|| श्री स्वामी समर्थ ||
महर्षी पतंजली ह्यांच्या योगसूत्र सांगणार्या “ Atha-Yoganusasanum ” मध्ये पहिलीच ओळ आहे ...And Now , Yoga.
योग, प्राणायाम हे शब्द आज नवीन नाहीत .हजारो वर्षांपासून आपल्याकडे योग प्रचलित आहे. आजच्या अत्यंत तणावयुक्त जीवनशैलीला “ योग ” हे एक वरदान ठरले आहे. पाश्चिमात्य देशातून अनेक अभ्यासक योगाचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतात.योगाचे महत्व आज संपूर्ण विश्वाने मान्य केले आहे आणि योगाचा प्रसार अखंड विश्वात जोमाने होत आहे .
भूतकाळात जे झाले ते बदलता येणार नाही आणि भविष्य आपल्याला माहित नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आहे तो आत्ताचा क्षण आणि तोच क्षण आनंदाने कसा जगायचा ते आपल्याला शिकवणारे शास्त्र म्हणजे “ योग ”. योग हि एक जीवनशैली आहे .
आपल्याला कुठलाच आजार नाही म्हणजे आपण आरोग्यसंपन्न आहोत असे नाही. शारीरिक , मानसिक ,सामाजिक आणि अध्यात्मिक सुस्थितींचा अनुभव घेणे म्हणजे “आरोग्य ".
शरीर , बुद्धी आणि मनाचे आपल्या आत्म्याशी जोडणे जाणे म्हणजेच “योग”. आपले कुटुंबाशी , समाजाशी ,राष्ट्राशी आणि संपूर्ण सृष्टीशी जोडणे जाणे म्हणजे “ योग ” अशीही एक व्याख्या महर्षी पतंजली ह्यांनी सांगितली आहे.
आपले जीवन शारीरिक आणि मानसिक , बौद्धिक दृष्टीने संतुलित करण्यासाठी योग अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. योग केल्याने जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो, सकारात्मकता वाढते आणि एक संतुलित व्यक्तिमत्व तयार होते .महामुनी पतंजली ह्यांनी ह्यास अष्टांग योग म्हंटले आहे . ह्यातील महत्वाचा भाग म्हणजे हि सर्व अंगे एकाच वेळी एकमेकांशी जोडली गेली आहेत .
योग साधनेबद्दल अनेक पुस्तके उपलब्ध आहेत तसेच आज शास्त्रीय पद्धतीने योग शिकवण्यासाठी अनेक शिबिरेही आहेत .
कुठलीही पुस्तके बघून योगासने करणे अत्यंत चुकीचे ठरू शकते . अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने योग शिकणे गरजेचे असते .
सुरवातीला सहज सोपी काही आसने करून योगाभ्यासाला सुरवात करावी. आसने खूप आहेत पण आपल्या क्षमतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे आसने करावीत. आसनांची शरीरास सवय झाली कि प्राणायामाचा अभ्यास करावा .आसनाने सिद्ध झालेलं शरीर प्राणायामामुळे अधिक कार्यक्षम होते .प्राणायामामुळे शरीर आणि शरीरातील नाड्या शुद्ध होतात तसेच भावनात्मक समतोल राहण्यास मदत होते
.
मला स्वतःला आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हा लेखनप्रपंच. आपल्याकडे lockdown सुरु झाले आणि आपण सगळे बघता बघता घरात अगदी बंदिस्त होवून गेलो , हे इतके अचानक झाले कि आपल्याला ह्या परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यायला थोडा काळ नक्कीच लागला. मी रोज पहाटे ५ वाजता चालायला जाते तेही ह्यामुळे बंद झाले आणि मनाची चिडचिड सुरु झाली. चालणे होत नसल्याने काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले . एक आठवडा गेला तेव्हा जाणवले कि फारच मरगळ आली आहे, उदास वाटत आहे आणि कश्यातच आनंद वाटत नाही आहे. त्यात रोज TV वर दिसणाऱ्या सर्व नकारात्मक बातम्या ह्यामुळे संपूर्ण विश्वातली सकारात्मकताच नष्ट झाली आहे कि काय असे वाटू लागले .
मग ठरवले कि आपल्या जीवनपद्धतीत बदल करायचा . रोज करतो त्या आसनांमध्ये अधिक वेळ द्यायचा . चालायला मिळत नाही म्हणून काय झाले अन्य योगाभ्यास वाढवायचा .मी रोज सकाळी ७ आणि दुपारी ४ हि वेळ निश्चित केली आणि ठरल्याप्रमाणे आसने आणि प्राणायाम करू लागले. सर्वात जास्ती वेळ मी ध्यानास देवू लागले .आजवर इतका वेळ मला मिळत नव्हता पण आता मिळालेला वेळ सत्कारणी लागत होता .
मंडळी आपण तासनतास फोनवर बोलू शकतो , सिनेमा पाहू शकतो पण ध्यान करायचे म्हंटले तर आपण २ मिनिटेही एका जागी स्थिर राहू शकत नाही हे तुम्ही अनुभवले असेल. पण जी गोष्ट जितकी कठीण त्याचे फायदेही तितकेच जास्ती असतात.
मी माझी ठरलेली नित्याची आसने करत राहिले . त्यात अजिबात बदल केला नाही आणि संपूर्ण लक्ष ध्यानावर केंद्रित केले. सुरवातीला मनात असंख्य विचारांची गर्दी होवू लागली . कपाळावर आठ्या जसे काही मला कुणी शिक्षाच केली आहे. मनात स्वतःशीच द्वंद्व . कुकर लावायचा आहे , आता काय बाई नाही आपल्यालाच करायचे आहे सर्व, भाजी मिळेल का बाहेर ,पण जाणार कसे ..हे सर्व कधी थांबणार ..एक न दोन अनेक विचार मनात थैमान घालत होते पण मी निश्चय केला होता त्या प्रमाणे हे विचार आले तरी शांतपणे ध्यानावर संपूर्ण लक्ष ठेवले. हळूहळू त्यातील कालावधी वाढवला , मनातील विचार हळूहळू कमी होत गेले आणि त्याचा प्रचंड सकारात्मक परिणाम मला जाणवू लागला. ह्या आधीही मी ध्यान करत असे पण त्यास खूप वेळ देता येत नसे . आज lokdown मुळे ध्यानासाठी वेळ देता येवू लागला आणि त्याची गोडी लागली .प्रचीतीविना भक्ती नाही तसेच कुठल्याही गोष्टीचे चांगले परिणाम दिसू लागले कि आपल्याला त्यात आनंद वाटू लागतो. आज जवळजवळ ३ महिने मी हा अभ्यास करत आहे आणि आज माझे आयुष्य बदलून गेले आहे हे मला प्रकर्षाने जाणवत आहे. योगाभ्यास , साधना मला एका वेगळ्याच उंचीवर घेवून गेली आहे हा आनंद मी अंतर्यामी अनुभवते आहे .
ध्यानामुळे मला शांत वाटत आहे, दिवसभर उर्जा टिकून राहते आणि ताजेतवाने वाटते . शरीर आणि मन दोन्ही हलके झाले आहे. वजन कमी झाले आहे एक संपूर्ण सृष्टी आपल्यात समावल्याचा अद्भुत,अद्वितीय आनंद मी अनुभवते आहे.
आपण सतत बाह्य जगाकडे पाहत असतो आणि त्यातूनच मानसिक शारीरिक ताण घेत असतो . पण कधीही आपण आपल्या मनात आपल्या आतमध्ये डोकावून पाहताच नाही . जो आनंद आणि मनाची शांतता आपण बाहेर शोधात असतो ती तर खरी आपल्या आतच असते पण नेमके त्याकडे आपण दुर्लक्ष्य करतो .
मंडळी गेल्या ३ महिन्यात माझी मला मी नव्याने भेटत गेले . योगासन तर करावीत पण ध्यान केल्याचे अनेकविध फायदे आहेत जे आपले जीवन एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवतात , किती संकटे आली तरी आपण शांतपणे त्यातून न डगमगता मार्ग काढू शकतो ,कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होण्यापासून आपण दूर राहतो , चटकन येणारा राग काबूत येतो ,आपल्या भावनांवर विजय मिळवतो असे अनेक ध्यानाचे परिणाम आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाहीत . आज ह्या योग दिवसाचे औचित्य साधून मला माझा हा अनुभव आपल्यासोबत शेअर करावासा वाटला.
योग आणि ध्यानधारणा कुणीहि करू शकतो त्याला वयाची अट नाही पण प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी...
तसेच तुम्ही जी आसने निवडाल त्यात सातत्य असायला हवे . आज हि ४ केली मग उद्या दुसरी असे नको . ऑमकार साधना , अनुलोम विलोम , कपालभाती , सिंह मुद्रा , भ्रामरी, वक्रासन ,पवनमुक्तासन ,हलासन हि आसने वर सांगितल्याप्रमाणे योग शिक्षकाकडून शिकून घ्यावीन आणि मगच करावीत . आपल्याला काही आजार असतील तर शिक्षक त्यानुसार आपल्याला आसने सुचवू शकतात. ह्यात कुणालाही कॉपी करायला अजिबात जावू नये. प्रत्येकाची शारीरिक क्षमताही वेगळी असते त्यामुळे दुसरा हे आसन १० वेळा करतो म्हणजे आपणही केलेच पाहिजे हा अट्टाहास नको. आपल्याला जमेल तशी सुरवात करून हळूहळू त्यात वाढ करावी .
शक्यतो सकाळची वेळ निवडावी कारण तेव्हा आपले पोट रिकामे असते . नियमित योग, ध्यान , चालणे ह्यासोबत आपण जर आपला आहारही नियंत्रित ठेवला तर आपल्या आयुष्याची संध्याकाळ सुद्धा तितक्याच सकारात्मक उर्जेने भरलेली असेल ह्यात दुमत नाही .
मंडळी , आत्ताचा हा क्षण महत्वाचा आहे आणि तो खर्या अर्थाने आनंदाने जगणे आपल्या हाती आहे . योग आपल्याला ह्याच क्षणाची अनुभूती घ्यायला शिकवतो.
कदाचित ह्या आधी तुम्हीसुद्धा अनेक संकल्प सोडले असतील ...हसायला येतंय ना मनोमनी ? येणारच कारण आपण सगळे तसेच करत असतो .पण आज दृढ निश्चय करुया ..
आज आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निम्मित्ताने आपल्या आयुष्यातील योग आनंदयात्रेस प्रारंभ करुया .
लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.
Antarnad18@gmail.com
अस्मिता