|| श्री स्वामी समर्थ ||
मंडळी ,अनेक शास्त्रांप्रमाणे वास्तुशास्त्र हेही एक महान शास्त्र आहे आणि त्याचे अभ्यासक हि खूप आहेत. एखाद्याच्या घरात गेले कि आपल्याला एकदम प्रसन्न वाटते मग ते घर लहान अथवा मोठे कसेही असुदेत . पण कधीकधी एखाद्याच्या वास्तूत आपल्याला क्षणभर सुद्धा बसवत नाही ह्याचे कारण तेथील नकारात्मक उर्जा . अशा वास्तूत आपण फार रमत नाही .वास्तू सुशोभित , निटनेटकी असणे गरजेचे आहेच पण त्याहीपेक्षा तिथे सकारत्मक लहरी , स्पंदने असणे त्याहीपेक्षा आवश्यक आहे . वास्तुदोष हा वास्तुत नसून आपल्या कृती आणि विचारामुळे निर्माण होतो. आपली कर्मे आपल्या वास्तुमधील लहरींवर परिणाम करत असते.त्यामुळे वास्तूला दोष देण्यात काहीच अर्थ नाही .
काही घरात माणसे कित्येक पिढ्या रहात असतात. अनेक पिढ्या सुखा समाधानात राहतात , अनेकांचे जाणेयेणे असते , पूर्वी सणासुदीला माणसे एकमेकांकडे जातयेत असत .अनेक सोहळे , समारंभ त्या वास्तूने पाहिलेले असतात . पूर्वी काही ठिकाणी मोठी घरे असत आणि एकत्र कुटुंब पद्धतीने लोक अगदी गुण्या गोविंदाने रहात असत . आता आधुनिक काळात ह्या गोष्टींचा ह्रास होताना दिसतो. आपल्या घरात आपल्या पूर्वजांनी अनेक पूजा पाठ , व्रत वैकल्ये केली , ऐश्वर्य उपभोगले त्या वास्तूला जर उतरती कळा लागली तर ती सध्या घरात वावरत असलेल्या माणसांच्या कर्मामुळे असते, वास्तूचा ह्यात काहीच संबंध नाही . जर वास्तूत काही कारणाने दोष असता तर मग तीच वास्तू इतके अनेक वर्षे मागील पिढ्यांना सुख कशी देवू शकली हा अभ्यासाचाच विषय होईल नाही का?
पूर्वी वडिलांच्या नावावर असलेले घर आता तुमच्या नावावर आले आणि घराला उतरती कळा लागली तर स्वतः मधील दोष शोधा वास्तुमधील नाही हे साधे सरळ गणित आहे.
आपण आपल्या विचारांनी आणि स्वतःच्या कुकर्मांनी आपली वास्तू दूषित करतो. पूर्वी मानवाचे वास्तव्य गुहेत होते . कालांतराने तो झोपडी किंवा कुटी बांधून राहू लागला . आधुनिक काळातील मानवाने दगडविटांच्या पक्क्या घरात रहायला सुरवात केली.
ह्या वास्तूत त्याची प्रगती जरूर झाली आणि जीवनात आनंद , स्थिरता आली. काही जणांच्या नशिबात स्वतःची वस्तू नसते , अनेकांचे आयुष्य घर करण्यातच खर्ची होते म्हणूनच म्हणतात ना “ घर पाहावे बांधून ” काही जणांना आपल्या आई वडिलांच्या पुण्यायीने वडिलोपार्जित घर मिळते पण स्वतःचे घर नशिबात नसते. अनेकांची घरासाठी ससेहोलपट होते ,तर अनेकांना जीवनाच्या अखेरपर्यंत भाड्याच्या घरात राहावे लागते आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी जे जतन करून ठेवले आहे ती वास्तू दुषित होवू न देणे हे आपले परम कर्तव्य आहे.
कुठल्याही वास्तूमध्ये एका रात्रीत वास्तुदोष निर्माण होत नाही . अनेक उलटसुलट गोष्टी वारंवार घडल्याने घरातील पंचभूतांचा समतोल बिघडतो आणि वास्तूत दोष निर्माण होतो.
आपल्या घरात जर पैसा टिकत नसेल, सौख्य लाभत नसेल , आपल्या कडून देवाचे काहीच होत नसेल , वेळी अवेळी पूजा किंवा व्रत वैकल्ये, कुलाचार होत नसतील , आजारपण किंवा घरात अन्न फुकट जात असेल , घरातील उपवर मुलामुलींच्या विवाहात अडथळे येत असतील , नोकरी व्यवसाय जेमतेम चालणे , घरातील लहान मुले सतत चिडचिड , वस्तूंची आदळआपट करत असतील , सतत तणाव असेल , सर्व असूनही आनंद नसेल , एकमेकांचे विचार पटत नसतील तर समजून जायचे कि आपल्या वास्तूत काहीतरी दोष निर्माण झाला आहे.
आपल्या हातून संतापाच्या भरात वाट्टेल ते बोलले जाते , शिव्याशाप देणे. अभद्र बोलणे ह्या गोष्टी घडतात . आपल्या प्रत्येक कृतीवर वास्तू
“ तथास्तु “ म्हणत असते, ह्याचे भान असुदे.
मुळात वास्तूमध्ये वास्तुदोष का निर्माण होतात ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्यावर आधुनिकीकरणाचा इतका पगडा असतो कि ह्या गोष्टी समजून घ्याव्यात असे आपल्याला वाटत सुद्धा नाही आणि मग गोष्टींचा अतिरेक झाला कि आपण हजारो रुपये घालून वास्तूपरीक्षण करून घेतो.
आपल्या वास्तूचा मुख्य दरवाजा अमुक अमुक दिशेस आहे, पाण्याची टाकी इथे आहे आणि स्वयपाकघर तिथे आहे म्हणून वास्तू दोष निर्माण झाला ह्याबद्दल चर्चा ऐकू येतात पण हे सर्वप्रथम डोक्यातून काढून टाकले पाहिजे. आज काळ शहरात घरे दाटीवाटीने असतात , आजकाल इमारत बांधताना वास्तुतज्ञांची पण मदत घेतली जाते. घराचे allotment करताना अनेक वादही होतात कारण प्रत्येकाला पूर्व पश्चिम उत्तरेकडचे घर हवे असते पण प्रत्येकाला असे स्वतःच्या पसंतीचे घर मिळणे नेहमीच शक्य नाही .
दक्षिण दिशेस मुख्य दरवाजा नको कारण ह्या दिशेस दरवाजा उघडणार्या घरात त्रास असतो हे पिढ्यानपिढ्या चाललेले चुकीचे विचार काढून टाकले पाहिजे. दक्षिण , पश्चिम दिशा वाईट हे विचार सर्वप्रथम आपण मनातून हद्दपार केले पाहिजेत .
अभ्यासासाठी आपण एखद्या इमारतीची रचना बघुया . जिथे काही घरांचे दरवाजे दक्षिणेस उघडतात तर काही पूर्वेस . अभ्यासाअंती असे दिसून येयील कि दक्षिणेकडे दरवाजे उघडणार्या काही घरात त्रास आहे तर काही ठिकाणी अत्यंत भरभराट , आनंद आहे . अगदी तसेच पूर्वेकडे दरवाजा उघडणाऱ्या घरांमध्येही कुठे अत्यंत तापदायक स्थिती तर काही ठिकाणी सुख समृद्धी पाहायला मिळाले. जर दक्षिण दिशा वाईट असती तर सगळीकडे एकच त्रास अनुभवायला मिळाला असता पण तसे दिसत नाही .
याचाच अर्थ दक्षिण किंवा पश्चिम दिशा वाईट आणि पूर्व किंवा पश्चिम दिशा चांगली असा सरसकट अर्थ आपण काढू शकत नाही ,पटतंय का?
मंडळी , घराचा मुख्य दरवाजा ज्याला आपण घराचे प्रवेशद्वार म्हणतो त्यास वास्तूशास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे. वास्तूचा हा दरवाजा कुटुंबाचा आरसा असतो. तो घरातील माणसांबद्दल बरेच काही सांगून जातो .
आजकाल आपण कुठेही गेलो कि काहीतरी विकत आणतोच. एखाद्या प्रदर्शनाला भेट दिली ,तेथे एखादी वस्तू आवडली कि तिचा प्रवेश घरात झालाच म्हणून समजा. त्यासारखी एक वस्तू आधीच आपल्या घरात असते पण म्हणतात न हौसेला मोल नाही . अनेक प्राचीन दुर्मिळ वस्तू मग त्या समया असुदेत कि मोठ्या फुलदाण्या . एक न दोन अनेक गोष्टी घरी आणल्या जातात. सुरवातीला त्याची निगा राखली जाते पण कालांतराने त्यावर धुळीचे साम्राज्य होवून वस्तू असलेल्या जागी वास्तू दोष निर्माण होतो. आपली वास्तू म्हणजे फर्निचर चे दुकान नाही. आवडले कि कुठलीही गोष्ट आपण घरी आणतो , त्याची खर्च गरज नसते. ह्या वस्तू घरात फक्त अडगळ म्हणून राहतात . श्री गणेश किंवा आपले इष्टदैवत ह्यांचे असंख्य फोटो आणि मूर्ती आपल्या घरात असतात . घरात देव्हारा सोडून मूर्ती किंवा फोटो नसावा .
प्रत्येक खोलीत वेगळे घड्याळ असते आणि प्रत्येक घड्याला वेळ मात्र वेगवेगळी दर्शवते .हाही एक दोषच आहे ह्यावरून कुटुंबातील सर्वांची मते वेगवेगळी आहेत असे जाणवते. लग्नाच्या पत्रिका त्या जोडप्यास मुले झाली तरी आपल्या संग्रही असतात, त्या लग्न झाले कि फेकून दिल्या पाहिजेत. खरतर ६ -८ महिने ज्या गोष्टी आपण वापरल्या नाहीत त्या सर्व टाकून दिल्या पाहिजेत. घरातील बंद पडलेल्या वस्तू जसे घड्याळे , टाईप राईटर, मोबाईल अश्या गोष्टी एकत्र चालू करून ठेवा अन्यथा फेकून द्या .
आपल्याला सगळे सतत जमवायची हौस असते. श्री स्वामी समर्थानीही भक्तांना म्हंटले आहे , “ अरे ,किती जमवशील आणि कश्यासाठी हि हाव ..? कारण हे जमवणे म्हणजे अग्नीत तुपाची धार ”.
मंडळी ,घरातील स्वछ्यता, टापटीप , घरात रोज केर काढून जमीन गोमुत्राने अथवा खड्या मिठाने पुसून घेणे , वस्तू जागच्या जागी असणे, स्वयपाकघरातील नीटनेटकेपणा, घरात अन्नाची नासाडी होवू न देणे, घरातील गृहिणीने आनंदाने घरात स्वयपाक करणे, कुटुंबातील कुलाचार यथाशक्ती पार पाडणे, घरात आल्यागेलेल्याचे हसतमुखाने केले जाणारे आदरतिथ्य ,एकमेकांशी असलेला संवाद , सहकुटुंब भोजन करणे , सकाळ संध्याकाळ वेळेत घरातील देवांची पूजा ,दिवाजवळ दिवा लावणे ह्या सर्व गोष्टींचे पालन म्हणजेच “ घराचे वास्तुशास्त्र ” .
काही घरात गेल्यावर घरात कुबट वास येत असतो तसेच सर्वत्र पसारा असतो . वर्षानुवर्ष तो तसाच असतो , अशी वास्तू काही चांगले फळ देयील हे दुरापास्त आहे .
सर्वात महत्वाचे म्हणजे घराचा मुख्य दरवाजा , प्रवेशद्वार .आजकाल शहरातून आपल्याला अत्यंत आधुनिक पद्धतीची ,सुशोभित घरे आणि त्यांचे दरवाजे पाहायला मिळतात . घराचा दरवाजा कित्येक ठिकाणी खूप जास्ती सजलेला असतो , काय मिळेल ते तिथे लावलेले असते. अनेक प्रकारच्या देवांच्या मूर्ती दरवाज्यावर असतात तार अनेक दिव्यांचा प्रकाशझोत असतात . दरवाज्याच्या दोन्ही बाजूस सुशोभित फुलांची झाडे असतात . घराच्या मुख्य दरवाज्यातून सुख दुख , आनंद , लक्ष्मी अलक्ष्मी ,संकटे ,मानहानी , वैफल्य , नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करत असते . घराचा दरवाजा पुसून उंबरठ्यावर आणि बाहेर सुबक रांगोळी काढणे , आणि संध्याकाळी घराबाहेर तुळस असेल तर तुळशीजवळ दिवा लावणे ह्या गोष्टींमुळे घरात शांतता प्रस्थापित होते , घरातील सकारात्मक लहरींचे प्रमाण वाढते. घराचा उंबरठा आणि दाराची संपूर्ण चौकट एकाच स्वरुपाची असावी , शक्यतो उंबरठा लाकडाचा असावा नसेल तर संपूर्ण चौकट संगमरवर अथवा लाकडाची असावी. घराला दोन दरवाजे असतील तर दोन्ही दरवाजे नीट आसवे, कुठे तुटलेले नसावे,घराचा दरवाजा अलगद लावावा, तसेच घराच्या दारावर सणासुदीला फुलांचे तोरण बांधावे.पण ते दुसर्या दिवशी काढून टाकावे कारण त्याचे दुसर्या दिवशी निर्माल्य होते.
काही लोकांकडे सण संपला तरी १५ दिवस काय महिनोंमहिने ते तोरण तसेच असते. घराच्या मुख्य दरवाज्यात कुणाशीही बोलत उभे राहू नये. घराचा दरवाज्यातून काय आत येते ते त्याचा वरती उल्लेख केलाच आहे. त्यामुळे घराच्या मुख्य द्वारात उभे राहून गावगप्पा मरणार्यांच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि आली तर ती टिकत नाही. घरात क्लेश , माणसात दुरावा आणि घरातील माणसाना बरे न होणारे दीर्घ काळचे आजार होवू शकतात . घराच्या दरवाज्यात आतबाहेर गप्पा केल्यामुळे दरवाज्यातच नकारत्मक उर्जा तयार होते आणि त्याचे अत्यंत वाईट परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात . पूर्वीच्या काळी घरातील स्त्रीयांना घराच्या दरवाज्यात येण्यास मज्जाव असे, त्या आतमध्ये स्वयपाकघरात किंवा माजघरात बोलत असत .
आता तुम्हीच ठरवायचे कसे वागायचे ते.
घराचा मुख्य दरवाजा कुठल्याही दिशेने उघडत असावा तो वाईट नक्कीच नाही. त्यामुळे त्यात मनात संदेह असू नये.
दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना
शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा
शुभंकरोती कल्याणम्, शुभंकरोती कल्याणम्
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशांदिशांतुन या लक्ष्मीच्या, दिसती पाउलखुणा
या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळेजीवना
दिव्या-दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार
दिव्यास पाहुन नमस्कार हा, रिवाज आहे जुना
आपल्या वास्तूचा आणि पर्यायाने कुटुंबाचाही उत्कर्ष होण्यासाठी आपण आपली नित्यकर्मे अत्यंत प्रामाणिक पणे करावीत , योग्य धनसंचय करावा, दारात आलेल्या याचकास विन्मुख जावू देवू नये, आपापल्या परीने सण साजरे करावेत , घरातील लहान मुलांची दृष्ट काढावी , जमेल तसे यथाशक्ती दान करावे. आपल्या घरातील सकारत्मक उर्जा आपल्यालाच जागृत ठेवायची आहे. त्यामुळे आपले घर आपल्या मनातील चांगल्या विचारांनी अभेद्य ठेवावे. ह्या सर्वांमुळे मुलांच्या मनावर आणि एकंदरीत पिढीवर उत्तम संस्कार होतात , घरातील मुलांना चांगले वळण लागेल आणि त्यांना कुठलेही व्यसन लागणार नाही . आपल्या मुलांची उत्तम शिक्षणे होतील. घरात प्रत्येकाने आपल्या कुलस्वामिनीचा आणि इष्टदेवतेचा जप करावा. त्यामुळे घरातील अशुभतेचा नाश होवून सकारात्मकता वाढीस लागते.
घरामध्ये कुठल्याही प्रसंगात जर एखाद्या सवाष्णीचा अपमान झाला तर तिचा शाप आपले घरदार उध्वस्त करतो. त्यामुळे कुलाचार , हळदीकुंकू असे समारंभ करताना आलेली प्रत्येक स्त्री देवीचे स्वरूप आहे असे मानावे. कुणाला न बोलवून अपमान करू नये कारण अश्याने दुसर्याचे मन दुखावते आणि त्याचा त्रास आपल्या कुटुंबास होतो.
