Monday, 5 August 2019

मौनं सर्वार्थ साधनम..

|| श्री स्वामी समर्थ ||








मौन ? छे छे  हे काय भलतच , काहीही करायला सांगा पण गप्प बसायला सांगू नका कारण बोलणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही प्रत्येक क्षणी बजावणारच . गमतीचा भाग सोडा पण खरच आहे कि नाही हे आपल्या सर्वाना लागू ? सगळे गालातल्या गालात हसत आहेत . अहो आपल्या भावना व्यक्त करायला ,संवाद साधायला बोलणे तर हवेच कि ,फक्त ते प्रमाणात आणि मुद्देसूद , विषयाला धरून हवे हा मुद्दा आहे. ध्वनीप्रदुषणाबद्दल अनेक लेख आपणा वर्तमानपत्रातून वाचत असतो . आपल्याकडील अनेक  प्रदुषणा पैकी सर्वात महत्वाचे आणि आवर न घालता येणारे प्रदूषण म्हणजे “ ध्वनी प्रदूषण ”. शहरात तर गाड्यांच्या होर्न चे प्रदूषण प्रमाणाबाहेर आहे.

स्वयपाकघरात काम करत असताना हातातून साणशी जरी खाली पडली तरी तिचा आवाज सहन होत नाही. घरात TV सुद्धा मोठा झाला तर घरातील मोठ्या मंडळींचे डोळे मोठे होतात . अर्थात बरेचदा काही जेष्ठ मंडळीना कमी ऐकायला येते त्यामुळे तेच TV मोठा ठेवतात हा अपवाद असू शकतो . घराबाहेर पडले कि ध्वनीचे, आवाजाचे साम्राज्य सुरु होते .वाहने , रस्त्यावरील विक्रेते , ट्राफिक , रिक्षावाले , भाजी मंडई .न संपणारी यादी आहे. ट्रेन मध्ये तर आम्ही बायका इतके बोलत असतो जसे काही नाही बोललो तर आम्हास TC येवून दंड ठोठावेल. गप्प राहणे ,कमी बोलणे आणि कधी काय बोलणे किंवा न बोलणे हे सर्व ज्याला जमले तो जिंकला .उदाहरण द्यायचे झाले तर. हळदीकुंकू किंवा इतर कुठल्याही ठिकाणी समारंभास अनुपस्थित व्यक्तीबद्दल बरीच चर्चा रंगलेली असते ,पण सगळेच त्यात भाग नाही घेत . सगळे सगळ्यांना माहित असते पण काही गप्प राहून “ मी त्यातला नाहीच ” असे राहून “ काय सांगता ?” असा प्रश्नार्थिक चेहरा ठेवून त्यातून सहज निसटतात . सगळ्यात राहून आपला रंग वेगळा हे त्यांना जमते. सोसायटीच्या मिटिंगला तेच .नेहमीची ४-५ डोकीच बोलणार आणि बाकीचे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून  स्थितप्रद्न्य अवस्थेत श्रोत्याची भूमिका बेमालूनपणे निभावणार आणि कुठलाही वाईटपणा घेणार नाही . हेच चित्र सर्वत्र असते. तर हे सर्व असे आहे .

सारांश सतत कानावर पडणारा हा आवाज,ध्वनी अनेक आजार निर्माण करणारा असतो. सर्वात मोठा आजार म्हणजे डोकेदुखी. कुठेतरी शांत ठिकाणी निघून जावेस वाटतंय अशी वाक्य म्हणूनच ऐकायला मिळतात . 

असो विषयांतर नको. आपल्याला २ मीन सुद्धा मौन पाळता येत नाही मग आपले ऋषीमुनी कसे वर्षानुवर्ष मौन पाळून जप ,साधना करत असत याचा विचार करुया . मौन पाळण्याचे अनेक फायदे आहेत. कमी बोलण्याने आपण आपली शक्ती वाचवतो. बोलण्याचा वेळ विचार करण्यात सत्कारणी लागल्या मुळे आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज मिळतात . आपल्या उतावळ्या स्वभावावर थोडा धरबंद येतो. कमी आणि चुकीचे बोलणे टाळल्यामुळे माणसे कमी दुखावली जातात . मौनव्रताचा फायदा म्हणजे आपण आपल्याच विश्वात रममाण असतो ते जरा बाहेर येवून दुसर्याचा विचार करायला शिकतो .मन शांत होते , अनेक गुंते सुटतात, मार्ग सापडतात आणि जीवन सुखकर होते. सतत चालू असणार्या जिभेस आराम मिळतो.व्यर्थ जाणारी शक्ती सत्कारणी लावता येते .

खरतर आपल्या भावना सांगण्यासाठी  नेहमीच शब्दांची गरज नसते . एकदा माधवराव पेशव्यांच्या मातोश्रींनी रमाबाईना सांगितले ,” आपण स्त्रिया नुसत्या वाट पाहत असतो नाहीतर टिपे गाळत असतो. सर्वाना आपल्या डोळ्याच्या धाकात ठेवायला शिकले पाहिजे. ” डोळ्यांनी बोलण्याचे कसब आपल्याला जमले पाहिजे .खरतर ती कला आपल्याला उपजतच आहे फक्त त्याचा वापर अधिकांश रित्या केला पाहिजे. अनेक ज्योतिषाना हि कला अवगत असणारच कारण त्यांच्याकडे येणारा जातकास काय बोलू आणि काय नको असे होवून गेलेले असते ,प्रश्नांची सरबत्ती त्यामुळे आपोआपच मौनव्रताची साधना घडत असते.

मौन ज्याला जमले तो आयुष्याची लढाई जिंकला . केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . चला “ श्रावणमास ” सुरूच आहे . सुरवात करुया “मौनव्रतास ”.

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .

antarnad18@gmail.com


Sunday, 4 August 2019

“ शाश्वत आनंद ”

|| श्री स्वामी समर्थ ||


                          


आयुष्यात जसे योग्य आचारविचार , वागणे ,सामाजिक बांधिलकी अनेक गोष्टींचा सुयोग्य मेळ घालायला लागतो, अगदी तसेच त्याहीपेक्षा जास्ती आपल्या आरोग्याचा विचार करायला लागतो . ह्या सर्वाची एकत्रित होड बांधण्याची सुवर्णसंधी म्हणजे चातुर्मास . परमेश्वरी आराधना ,साधना ,व्रत, नामस्मरण करण्यासाठी चातुर्मासाच अतिमहत्त्वाचा .

हिंदू संस्कृतीत श्रावण मासास पवित्र मानले गेले आहे . उन्हाळा संपून सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे तप्त झालेली धरणी शांत होते आणि सृष्टीही विविध रंगानी कात टाकल्यासारखी फुलते .हे संपूर्ण वातावरण अध्यात्मिक साधनेस ,उपासनेस परिपूर्ण ,पोषक असेच असते . ह्या काळात सिंहावलोकन करून आपले गुणदोष स्वीकारूया आणि त्या दोषांचे परिमार्जन करुया . त्यासाठी परमेश्वरी आराधना ,भक्ती ह्यासारखा नामी आणि जालीम उपाय दुसरा नाही. सेवेअंती आपलीच आपल्याशी नव्याने भेट होईल हे नक्की.

यथासांग पूजन

ह्या उपासनेतून आपल्याला देणगी मिळेल ती “संयमाची ” . आयुष्यात जो संयम ठेवतो तोच जिंकतो .आयुष्यात अनेक चढ उतार ,नानाविध प्रलोभने येतात पण मनावर ,इंद्रियांवर ,आणि मुखत्वे जिभेवर जो संयम मिळवतो तो निश्चितच निरोगी आयुष्य जगू शकतो. चातुर्मासात अनेक लोक नानाविध संकल्प करतात .आपल्याला प्रिय असलेल्या भगवंतासाठी अनेक व्रतेही करतात .आपणही एखादा संकल्प नक्कीच करा पण तो दुसरे करतात म्हणून नाही तर स्वतःच्या मानस पटले तर आणि तरच आपण जे व्रत ,संकल्प करणार आहोत ते मनोभावे ,मनापासून केला तर फळ नक्कीच मिळणार पण त्याचबरोबर मी हे केले आणि ते केले ह्याची  वाच्यताही न करणे महत्वाचे . आपल्या आराध्यावर आपण संकल्प करून जणू काही उपकारच करत आहोत असा भाव जराही येवू देवू नये . मनी योजलेला संकल्प पूर्णत्वास नेण्याची विनंती, आर्जव भगवंतास करून संकल्प करावा . शेवटी आपला “ मी ” घातकच नाही का?
नामस्मरण 


आपली अध्यात्मिक प्रगती व्हावी , विचारांची बैठक नीट बसावी ,मन शांत व्हावे आणि शरीर आणि मनाची योग्य सांगड घालता यावी ह्यासाठी आपल्या जीवनशैलीत चपलख बसेल  झेपेल ,रुचेल आणि पटेल असा संकल्प केलात तर तो नक्कीच पूर्णत्वाला जायील.उगीचच कुणीतरी दुसरा करतो म्हणून मी रोज एक हजार जप करीन असे अजिबात करू नये .                                                         
चातुर्मासात आपल्या इष्ट देवेतेसाठी एखादा आवडीचा पदार्थ सोडवा किवा त्याचेच दान करावे ,ह्यातून आपण सोडून द्यायला शिकतो . काहीजण एक वेळेस जेवतात तर काही एकदा जेवून संध्याकाळी फलाहार घेतात . आपल्या प्रकृतीस जे झेपेल तेच करावे . सर्वात महत्वाचे म्हणजे कमीतकमी आणि आवश्यक तेव्हडेच बोलावे म्हणजे आपले जास्तीतजास्त लक्ष ध्यानाकडे, नामस्मरणा मध्ये केंद्रित होते. कमीतकमी बोलण्याने बोलण्यावरही नियंत्रण येते ,कुणाची निंदा अपशब्द आपोआपच टाळले जातात . सूर्यनमस्कार घालूनच दिवसाची सुरवात करावी .आजकाल आपल्या जीवन पद्धतीला हे मानवणारे नाही तरीही प्रयत्न करून एखादा दिवस मौनव्रत करावे आणि अनुभव नक्कीच शेअर करावा.  हॉटेल आणि मॉल मध्ये जेवणे आपले नित्याचेच झाले आहे त्याला पूर्णविराम देता आला तर उत्तमच कारण अशक्य काहीच नाही . आपली स्वतःची कामे स्वतःच करावी जसे आपले जेवणाचे ताट धुवून ठेवणे, कपडे धुणे ,घरातील  इतर कामे जी आपण इतरवेळी  नाही करत .काहीतरी दानधर्म करावा. 

सात्विकता


काही वृद्ध व्यक्तींना घराबाहेर पडता येत नाही मग त्यांनी आपल्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीस किंवा गरजूस दर सोमवारी साखर किंवा धान्य दान करावे हे ,निसर्गाचेही देणे लागतो आपण त्याची जपणूक करणे हेही आपले कर्तव्यच आहे म्हणून तुळशीच्या रोपाचे दान करावे. एक उदाहरण झाले तत्सम काहीही करावे जे आपल्याला सुचेल. एखाद्या गरजू व्यक्तीस एकवेळचे तरी भोजन, शिधा द्यावा . एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणास मदत करणे हे तर पुण्याचेच काम. शक्यतो जेवणाच्या वेळा पाळाव्यात आणि अर्थातच सात्विक आहार घ्यावा. कुटुंबातील सर्वांनी दिवसातून एकवेळचे जेवण एकत्र करावे त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींमध्ये खेळीमेळीचे वातावरण तयार होवून भावनिक बंध घट्ट होतात. आपल्या एखाद्या माहेरवाशिणीस आवर्जून जेवायला बोलवावे ,त्यानिम्मित्ताने तिला माहेरी येत येयील. नाहीतर हल्ली माहेर आणि सासर एकाच शहरात ,त्यात सर्वांच्या नोकर्या अगदी व्यस्त आयुष्य त्यामुळे येणेजाणे कमीच होते .कुणाचीही निंदा करायची नाही ह्याची मनात खुणगाठ बांधायची.

ग्रंथाचे पारायण

श्रावण महिन्यात जास्तीतजास्त “ श्रवण ” करावे. कानावर सतत काहीतरी चांगले विचार पडावेत ज्याचे चिंतन ,मनन व्हावे. त्यासाठी कीर्तन , भजन ,प्रवचन ऐकण्याची संधी सोडू नये . रोज आपल्या मनात असते पण ते प्रत्यक्षात न येणाऱ्या गोष्टी म्हणजे रोज चालणे ,धावणे ह्या गोष्टीना सुरवात करावी आणि त्यात सातत्य ठेवावे. तात्पर्य काय तर एखाद्या अश्या गोष्टीस सुरवात करावी जी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणील. नामस्मरणाने परमेश्वरा समीप जाता येते आणि ईश्वरी कृपेची प्राप्त होईल. कुठल्यातरी धार्मिक ग्रंथाचे जसे  “ गुरुचरित्र ”, “ श्री साई चरित्र ”, “ श्री गजानन विजय ” ह्या ग्रंथांचे पारायण करावे.  सामुदायिक उपासनेस सुद्धा महत्व आहे त्यामुळे एकत्र येवून चक्रीपारायण करावे. आपल्या कुलस्वामिनीचा जप करून ,श्रीसूक्त म्हणावे . अनेकजण ह्या काळात नर्मदा परीक्रमाही करतात .वरील नमूद केलेल्या गोष्टींपैकी किमान एखादीतरी गोष्ट करून शाश्वत आनंदाची दालने खुली करावीत. ह्याहीपेक्षा आपल्याला काही चांगले सुचले तर तेही आचरणात आणावे. जे कराल त्यात सातत्य असावे.

थोडक्यात काय तर समर्पण म्हणजेच “चातुर्मास ”. 



लेख आवडला तर जरूर अभिप्राय कळवा.


antarnad18@gmail.com





Friday, 2 August 2019

पंचामृत

|| श्री स्वामी समर्थ ||








पयोदधिधृतं चैव मधु च शर्कारायुतम |
पंचामृतं मयानीतं स्नानार्थ प्रतीगृह्यताम ||

कुठल्याही पूजेतील मुख्य उपचार म्हणजे “पंचामृत ”. त्याशिवाय पूजा अपूर्णच .पंचामृत हे दुध ,दही ,तूप , मध आणि शर्करा एकत्र करून केले जाते. ह्यातील प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ठ प्रमाण आहे. पंचामृतातील प्रत्येक घटकास शास्त्रीय ,अध्यात्मिक कारणही आहे. पूजा म्हणजेच सात्विकता.
पंचामृत हे सात्विकतेचे प्रतिक आहे. ह्यातील दुध हे शुभ्रतेचे प्रतिक आहे जे  आपले चरित्र , जीवन शुभ्र असावे हेच सुचवते. आपण नेहमीच चांगले कर्म करत राहावे ,पवित्र आणि शुद्ध मनाने परमेश्वरी सेवेत राहावे. दुध हे वात्सल्या चे प्रतिक आहे. दही 

हे स्नेहांकित आहे ,प्रवासास जाताना दही हातावर ठेवण्याची प्रथा आहे. दूर जाणार्या व्यक्तीचा स्नेह दुरूनही राहावा हि त्यामागील भावना . दह्यात दुसर्याला बदलण्याची क्षमता आहे . प्रवासास जाणार्या व्यक्तीने जायील तिथे आपल्या संस्कृतीचा प्रसार करावा . परदेशी अनेक प्रलोभने असतात पण ह्या सर्व रंगात रंगुनही आपला रंग म्हणजेच आपली संस्कृती ,अस्तित्व टिकवून ठेवण्याचा उद्देश ह्यामागे आहे . ज्याप्रमाणे दही दुधाचे परिवर्तन करू शकते त्याचप्रमाणे अल्पसंखेत असणारी चांगल्या विचारांची ,सद्विवेक बुद्धी जागृत असणारी माणसे जगात परिवर्तन करू शकतात. आपल्याप्रमाणे दुसर्याला सात्विक बनवणे हा उद्देश असणारे दही परमेश्वर चरणी म्हणूनच वाहिले जाते.


तूप दाखवी रूप हे अगदी खरे आहे. माणूस समाजप्रिय प्राणी आहे,आपण एकटे एकटे नाही जगू शकत. आपल्या भोवतीच्या प्रत्येक नात्यामध्ये मायेची उब ,स्निग्धता नसेल तर जीवनातील रस निघून जातो .पण नात्यांमध्ये स्नेह ,वात्सल्य असेल तर आपण संकटांचे डोंगरही पार करतो. म्हणूनच तुपातील स्निग्धता स्नेहाचे प्रतिक आहे. आजकाल आहारतज्ञ सुद्धा रोज एक चमचा तूप खा असे सांगतात, आपल्या शरीरात ते वंगण म्हणून कार्य करते आणि हाडांना बळकटी देते . बुटी पार्लर मध्ये सुद्धा घरच्याघरी पंचामृताचे फेशिअल करायला सांगतात . पंचामृतातील सर्व गुणांमुळे त्वचा उजळते. तर अश्या ह्या बहुगुणी तुपाचा समावेश पंचामृतात आहे

मधात गोडवा आहे .आपण कित्येक वेळा एखाद्याच्या बोलण्याचा उल्लेख मधाळ बोलणे असाही करतोच. पण नुसता गोडवा नाही तर मध शक्तिवर्धक आहे. आयुर्वेदातील अनेक चाटणे हि मधातून घेतली जातात. आपल्याला सामर्थ्यवान बनायला हे शक्तिवर्धक मध उपयुक्त ठरते . आजकाल पंचामृताचा साबण सुद्धा मिळतो.


सरतेशेवटी जिवनात अवीट गोडी निर्माण करणारी शर्करा म्हणजेच साखर. जीवनात गोडवा नसेल तर जीवन बेचव, निरस होवून जायील . पण नुसतेच गोडगोड बोलणारी माणसे विनाशासाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच “ दुग्द्शर्कारा “ हा शब्द प्रचलित आहे . जसे दुधात साखर विरघळली तरच दुधाला गोडवा निर्माण करते त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीत आपला “ मी ” जोवर पूर्णपणे मिसळून विरून जात नाही तोवर त्याची कृपा होणे निव्वळ कठीणच .

तर अश्या ह्या बहुगुणी पंचामृताच्या सेवनेने आपले आरोग्य उत्तम राहते. आणि म्हणूनच ह्या पंचामृताचा अभिषेक प्रत्येक पूजेत अग्रभागी असतोच.

पंचामृताचे सर्वमान्य प्रमाण खालील प्रमाणे .

एक कप दुध , चार चमचे दही , दोन चमचे तूप , एक चमचा मध आणि एक चमचा साखर .

विशेष सूचना : घरच्या दुधाचे दही लावावे ,ऐन वेळी बाजारातून अमूल किंवा अन्य पावडरीच्या दुधाने बनवलेले दही ह्यात वापरू नये .


 लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.


antarnad18@gmail.com









Wednesday, 31 July 2019

उगम चातुर्मासाचा

|| श्री स्वामी समर्थ ||






मंडळी ,आपल्या घरात मुलांना चातुर्मास म्हणजे काय ? असे विचारले तर आपणच चक्रावून जाऊ अशी उत्तरे मिळतील. त्यात मुलांची तरी काय चूक म्हणा ,कारण कलियुगात अनेक कारणांनी ह्या गोष्टी आता काळाच्या पडद्याआड जातील कि काय अशी भीतीच आहे. आपले सण , रूढी ,परंपरा जतन करणे हे आपले कर्तव्यच आहे . नुसते तेव्ह्डे करून न थांबता त्याचा वारसा आपल्या पुढील पिढ्यांकडे सुद्धा सुपूर्द केला पाहिजे. आपल्या पुढील पिढ्या ह्या गोष्टी किती उत्चाहाने करतील ह्याबद्दल बरेचदा शंका व्यक्त केली जाते ,म्हणूनच आपण करत असलेली व्रत ,वैकल्ये ,उपवास आणि तत्सम गोष्टींचा आपल्या जीवनाशी, मानसिकतेशी आणि आरोग्याशीही किती जवळचा संबंध आहे ह्याचे महत्व त्यांना पटवून दिले पाहिजे. पण प्रत्येक गोष्ट डोळसपणाने केली पाहिजे हेही महत्वाचे .कधीकधी एखाद्या गोष्टीची अर्धवट माहिती असताना आपणही आंधळेपणाने काही गोष्टी करत असतो म्हणून डोळसपणा महत्वाचा . आता हेच पहा संध्याकाळी अंधार झाल्यावर नखे कापू नये हे आईने, आजीने सांगितले म्हणून आपणही आपल्या मुलांना सांगतो .पूर्वी आजच्या इतके शहरीकरण झाले नव्हते ,गावातून वीज नव्हती आणि अंधार झाल्यावर घासलेट चे दिवे ,मेणबत्या लावल्या जात ,त्याचाच काय तो मिणमिणता प्रकाश ,मग अश्या तुटपुंजा प्रकाशात नखे कापताना कुठे लागू नये म्हणून ती दिवसा कापावीत हा उद्देश पण आपण उगीचच त्याला परंपरा वगैरेची वेष्टने देतो आणि मग नवीन पिढी विश्वास ठेवत नाही ह्याची खंत करतो .


चातुर्मास हा आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी पासून सुरु होतो आणि कार्तिकी एकादशीस समाप्त होतो. आषाढी एकादशीस देव निद्रिस्त होतात म्हणून त्यास देवशयनी एकादशीही म्हणतात पुढे कार्तिकी शुद्ध एकादशीस देव उठतात असा हा चातुर्मास. देवानाही विश्रांती हवीच कि पण मग आता भक्तांनी करायचे काय ? 

भक्तांनी ह्या काळात आपल्या आराध्याची जास्तीत जास्त सेवा करायची . परमात्मा झोपला म्हणून
आपण हतबल न होता हा काळ त्यांच्याच आराधनेत व्यतीत करायचा  .अहो आपल्याला सुद्धा विश्रांती हवी म्हणून रात्र आणि दिवस दिले आहेत . शरीर थकते म्हणूनच रात्री विश्रांती घेतली कि प्रत्येक अवयव पुन्हा ताजातवाना होवून काम करू शकतो.
शेतीची कामे- पेरणी


आपल्या देशाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे .देवधर्म ,व्रते ह्यांची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत .मुळात आपला देश हा शेतीप्रधान देश. पावसापूर्वी शेतकरी पेरणी , लावणी अशी शेतीची कामे हातावेगळी करतात आणि मग पुढे अश्विन महिन्यात त्याची कापणी होते .मग मधला काळ हा जास्तीतजास्त देव धर्मासाठी वापरला जात असे.

