Sunday, 27 July 2025

वास्तु आणि सौख्य .

 || श्री स्वामी समर्थ ||


दोन वर्षापूर्वी आम्ही नवीन घरात राहायला आलो . घरात येण्यापूर्वी मनात घर सजवायच्या अनेक कल्पना होत्या . पण सगळ्यात मुख्य म्हणजे देवघर . पूर्वीच्या काळी देवघर वेगळे आणि प्रशस्थ असे. पूर्वी सोवळे फार असायचे . असो. आता च्या काळात देवाला हात जोडायची मारामार तिथे सोवळे वगैरे फारच झाले. पण ह्याला काही अपवाद मी स्वतः अनुभवले आहेत , अगदी साग्रसंगीत रोज पूजा , नेवैद्य छान वाटते. असो.

तर आमचे घर पूर्व पश्चिम आहे. घराचा मुख्य दरवाजा पूर्व ईशान्य आहे. देवघर इथे ठेवा तिथे ठेवा अशी चर्चा चालू होती कारण स्वयपाकघरातील पूर्व ईशान्य कोपरा हा फ्रीज साठी दिलेला होता . शेवटी म्हंटले तिथे प्रत्यक्ष देवांची जागा असताना फ्रीज हवा कश्याला तिथे . मग दिवाणखान्यात फ्रीज कसा दिसेल लोक काय म्हणतील वगैरे वगैरे . पण शेवटी फ्रीज ची रवानगी बाहेर झाली आणि पूर्व ईशान्य कोपर्यात देवघर स्थापित झाले प्राणप्रतिष्ठा होवून देवांची पूजा झाली आरती नेवैद्य , डोळे भरून महाराजांच्या कडे पाहत त्यांना म्हंटले बघा आता आपला ह्या नवीन वास्तुत सहप्रवास सुरु . कसे आहे आपले नवीन घर महाराज ? तुम्हाला छान वाटत आहे ना ? देवघर सुद्धा मोठे झाले आहे आता. क्षणभर त्यांच्याकडे पाहत असताना जाणवले महाराज खुदकन हसत जणू मला सांगत होते...पोरी तुला कुठे काय ठेवायचे ते ठेव पण मी मात्र माझ्या हक्काच्या जागेवर आता आरामात बसणार आणि तुझा सुखी संसार पाहत तुला आशीर्वाद देणार . 


डोळे भरून त्यांना पाहत होते आणि नेहमीच त्यांना पाहताना डोळे भरून येतात . त्यांना किती काळजी आहे आपली . देवघर योग्य ठिकाणी ठेवले गेले कि वास्तूत आपोआपच सर्व व्यवस्थित होतेच . आज ह्याबद्दल थोडे अधिक जाणून घेवूया .

मी स्वतः वास्तु तज्ञ नाही पण प्रत्येक शास्त्राचा मी नक्कीच सन्मान करते . प्रत्येक दिशेला काहीतरी महत्व आहे आणि त्या दिशेची देवताही आहे . जसे पूर्वेला इंद्र देवतेचा वास आहे त्याच प्रमाणे ह्या दिशा समृद्ध आहेत .  आई पण लहानपणी आपल्याला सांगायची दक्षिण दिशेला पाय करून झोपू नकोस . आजकाल इमारत बांधणारे बिल्डर सुद्धा आपला प्रोजेक्ट वास्तूच्या नियमांप्रमाणे बांधण्यासाठी वास्तू विशारद नेमत असतात . 

उदा स्वयंपाकघर हे पूर्व पश्चिम असावे . स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीचा चेहरा पूर्वेला असावा . दक्षिण दिशेला तिजोरी नसावी वगैरे अनेक गोष्टी आपण वाचतो ऐकतो . आता प्रत्येक घरात सगळे नियम लागू होतील असे नाही . अनेक लोकांचे घर दक्षिणामुख असते मग ते वाईट का? अजिबात नाही ? 


चित्रात जसे सर्व रंग हवे तसे सगळ्या वृत्ती प्रवृत्तीची माणसेही जीवनात हवीतच अगदी त्याच प्रमाणे दिशा , ग्रहतारे , वेगवेगळी फुलांची झाडे सर्व हवेच . प्रत्येक दिशा महत्वाची आहे. त्यातल्या त्यात आपल्या वास्तूत जितके करता येयील तितके करावे इतकेच . 

दक्षिण दिशा असली कि तिथे वाईट होणार असे काहीही नाही. निदान मला तरी तसे वाटत नाही . आता ह्या विषयावर आज माझी मते मी मांडण्याचा प्रयत्न करते तुम्ही तुमची मते नक्कीच मांडावीत हि विनंती .

आपल्या मनातील विचार त्याच्या विशिष्ठ लहरी ज्याला आपण AURA म्हणतो त्या जर अत्यंत चांगल्या सकारात्मक असतील तर वास्तूमध्ये सकारात्मकता अनुभवता येते . आपल्या घरातील स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने जर मनापासून प्रेमाने पदार्थ केले तर ते रुचकर होतात आणि अन्न ग्रहण करणारा समाधान पावतो. घरातील रिती रिवाज , रूढी परंपरा ह्यांचे जतन केले तर देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात . घरातील मागील पिढीतील हयात नसलेल्या आपल्या नातेवाईकांचे कार्य तसेच श्राध्द कर्म  केले तर त्यांचेही आशीर्वाद लाभतात त्यानाही पुढे चांगली गती मिळते. 

घर स्वछ्य ठेवणे , घरात सकाळ संध्याकाळ देवाजवळ दिवा धूप करणे , अन्न फुकट न घालवणे , आल्या गेलेल्या पै पाहुणा अगदी पोस्टमन सुद्धा साधे पाणी तरी विचारू शकतो , त्यांचा आदर करणे , दारात लहानशी रांगोळी , उंबरठा पूजन करणे , संध्याकाळी घराबाहेर दिवा लावणे , संध्याकाळी शुभं करोति आणि इतर श्लोकांचे पठण , सद्गुरू उपासना ,ह्यामुळे घराला घरपण येते असे माझे मत आहे . देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आदर ठेवता आला पाहिजे . आज अनेक लोकांना दृष्टी नाही ऐकू येत नाही त्यांनी काय करायचे . आपण निदान पाहू शकतो बोलू शकतो मग त्यासाठी प्रत्येक क्षणी त्याचे ऋणी नाही का आपण ? इतके सुंदर आयुष्य आहे आपले त्यासाठी परमेश्वराला निदान एकदा हात तरी जोडायला नको का? नामस्मरण करूनही घरातील पावित्र कैक पटीने वृद्धिंगत होते . चांगले आचार विचार ह्यांनी घरातील स्फंदन , वातावरण शुद्ध पवित्र राहते . घर लहान मोठे सुशोभित किती आहे घरात AC किती आहेत त्याही पेक्षा घरातील मंडळींचे एकमेकांशी प्रेमाचे असलेले संबंध , ओढ , आत्मीयता , एकोपा महत्वाचा आहे. पैसा सगळेच मिळवतात ते प्रत्येकाचे नशीब आहे पण दोन गोड शब्द एकमेकांशी बोलायला काहीच पैसे पडत नाहीत.

शेवटी आपली तिरडी उचलायला पण चार माणसे लागतात आणि ती जमवायला आयुष्य खर्ची करायला लागते . आपल्या वास्तूत मिजास नको अहंकार तर अजिबात नको . आपण काहीही मिळवलेले नाही , आहे हि सर्व त्याची कृपा आहे ह्या भावनेने जीवन व्यतीत केले तर वास्तू सुद्धा फळेल . 

ह्याउलट वास्तूत शिवीगाळ करणे, मद्य प्राशन , घरातील स्त्रीला मारहाण जी आपली खर्या अर्थाने गृहलक्ष्मी आहे , उधारी , घरातील अस्वछ्यता , चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा , एकमेकांत प्रेम नसणे , घरातील वयोवृद्ध व्यक्तींचा अपमान , कुळाचार न पाळणे , देवपूजा न करणे ह्या सर्व गोष्टी वास्तुवर परिणाम करतात आणि कालांतराने आयुष्यातील सुखाला ओहोटी लागते , कित्येक वेळा वास्तू विकावीही लागते इतकी अन्नान्न दशा होते .


वास्तू म्हणजे आपले सुखस्थान पत्रिकेतील चतुर्थ भाव तो शुद्ध असावा . चतुर्थात गुरु असेल तर वास्तू मोठी असते , शनी असेल तर अशी लोक जुन्या घरात राहतात , घेतानाही जुनी वास्तू घ्यावी . इथे मंगळ असता वास्तूचा लाभ होतो . राहू असेल तर घरात काहीतरी दडपण जाणवते . केतू अर्थात घरात असून नसल्यासारखे विरक्ती देतो . चतुर्थातील शुभ ग्रह उत्तम फळतील . वास्तूला आपण सुखस्थान म्हंटलेले आहे आणि सुख हे शेवटी आपल्या प्रत्येक कर्माशी निगडीत आहे. चतुर्थ भाव हा मोक्ष त्रिकोणातील पहिला भाव सुद्धा आहेच . घरातून शरीराने आणि मनानेही मुक्त झाल्याशिवाय मोक्षाकडे वाटचाल होवू शकणार नाही . 

घराबाहेर रांगोळी असेल , घराचे द्वार स्वच्छ व्यवस्थित असेल कुठेही तुटलेले नसावे तर घरात येणाऱ्या व्यक्तीलाही घरात यावेसे वाटते . काही जणांच्या घराच्या बाहेर ढीगभर पादत्राणे असतात तीही विखुरलेली , निदान ती नीट ठेवा.

घरात कमीत कमी मोजकेच समान असावे, जुनी न चालणारी घड्याळे , वस्तू फेकून द्या किंवा दुरुस्त करून आणा आणि वापरा. घरातील रद्दी काढून टाका . घर आहे आपले ते जिथे आपले देव आहेत , त्याचे फर्निचर चे दुकान करू नका . दिखावा करणाऱ्या लोकांच्या घरात शांतता नसते तिथे अहं असतो . 

ज्याच्या घराबाहेर अनेक चपला तो श्रीमंत . आपल्या घरात कुणालाच यावेसे वाटत नसेल तर नक्कीच त्याचे कारण शोधता आले पाहिजे.  वास्तुदेवतेचा जिथे अपमान होतो तिथे आरोग्य सुख शांती नांदणे कठीण . घरात शांतता प्रेमाचा ओलावा हवा . मग कितीही संकटे आली तरी बेहत्तर . निदान एक संध्याकाळचे भोजन सगळ्यांनी एकत्र करायचे असा नियम करा बघा सगळे येतील. एकत्र गप्पा मारता जेवताना कुटुंबातील प्रेम सुद्धा वाढेल. 

घरात तुळस असेल तर नित्य तिच्या जवळ संध्याकाळी दिवा लावावा . संध्याकाळी तुपाचे निरांजन लावुन आरती करावी . दिवसभरात जे काही मिळवले ते त्यालाच अर्पण करावे म्हणजे कसलाच अहंकार राहणार नाही . 

घरातील स्वयपाकघर अति महत्वाचे आहे . शेगडी आणि ओटा घासून पुसून ठेवावा . जिथे अन्न शिजवतो त्या शेगडीला निदान नमस्कार करून अन्न शिजवावे . घरात आनंद निर्माण करणाऱ्या साठी सगळ्यात मुख्य मनात प्रेम असावे . 

सतत चिडणे संतापणे ह्या गोष्टी आपल्या स्वतःच्या आणि वास्तूच्या लहरी दुषित करतात आणि मग पैश्याचा अपव्यय सुरु होतो , अनेक आजारपण मागे लागतात . वास्तू हि पवित्र आहे . आज अनेक लोक कष्ट करूनही स्वतःची वास्तू घेवू शकत नाहीत त्यामुळे ज्यांची आहे त्यांनी त्याचा आदर ठेवायला शिकले पाहिजे . आपल्या घरात श्रावण मार्गशीर्ष सवाष्ण भोजन , सत्यनारायण , श्रीसूक्त पूजन , हळदी कुंकू , कुलस्वामिनीला अभिषेक , श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण अश्या उपासना सतत करत राहिल्यास वास्तू समृद्ध होते आणि आपले आयुष्य सुखमय होते शांत झोप लागते आणि वास्तू देवतेचे आशीर्वाद लाभतात ह्यात दुमत नसावे.

आपली वास्तू जिथे आपले उभे आयुष्य जाते ती अनेक पिढ्या पाहत असते . आपल्या वास्तूवर आणि तेथील प्रत्येक गोष्टीत आपण सहज सामावले जातो , प्रत्येक लहान सहान गोष्टीत आपला जीव गुंतलेला असतो . अश्या ह्या आयुष्याचा पूर्ण काळ जिथे आपण व्यतीत करतो , सणवार साजरे करतो सुख दुक्ख वाटून घेतो त्या वास्तूसाठी रोज एकदा “ श्री वास्तू पुरुषाय नमः “ असे म्हणून एक नमस्कार तरी नक्कीच करू शकतो . आपल्या वास्तूतील चैतन्य टिकून राहण्यास मदत होईल .

आज वास्तुशास्त्र सुद्धा अत्यंत प्रगत आहे. वास्तूतील दोष निवारण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात . पण ज्यांना ते शक्य नाही  त्यांनी निदान वरील लेखातील गोष्टी केल्या जसे घरातील स्वछ्यता , कुलाचार , एकत्र भोजन , रोज नामस्मरण तरी वास्तू शुद्धीकडे एक पाऊल पडले म्हणून समजा . 

आपले घर जिथे आपले मन असते . जगात कुठेही असो सर्व लक्ष्य घराकडे असते . प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर मिळूदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 

श्री वास्तू पुरुषाय नमः


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230





     


 


No comments:

Post a Comment