत चालू असते आणि त्यात ते कुणाला बोलून मोकळेही होत नाहीत . गमतीने त्यांना आपण आतल्या गाठीचे म्हणतो पण त्यांच्यातील हा दोष अनेक विकारांना प्रेरित करतो. अष्टम भावातील शनी , मंगळाचे गोचर महत्वाचे किंवा मूळ पत्रिकेतील शनी मंगळ कुयोग दुष्टीयोग त्रासदायक होतोच . शनी दशा , अष्टम भावातील शनी तसेच राहू दशा आणि शनी मंगळ राहू चा पंचम भावाशी असलेला संबंध .

थोडक्यात पत्रिकेतील शनी राहूचा रविशी कुयोग , साडेसाती अष्टम शनी , मंगळ,. ४ ५ ६ ८ १२ भाव दुषित , ८ १२ भावाची दशा किंवा शनी दशा आणि शनीचा चंद्राशी संबंध “ बायपास “ सारखे मोठे आजार देवू शकतो .


उपासना : मन मोकळे जग , सात्विक आहार , झोप पूर्ण घ्या आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कटपुतली बाहुलीसारखे कुणाच्यातरी दडपणाखाली जगू नका . मोकळ्या आकाशाखाली मस्त जगा . आदित्य हृदय स्तोत्र  , हनुमान चालीसा , शनीचा बीजमंत्र , सकाळी सूर्याला अर्घ्य घालणे आणि योग मेडीटेशन ह्यामुळे आपल्या पत्रिकेतील ग्रहांना बळ मिळेल. 

ज्योतिष शास्त्राला कुणी कितीही नावे ठेवली तरी नित्य सूर्योदय होतोच आणि सृष्टीच्या अंतापर्यंत होतच राहणार . म्हणूनच आपली पत्रिका काही प्रमाणात आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे अगदी सर्वार्थाने .


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 


Friday, 11 July 2025

मारकेश आणि त्रिषडाय

 || श्री स्वामी समर्थ ||

पत्रिकेतील मारक ग्रह ,  त्रिषडाय ग्रह ह्यांचा अभ्यास महत्वाचा आहे. मारक ग्रहाची महादशा असेल त्यात त्रिषडाय भावाची अंतर्दशा येयील तेव्हा मृत्यू किंवा मृत्यू तुल्य कष्ट देयील. एका मोठ्या नामांकित स्त्रीचा मृत्य त्यांना अष्टम भावाची शनीची दशा होती त्यात राहूच्या अंतर्दशेत त्यांचा मृत्यू झाला , राहू स्वतः षष्ठ भावात स्थित आहे . 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Thursday, 10 July 2025

रेशीम गाठी भाग -१४ विवाहास विलंब

 || श्री स्वामी समर्थ ||



अनेकदा विवाहाला उशिरा होतो . घरातील आर्थिक कौटुंबिक जबाबदार्या , शिक्षण , नोकरीत स्थैर्य नसणे , आर्थिक कुचंबणा , घरासाठी घेतलेले कर्ज , राहत्या घराच्या समस्या , शारीरिक आजार , लहान भावंडांची आणि एकंदरीत कुटुंबाची जबाबदारी ह्या सर्व कारणांमुळे विवाह लांबणीवर पडतो.  


ज्योतिष शास्त्राचा विचार करता लग्नेश , सप्तमेश , धनेश , लाभेश ,चंद्र ,रवी आणि विवाहाचा कारक शुक्र ह्यांचा विचार केला पाहिजे . एकापेक्षा अनेक पापग्रहांचा प्रभाव हा सप्तम स्थानावर असेल तर विवाहास विलंब होतो . सप्तमेशाची दशा , पंचम भावाच्या ही दशा अंतर्दशा ह्यात विवाह होतो. गुरु सारख्या ग्रहाचे गोचर भ्रमण पाहणे आवश्यक असते षष्ठ आणि दशम स्थान सुद्धा विवाहात विघ्न उत्पन्न करू शकतात . सप्तम स्थानात राहू केतू शनी मंगळ हर्शल ह्यासारखे पापग्रह असणे. सप्तमेश ६ ८ १२ मध्ये असणे . सप्तमेश वक्री , निचीचा असणे , सप्तम स्थानात पापग्रहांची युती असणे . २ ४ ८ ह्या स्थानात मंगळ शनी एकत्र असणे , गुरु ग्रहाला बळ कमी असणे . शुक्र ग्रह पत्रिकेत दुषित असणे हे महत्वाचे कारण शुक्र विवाहाचा प्रमुख ग्रह आहे. 

चंद्र आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अशुभ योगात असणे . चंद्र आणि शुक्र शनीच्या अशुभ योगात असणे . सप्तम स्थानात शुक्र राहू ,केतू हर्शल सोबत असणे . सप्तम किंवा पंचम स्थानात हर्शल बलवान असणे . सप्तम स्थानात किंवा स्थानावर ३ पापग्रहांच्या दृष्टी असेल तर विवाहाची शक्यता कमी असते . पत्रिकेतील चंद्राला बळ नसणे , त्यावर २ पापग्रहांच्या दृष्टी असेल तरी जातक विवाहास उत्सुक नसतो . व्यय भावात अस्तंगत शनी बुध सारखा ग्रह आणि तोही अस्तंगत असेल त्याचीच दशा असेल तर विवाहासाठी जातक फारसा उत्सुक नसतो.  शुभ ग्रहांचा कुठल्याही प्रकारे सप्तम स्थानाशी संबंध नसणे . धनस्थान किंवा त्याचा स्वामिग्रह दुषित असणे , मंगळ राहू केतू शनी हर्शल नेप ह्यापैकी कुठल्याही ग्रहाचा सप्तम  स्थानाशी संबंध आला . शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह विवाहास उशीर करणारे मुख्य ग्रह आहेत .


सप्तम स्थानात राहू असेल तर विवाहास उशीर होतो तसेच विवाहाची बोलणी झाल्यावर सुद्धा अडचणी येतात ,विवाह मोडू शकतो. केतू सप्तम स्थानात असेल तर विवाहाच्या दरम्यान अडचणी येतात . अनेक पत्रिकांमध्ये सप्तम भावात केतू असेल तर पत्नी चांगली मिळूनही वैवाहिक सौख्य नसते. पंचम स्थानात शुक्र राहुसोबत असेल तर विवाह 31 किंवा 33 मध्ये होतो . सप्तमातील शनी हा जोडीदार समजूतदार विश्वासू असतो पण विवाहास विलंब होतो. शनी राजयोगकारक झाला तरीसुद्धा .  शनी मंगळ , शनी राहू , मंगळ रवी ,रवी राहू ७ किंवा ८ मध्ये नकोत . मंगळ दोष मंगळ पत्रिकेत प्रथम स्थानात मेष राशीत , चतुर्थ स्थानात वृश्चिक राशीत ,सप्तम स्थानात मकर राशीत आणि अष्टम स्थानात सिंह राशीत आणि व्यय स्थानात धनु राशीत असेल तर मंगळ दोष लागत नाही . शनीचा शुक्राशी किंवा सप्तमेशा सोबत योग असेल तर विवाहास विलंब होतो.  पत्रिकेतील ८ तसेच १२ ह्या स्थानांचा प्रभाव विवाहास विलंब होण्यासाठी होतो. लाभस्थान सुद्धा अशुभ असेल तर विवाहात अडचणी विलंब होतो.

रवी हा सप्तम स्थानात पूर्ण फळे देवू शकत नाही कारण पश्चिम दिशा येते. राहू केतू सप्तम स्थानात त्रासदायक असतात . सप्तम स्थान हे विवाहाचे महत्वाचे स्थान आहे, अष्टम स्थान हे विवाहातून मिळणारा आनंद दर्शवते . ८ व १२ च्या स्वामींचा सप्तम स्थान किंवा सप्तमेशाशी संबंध आला तर विवाहास  विलंब होतो. सप्तम स्थानातील हर्शल , प्लुटो विवाह होऊन देत नाहीत . पितृदोष  आणि दुषित शुक्र ह्यामुळे  विवाह उशिरा होतो किंवा अनेक अडचणी येतात . 

मुळात जातकाला विवाह करायचा आहे कि नाही ? हे महत्वाचे आहे . अनेकांचे व्यय भाव बिघडलेला असतो कारण तोही शय्यासुखाचा भाव आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230



अचूक निर्णय ( फसवणूक होईल अशी ग्रहस्थिती )

 || श्री स्वामी समर्थ ||




गुण मिलनासाठी येणाऱ्या पत्रिका ह्या अक्षरशः डोळ्यात तेल घालून पाहाव्या लागतात . अनेकदा लोकांना निर्णय ऐकण्याची इतकी घाई असते कि जसे काही गुणमिलन व्यवस्थित आहे पुढे जाण्यास हरकत नाही हे ऐकून लगेच दुसर्या दिवशी लग्न लावणार आहेत असाच थाट असतो. इतक्या महत्वाच्या गोष्टीला घाई करून चालणारच नाही कारण हि लग्नगाठ आयुष्यभराची असते. असो.

मध्यंतरी एक पत्रिका पहिली. शुक्राची दशा आणि विवाहाचा प्रश्न . शुक्र सप्तमेश आणि व्ययेश केतूच्या मूळ नक्षत्रात . शुक्र आणि मंगळ युतीत तीही अंशात्मक . दिसताना धनेत द्वितीय भावात पण अर्थात फळे देणार लग्नाची. केतू काही कला आणि विकलांवर षष्ठ भावात . वरवर पाहता कृष्णमुर्ती प्रमाणे हा केतू पंचमाची  फळे देयील असे वाटेल पण केतूने पंचम भावाला स्पर्श सुद्धा केलेला नाही त्यामुळे तो पंचम भावाची फळे न देता षष्ठ भावाचीच फळे देणार . ह्याचा अर्थ शुक्र हा 7 12 असून षष्ठ भाव पण देणार म्हणजेच 6 12 ची मजबूत( नकारात्मक ) फळे शुक्राच्या दशेत मिळणार . वैवाहिक सुखाचा दूरदूर पत्ता नसलेली हि ग्रहस्थिती आहे . माणूस समजून किती घेवू शकेल ह्याची परीक्षा पाहणारी ग्रहस्थिती जी अत्यंत फसवी सुद्धा आहे. वैवाहिक सुखाचा कारक ग्रह केतू ह्या विरक्ती देणाऱ्या नक्षत्रात आणि पुन्हा षष्ठात . शुक्राची दशा थोडी थोडकी नाही तर २० वर्षाची आहे . त्यात लग्न वृश्चिक आणि त्यात चंद्रा सोबत बुध व अनेक ग्रहांची भाऊगर्दी . प्रचंड आतल्या गाठीचे हे व्यक्तिमत्व . अश्या पत्रिका चक्रावून टाकणाऱ्या आणि संभ्रमात टाकणाऱ्या असतात . पण समोरच्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो त्यामुळे उत्तर कसेही असो प्रामाणिक पणे द्यावेच लागते . पुढे त्यांची इच्छा .ह्या केस मध्ये समोरच्या यजमानांनी मला सांगितले कि अजून कुणी त्यांना सांगितले उत्तम आहे सर्व . मनातल्या मनात मी डोक्याला हात लावला. म्हंटले आपल्या मनाचा कौल घ्या , परमेश्वर तुम्हाला योग्य विचारशक्ती देवूदे. ह्यापलीकडे निदान माझ्या हातात काहीही नाही . शेवटी जसे घडायचे तशी बुद्धी होणारच.


आता ह्या शुक्राला केतूच्या मूळ नक्षत्रातून उचलून शुक्राच्या पूर्वा  नक्षत्रात आणणे हे ब्रम्हदेवालाही कदाचित जमणार नाही . आहे हे असे आहे कारण ते आपले प्राक्तन आहे. हे असेच्या असे राहणार पुढील २० वर्ष . दशा स्वामी 6 12 ची फळे देत असेल तर कशी काय जुळवायची सोयरिक , सांगा बरे.

आता ह्यात गोम अशी आहे कि वरवर पाहता हा केतू पंचम भावाची फळे देत आहे असे दिसते पण तसे नाहीय आणि हेच जर नेमके ज्योतिषाला समजले नाही तर तो सांगेल वा वा पंचम भावाची फळे मिळतील विवाह करायला हरकत नाही पुढे मुले वगैरे पण होतील. मुले सोडा विवाह होईल कि नाही शंका आहे आणि विवाह झालाच कारण अश्या लोकांना अनेकदा चुकीचेच मार्गदर्शन मिळते ( पुन्हा त्यांचे प्राक्तन ) . विवाह होईल पण टिकेल का? वैवाहिक सौख्य मिळेल का? म्हणूनच घटना घडवण्याचा सर्वस्वी अधिकार दशा स्वामीने राखून ठेवला आहे तो आम्हाला  हवे तसे उत्तर देण्यास अजिबात बांधील नाही . दशा अत्यंत महत्वाची आहे तिला डावलून आपण काहीही करू शकणार नाही.

जर एखाद्या व्यक्तीने अश्या जुळलेल्या ( ओढून ताणून आणि अर्धवट ज्ञानाने ) व्यक्तीशी विवाह केलाच तर पदरात घोर निराश्या आणि काडीमोड ह्याखेरीज दुसरे काहीही पडणार नाही. कृष्ण्मुर्तीचा सखोल अभ्यास असे बारकावे दर्शवतो जे अचूक उत्तरापर्यंत नेतात . तात्पर्य ग्रह समजले नाही तर निदान चुकेल जे बहुतांश पत्रिकेत आजकाल पाहायला मिळते . म्हणूनच कदाचित पुढे जावून वैवाहिक सुखात अडचणी निर्माण होतात . ग्रह त्याचे नक्षत्र , दशा स्वामी कुठल्या नक्षत्रात आहे आणि तो कुठले भाव दर्शवत आहे , विवाहाचा कारक शुक्र कुठल्या नक्षत्रात आहे ह्या सर्व ग्रहस्थितीची सांगड दशेशीही करावी लागते . ह्यात कुठेतरी लहानशी उणीव राहिली तर उत्तर चुकू शकते . 

म्हणून मुला मुलींच्या पालकाना सुद्धा नम्र विनंती करावीशी वाटते. सोयरिक जुळवताना ज्योतिषाच्या मागे तगादा लावू नका , त्याला अभ्यासाला पुरेसा वेळ द्या त्यात तुमचेच भले आहे . ज्योतिष बाजूला ठेवा . आपल्यालाही कान नाक डोळे आहेत . प्रत्येक माणसालाही आंतरिक विचारशक्ती ( six sense ) असतो . मुलगा किंवा मुलगी बोलते कशी , तिचे विचार , नम्रता कि उद्धटपणा , मानसिकता , आर्थिक बाबतीत असणारे विचार ह्याची उत्तरे तुम्ही अचूक प्रश्नांच्या माध्यमातून नक्कीच मिळवू शकता . नुसते दिसणे आणि हसणे महत्वाचे नाही तर आयुष्याच्या प्रत्येक चढ आणि उतारावर तिचे सोबत असणे अनमोल ठरेल.


प्रत्येक ग्रह त्याची राशीपरत्वे बैठक , नक्षत्र आणि दशा ह्याची योग्य सांगड अचूक निर्णय देण्यास समर्थ असतात . ह्या सर्वात कमी म्हणून अनेक ग्रह वृश्चिकेत जे तपासावेच लागतात . संसारात मोकळे ढाकळे असावे सर्व , वागण्या बोलण्यात मोकळेपणा , प्रेम समजूतदारपणा अश्या असंख्य गोष्टीवर संसाराची इमारत असते.  त्या दोघांना आयुष्य एकत्र काढायचे आहे , त्यांच्या नात्यात गोडवा असावा आणि तो वृद्धिंगत व्हावा . तिथे गूढ गूढ काहीच नसावे. आकाश मोकळे निरभ्र असावे. सहमत ?


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Sunday, 6 July 2025

गुरुस्तवन ( गुरुपौर्णिमा म्हणजे समाधानाकडे वाटचाल )

 || श्री स्वामी समर्थ ||





गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती असलेली श्रद्धा , भाव त्यांच्या चरणी समर्पित करण्याचा योग . आजवर प्रत्येक क्षणी  गुरुंनी सांभाळले आहे , आधार दिला त्यासाठी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुदिन म्हणजे गुरु पौर्णिमा . आपल्या आयुष्यात आपल्याला आईवडील , घरातील इतर वयातीत व्यक्ती , शालेय जीवनापासून आपल्यावर संस्कार करणारे शिक्षक सर्वच आपले गुरु आहेत ज्यांच्या कडून आपण आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर काहीतरी ज्ञान मिळवत असतो . माणसाचे षडरिपू त्याची पाठ सोडत नाहीत म्हणूनच अध्यात्म आहे. नामस्मरण , गुरु उपासना ह्या अवगुणांना वेसण घालून नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते. विज्ञान , ज्योतिष ह्यांचा समतोल आयुष्यात घालावाच लागतो. कर्मनिष्ठ जरूर असावे पण अध्यात्माला नाकारू नका हे नक्की .

गुरुपौर्णिमा हा एक दिवस नाम घेवून चालणार नाही तर आपल्यावर अखंड नामाचा अभिषेक होणे गरजेचे आहे . गुरुपौर्णिमा ह्याचा साधा सोपा अर्थ म्हणजे “ आपल्या गुरूंच्या सहवासात अखंड राहणे “ त्यांच्या बरोबरच आयुष्य व्यतीत करणे . जळी स्थळी त्यांचीच छबी मनात आणि डोळ्यासमोर असेल तर आयुष्य आनंदात जाणारच . नुसता आनंद नाही तर ते सर्वार्थाने समृद्ध होईल .

मोक्ष त्रिकोण आपल्या आयुष्याच्या सुरवातीला नाही तर शेवटी आहे कारण इथल्या भौतिक सुखांचा आनंद माणसाला पूर्णतः घेता यावा पण त्यातच बुडून दंग होवून न राहता त्यांना सोडून पुढेही वाटचाल करायला हवी कारण मोक्षाच्या पायर्या पुढेच आहेत . गुलाबजाम खायला दिले किती खावून खावून खाणार कुठेतरी तृप्तता हवी . पुरे म्हणायची वेळ यायच्या आधीच स्वतःच्या मनाने थांबता आले पाहिजे . पूर्णविराम कुठे द्यायचा ते समजले पाहिजे . 

जन्म मोक्षासाठीच आहे आणि म्हणूनच शनी गुरु ह्या सारखे ग्रह आयुष्याच्या तिसर्या अंकात भेटतात . जीवनातील मौजमजा आनंद तृप्तता , मोह ,पुरुषार्थ गाजवणे , मानमरातब , ज्ञान , वर्चस्व , पद लालसा , आकर्षण , सुख समृद्धी ह्या सर्वांसाठी चंद्र शुक्र बुध राहू मंगळ सर्वच प्रोचाहित करतील पण खरे समाधान आयुष्याच्या संध्याकाळी देणारे गुरु आणि शनीच आहेत . मी काय मिळवले आणि गमावले ह्याचा हिशोब आयुष्याच्या अखेरीच होतो . भौतिक सुखे कमी मिळाली तरी चालेल पण आंतरिक समाधान शेवटचा क्षण सुखाचा करणार ह्यात शंकाच नाही . 

एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न कमी असूही शकेल  , भौतिक सुखे पायाशी लोळत नसतील पण मनाचे आंतरिक समाधान ओतप्रोत आहे कारण समाधान देणारा गुरु पत्रिकेत उत्तम आहे. गुरूंच्या शिवाय जीवन अपूर्ण आहे. एखादी कला , विषय भाषा ,पदार्थ काहीही असो ती शिकवणारा योग्य गुरु जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणे हे अहो भाग्य आहे . ह्या सगळयाच्या जोडीला मनाचे समाधान कश्यात आहे ह्याचा शोध घेण्यासाठी मदत करणारा अध्यात्मिक गुरु लाभणे हे तर परमोच्च भाग्य म्हंटले पाहिजे. 

भारतीय ज्योतिष आणि अध्यात्म आपल्याला परावलंबी बनवत नाही तर  विचार करण्यास सक्षम करते . ज्ञानाचा अखंड झरा, ओघ म्हणजे गुरुतत्व . गुरुतत्व हा एक विचार आहे आणि तो मनात रुजला तर सकारात्मकता , मनाची शांतता अपोआप येतेच , कश्याचीही भीती वाटत नाही .

आजकाल दर दोन मिनिटांनी लोकांना उदास एकटे वाटते, डिप्रेशन एनझायटी असले भले मोठे शब्द आजकाल अगदी लहान वयाच्या मुलांकडून ऐकायला येतात . काय असते ते नेमके ? अहो सुखाच्या गाद्यावर लोळून येतात ह्या सर्व गोष्टी जवळ. आज रस्त्यावर जावून बघा लोकांना शुद्ध पाणी नाही प्यायला , भुकेने कासावीस झालेल्या त्या लहान लहान जीवाना विचार त्यांना डिप्रेशन आले आहे का? भरपूर झाले मनाचे आणि शरीराचे लाड . परमेश्वराने खूप दिले आहे आपल्याला म्हणूनच मोठ्या घरात राहून चार वेळा खायला प्यायला मिळूनही आपल्याला डिप्रेशन येते . परमेश्वराची ओंजळ रिती व्हावी इतके सुख पदरात घातले आहे त्यांनी आपले तरीही आपल्याला डिप्रेशन वा रे वा .

विचार करा खरेच सर्व काढून घेतले तर काय अवस्था होयील आपली . आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या आणि कामाला लागा , स्वतः कष्ट करा आपले गुरु सदैव आपल्या सोबत आहेत ह्याची खात्री बाळगा . सारखे काय मागत राहायचे . हे द्या ते द्या . थोडे तटस्थ राहून आपल्याच आयुष्याकडे बघा . गुरु तत्व म्हणजे इतरांना मदत करणे , एखाद्याच्या शिक्षणाला औषधांना मदत करणे , वृद्धाना मानसिक आधार देणे , समाजासाठी काहीतरी कुणाच्यातरी उपयोगी पडणे , एखाद्या आजोबाना रिक्षा करून दिलीत तरी महाराजांना ते आवडेल. 

गुरुपौर्णिमा रोज प्रत्येक क्षणी जगायची गोष्ट आहे . ती एक दिवस त्यांची आठवण काढायची आणि इतर दिवशी वाटेल तसे वागायचे हे कसे चालेल. आपला संसार आपल्या घरातील जबाबदार्या भाविशासाठी केलेली आर्थिक तरतूद आणि घरातील कुटुंबातील सर्वाना एकत्र धरून ठेवणे हि भावना म्हणजेच गुरुतत्व आहे. महाराजांनी कसे आपल्या सर्वाना एकत्र आणले आहे . प्रेमाच्या धाग्याने सर्व भक्तांना बांधून ठेवले आहे त्याच प्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात देणे हेही गुरुतत्व आहे. नुसते मी माझे करून होत नसते. जीवन खर्या अर्थाने जगायचे असेल तर इतरांसाठी काहीतरी मागण्याची करण्याची वृत्ती हवी , ती मनात भिनली पाहिजे .प्रत्येक गोष्टीत स्वार्थ असतो आपला. अगदी महाराजांच्या सेवेत सुद्धा . काहीतरी हवे आहे म्हणून सेवा हे समीकरण आहे. 

कुणाची माफी मागायची आहे लगेच मागून टाका , नाहीतर ती मागायला पुढील जन्म घ्यावा लागेल तोही अजून अधिक कष्टाचा . द्वेष मत्सर , तिरस्कार म्हणजे मोठ्या कधीही बर्या न होणार्या आजारांना जन्माला घालणे .

फक्त त्यांचे अस्तित्व आणि मी अखंड नाम घ्या ...काहीही करू नका जप किती करू ? हे विचारतात . बटाटे वडे किती खाऊ ते नाही विचारात ते कुणाला. अहो नामस्मरणाची गोडी अवीट आहे आणि ती चाखायची असेल तर जपाची माळ ठेवून द्या आणि श्वासागणिक नाम घ्या. आयुष्यात कितीही काहीही मिळवले तरी जोवर मनाचे समाधान मिळत नाही तोवर सर्व फोल आहे .

गुरुपौर्णिमा म्हणजे समाधानाकाडे वाटचाल . द्या सोडून सर्व विचार आणि झोकून द्या स्वतःला त्यांच्या चरणाशी , अर्पण करा सर्वस्व . असे कराल तेव्हा उरेल ते फक्त नाम नाम आणि नाम. नामाचा महिमा अगाध आहे पण आजच्या इंस्तंट च्या जगात इंस्तट नाम मात्र मिळणे अवघड आहे . परमेश्वर प्राप्ती साठी स्वतःला विसरावे लागते तरच कुठे ते दृष्टीक्षेपात येते . आपले सर्वस्व गेले तरी आपला अहंकार जात नाही , पुढील जन्मीही तो घेवून जाणार कि काय ? रत्न कुठले घालू विचारतील कारण ते बोटात घातले कि जगाला दिसते आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला आणि मिरवायला मोकळे . बरे ते सहज सोपे . पण नामस्मरण कुठले करू ते नाही विचारात . उपासना ह्या शब्दाचा अर्थ रत्न नसून नाम आहे. नाम नाही घेतले तर रत्न सुद्धा काम करणार नाही.

गुरूंच्या वर असणारी निष्ठा हि परमोच्च आहे. गोरा कुंभार आपल्या पत्नीसोबत रस्त्यातून जात होते . त्यांच्या पायाला काहीतरी लागले म्हणून पायाने माती बाजूला केली तर सोन्याचे कडे दिसले मागून पत्नी येत होती ती हे उचलेल अशी शंका मनात आली म्हणून लगेच त्यांनी त्यावर माती सारली आणि पुढे निघून गेले. आपले पती इथे क्षणभर का थांबले हे पत्नी पाहत होती . तिथे आल्यावर तिच्याही पायाला त्या कड्याचा स्पर्श जाणवला तिनेही त्यावर माती सारली आणि पुढे आली. पतीला विचारले , स्वामी तुम्ही तर मातीवर मातीच टाकून आलात . 

हा खरा परमार्थ आहे . भौतिक सुखे शेवटी कवडीमोल आहेत . आपण मातीतून जन्मलो आणि शेवटी मातीतच विलीन होणार हे त्रिवार सत्य आपल्याला जितक्या लवकर कळेल तितके द्वेष , मत्सर खुनाशी स्वभाव , दुसर्याच्या वर असलेली जळू वृत्ती , मानापमानाच्या भावना , तिरस्कार कमी होत जातील. आपल्याकडून काही हरवले मग ती वस्तू असो अथवा माणूस चूक आपलीच असते . दोष इतरांचा नसतोच कारण हे आपले आयुष्य आहे आणि तेही आपल्या पूर्व कर्मानुसार मिळालेले . हेच समजण्यासाठी अध्यात्म आहे आणि ते करत राहणे समजून घेणे हेच आपले जीवन आहे. आपल्या पडत्या किंवा वाईट काळात ज्यांनी मदत केली त्यांना विसरलात तर कुठलाही देव माफ करणार नाही त्यामुळे सदैव सर्वांचे ऋण माना आणि त्याप्रमाणे वागणेही ठेवा .

किती लोक ओळखतात आपल्याला ह्या जगात ? आपण गेल्यावर कुणीही आपली आठवण सुद्धा काढणार नाही . वयाच्या सत्तरीत सातवीचे मार्क आठवत आहेत का? नाही ना मग विसरा सर्व कटू गोष्टी आणि मनात ओठात हृदयात आणि वागण्या बोलण्यात फक्त आणि फक्त गुरूंचे नाम असुदेत .

आयुष्य स्वामीमय होणे ह्यासारखा परमोच्च आनंद असूच शकत नाही . अनुभव घ्या आणि कळवा सुद्धा .


माझ्या आयुष्यातील सर्व गुरुंना हा लेख समर्पित करत आहे .


गुरुपौर्णिमा तुमच्या आमच्या सर्वांच्याच आयुष्यात नामाचे महत्व जपणारी , मुखी गुरुस्तवन असणारी असुदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना .


श्री स्वामी समर्थ 


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 

अनुराधा नक्षत्रातील ग्रहांचे गूढत्व

 || श्री स्वामी समर्थ ||



मोक्ष त्रिकोणात येणाऱ्या कर्क , वृश्चिक आणि मीन ह्या जलतत्वाच्या राशी. ह्या तिन्ही राशींच्या मध्ये क्रमाने पुष्य , अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा हि ३ शनीची नक्षत्रे येतात . शनीच्या ह्या तिन्ही नक्षत्रातील आज अनुराधा नक्षत्रातील ग्रह बघुया . वृश्चिक राशी हि मोक्षाचा गाभा असणारी संवेदनशील पण गूढत्व असणारी राशी आहे. वृश्चिक राशीतील अनुराधा नक्षत्र हे शनीच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यातील ग्रहांची बैठक सुद्धा अभ्यासण्या जोगी असते . 

अनुराधा नक्षत्रात जर गुरु शुक्र बुध नेप ह्या ग्रहांची युती असेल तर हा अत्यंत दुर्मिळ योग आहे.  अनुराधा नक्षत्र हे भक्ती आणि समर्पण . शनी असल्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध , त्यात वृश्चिक राशी काहीतरी गूढता प्रदान करणारी अश्या राशीत आहे. काल पुरुषाच्या अष्टम भावात येणारी हि वृश्चिक राशी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारी आणि अनेक रहस्य उलगडणारी आहे. 

ह्या राशीतील प्रत्येक ग्रह काहीतरी गूढत्व देणारा किंवा त्यासंबंधी माणसाचे व्यक्तिमत्व घडवताना दिसतो. इथे गुरु सारखा ज्ञानी ग्रह आला तर व्यक्ती ज्ञानपिपासू , उत्तम वाचन , अध्यात्मिक बैठक आणि नैतिक आचरण करणारी असते. पुन्हा आपल्याला इथे शनीचे नक्षत्र आहे हे विसरून चालणार नाही म्हणून तपस्वी , शिस्त , न्यायाच्या चौकटीत आयुष्य असलेला आणि साधक व्यक्ती इथे दिसते . धर्म युक्त आचरण आणि अध्यात्माचा अभ्यास , सखोल संशोधक वृत्ती आणि गूढ विषयांच्या अभ्यासाकडे कल असतो.

शनीच्या ह्या राशीतील शुक्र सुद्धा एका चौकटीत स्थिर होतो . प्रेम विलास , आनंद आणि भोग उपभोगताना सुद्धा आत्यंतिक समरसून प्रेम करणारा शुक्र संयमित होताना दिसतो. रसिक , भोक्ता पण तितकाच नीतिमान , मनाच्या प्रत्येक तरल भावनांवर मनाचा ताबा मिळवणारा असा हा शुक्र विलासात सुद्धा स्वतःला पूर्णत्वाकडे नेतो.

 वृश्चिक राशीतील अनुराधा नक्षत्र आणि त्यात बुध . धारधार लेखणी , स्पष्ट वक्तेपणा ह्यामुळे उत्तम व्यापार पण अंतर्मुख झाला तर संशोधन चांगले करील. इथे बुध त्याचे उडते बोलणे संयमित करून एक अभ्यासू व्यक्तिमत्व घडवतो. लेखन वाचन आणि मनन चिंतन हे बुधाचे रूप शनीच्या ह्या नक्षत्रात खुलून येतात . ज्या ज्या क्षेत्रात संशोधन आहे तिथे हि युती कार्यरत असते . भाषा संवाद ह्यावर सुद्धा प्रभुत्व असते. 

मोक्षाच्या ह्या गाभ्यात नेप सारखा जल तत्वाचा गूढ ग्रह असेल तर अध्यात्म , मोक्ष ह्याकडे निश्चित वाटचाल होते . स्वतःच्या अस्तित्वाचा शोध , स्वप्नाळू जगतात जगणारा आणि आयुष्यातील अनेक गुपिते रहस्य जाणून घेण्याची धडपड करणारा पण थोडासा आपल्याच कोशात अडकलेला असतो. साक्षात्कार , सूचक स्वप्ने , दैवी शक्ती , उत्तम उपासक बनवते.

 गूढता आणि आध्यात्मिकतेची जोड त्यामुळे संशोधन मग साधना असो कि ज्योतिष विद्या ह्यात निपुण असतात . ध्यान उत्तम होते . 

ह्या चार ग्रहांची युती शुभ असेल तर उत्तम अध्यापक , संशोधक , मार्गदर्शक , लेखन करण्यास प्रवृत्त होते . ह्यात मेख आहे ती नेप ह्या ग्रहाची . हा ग्रह बिघडला तर अमली पदार्थ , नशेत राहणे , मनावर खोल परिणाम अशीही फळे मिळताना दिसतात .

अशी व्यक्तिमत्वे आपल्या बोलण्या वागण्यातून समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटवतात . त्याचे विचार , एकंदरीत व्यक्तिमत्व समोरच्यावर छाप टाकणारे आकर्षित करणारे असते . ह्यांच्या मनाचा थांगपत्ता कुणालाही लागणार नाही . ह्यांच्या प्रत्येक कृतीतील अर्थ जन सामन्याला सहज लागणार नाही . एक क्षणात समोरच्याच्या मनाचा ठाव घेतील पण आपल्या मनाचा ठाव लागू देणार नाहीत .

हि युती शुभ ग्रहांनी  दृष्ट असेल तर उत्तम फलित देयील अन्यथा नाही . आयुष्यातील काही काळ एकटेपणा सुद्धा येवू शकतो. 


सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Saturday, 5 July 2025

 || श्री स्वामी समर्थ ||




पूर्वापार आपल्याकडे घराच्या मुख्य द्वारापुढे काढलेल्या रांगोळीला अनन्य साधारण महत्व आहे . खेड्यापाड्यातून दरवाजा समोरील रांगोळी मुळे सरपटणारे प्राणी घरात येत नाहीत म्हणून घरातील स्त्रिया आवर्जून रांगोळी काढत असत . तसेच रांगोळी हा पूजेतील एक संस्कार सुद्धा आहे. विविध देवतांसाठी विविध रांगोळ्या काढण्याच्या प्रथा आहेत . 

आपल्या घरात येणारी व्यक्ती मुख्य दरवाज्या सामोरील रांगोळी क्षणभर पाहते तेव्हा तिचे विचार सकारात्मक होतात आणि त्याचा आपल्यालाही फायदाच होतो. कृती लहान असली तरी अगणित फायदे असल्यामुळे वेळ नाही हि सबब न सांगता दरवाज्यासमोर नित्य लहानशी का होयीना रांगोळी काढावी आणि अनुभव घेवून बघावा तसेच रांगोळीचा वसा पुढील पिढीलाही सुपूर्द करावा .


आषाढी एकादशीच्या सर्वाना अनंत शुभेछ्या .


श्री राम कृष्ण हरी 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 


Friday, 4 July 2025

रेशीमगाठी भाग १२- सप्तम भाव शुक्र आणि जोडीदार

 || श्री स्वामी समर्थ ||


स्त्री आणि पुरुषामध्ये लैंगिक आकर्षण हे नैसर्गिक आहे. स्त्री आणि पुरुष एकत्र आले कि त्यांच्यात आकर्षण होणेही अपरिहार्य आहे आणि त्यातून नवीन जीव तयार होतो ह्यातूनच विवाहसंस्था निर्माण झाली असावी थोडक्यात काय तर समाजाने स्त्री आणि पुरुषाला एकत्र राहण्यास दिलेली अधिकृत परवानगी म्हणजेच विवाह.

सप्तम अष्टम हे मुख्यतः लैंगिक भावनांवर परिणाम करणारे हे स्थान आहे त्यामुळे व्यक्तीला वैवाहिक सुख कसे मिळेल जोडीदारापासून शारीरिक आणि मानसिक सौख्य कसे असेल ते सांगते.  जोडीदाराचे रंग रूप स्वभाव प्रेम आपुलीकी मतभिन्नता द्वेष आजार मृत्यू घटस्फोट सर्व गोष्टींचे ज्ञान सप्तम स्थान देते .विवाह दोघांचाही असतो त्यामुळे सर्वच गोष्टी दोघांच्याही मनासारख्या झाल्या पाहिजे. सुख ओरबाडून घेण्यात अर्थ नाही . 

शुक्र आणि मंगळ हे कामप्रधान ग्रह आहेत .अनेकदा ज्यांची कामवासना प्रबळ आहे त्यांचा विवाह उशिरा होताना दिसतो. घटस्फोट हि घटना नसून स्वभाव आहे. जबाबदारीचे पालन न करणे किंवा न पेलवणे . शुक्र वृषभ किंवा तूळ राशीत असता कामभावना जास्ती असते.शुक्र मंगळाच्या राशीत असताना सुद्धा कामवासना अधिक असते. मिथुनेतला शुक्रही कामी असतो. शुक्र मंगळ ७ किंवा १० मध्ये असता अनैतिकता वाढते. शुक्राच्या सप्तमात वक्री मंगळ ,शुक्रवार मंगळाची दृष्टी,शुक्र मंगळाच्या राशीत आणि त्यावर हर्षलचे कुयोग असतील तर पालकांनी मुली वयात येताना त्यांना सांभाळावे. 

शुक्राचे सप्तमात चंद्र असेल तर जोडीदार मन मिळाऊ असतो , गोरा , कलासक्त , सेवाभावी ,चंचल ,गोड बोलणारा असतो . शुक्राचे सप्तमात मंगळ असेल तर विवाह उशिरा होतो त्यात मंगळ मेष वृश्चिक राशीत असेल तर जोडीदार सत्ता हुकुम गाजवणारा, शिस्तप्रिय असतो . शुक्राचे सप्तमात धनु किंवा मीन राशी असतील तर जोडीदाराशी वैचारिक मतभेत असतात . शुक्रापासून सातव्या स्थानात तूळ रास असेल तर संसार सुखाचा करतील .रसिकता शुक्राच्या सप्तमात सिंह रास असेल तर जोडीदार घमेंडी , मानी ,आतल्या गाठीचा प्रेम पण करतील पण शिस्तीत.  राहू असेल तर जोडीदार महत्वाकांक्षी , वयात अंतर असणारा धार्मिक असेल  मकर राशी असेल तर कष्टाळू असेल . बुधाच्या राशी असतील तर उदार , बुद्धिमान ,बोलका , विनोदी स्वभावाचा  असतो .

विवाह हे दोन मनाचे मिलन आहे तेव्हा विवाह ठरवताना इतरांना काय वाटते त्याही पेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटते ह्याचा विचार करत आपला आतला आवाज ऐकावा . मग शास्त्राचा आधार घ्यावा पण सर्वच सारासार विचार करून निर्णय घ्यावा. आपल्या घरातील मांडली आपले हितच बघणार तेव्हा त्यांचाही विचार अवश्य झालाच पाहिजे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230




Wednesday, 2 July 2025

रेशीमगाठी भाग ११- विवाहात फसवणूक

 || श्री स्वामी समर्थ ||

विवाहात फसवणूक होईल का ?? हि चिंता आज प्रत्येक पाल्याला आहे . मुलाचे दुकान आहे, नोकरीत अमुक अमुक पगार आहे , घर स्वतःचे आहे , व्यसने अजिबात नाही  असे सांगितले जाते पण विवाह झाल्यावर ह्यात विसंगती दिसून येते . मूळ पत्रिकेत फेरबदल करून  जन्मतारीख आणि महिना तोच पण वर्ष बदलून पत्रिका दाखवणे अशी फसवणूक केली जाते . फसवणुक म्हणून मुलामुलींची १० १२ वी चा दाखला ,शाळा सोडल्याचा दाखला  ज्यावर जन्मतारीख असते त्याच्याशी पत्रिकेवरील तारीख निदान तपासून बघावी . कडक मंगळ असेल तर विवाहाला उशीर आणि अडचणी होतात म्हणूनही जन्म टिपण बदलले असते. अनेकदा नपुंसक जोडीदार मिळणे अश्या प्रकारे फसवणूक होते त्यात मुलाचा शारीरिक दोष लपवला जातो. 

आज फसवणूक झाली आणि मग विवाहच नाही किंवा एकंदरीत लग्नाला उशीर होतोय म्हणून मनोरुग्ण होणारे मुले मुली आहेत . विवाहापूर्वी किंवा नंतर होणारे प्रेमसंबंध हे पण फसवणुकीचे कारण आहे. विवाहासाठी पत्रिका बघताना हर्शल नेप ह्या ग्रहांचा विचार झालाच पाहिजे. नेप हा मुख्यत्वे फसवणूक करवतो . सप्तम भावात जेव्हा हर्शल नेप येतात तेव्हा ह्या ग्रहांचा सखोल अभ्यास झाला पाहिजे . हर्शल आकस्मित घटना घडवतो अचानक विवाह ठरवतो आणि मोडतो सुद्धा. सप्तमातील नेप काहीतरी गूढ गोष्टी दर्शवतो . समोरचे लोक काहीतरी लपवा छपवी करण्याकडे कल असतो . मुलाचा आधी मोडलेला साखरपुडा किंवा प्रेमभंग तत्सम काहीतरी सांगत नाहीत आणि मग ते नंतर समजते . 

बरेचदा नेप मुळे विवाहात नाट्यमय घटना घडतात . मंडपातून मुलगी पळून जाणे किंवा साखरपुडा झाल्यावर विवाह मोडणे . सप्तम स्थानात नेप हा हर्शल राहू शनी केतू मंगळा सोबत असेल तसेच तो आश्लेषा , जेष्ठा ,कृत्तिका ,मूळ ह्या नक्षत्रात असेल . लग्नस्थानात बिघडलेला नेप , सप्तमेशा सोबत बिघडलेला नेप असेल तर फसवणूक होऊ शकते. शुक्र हा नेप सोबत असेल किंवा शुक्र नेप प्रतियोग असेल आणि ती अशुभ नक्षत्रात  चंद्र नेप युती किंवा प्रतियुती असेल आणि अशुभ नक्षत्रात झाली असेल तर . सर्वांच्या संमतीने जेव्हा विवाह ठरतो ,खरेदी होते , पत्रिकाही छापल्या जातात आणि अचानक विवाह मोडतो हि बाब अत्यंत क्लेशदायक आणि मनस्ताप देणारी असते . 


नपुंसक जोडीदार मिळण्यासाठी शनी बुध हे ग्रह कारणीभूत आहेत तसेच फसवणूक होण्यास नेप कारणीभूत आहे .त्याचप्रमाणे हर्शल आणि मंगळ हे दोन ग्रह विवाह मोडण्यास कारणीभूत आहेत . हर्शल हा बुद्धिमान पण हेकट , आकस्मिक अनाकलनीय घटना घडवणारा ग्रह आहे. विवाहाच्या वेळी आकस्मित घटना घडवणे ,गोंधळाची स्थिती निर्माण करणे .ज्यांच्या पत्रिकेत सप्तमातील हर्शल हा पापग्रह युक्त , दृष्ट किंवा अशुभ नक्षत्रात असेल तर .चंद्र हर्शल युती किंवा प्रतियुती असेल आणि ते अशुभ नक्षत्रात असतील तर शुक्र हर्शल युती किंवा प्रतियोग विवाहसौख्याची हानी करतात . शुक्र वक्री असेल तर विवाहात अडचणी येणे , विवाह मोडणे हे होते . सप्तम स्थानातील वक्री ग्रह सुद्धा विवाह मोडण्यास कारणीभूत ठरतात . थोडक्यात शुक्र हर्शल युती प्रतियुती , मंगळाची पत्रिका ,सप्तमातील वक्री ग्रह , चंद्राशी असणारे हर्शल नेप चे कुयोग ,वक्री शुक्र ,कुयोगातील नेप ,वक्री सप्तमेश हे सर्व योग आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत आहेत का हे तपासून बघितले पाहिजेत .

वराचा सप्तमेश आणि वधूचा लग्नेश पहा. दोघांचे लग्न आणि चंद्र पुरुषाच्या पत्रिकेत चंद्र आणि शुक्र पहा . स्त्रीच्या पत्रिकेत मंगळ आणि रवी पहा . वैवाहिक सौख्य नसणे, वैवाहिक असमाधान , विवाह मोडणे , घटस्फोट असे काहीना काही प्रोब्लेम बरेचदा कर्क लग्नाच्या पत्रिकेत पाहायला मिळतात .कर्क लग्न हे विवाहासाठी बरेचदा दुर्दैवी ठरते कारण ७ आणि ८ व्या स्थानात शनीची रास येते तसेच शनी हा कर्क लग्नाचा शत्रूही आहे. कर्क लग्नात वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र हा बाधकेश होतो . ह्यामुळे कर्क लग्न हे वैवाहिक सुखात निरस असणार. सप्तमेश शनी हा आळशी , निरस ,नैराश्य वादी, पिडा देणारा पापग्रह आहे. थोडक्यात सौंदर्याचा अभाव मकर राशीत आहे. शनी हा विलंबाचा,दुक्ख ,दारिद्र्य ,दैन्य ,संकटे ,उदासीनता ,वैफल्य ,दीर्घ आजार देणारा विवाह सौख्यात परमोच्च आनंद देणाऱ्या शुक्राच्या फळाशी ह्याचा दुरचाही  संबंध नाही शनी हा निग्रही , कष्टाळू ,सहनशील , विचारी , तत्वनिष्ठ ,ज्ञानी , प्रामाणिक, कायद्याच्या चौकटीत जगणारा ,काटकसरी ,दिर्घोद्योगी आहे. त्यामुळे हे गुणसुद्धा जोडीदारात दिसून येतील.  कर्क लग्नाचा स्वामी चंद्र असल्यामुळे जातक चंद्राच्या गुणधर्माचा असणार आणि जोडीदार शनीच्या गुणांचा असणार.

चंद्र हा शीतल , सौम्य , शांत , प्रेमळ स्त्रीग्रह आहे. शनी च्या अगदी विरुद्ध तत्वाचा ग्रह आहे. कर्क लग्नाच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक , देखणे , मोहक , मादक , भावनाप्रधान , चंचल , कलासक्त , रसिक , प्रवासाची आवड असणारे ,कुटुंब वत्सल, स्वभाव रसिक , आनंदी हौशी असतो .व्यक्तिमत्व चारचौघात उठून दिसणारे असते त्याउलट जोडीदाराचे व्यक्तिमत्व असते कारण ते शनिप्रधान असते. ह्याच्या अगदी उलट स्वभाव हा जोडीदाराचा असतो .

कर्क लग्नाच्या व्यक्ती ह्या ऐहिक सुखाची लालसा असणार्या , महत्वाकांक्षी, परोपकारी असतात .लोकप्रिय असतात .ह्यांना पैसा , कीर्ती , वाहन , घर , नावलौकिक , प्रतिष्ठा सर्व सुखे मिळतात .मात्र वैवाहिक सौख्य मनाप्रमाणे मिळत नाही .सप्तमेश शनी असल्याने विवाह उशिरा होतो .शनी खरच दुषित असेल तर ३५ नंतर किंवा विवाह न झालेलाही दिसतो . सप्तमेश शनी ३ ७ ९ ११ ह्या स्थानात असेल तर वैवाहिक सौख्य तितके खराब नसते .

मध्यंतरी एका मुलीला एक स्थळ सांगून आले , दोघांची पसंती झाली. तिच्या सप्तमात हर्शल नेप . तिला त्याच्यात काहीतरी खटकत होते पण काय ते उमगेना . मी म्हंटले सगळे नीट वर्णन कर त्याचे , दिसतो कसा रंग उंची बोलणे कुठल्या विषयावर असते . केशवेशभूषा . त्यावर म्हणाली तो नेहमी फुलशर्ट घालतो. मी त्याला म्हंटले सुद्धा कि तुला नवनवीन कपडे घालण्याची आवड नाही का? असो तिला म्हंटले त्याला तसे सांग नाही तर एकदा त्याला न सांगता त्याच्या घरी जा. असो त्याच्या हातावर थोडे कोडचे डाग होते. आता हे आज ना उद्या समजणार . 

विवाह हा सुखद असतो , पुढील संपूर्ण आयुष्य त्याच्या सोबत घालवायचे ती विवाहाची इमारत प्रामाणिक पानाच्या विटेवर उभी असावी. फसवणूक करून आपण आपले आणि समोरच्या व्यक्तीचेही आयुष्य धुळीला मिळवून आपल्याच कर्मात वाढ करतो . विचार करावा ....

श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230