श्रावणात निसर्गचक्र फिरते आणि वसुंधरा पावसात न्हावून निघते ,अश्यावेळी मग घराबाहेर पडणे कमीच होते, कामेही कमी होतात त्यामुळे शरीराचे चलनवलन कमी होते, पचनसंस्था मंद होते ,अश्यावेळी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक म्हणून वातूळ पदार्थ वर्ज आणि अतिशय हलका आहार घेणे इष्ट ठरते . ह्या दिवसात म्हणूनच उपवास आरोग्यदायी ठरतात. अशी वैज्ञानिक बैठक ह्यामागे आहे .              

गजर टाळ मृदुंगाचा

ह्या चार महिन्यात करायचे काय म्हणून मग शेतकरी वर्ग एकत्र येवून भजन , कीर्तन ,व्रत वैकल्ये ,उपवास ह्यात वेळ घालवतात . देवधर्मही घडतो आणि वेळही सत्कारणी लागतो . सर्वांनी ह्या उपक्रमासाठी एकत्र येण्याचे ठिकाण प्रामुख्याने गावातील देवळे . साहजिकच देवाची उपासना , एकत्र जमून ढोलकी ,वाद्यांच्या गजरात आरत्या ह्याला उधाण येते. मग अनेकांना आपल्या अंगी असलेल्या कला ,जसे एखादे वाद्य वाजवणे , प्रवचन करणे , सादर करण्यास हक्काचे व्यासपीठ मिळते .त्यानिम्मित्ताने सामाजिक उपक्रमात सर्वांचा सहभाग होतो .जनमानसातील संबंध घट्ट होतात ,सणांमुळे माणसे जवळ येतात. अश्याप्रकारे चातुर्मास उदयास आला असावा. त्यात आलेल्या उत्सवांमुळे सर्वत्र आनंदी वातावण तयार होते आणि ह्यामुळे क्षणभरासाठी प्रत्येक जण आपले दुखः ,यातना विसरतो आणि साधनेत रममाण होतो .विधात्याने प्रत्येक गोष्ट चपलख बसवली आहे ,आहार विहार ,रुतुचक्रे सर्वच त्याचा योग्य तो उपयोग आणि सन्मान ठेवलाच पाहिजे.


लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.

antarnad18@gmail.com



Monday, 29 July 2019

उंबरठा –प्रतिक मर्यादांचे.


|| श्री स्वामी समर्थ ||







भारतीय संस्कृती मध्ये वास्तुशास्त्रास अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वीची घरे चौसोपी असत. पुढे ओटी त्यामागे ओसरी ,माजघर ,स्वयपाकघर आणि मागे पडवी अशी प्रशस्त घरे असता . पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरे प्रशस्त असत ,अनेक पिढ्या ह्या घरांच्या छत्र छायेत गुण्यागोविंदाने राहत. आज शहरीकरण झाल्यामुळे गावच्या घरातल्या वास्तव्यास शहरातले लोक पारखे झाले आहेत. पूर्वी घरे शेणाने सारवलेली असत ,अगदी स्वयपाकघरातील चूल सुद्धा . दारासमोर सारवलेल्या जमिनीवर सुबक रांगोळी असे. 

ह्या सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे “ घराचा उंबरठा “. घरातल्या बायका रोज घराचा उंबरठा स्वछ्य पुसून त्यावर रांगोळी काढून त्याला पुजत.
वास्तुशास्त्रात देशील उंबरठा महत्वाचा मानला आहे . घर गावातले असुदे किंवा शहरातील घरास उंबरठा नाही असे घर नाही. आपल्या आणि बाहेरील जगामध्ये उभा ठाकणारा हा उंबरठा. घरात आपली हक्काची नाती असतात ,उंबरठा ओलांडला कि बाह्य जग सुरु होते आणि तिथे आपले कुणी नसते. आपण कितीही रागावलो कसेही वागलो तरी आपल्याला सांभाळून घेणारी माणसे उंबरठ्याच्या आतच असतात हेच जणू त्याला सुचवायचे असावे.

तर घरात प्रवेश करताना ओलांडावा लागणारा हा उंबरठा महत्वाचाच आहे .उंबरठा आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देतो,आपल्या अब्रूचे रक्षण करतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना उंबरठा ओलांडून बाहेर जाण्यास परवानगी नसे . मागील पडवीतून त्यांचे येणे जाणे चालत असे. स्त्रीने उंबरठा ओलांडू नये हि पूर्वापार चालत आलेली रीत.



उंबरा ओलांडलास तर वाकडे पाऊल पडू नये ,आपली अब्रू धुळीस मिळू नये हि त्यामागील भावना . शेतीवर काम करणारी गडीमाणसे इतर कुणीही हा उंबरठा ओलांडून आत येत नसत ,बाहेरील ओसरी ,पडवीत बसून त्यांना गुळपाणी दिले जाई. उंबरठ्याबाहेर चपला सुद्धा वेड्यावाकड्या ठेवू नयेत . घरातून बाहेर जाणर्या आणि येणाऱ्या प्रत्येकाची दाखल जणू हा उंबरठा घेतो त्यामुळे मनास बांध बसतो . कुठलेही वाईट कृत्य करताना आपण हा उंबरठा ओलांडून घरात कसे जाणार हा धाक बसतो . तर अश्या ह्या उंबरठ्यास घराची लक्ष्मण रेषा म्हंटले तर वावगे ठरू नये.
घरात येणाऱ्या पै पाहुण्याची वर्दी आपल्याला सर्वप्रथम उंबराच देतो . आपल्या चांगल्या वाईट सर्वच गोष्टींची दखल उंबरठा घेत असतो . आपले वैभव, समाधान ,चारित्र ,आचार विचार ,वर्तन ,आपल्या मर्यादांचे पालन करा हेच जणू हा उंबरठा मूकपणाने आपल्याला सांगत असतो .

उंबरठा आपल्या घरातील मानसिकतेचेही प्रतिक आहे . घरात कुणी आले तर त्याचे स्वागत आनंदाने करावे. काही घरास हल्ली सेफ्टी डोर असते ,आतील दरवाजा उघडून काहीजण प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर ठेवून दरवाजा उघडतात .अहो काहीतरी काम असल्याशिवाय कोण कश्याला येयील तुमच्याकडे . सर्वांचे आनंदाने स्वागत करा नाहीतर स्वगत करायला कुणी येणारच नाही अशी वेळ नको यायला .वेळीच सावध व्हा. घराला २ दरवाजे आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत . लोकांचा अपमान करायला नाही . घराच्या उंबरठ्यातून आत बाहेर करताना उंबरठ्यावर चुकूनही पाय ठेवू नये तर तो ओलांडून जावा. घरात येणार्या लोकांना आपण तसे सांगावे नाहीतर काहीजण चक्क उंबरठ्यावर चपला घालून पाय ठेवून छान गप्पा मारत उभी राहतात. उंबरठ्याच्या आत बाहेर शेजार्यांची गप्पा मारत तासतास उभे राहणाऱ्या घरांमध्ये नक्कीच आर्थिक समस्या उद्भवणार . तसेच उंबरठ्यावर शिळोप्याच्या गप्पा मारू नये त्यासाठी हि जागा योग्य नाहीच.

तर अश्या ह्या उंबरठ्याचे रोज हळदीकुंकू वाहून पूजन केले पाहिजे.  उंबरा पुसून त्यावर लक्ष्मीची पाऊले( पाऊले आत येणारी असावीत ) . त्यावर रांगोळी घालून उदबत्ती दाखवावी .संध्याकाळी दिवे लागणीस सुद्धा देवाजवळ दिला लावल्यावर उंबरठ्यास ओवाळावे. उंबरठ्या जवळ केर कचरा ठेवू नये .
प्रत्येक चांगल्या गोष्टीस विलंब नको म्हणूनच श्रावण महिन्यापासून ,प्रत्येक घरास घरपण देणाऱ्या ह्या उंबरठ्याचे पूजन करून त्याचा यथाशक्ती मान ठेऊया.  


लेख आवडल्यास जरूर कळवा



antarnad18@gmail.com

दीपोत्सव

|| श्री स्वामी समर्थ ||





        आषाढ कृष्ण चतुर्दशीला आपण “दिव्याची अमावस्या ” म्हणून संबोधतो आणि त्यादिवशी दीप पूजन हि करतो. दीप हे मांगल्याचे प्रतिक आहे म्हणूनच शुभ प्रसंगात ओवाळताना आपण निरांजनाचा उपयोग करतो .आषाढ अमावास्येनंतर अनेकविध सणांनी नटलेला साजरा श्रावण सुरु होतो . भारतीय संस्कृतीला परंपरेचा इतिहास लाभला आहे. प्रत्येक सणामागे काहीतरी विशिष्ठ उद्देश आहे आणि त्याचा मानवी जीवनाशी थेट संबंध आहे ,तो समजून आपण सण साजरे केले तर त्याचा आनंद आपल्याला खर्या अर्थाने उपभोगता येयील.

शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा 
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते 

हा श्लोक आपल्याला आपल्या बालपणात घेवून जातो , संध्याकाळी तिन्हीसांजा झाली कि आई देवाजवळ दिवा लावत असे . तिच्यासोबत आपण शुभं करोति ,मनाचे श्लोक , परवाजा म्हणत असू . मग घरातील सर्व मोठ्या माणसांना नमस्कार करणे ह्याचे पालन आपण न चुकता करत असू .संस्कार लहानपणीच करायचे असतात कारण त्याची पाळेमुळे मनात खोलवर रुजतात आणि अखेरपर्यंत लक्ष्यात राहतात .घरातील वडील मंडळीना नमस्कार करायचा हे आपले नित्य कर्म कारण तेव्हा शिंगे फुटलेली नसतात .असो तर सांगायचे असे ह्या सर्वाचे पालन आपण आजवर करतच आहोत.
श्रावण सुरु होतो त्यावेळी घरात अनेक पूजा ,व्रते होतात, सकारात्मकता निर्माण होते आणि म्हणूनच ह्या सर्वाचा श्रीगणेशा आपण आषाढ अमावास्येला दीप पूजा करूनच करतो .त्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे ,नुसतेच दिवे नाही तर आपले मनसुद्धा घासून पुसून स्वच्छ करायचे .मनातील वाईट विचार, द्वेष ह्या सर्व गोष्टीना तिलांजली द्यायची आणि शुद्ध ,सात्विक मनाने दीपपूजन करायचे .
आपल्याला जी उर्जा ,समाधान ,सकारात्मक आनंद लहरी निरांजन किंवा समयीच्या ज्योतीमुळे मिळतील त्या टूबलाईट च्या प्रकाशातून मिळणार नाहीत. कारण तुपाच्या निरांजनातील ज्योत सात्विकतेचे प्रतिक आहे .देवासमोर निरांजन लावून ध्यानधारणा केली तर मनास निश्चित शांतता लाभतेच. निरांजनाच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहिले तर एकाग्रता वाढते असेही ऐकिवात आहे.

तर असे हे दीपपूजन का करायचे ? तर अंधाराकडून प्रकाशाकडे आणि  निराशेकडून सकारात्मकतेकडे नेणारा हा  दीप आणि म्हणूनच त्याचे पूजन करायचे. श्रावणापासून एक उत्चाहाचे ,आनंदाचे पर्व सुरु होते त्याचा श्रीगणेश ह्या दिपपूजनाने करायचा. घराची साफसफाई करून नीटनेटके करावे, संध्याकाळी दिवे लागणीस एका पाटाभोवती छानशी रांगोळी काढून पाटावर घरातील लहान मोठे सर्व प्रकारचे दिवे, निरांजने ,समई घासूनपुसून ठेवावेत . सर्व दिव्यांना हळदकुंकू , अक्षता फुले वाहून दीपप्रज्वलन करावे. गोडाचा नेवैद्य दाखवावा आणि आपल्या जीवनात शांतता , स्थैर्य ,समृद्धी येण्यासाठी मनापासून प्रार्थना करावी, ह्या दिव्यांच्या प्रकाशात आमचे जीवन उजळून निघावे, मनातील दुष्ट , वाईट विचारांचा विनाश व्हावा, आणि जीवन प्रकाशमान व्हावे ह्यासाठी मनोभावे नमस्कार करावा. काही ठिकाणी उकडलेल्या कणकेचे गोडाचे दिवे तसेच मातीचेही दिवे करण्याची प्रथा आहे .


विधात्यानेही विचारपूर्वक सृष्टीची रचना केली आहे.दिवस आणि त्यामागून येणारी रात्र. दिवसा सूर्यकिरणे आपल्याला मिळतात म्हणून सर्व जीवसृष्टी टिकून आहे . तेव्हा प्रकाशाचे अनन्यसाधारण महत्व आपल्याला विसरून कसे बरे चालेल .आम्हाला ऑफिस मधून यायला उशीर होतो ,वेळ नसतो असे अजिबात म्हणायचे नाही ,एक दिवस TV, whatsapp थोडावेळ नाही पाहिले तर जगबुडी नाही होणार पण आपल्या परंपरा जपत छान दीपपूजन केले तर आपले संपूर्ण कुटुंब पुढील वर्षात प्रगती नक्कीच करेल, ,प्रत्येकाचे जीवन प्रकाशमय होवून उजळून निघेल ,करून पहा.

       मंडळी , श्रावण सुरु झाला कि अनेक व्रते वैकल्ये ,सणवार येतात आणि ह्यात अभक्ष भक्षण म्हणजेच नॉनवेज खाण्यास मज्जाव आहे कारण ह्या सर्व खाण्याने तामसी वृत्ती वाढते आणि तामसी वृत्ती परमार्थास अनुकूल नाही, ह्या गोष्टीत सात्विकता नसल्यामुळे हे ४ महिने तामसी भोजन वर्ज करावे हे ह्यामागील शास्त्रीय कारण आहे. गेल्या काही वर्षात आपल्या सणांचा मुख्य उद्देश गायब होवून त्याला एक वेगळेच हिडीस स्वरूप येवू लागले आहे हे नव्याने सांगायला नको. सणांचा मुख्य उद्देश परमेश्वराचे पूजन करून त्याच्यात विलीन होणे हा असला तरी हल्ली मात्र सण किंवा कुठलीही पूजा म्हणजे अंगविक्षेप करून देवासमोर घाणेरड्या गाण्यांवर नाचणे इतकाच उरला आहे . 


आता हेच पहा, अनेक वर्षापासून चालत आलेल्या आणि आपल्या सात्विक प्रकाशाने डोळ्यास नेत्रसुख देणाऱ्या ह्या दिप पूजनास सुद्धा “ गटारी अमावस्या “ म्हंटले जावू लागले आहे. आपल्या रूढी परंपरांचा एकीकडे ह्रास होत चालला आहे तर दुसरीकडे विटंबना आणि त्यात आपल्यासारखी सुशिक्षित माणसे अग्रभागी आहेत हे सांगतानाही खेद होतो. शिक्षणाने आपण प्रगल्भ होतो मग आपणच सोशल मिडीयावर ,whatsapp वरती हौशीने “उद्या गटारीचा प्रोग्राम काय ?" असे विचारले तर कसे होईल ? काही वर्षाने आषाढी अमावस्या –दीपपूजन हे शब्द विस्मृतीत जावून “ गटारी अमावस्या “ हाच शब्द प्रचलित होईल कि काय अशी भीती आहे . आपल्या परंपरा, सण साजरे करताना आपली सद्विवेक बुद्धी जागृत असेल तर आणि तरच त्याची उद्दिष्टे सफल होतील. नाहीतर पुढे येणारा काळ आणि येणाऱ्या पिढ्यामध्ये सात्विकता कणभरही उरणार नाही .आपणच आपल्या आयुष्यातील ह्या तेजाला वंचित होवू त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा एक सामाजिक बांधिलकी म्हणून नक्कीच विचार व्हावा ,स्वतःला पटले तर इतरानाही पटवून द्यावे ,कधी दारू प्यायलाच मिळाली नाही अश्या थाटात व्याकूळ होवून दिप पूजनास अभक्ष भक्षण आणि दारू पिवून नको त्या रूढी निर्माण करू नये, आपण पुढील पिढ्यांना काय आदर्श ठेवणार आहोत?  आपण आपल्या मुलाबाळांना कसला वारसा देणार आहोत ? ह्याचा क्षणभर विचार करायची वेळ आत्ताच आहे मग ती निघून गेली तर आपल्या ओंजळीतून सद्भावना , विवेक सर्वच निघून जाईल .



मंडळी सारांश असा कि आपणही २१ व्या शतकात आहोत ,सर्वसाधारण माणसे आहोत ,आपल्यालाही भावभावना आहेतच कि, पण modernisation च्या नावाखाली आपल्या सणांना जे हिडीस स्वरूप येते आहे त्याला रोखणे आपल्याच हातात आहे .आजकालचे कॉर्पोरेट युग आहे ,आजकालची मुले म्हणतील आम्ही घरीच १० नंतर येतो मग कधी करणार हे सर्व ,ठीक आहे आल्यावर घरातल्यांनी केलेल्या पुजेचा मान ठेवून  नमस्कार तर नक्कीच करता येयील . तसेही जो देव आपल्याला अनंत हाताने भरभरून देत असतो त्याच्यासमोर एक क्षण उभे राहून दीपपूजन करण्यास एक मिनिट सुद्धा नसेल तर आपल्यासारखे अभागी आपणच.नक्कीच विचार करा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ,ह्या उक्तीला धरून आपण आपल्यापासूनच सुरवात करुया आणि साजरा करुया "दीपोत्सव ".

आपल्या सर्वाच्या आयुष्यात हा दीपोत्सव समाधान , आनंद आणि सात्विकता प्रदान करुदे आणि आपल्या सर्वांचे आयुष्य प्रकाशमय होवूदे हीच प्रार्थना.

ह्या लेखाचा उद्देश “ click ” झाला आणि एकाने तरी “ गटारी अमावस्या “ ह्या नावाचा अपप्रचार थांबवला तर लिहिण्याचे सार्थक झाले असे समजायला हरकत नाही.


लेख आवडला तर अभिप्राय जरूर पाठवा.


antarnad18@blogspot.in




Sunday, 28 July 2019


|| श्री स्वामी समर्थ ||







Monday, 15 July 2019

अजि सोनियाचा दिनु

|| श्री स्वामी समर्थ ||


मी गेलो ऐसे मानू नका                              हम गया नही जिंदा है



       प्रपंच करावा नेटका, पण तो करताना जर त्याला गुरूसेवेचा परीस स्पर्श लाभला तर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही हा प्रत्यक्ष अनुभव मी गेले कित्येक वर्षे घेते आहे. माझ्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची यथासांग पूजा ह्या व्यतिरिक्त फारसे देवदेव करणारे कुणीच नाही . पण माझ्या सासूबाई कै. उषाताई ह्यांच्यामुळे मला 1999 मध्ये शेगावला जाण्याचा योग आला आणि जीवन गजाननमय होवून गेले. इतके वर्ष सातत्याने महाराजांच्या सेवेचा लाभ मिळणे हीच त्यांची असामान्य कृपा मी समजते. पुढे २०१३ मध्ये अक्कलकोटला जाण्याचा योग आला आणि तेव्हापासून ह्या दोन्हीही गुरूंच्या सेवेने माझ्या जीवनास खरा अर्थ प्राप्त झाला , हे पुर्वसंचीता शिवाय होणे नाही हे नक्की
वटवृक्ष..अक्कलकोट समाधी मंदिर


आज गुरुपोर्णिमा. गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला खरतर मला शब्दच सापडत नाहीत कारण ह्या अलौकिक शक्ती आपल्या आकलनाच्याहि पलीकडे आहेत. त्यांचे नित्य स्मरण ,मानसपूजा आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर जीवन व्यतीत करणे हेच आपले इतिकर्तव्य आहे असे मी समजते . आज मागे वळून पाहताना वाटते कि महाराजांनी मला काय दिले ? तर सर्वप्रथम त्यांनी मला स्वतःच्या चुकांची जाणीव करून दिली . आपण रोज कुठेना कुठेतरी चुकतच असतो ,कुणालातरी शब्दाने ,मनाने दुखवत असतोच .इतरांपेक्षा वेगळे ,शहाणे समजत असतो आणि ह्यालाच म्हणतात “ अहंकार ”. आपल्यात षडरिपू ठासून भरलेले आहेत .कितीही करा आपला अहंकार जाता जात नाही . एखाद्या संपूर्ण दिवसाचे अवलोकन केले तरी जाणवेल कि प्रत्येक गोष्टीत आपण स्वतःचे महत्व अबाधित ठेवतो. मी हे केले आणि मी ते केले हे शब्द सर्वश्रुत आहेत . आपली ह्या “ मी ” शिवाय बात नाही आणि ह्या “ मी ” पासून सुटकाही नाही . म्हणूनच अध्यात्माची कास धरणे आपल्याला क्रमप्राप्त आहे किबहुना हे जितके लवकर करू तितके जीवन सुखप्रद होईल ह्यात शंकाच नाही कारण “ मी ” ला दूर केल्याशिवाय गुरुचरण लाभणार तरी कसे?


शेगाव श्री गजानन महाराज मंदिर

अध्यात्माचा मार्ग खचीतच सोप्पा नाही .इथे “ पी हळद हो गोरी ” हे समीकरण लागू पडत नाही आणि हीच ह्या मार्गाची खरी मेख आहे. अध्यात्म आणि गुरुसेवा आपल्याला संयम शिकवते. आत्मपरीक्षण करायला भाग पाडते आणि एकदा त्याची सवय झाली कि मग प्रथम स्वतःच्या चुका दिसतात आणि त्या निरपेक्षपणे स्वीकारण्याची, त्याची पुनरावृत्ती न करण्याची सवय लागते . आपण केलेली नित्याची सकाळची पूजा ,साधना आपल्या उर्वरित दिनचर्येत दिसली नाही तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. नामस्मरण , ध्यानधारणा , पोथीचे पारायण , प्रदक्षिणा अश्या अनेक माध्यमातून आपण आपल्या सद्गुरूंची सेवा करत असतो. कालांतराने आपल्यातही अमुलाग्र बदल होत जातो . आपल्या प्रत्येक कृतीवर महाराजांचे लक्ष्य आहे हि भावना मनात असते आणि त्यामुळे दुष्कृत्ये घडत नाहीत किबहुना ती घडू नयेत हि अपेक्षा असते . आपण फार साधी माणसे आहोत. प्रापंचिक जीवनात आपल्याला अनेक संकटे बेजार करतात आणि मग अश्यावेळी आपण निराश होऊन  गुरुचरणी धाव घेतो. गुरुसेवा कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाहीत पण प्रत्येक गोष्टीत महाराजांना वेठीस न धरता प्रयत्नांची कास धरावी .सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि त्या घडाव्यात असा अट्टाहास हि असू नये. महाराज त्रिकालज्ञानी आहेत त्यामुळे आपली एखादी इच्छा भविष्यात आपल्यालाच त्रासदायक होणार असेल तर ते ती कशी पूर्ण करतील ? त्यामुळे महाराज जे करतील त्यातच आपले हित आहे हे जाणून आपली इच्छा त्यांच्या इच्छेत विलीन करावी. दासगणू विरचित, अत्यंत रसाळ असा श्री गजानन विजय ग्रंथ म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा ठेवाच आहे जणू . २१ अध्यायाची शिदोरी आपल्याला जीवनातील मुल्ये शिकवते. पारायण करताना डोळ्यासमोर  शेगाव उभे राहते. महाराजांच्या मठास प्रदक्षिणा घालण्यास अनन्यसाधारण महत्व आहे . अनेक वेळा आपण तीर्थक्षेत्री जावून पोथ्या , महाराजांचे फोटो असणार्या अनेक गोष्टींचा संग्रह करतो पण त्याहीपेक्षा त्यांचे घर हृदयात करणे हे सर्वात महत्वाचे आहे ,आपल्या अंतर्मनात ते किती खोलवर उतरले आहेत ,आपल्याला ते किती समजले आहेत हे महत्वाचे,हे जर आपल्याला समजले तर आपली जीवनरूपी नौका पैलतीरी जाणार ह्यात शंकाच नाही.

गजानन महाराजांचे लाडके गणराज

अगदी लहानसहान गोष्टीनी आपण भयभीत होतो , हतबल होतो आणि महाराजांना वेठीस धरतो. कश्यासाठी ? माझा मुलगा चांगल्या मार्कांनी पास होवूदे ..आता ह्यात महाराज काय करणार ? त्याने उत्तम अभ्यास केला असेल तर तो नक्कीच पास होणार ,पटतंय ना? जरा काही खुट्ट झाले कि महाराजांना नवस बोललाच म्हणून समजा, स्वतः कुठलाही प्रयत्न न करता काहीच हाती लागणार नाही. पण आपल्याकडून संपूर्ण प्रयत्न केल्यावर मग महाराजांना हक्काने ,प्रेमाने साद घातली तर ते आपल्या लाडक्या भक्तांसाठी धावत आल्याशिवाय राहत नाहीत ह्याची प्रचीती आजही येते.
पण उठसुठ प्रत्येक अडचणीत प्रयत्न न करता महाराजांना नवस बोलणे (अर्थात तो पुढे पूर्ण होईल ह्याची कसलीच शाश्वती नाही )  हे खरच उचित आहे का? त्यापेक्षा त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालत राहणे आणि आपले भोग भोगूनच संपवणे ह्यासारखे शहाणपण नाही. स्वामीनी भक्तांना आश्वासन दिले आहे कि “ अशक्य हि शक्य करतील स्वामी ” पण ते त्यांना वाटले तर. प्रत्येक गोष्टीत माप आपल्याकडेच कसे झुकेल ? दुसर्या कुणालातरी दुखवून स्वामी आपली झोळी कशी भरतील ? कारण ते तर सर्वांचेच आहेत. म्हंटलेच आहे ना “ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ”. दासगणुनी संपूर्ण गजानन विजय ग्रंथात पदोपदी अत्यंत सुरेल रचना केल्या आहेत जसे “ संतांच्या जेजे येयील मनी ते ते येयील घडोनी , भरोसा त्यांच्या चरणी ठेवूनी स्वस्थ राहावे ”, “ श्री गजानन लीलेचा पार ना कधी लागायचा ,अंबरीच्या चांदण्याचा हिशेब ना कोणा लागे कधी ” .अश्या ह्या ओव्यांनी भरलेल्या ह्या रसाळ .अद्भुत ग्रंथाचे वाचन करताना अश्रूंच्या धारा वाहू लागल्या नाही तरच नवल.

गुरु योग्य असेल तर गुरुसेवा कधीच वाया जात नाही.पण गुरु कश्यासाठी करायचे हेच कित्येकांना समजत नाही असे दिसते . कित्येक वेळा मला गुरु करायचे आहेत ,कसे करायचे ? असे प्रश्न वाचनात येतात. भौतिक सुखांच्या लालसेने कुठल्याही गुरूंची सेवा निष्फळ ठरेल. अमुक एक गोष्ट मिळवण्यासठी गुरुसेवा करू नये ती होणारही नाही .गुरुसेवेचा उगम हा गुरुंवरील उत्कट प्रेम ,मनातील तळमळ आणि प्रचंड विश्वास ह्यातच आहे .गुरुसेवेने मिळते ते आंतरिक समाधान ,जगण्याची लढण्याची उमेद .पण आपण भौतिक सुखाच्या लालसेने जपमाळ हाती घेतो . खरतर सतत काहीनाकाही त्यांच्याकडे मागुच नये . न मागताही वेळ आली कि महाराज सर्वच देणार आहेत ह्याची खात्री उरी असावी ,संतसेवा करत राहावी आणि त्यात कधीही संदेह ,कल्पविकल्प ,अविश्वास नसावा. कित्येक वेळा आम्ही इतके करतो तरी आम्हाला काहीच फळ मिळत नाही असली विधाने ऐकायला मिळतात. प्रत्येकाने आपले कर्म प्रथम तपासून पाहावे ,आत्मपरीक्षण करावे मग आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतात . संचित , क्रियमाण आणि प्रारब्ध ह्यातून आपली सुटका नाही पण ते भोगण्याची शक्ती गुरुसेवा नक्कीच प्रदान करते . आपल्याला सगळ्याची घाई असते . दोन दिवस जप झाला नाही तर लगेच आपला संयम जातो आणि आपण पूर्वपदावर येतो . संयम ठेवणे हीच तर अध्यात्माची पहिली पायरी आहे . महाराज रोज आपली परीक्षा घेणार अगदी प्रत्येक क्षणी पेपर लिहायला बसवणार पण कधीतरी त्यात आपण नक्कीच पास होणार हा आपला विश्वास असला पाहिजे. घ्या किती परीक्षा घ्यायची ती पण आपले चरण सोडणार नाही असे जो म्हणेल तोच तरेल .


हम गया नही जिंदा है 
आपल्यातील “ मी ” जितका दूर जाईल तितके स्वामीचरण जवळ येतील. महाराजांनीही सांगितले आहे रोज पोथ्या घेवून बसू नका उत्तम कर्म करत राहा .वर्षातून एकदाच पारायण करा आणि उरलेले ३६५ दिवस ते आचरणात आणा. आपण काय करतो ? सुज्ञास सांगणे नलगे. गजानन विजय ग्रंथातील प्रथम अध्यायात महाराज उष्ट्या पत्रावळीवर जेवले त्यावरून त्यांना सूचित काय करायचे होते ? टाकून दिलेल्या भोजनावर सुद्धा एकजण जेवू शकतो . आपण काय करतो पारायण करतो .दुसर्या दिवशीपासून पुन्हा येरे माझ्या मागल्या ..रोज घरात अन्न , फळे कित्येक गोष्टी कचर्याच्या डब्यात जातात . मग त्या परायणातील नेमके काय समजले आपल्याला ?  समजले तरी वळले का? अगदी सणासुदीलाही आपल्याकडून घरातील वृद्धाना बोल लावले जातात मग आपल्या आणि आपल्या पुढील पिढ्यांचे सण खरच आनंदात जातील का? बघा आपले उत्तर आपल्यालाच मिळेल ?म्हणूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे अध्यात्माचा मार्ग अत्यंत कठीण आहे. गुरुकृपा होण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी नीतीने आचरण केले पाहिजे. गुरुकृपा वगैरे ह्या फार दूरच्या गोष्टी आहेत त्याआधी अध्यात्मातील अनेक कसोट्यांवर आपण खरे उतरलो पाहिजे. गुरुसेवा करत असताना एक दिवस असाही येतो किबहुना तो महाराज आणतात कि जिथे लोक आपल्या सेवेकडे पाहून आपल्यालाच नमस्कार करू लागतात . हाच क्षण महत्वाचा कारण महाराज आपली परीक्षा घेत असतात . आपण ह्या मोहास बळी पडलो आणि एक भक्त आहोत हे विसरून स्वतःला महाराज समजू लागलो कि त्या क्षणापासून आपली प्रापंचिक आणि पारमार्थिक अधोगती सुरु झालीच म्हणून समजा. आपण एक सेवेकरी आहोत  ह्याचे भान प्रत्येक क्षणी असणे गरजेचे आहे, चरणास घट्ट मिठी मारायची ती महाराजांच्या आपल्या नाही ह्याची जाणीव आपल्याला असायलाच हवी आणि ती  इतरांना नसली तर ती आपण करून द्यायला नको का? तसे झाले नाही तर आपला  विठोबा घाटोळ (गजानन विजय अध्याय ३) होण्यास वेळ लागणार नाही. 


प्रसाद हा मज द्यावा देवा सहवास तुझाची घडावा देवा 


महाराजांनी भक्तांना सांगितलेच आहे “ माझा फोटो ठेवून बाजार मांडू नकोस ”. स्वामी समर्थांचा तारक मंत्र नावाप्रमाणेच भक्तांना तारतो . मनाच्या गाभ्यातून ,तळमळीने त्यांना हाक मारली तर महाराज आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात . अनुभव घेवून पहा. महाराजाना काहीही नको आहे आपल्याकडून , त्यांना आस आहे ती खर्या भक्तीची .प्रपंचात आपण किती गोष्टीचा संचय करतो, ह्या सर्व गोष्टी इथेच ठेवून अखेरच्या प्रवासाला जायचे आहे हे माहित असूनही .म्हणूनच स्वामी भक्तांना सांगत असत अरे किती साठवशील ? हे म्हणजे अग्नीत तुपाची धार ,जितके साठवशील तितकी इच्छा वाढतच जाईल . त्यापेक्षा सेवा कर पण निस्वार्थीपणे .मेवा खाण्यासाठी नाही. सेवा केलीस तर जीवन समृद्ध होईल आणि सद्गती मिळेल .
अध्यात्माचा प्रवास सोपा नसला तरी ज्याने त्याची अवीट गोडी चाखली त्याचे जीवन सार्थकी लागतेच. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनाहि अध्यात्मिक बैठक असेल तर वाचासिद्धी प्राप्त होते आणि अचूक निदान करण्याची क्षमताही. नावे आणि रुपेही जरी वेगळी असली तरी हि शक्ती एकच आहे आणि त्यावर शंका घेणारा दुर्दैवीच. ह्या संत विभूतींनी जरी देह ठेवला असला तरी, प्रचीती आणि दृष्टांत देवून त्यांच्या अमरत्वाची ग्वाही आजही मिळतेच आहे. स्वामी समर्थांचे भक्तांना आश्वासन आहे “ हम गया नाही जिंदा है ” आम्ही कुठेही गेलो नाही इथेच आहोत आणि जो अनन्य भावाने माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालवेन. त्याचप्रमाणे शेगाव निवासी संत गजानन महाराजांनीही “ मी गेलो ऐसे मानू नका ,भक्तीत अंतर करू नका. कदा मजलागी विसरू नका ,मी आहे येथेच
” असे अभिवचन दिले आहे
.आज खरच गहिवरून आले आहे कारण मला त्यांनीच जीवनात उभे केले आहे. पहिल्या क्षणापासून मला ते देतच आले आहेत. ह्या विलक्षण आणि असमान्य शक्तींना माझा साष्टांग दंडवत. त्यांना आपल्याकडून काहीच नको आहे ,हवे आहे ती खरी भक्ती. मी कित्येक वेळा जप,पोथी वाचन काहीच करत नाही कारण कधीकधी प्रापंचिक गोष्टीत जास्ती लक्ष्य द्यावे लागते. आपली साधना आपल्यापाशीच, ती कुणाला दाखवण्यासाठी आणि खोट्या अहंकाराचे ढोल वाजवण्यासाठी करणे कधी जमलेच नाही . जेव्हा जेव्हा सेवा करायची मग तो जप असो कि प्रदक्षिणा किंवा वाचन ते सद्भावनेने आणि अंतकरणाने तरच ते त्यांच्यापर्यंत पोहोचते . 



अक्कलकोट ...अन्नछत्र..


मानसपूजा करतानाही महाराज दृष्टांत देतात ,पण प्रामाणिक भावना मनात असायला हवी आणि खर्या भक्तांची आस ते ओळखतातच. त्यांच्याकडे काहीच मागायचे नाही त्यांना सगळे माहित आहे. मला इतकेच समजते कि आपण जितके साधे सरळ सोपे जीवन जगतो अगदी तशीच सहजसुंदर सोप्पी साधी निर्मळ मनाने केलेली भक्तीच महाराजांना अपेक्षित असते आणि तीच त्यांना भावते .दिखावेपणा , ढोंगीपणाने सद्गुरुप्राप्ती केवळ अशक्य. भक्तांला नेहमीच गुरुचरणांची आस असावी .ज्याला गुरु लाभले आणि गुरुसेवेची संधी लाभली त्यांचा जन्म सार्थकी लागला .मला गुरुसेवेची संधी मिळाली आणि जीवन कृतार्थ झाले .असे कित्येक लेख लिहूनही गुरूंच्या बद्दलच्या माझ्या भावना मला आजवर कधीच सांगता आल्या नाहीत हे माहित असूनही हा लेखनप्रपंच.आज गुरुपोर्णिमा ..आज त्यांना गुरुदक्षिणा म्हणून द्यायचे तरी काय कारण आहे हे सर्व त्यांचेच तर आहे. पण तरीही आजन्म अखंड नामस्मरण करत त्यांच्या नामाचा प्रसार करत राहणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. .शेवटी एकच मागणे आहे “ माझी राखा तुम्ही लाज ,आहे एक मागणे आज. अपराध माझे गुरुराया आज सारे क्षमा करा वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी .



      गुरुविणा जीवनात कोण येयील कामी , खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी |
        जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती , गुरुपदी घेवू चला क्षणभर विश्रांती ||



गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll



सर्वाना गुरुपोर्णिमेच्या मनापासून शुभेछ्या.


लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.