|| श्री स्वामी समर्थ ||
गुण मिलनासाठी येणाऱ्या पत्रिका ह्या अक्षरशः डोळ्यात तेल घालून पाहाव्या लागतात . अनेकदा लोकांना निर्णय ऐकण्याची इतकी घाई असते कि जसे काही गुणमिलन व्यवस्थित आहे पुढे जाण्यास हरकत नाही हे ऐकून लगेच दुसर्या दिवशी लग्न लावणार आहेत असाच थाट असतो. इतक्या महत्वाच्या गोष्टीला घाई करून चालणारच नाही कारण हि लग्नगाठ आयुष्यभराची असते. असो.
मध्यंतरी एक पत्रिका पहिली. शुक्राची दशा आणि विवाहाचा प्रश्न . शुक्र सप्तमेश आणि व्ययेश केतूच्या मूळ नक्षत्रात . शुक्र आणि मंगळ युतीत तीही अंशात्मक . दिसताना धनेत द्वितीय भावात पण अर्थात फळे देणार लग्नाची. केतू काही कला आणि विकलांवर षष्ठ भावात . वरवर पाहता कृष्णमुर्ती प्रमाणे हा केतू पंचमाची फळे देयील असे वाटेल पण केतूने पंचम भावाला स्पर्श सुद्धा केलेला नाही त्यामुळे तो पंचम भावाची फळे न देता षष्ठ भावाचीच फळे देणार . ह्याचा अर्थ शुक्र हा 7 12 असून षष्ठ भाव पण देणार म्हणजेच 6 12 ची मजबूत( नकारात्मक ) फळे शुक्राच्या दशेत मिळणार . वैवाहिक सुखाचा दूरदूर पत्ता नसलेली हि ग्रहस्थिती आहे . माणूस समजून किती घेवू शकेल ह्याची परीक्षा पाहणारी ग्रहस्थिती जी अत्यंत फसवी सुद्धा आहे. वैवाहिक सुखाचा कारक ग्रह केतू ह्या विरक्ती देणाऱ्या नक्षत्रात आणि पुन्हा षष्ठात . शुक्राची दशा थोडी थोडकी नाही तर २० वर्षाची आहे . त्यात लग्न वृश्चिक आणि त्यात चंद्रा सोबत बुध व अनेक ग्रहांची भाऊगर्दी . प्रचंड आतल्या गाठीचे हे व्यक्तिमत्व . अश्या पत्रिका चक्रावून टाकणाऱ्या आणि संभ्रमात टाकणाऱ्या असतात . पण समोरच्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो त्यामुळे उत्तर कसेही असो प्रामाणिक पणे द्यावेच लागते . पुढे त्यांची इच्छा .ह्या केस मध्ये समोरच्या यजमानांनी मला सांगितले कि अजून कुणी त्यांना सांगितले उत्तम आहे सर्व . मनातल्या मनात मी डोक्याला हात लावला. म्हंटले आपल्या मनाचा कौल घ्या , परमेश्वर तुम्हाला योग्य विचारशक्ती देवूदे. ह्यापलीकडे निदान माझ्या हातात काहीही नाही . शेवटी जसे घडायचे तशी बुद्धी होणारच.
आता ह्या शुक्राला केतूच्या मूळ नक्षत्रातून उचलून शुक्राच्या पूर्वा नक्षत्रात आणणे हे ब्रम्हदेवालाही कदाचित जमणार नाही . आहे हे असे आहे कारण ते आपले प्राक्तन आहे. हे असेच्या असे राहणार पुढील २० वर्ष . दशा स्वामी 6 12 ची फळे देत असेल तर कशी काय जुळवायची सोयरिक , सांगा बरे.
आता ह्यात गोम अशी आहे कि वरवर पाहता हा केतू पंचम भावाची फळे देत आहे असे दिसते पण तसे नाहीय आणि हेच जर नेमके ज्योतिषाला समजले नाही तर तो सांगेल वा वा पंचम भावाची फळे मिळतील विवाह करायला हरकत नाही पुढे मुले वगैरे पण होतील. मुले सोडा विवाह होईल कि नाही शंका आहे आणि विवाह झालाच कारण अश्या लोकांना अनेकदा चुकीचेच मार्गदर्शन मिळते ( पुन्हा त्यांचे प्राक्तन ) . विवाह होईल पण टिकेल का? वैवाहिक सौख्य मिळेल का? म्हणूनच घटना घडवण्याचा सर्वस्वी अधिकार दशा स्वामीने राखून ठेवला आहे तो आम्हाला हवे तसे उत्तर देण्यास अजिबात बांधील नाही . दशा अत्यंत महत्वाची आहे तिला डावलून आपण काहीही करू शकणार नाही.
जर एखाद्या व्यक्तीने अश्या जुळलेल्या ( ओढून ताणून आणि अर्धवट ज्ञानाने ) व्यक्तीशी विवाह केलाच तर पदरात घोर निराश्या आणि काडीमोड ह्याखेरीज दुसरे काहीही पडणार नाही. कृष्ण्मुर्तीचा सखोल अभ्यास असे बारकावे दर्शवतो जे अचूक उत्तरापर्यंत नेतात . तात्पर्य ग्रह समजले नाही तर निदान चुकेल जे बहुतांश पत्रिकेत आजकाल पाहायला मिळते . म्हणूनच कदाचित पुढे जावून वैवाहिक सुखात अडचणी निर्माण होतात . ग्रह त्याचे नक्षत्र , दशा स्वामी कुठल्या नक्षत्रात आहे आणि तो कुठले भाव दर्शवत आहे , विवाहाचा कारक शुक्र कुठल्या नक्षत्रात आहे ह्या सर्व ग्रहस्थितीची सांगड दशेशीही करावी लागते . ह्यात कुठेतरी लहानशी उणीव राहिली तर उत्तर चुकू शकते .
म्हणून मुला मुलींच्या पालकाना सुद्धा नम्र विनंती करावीशी वाटते. सोयरिक जुळवताना ज्योतिषाच्या मागे तगादा लावू नका , त्याला अभ्यासाला पुरेसा वेळ द्या त्यात तुमचेच भले आहे . ज्योतिष बाजूला ठेवा . आपल्यालाही कान नाक डोळे आहेत . प्रत्येक माणसालाही आंतरिक विचारशक्ती ( six sense ) असतो . मुलगा किंवा मुलगी बोलते कशी , तिचे विचार , नम्रता कि उद्धटपणा , मानसिकता , आर्थिक बाबतीत असणारे विचार ह्याची उत्तरे तुम्ही अचूक प्रश्नांच्या माध्यमातून नक्कीच मिळवू शकता . नुसते दिसणे आणि हसणे महत्वाचे नाही तर आयुष्याच्या प्रत्येक चढ आणि उतारावर तिचे सोबत असणे अनमोल ठरेल.
प्रत्येक ग्रह त्याची राशीपरत्वे बैठक , नक्षत्र आणि दशा ह्याची योग्य सांगड अचूक निर्णय देण्यास समर्थ असतात . ह्या सर्वात कमी म्हणून अनेक ग्रह वृश्चिकेत जे तपासावेच लागतात . संसारात मोकळे ढाकळे असावे सर्व , वागण्या बोलण्यात मोकळेपणा , प्रेम समजूतदारपणा अश्या असंख्य गोष्टीवर संसाराची इमारत असते. त्या दोघांना आयुष्य एकत्र काढायचे आहे , त्यांच्या नात्यात गोडवा असावा आणि तो वृद्धिंगत व्हावा . तिथे गूढ गूढ काहीच नसावे. आकाश मोकळे निरभ्र असावे. सहमत ?
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment