Wednesday, 23 July 2025

नामाचा श्री गणेशा

 || श्री स्वामी समर्थ ||


एका राज्यात सारखा दुष्काळ पडत असे म्हणून राजाने राज्याच्या बाहेर एक तलाव खोदला आणि पाण्याचा प्रश्न सुटला. तलाव पाण्याने ओतप्रोत भरत असे. राजाला वाटले हा तलाव बघण्यासाठी लोकांनी यावे पण लोक तिथे येतील कश्यासाठी नुसते पाणी बघायला तर कुणी येणार नाही म्हणून त्याने त्याच्या  शेजारी लहानसा तलाव करून त्यात अनेक रंगांचे मासे सोडले. 


लोक यायला लागली तिथे आपला वेळ घालवू लागली . काही दिवसांनी त्यात तळ्यातील मासे गायब होवू लागले. मासे मरत नव्हते ते गायब होत होते . माश्यांची संख्या दिवसागणिक कमी होत असलेली पाहून राजाने फर्मान काढले कि कुणीही इथे यायचे नाही .

पण तरीसुद्धा मासे कमीच होत होते. एक दिवस रात्री राजा स्वतः तळ्याकाठी गेला . तिथे एक कोळी जो तेथील मासे चोरत होता त्याने तळ्यात मासे पकडण्यासाठी जाळे टाकले होते आणि स्वतः तळ्यात होता राजाची चाहूल लागल्यावर तो तळ्याकाठी आला आणि अंगाला सर्व चिखल लागलेला होता त्याच अवस्थेत तेथील एका झाडाखाली बसून नामस्मरण करायला लागला . राजा तिथून जाताना त्याने त्याचा रामजप ऐकला आणि त्याला साष्टांग नमस्कार करून तो पुढे गेला.

कोळ्याला आश्चर्य वाटले , मृत्युच्या दारातून परत आणले ते ह्या नामाने . दंभ अहंकाराने घेतलेल्या नामाने राजाने सुद्धा मला नमस्कार केला तर मनापासून नाम घेतले तर परमेश्वर कृपा सुद्धा नक्कीच होईल . असा विचार करून त्याने मासे पकडण्याचा धंदा सोडला आणि रामनामात दंग झाला.

ह्या गोष्टीवरून काय तो बोध आपण घ्यायचा आहे . आयुष्यात नाम हे किती महत्वाचे आहे हे जितके लवकर समजेल तितके आयुष्य सुकर होईल. लहानपणी घरातील मोठी माणसे आपल्याला संध्याकाळी मनाचे श्लोक , शुभंकरोती शिकवत पण मोठे झाल्यावर आपण जगातील सगळ्यात जास्ती “ व्यस्त व्यक्ती “ होतो आणि हे सर्व भूतकाळात जमा होते .

 

श्रावण महिना आलाय चला पुन्हा त्या लहानपणीच्या भाव विश्वात जावूया आणि नामस्मरणाचा , श्लोक , स्तोत्रांचा श्रीगणेशा करुया . 


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment