|| श्री स्वामी समर्थ ||
एक राजा होता , तसा आस्तिक होता पण तो कधी नाम घेत असे हे कुणाला कधीच समजले नाही . त्याची पत्नी फार देवदेव करत असे आणि तिला सारखे वाटायचे कि आपल्या यजमानांनी नामस्मरण करावे. तिने त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले पण त्याने नाम घेतले नाही .
त्याच्या अंकारणात नाम होते पण व्यक्त कधीच केले नव्हते त्यामुळे पत्नीला त्याला लवलेशही नव्हता . तिने आपला प्रयत्न सुरु ठेवला पण त्याने कधीही नाम घेतले नाही . एकदा शयनगृहात राजा एका कुशीवर झोपलेला असताना पत्नी आली त्याला जराशी चाहूल लागली आणि त्याने कूस बदलली तेव्हा त्याच्या मुखातून “ राम “ असा शब्द बाहेर आला जो पत्नीने ऐकला . तिला राजा नाम घेत आहे हे ऐकून जणू हर्षवायू झाला . दुसर्या दिवशी अख्या गावाला पेढे वाटायचा निर्णय तिने घेतला आणि पेढेवाटप सुरु झाले. जेव्हा राजाला पेढा दिला तेव्हा त्याने हे सर्व कुठल्या आनंदाप्रीत्यर्थ पेढे वाटप चालू आहे हे विचारले असता तिने रात्रीचा प्रसंग कथन केला आणि आपल्या मुखातून “ राम “ हा शब्द आल्यामुळे मी आत्यंतिक आनंदाने मिठाई वाटत आहे हे सांगितले.
राजाला अतीव दुक्ख झाले . म्हणाला “ जन्मभर हृदयात सांभाळून ठेवलेला राम आज मुखातून निघून गेला .आता जगायचे कारणच उरले नाही . “ असे म्हणून त्याने प्राणत्याग केला . जन्मभर नामाच्या ओढीने जगला , अंतकरणात फक्त राम राम आणि राम होता . पण त्याने जगाला ते कळून दिले नाही . नामाचे महत्व ज्याने जाणले तो नाम घेतल्याशिवाय राहणारच नाही . फरक इतकाच कि काही प्रगट स्वरुपात घेतात तर काही मनात घेतात . नामाचे फळ आत्यंतिक मोठे आहे आणि ते नाम घेणार्या साधकाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराने सांगितले आहे फक्त एकदा तरी माझे नाव घेतलेस तर जन्माचे तुझ्या मी सार्थक करीन.
आयुष्य सरते पण नाम घ्यायचे राहूनच जाते . नाम हे म्हातारपणी उतारवयात घ्यायचे नसून ते जन्मल्या आल्यावर पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत घ्यायचे आहे. नामाची गोडी लागते पण त्यासाठी ते मनात मुखात असणे मात्र अत्यावश्यक असते . नाम हे आपल्या कृतीतूनही दिसणे आवश्यक आहे.
अनेक लोकांना मी कसा मोठा नाम घेणारा हे दाखवायची अति हौस असते . असुदेत तसेही चालेल पण येन तेन प्रकारे नाम घ्या आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करून घ्या . दंभाने घेतलेलेही शेवटी नामच आह. नाम दंभ कमी करेल , आपल्यात अमुलाग्र बदल करेल पण नाम तसेच राहील . नामाने आपल्या चित्तवृत्ती बदलतात इतके त्याचे महत्व आणि सामर्थ्य आहे .
नामाचे महत्व अनन्यसाधारण आहे हे सर्व आपण वाचतो ऐकतो पण नाम घेत मात्र नाही . कधीतरी क्षणभर का होईना नामात रंगून गेलेले वारकरी डोळ्यासमोर येतात . काय मिळवायचे असते त्यांना ? काहीही नाही . पण माऊली भेटल्याचा उत्कट आनंद ते अनुभवत असतात . अखंड आयुष्य गेले आणि आयुष्याच्या संध्याकाळी काय मिळवले ह्याचा हिशोब केला तर बेरीज वजाबाकी शून्य येते कारण एकाच परमेश्वराचे नाम घ्यायचे राहूनच गेले. आणि जे राहून गेले तेच महत्वाचे होते किबहुना जन्म त्यासाठीच झाला होता पण आपण मोहात अडकून सगळे जमा करत बसलो वैभवाच्या पाठी धावत राहिलो पण खरे वैभव तर नामात परमेश्वराच्या चरणी आहे हे कळेपर्यंत आयुष्याची अखेर आली . नामात विलक्षण शक्ती आहे ती अनुभवावी लागते ज्याची त्यालाच . अनुभव घेण्यासाठी आत्ता ह्या क्षणी सुरवात करुया .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment