|| श्री स्वामी समर्थ ||
मोक्ष त्रिकोणात येणाऱ्या कर्क , वृश्चिक आणि मीन ह्या जलतत्वाच्या राशी. ह्या तिन्ही राशींच्या मध्ये क्रमाने पुष्य , अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा हि ३ शनीची नक्षत्रे येतात . शनीच्या ह्या तिन्ही नक्षत्रातील आज अनुराधा नक्षत्रातील ग्रह बघुया . वृश्चिक राशी हि मोक्षाचा गाभा असणारी संवेदनशील पण गूढत्व असणारी राशी आहे. वृश्चिक राशीतील अनुराधा नक्षत्र हे शनीच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यातील ग्रहांची बैठक सुद्धा अभ्यासण्या जोगी असते .
अनुराधा नक्षत्रात जर गुरु शुक्र बुध नेप ह्या ग्रहांची युती असेल तर हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. अनुराधा नक्षत्र हे भक्ती आणि समर्पण . शनी असल्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध , त्यात वृश्चिक राशी काहीतरी गूढता प्रदान करणारी अश्या राशीत आहे. काल पुरुषाच्या अष्टम भावात येणारी हि वृश्चिक राशी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारी आणि अनेक रहस्य उलगडणारी आहे.
ह्या राशीतील प्रत्येक ग्रह काहीतरी गूढत्व देणारा किंवा त्यासंबंधी माणसाचे व्यक्तिमत्व घडवताना दिसतो. इथे गुरु सारखा ज्ञानी ग्रह आला तर व्यक्ती ज्ञानपिपासू , उत्तम वाचन , अध्यात्मिक बैठक आणि नैतिक आचरण करणारी असते. पुन्हा आपल्याला इथे शनीचे नक्षत्र आहे हे विसरून चालणार नाही म्हणून तपस्वी , शिस्त , न्यायाच्या चौकटीत आयुष्य असलेला आणि साधक व्यक्ती इथे दिसते . धर्म युक्त आचरण आणि अध्यात्माचा अभ्यास , सखोल संशोधक वृत्ती आणि गूढ विषयांच्या अभ्यासाकडे कल असतो.
शनीच्या ह्या राशीतील शुक्र सुद्धा एका चौकटीत स्थिर होतो . प्रेम विलास , आनंद आणि भोग उपभोगताना सुद्धा आत्यंतिक समरसून प्रेम करणारा शुक्र संयमित होताना दिसतो. रसिक , भोक्ता पण तितकाच नीतिमान , मनाच्या प्रत्येक तरल भावनांवर मनाचा ताबा मिळवणारा असा हा शुक्र विलासात सुद्धा स्वतःला पूर्णत्वाकडे नेतो.
वृश्चिक राशीतील अनुराधा नक्षत्र आणि त्यात बुध . धारधार लेखणी , स्पष्ट वक्तेपणा ह्यामुळे उत्तम व्यापार पण अंतर्मुख झाला तर संशोधन चांगले करील. इथे बुध त्याचे उडते बोलणे संयमित करून एक अभ्यासू व्यक्तिमत्व घडवतो. लेखन वाचन आणि मनन चिंतन हे बुधाचे रूप शनीच्या ह्या नक्षत्रात खुलून येतात . ज्या ज्या क्षेत्रात संशोधन आहे तिथे हि युती कार्यरत असते . भाषा संवाद ह्यावर सुद्धा प्रभुत्व असते.
मोक्षाच्या ह्या गाभ्यात नेप सारखा जल तत्वाचा गूढ ग्रह असेल तर अध्यात्म , मोक्ष ह्याकडे निश्चित वाटचाल होते . स्वतःच्या अस्तित्वाचा शोध , स्वप्नाळू जगतात जगणारा आणि आयुष्यातील अनेक गुपिते रहस्य जाणून घेण्याची धडपड करणारा पण थोडासा आपल्याच कोशात अडकलेला असतो. साक्षात्कार , सूचक स्वप्ने , दैवी शक्ती , उत्तम उपासक बनवते.
गूढता आणि आध्यात्मिकतेची जोड त्यामुळे संशोधन मग साधना असो कि ज्योतिष विद्या ह्यात निपुण असतात . ध्यान उत्तम होते .
ह्या चार ग्रहांची युती शुभ असेल तर उत्तम अध्यापक , संशोधक , मार्गदर्शक , लेखन करण्यास प्रवृत्त होते . ह्यात मेख आहे ती नेप ह्या ग्रहाची . हा ग्रह बिघडला तर अमली पदार्थ , नशेत राहणे , मनावर खोल परिणाम अशीही फळे मिळताना दिसतात .
अशी व्यक्तिमत्वे आपल्या बोलण्या वागण्यातून समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटवतात . त्याचे विचार , एकंदरीत व्यक्तिमत्व समोरच्यावर छाप टाकणारे आकर्षित करणारे असते . ह्यांच्या मनाचा थांगपत्ता कुणालाही लागणार नाही . ह्यांच्या प्रत्येक कृतीतील अर्थ जन सामन्याला सहज लागणार नाही . एक क्षणात समोरच्याच्या मनाचा ठाव घेतील पण आपल्या मनाचा ठाव लागू देणार नाहीत .
हि युती शुभ ग्रहांनी दृष्ट असेल तर उत्तम फलित देयील अन्यथा नाही . आयुष्यातील काही काळ एकटेपणा सुद्धा येवू शकतो.
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment