|| श्री स्वामी समर्थ ||
लेख क्र. 3.
ग्रह काय सांगतात ??
मंडळी, आपण सर्वच परिचित आहोत ते नवग्रहांशी .अनेक जण रोज नवग्रह स्तोत्रही म्हणतात . गेल्या काही वर्षात हर्शल , नेपचून , प्लुटो ह्या ग्रहांचा शोध लागला. अजूनही असंख्य ग्रह अंतराळात असतील ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असावा , पण ते अजूनही आपल्याला ज्ञात नाहीत . हे सर्व ग्रह आपल्या जीवनावर परिणाम करत असतात आणि म्हणूनच आपल्या पत्रिकेत त्यांना अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त आहे. असंख्य ग्रहयोग आहेत जे सर्व पाहणे शक्य नाही पण त्यातील काहींचा अभ्यास करुया . आज आपण काही ग्रहयोग बघू.
बुध हा ग्रहमालिकेतील सर्वात लहान तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे . चंद्र, शुक्र , बुध , रवी , गुरु ह्या ग्रहांना शुभ तर शनी , मंगळ, राहू आणि केतू ह्या ग्रहांना पाप ग्रह मानले जाते . ह्यामध्ये राहू आणि केतू हे पातबिंदू आहेत ज्यांना कुठलीही रास नाही . ते ज्या राशीत असतात त्या ग्रहाच्या अनुषंगाने फळ देतात . काही ज्योतिषी रवी ह्या ग्रहाला सुद्धा पापग्रह समजतात .
प्रत्येक ग्रह आपल्या जीवनावर परिणाम करतो . प्रत्येक ग्रहाचे चांगले वाईट परिणाम होतात . शुभ ग्रहसुद्धा बिघडले तर वाईट फळे देवू शकतात . चंद्र हा प्रत्येक राशीत सव्वादोन दिवस असतो तर शनी हा एका राशीत अडीच वर्ष. लग्नेश कुठलाही ग्रह असो तो ६ ८ १२ ह्या स्थानात असेल तर त्याचे कारकत्व कमी करतो. कर्क लग्नाचा ग्रह चंद्र जर हर्शलाच्या युतीत किंवा कुयोगात असेल तर व्यक्ती विक्षिप्त असते. लग्नेश ग्रह कुठल्याही कुयोगात बिघडला असेल तर आयुष्य काही प्रमाणत अयशस्वी , कष्टप्रद असते. चंद्र हा मातेचा तसेच मनाचाही कारक आहे . चंद्रावरून मनाची आंदोलने पाहतात तसेच भरती आणि ओहोटीही पहिली जाते . चंद्र जर बुधाच्या कुयोगात युतीत अथवा प्रतियोगात असेल तर त्वचारोग होवू शकतो. चंद्र अष्टमात भाग्येशासोबत असेल तर आयुष्य कमी असते. अर्थात बाकीचे योगही पाहावे लागतील. चंद्र हा शुक्र मंगल बुध ह्यांच्या नवपंचम किंवा लाभ योगात शुभफळ देतो. चंद्र जर राहू केतू ह्यांच्या युतीत असेल तर त्यास ग्रहणदोष म्हंटले जाते .
रवी हा आत्मकारक ग्रह आहे आणि पित्याचाही कारक आहे. पुरुषांच्या पत्रिकेत चंद्रावरून भार्या तर स्त्रियांच्या पत्रिकेत रविवरून पती पहिला जातो.मेष राशीत रवी उच्चीचा तर तुळेत निचीचा मानला जातो. रवी शनी युती वडिलांचे सौख्य दर्शवत नाही ,वडिलांशी पटत नाही. तसेच रवीसोबत राहू किंवा केतू हा ग्रहण दोष दर्शवतात .
मेष किंवा सिंह राशीत रवी दशमात सरकारी नोकरीचा योग आणतो. पत्रिकेत रवी हा मानमरातब आणि लौकिकाचा कारक आहे. मंगळ हा ग्रह सेनापती असून स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ बिघडला असेल तर मासिक पाळीचे त्रास असतात . मंगळ धडाडी आणि नेतृत्व गुण दाखवतो . मंगळ भावंडांचाही कारण आहे त्यामुळे मंगळ राहू केतू शनी ह्यांनी दुषित असेल तर भावंड सुख मिळत नाही. स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ सौभाग्याचा कारक आहे. द्वितीय स्थानात मंगळ असेल तर वाणी दाहक असते , चिडून संतापून बोलणे मंगळामुळे होते. त्यासोबत हर्शल असेल तर बघायलाच नको.
पत्रिकेत सप्तमेश मंगळ हर्षलाच्या कुयोगात युतीत अथवा प्रतीयुतीत असेल तर वैवाहिक सुखाचे काही खरे नाही . बुधाच्या राशीत मंगळ चांगला नाही आणि मंगळ बुध युती , शनी बुध युती खोटेपणा दर्शवते. मंगळ व्ययस्थानात असता आर्थिक नुकसान , उधळपट्टी ह्यामुळे कर्जबाजारीपणा येतो. शुक्र मंगळ युती हि प्रेमविवाहास पोषक आहे. पत्रिकेतील १२ १ ४ ७ ८ ह्या स्थानात मंगळ असेल तर पत्रिका मांगलिक आहे असे म्हंटले जाते . वयाच्या साधारण 28 नंतर मंगळ कमी त्रासदायक होतो.
शुक्र हा आयुष्यातील सौंदर्याचा , विलासाचा आणि आनंदाचाही कारक आहे. स्त्रियांच्या पत्रिकेत कन्या राशीतील शुक्र वैवाहिक सुखात कमतरता दाखवतो . तसेच शुक्र राहू युती परजातीय संबंध येवून विवाह दर्शवते. शुक्र हर्शल , शुक्र राहू ,शुक्र केतू ,शुक्राचे कारकत्व कमीच करतात . सिंह राशीत म्हणजेच रवीच्या राशीत शुक्र चांगली फळे देत नाही. पती आणि पत्नी दोघांच्याही पत्रिकेत विवाहाचा कारक ग्रह शुक्र शुभ स्थितीत असेल तर विवाह लवकर योग्य वयात होतो.
पंचमातील शुक्र बुध युती कालाप्रांतातील यश देते. बुध हा वाणीचा कारक ग्रह वाचास्थानात असेल तर बोलण्याचे काम असेल ते व्यवसायात यश देतो. बुध राहूच्या नक्षत्रात असेल तर खोटे बोलणे किंवा बुद्धिचतुर असतो.बुध बिघडला असता मज्जासंस्थेचे विकार होतात . शनी आणि बुध लग्नी असता विवाह सुखाचा होत नाही .
शनी मंगळाच्या युतीत फळ चांगले देत नाही . शनी अष्टमात असेल तर आयुष्य वृद्धी करतो. व्ययस्थानात बिघडलेला शनी तुरुंगाची हवा खाण्यास लावतो पण त्यासाठी पूर्ण पत्रिकेतील सर्व ग्रहांचा अभ्यास तसेच गुरु चा अभ्यास आवश्यक आहे. शनी आणि मंगळ हे बांधकाम क्षेत्राचे कारक आहेत .
शनी बिघडला असता कंपवात , लकवा ,अर्धांगवायूचा झटका ,फुफुसात पाणी होणे ह्या गोष्टी होवू शकतात .शनी दशा आणि साडेसाती शनी बिघडला असता खडतर जाते. शनी हा न्यायी ग्रह आहे . शनीची साडेसाती म्हंटले कि भल्याभल्यांची झोप उडते. पण शनी कारण नसताना त्रास देत नाही. तुम्ही चूक अपराध केला तरच शनी महाराज दंड सुनावतात .शनी आपला मित्र आहे तो आपल्याला आयुष्याचा उपभोग घेवून विरक्तीकडे नेतो. ह्या शरीराची चिमुटभर राख होणार आहे ह्याची जाणीव आपल्याला लवकर होईल तितका त्रास कमी. तेव्हा आता शनी महाराजांना आपला मित्र करायचे कि शत्रू हे तुमचे तुम्हीच ठरवा .
आपल्या संपूर्ण शरीरात एकच अवयव असा आहे ज्याने अनेक समस्या उद्भवतात आणि तो म्हणजे आपली वाचा . आयुष्यातील बरेच प्रोब्लेम आपल्या बोलण्याने होतात. त्यामुळे साडेसातीत कमीतकमी बोलावे, लोकांत कमीतकमी मिसळावे. मनन चिंतन अधिक करावे. उपासनेचे फळ निरंतर टिकणारे आहे त्यामुळे उपासनेकडे , ध्यानाकडे अधिक लक्ष्य द्या .
गुरु हा ग्राहमालीकेतील सर्वात मोठा ग्रह. शिक्षण , मुले होणे , विवाहसौख्य, उपासना ह्या सर्वासाठी पत्रिकेत गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरु केतू युती हि अध्यात्मिक उपासना दर्शवते .गुरुचे कारकत्व बुधाच्या राशीत कमी होते . गुरु जर राहूच्या नक्षत्रात असेल तार त्यास चांडाळ दोष म्हणते जाते .ह्या योगात सुद्धा गुरूची जोरदार फळे मिळत नाहीत .
हर्शल प्लुटो आणि नेपचून हे ग्रह नवग्रहात गणले जात नाहीत . १२ व्या स्थानातील हर्शल परदेशगमनाचे योग आणतो. हर्शल हा मंगलापेक्षाही १०० पटीने जास्ती दाहक आहे. धनस्थानातील हर्शल सांपत्तिक स्थिती फार उंचावत नाही. नेपचून हा शुभ असेल तर अध्यात्मिक प्रगती , भविष्यातील घटनांचे संकेत देतो. सप्तमेश ग्रह हा ६ ८ १२ मध्ये असू नये, वैवाहिक सुखात कमतरता निर्माण होते. मंडळी असे असंख्य ग्रहयोग अभ्यासता येतील. कुठल्याही एका ग्रहामुळे आयुष्यात घटना घडत नाही. त्यामागे ग्रहस्थिती , महादशा , कुयोग अनेक गोष्टी पाहायला लागतात .
त्यामुळे माझा रवी इथे आहे आणि माझा शुक्र इथे आहे तर काय होईल असे बाष्कळ प्रश्न कुणालाही विचारू नयेत कारण एक ग्रह म्हणजे आयुष्य नाही.
ज्योतिष शास्त्र शिकायला अवघड नाही पण त्याचा आवाका खूप जास्ती आहे त्त्यासाठी आवड आणि सवड दोन्ही पाहिजे . ते शिकताना संयम असणे गरजेचे आहे तसेच संशोधक वृत्ती हवी . त्याहीपलीकडे अर्धवट ज्ञान हे अतिशय वाईट असते. त्यापेक्षा अज्ञानी असणे केव्हाही उत्तम.
मुल झाले नाही अश्या लोकांच्या काही पत्रिका , विवाह झाला नाही , शिक्षणात अडथळे आले अश्या अनेक पत्रिका घेवून त्याचा सखोल अभ्यास आपल्याला नियमांपर्यंत पोहोचवतो.
ग्रह आपापली कामे चोख बजावत असतात ते पक्षपाती पणा करत नाहीत ,म्हणूनच म्हंटले आहे “ Stars Plays a Major Role In Life ”.
आता आपल्या लक्ष्यात आले असेल आपण आपली पत्रिका ज्योतिषास दाखवली कि त्यालाही किती सखोल अभ्यास करावा लागत असेल ,कारण एखाद्याच्या आयुष्याबद्दल अभ्यासपूर्ण , अधिकाराने बोलणे खचितच सोपे नाही, पटतंय ना ?
लेख आवडला तर अभिप्राय लिहायला विसरू नका .
antarnad18@gmail.com
अस्मिता