आजकाल आधुनिकीकरणाच्या नावाखाली स्त्रिया बरेच ठिकाणी मासिक धर्म पाळत नाहीत . आपल्या घराण्याच्या रिती , परंपरा आणि मुल्ये जतन करावीत आणि त्याचे पालन करावे . जमत नसेल तर काहीच करू नये पण निदान अश्या चुका करून संकटे ओढवून घेवू नयेत. आपली कर्मे उत्तम करावीत , वास्तूत परनिंदा करू नये . आपल्या प्रत्येक शब्दावर वस्तू तथास्तु म्हणत असते ह्याचे भान ठेवावे.
मंडळी अश्या अनेक वाईट कृत्यातून हळूहळू वास्तूचे पावित्र्य कमी होत जाते आणि मग वास्तुदोष निर्माण होतो. अनेक गोष्टीं वारंवार घडत गेल्या कि त्याचे नकारात्मक पडसाद आपल्या वास्तूत नाही उमटले तरच नवल.
अत्यंत श्रद्धायुक्त मनाने केलेली देवपूजा , कुलस्वामिनी आणि इष्टदेवतेचे नामस्मरण केले तर ती देवताच आपल्याला संपूर्ण दिवस सांभाळते .संध्याकाळी घरातील मुलांनी TV बघण्यापेक्षा शुभंकरोति म्हणावे . लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयी मुलांचे आयुष्य समृद्ध करतात आणि त्यांना चांगल्या वाईट गोष्टींसाठी ज्ञात करतात .आपल्या घरातील मंडळींनी मोठ्यांचा मान ठेवला तर घरातील लहान मुलेही त्याचे निश्चितपणे अनुकरण करतात . कितीही राग आला तरी घरातील स्त्रियांनी स्वयपाकघरात भांड्यांची आदळआपट करू नये. त्याने काय साध्य होणार आहे? काही घरात दोन पिढ्यात इतका दुरावा असतो कि शेवटी घरातील त्रासाला कंटाळून घरातील वृद्ध मंडळीना वृद्धाश्रमाचा रस्ता धरण्यास पर्याय नसतो. वृद्धाश्रमात कुणी मनापासून जात नाही .त्यांनीच पैपै करून जमवलेला संसार सोडून जाताना त्यांच्या मनाला किती क्लेश होत असतील आणि त्याचा सर्वच परिणाम वास्तूवर होतोच. घरातील शांततेवर विरजण पडते, नात्यातील दरी रुंद होते ,एकमेकांवरील प्रेमाला ओहोटी लागते आणि नकळत वास्तुदोष निर्माण होतो. कधीकधी आयुष्यात येणाऱ्या अनेक कटू प्रसंगामुळे आपण घरात काही अभद्र शब्द वापरतो , घरातील माणसात राग रुसणी होतात त्यात होणार्या शाब्दिक चकमकींचा परिणाम घरातील मुलांवर तसेच वास्तूवर पण होतो .
कुटुंबातील भाऊबंदकी हेही वास्तु दोषाचे प्रमुख कारण आहे. कधी कधी मुलांचे नोकरी निम्मित्ताने परदेशी वास्तव्य होते किंवा सर्वच जण आपापली वास्तू घेतात . काही कुटुंबात एकापेक्षा जास्ती मुले असली कि त्यांना आपापली जागा घेवून बाहेर पडावे लागते. एखाद्या अपत्यास आर्थिक विवंचनेमुळे तिथेच राहावे लागते पण हि वास्तू पुढे त्यास आणि त्याच्या कुटुंबास कधीही लाभत नाही . एकतर त्याने ती विकून दुसरीकडे जावे अन्यथा त्याची ठराविक रक्कम भावंडास द्यावी कारण अश्यावेळी भाऊबंदकी आड येते .वरवर उघड कुणी बोलले नाही तरी आज पैसे कुणाला नकोय आणि पैसा कितीही मिळाला तरी तोच दुरावा निर्माण करतो हे कटू सत्य आहे.हि जर आईवडिलांची मूळ जागा असेल तर त्यावर सर्वांचा समान हक्क असतो , आईवडिलांच्या प्रेमापुढे कुणी उघड बोलले नाही तरी मनात हाव असते आणि त्यातून क्लेश निर्माण होतात .एखाद्याला घर मोठे दिले एखाद्याला लहान , अगदी उच्चभ्रू कुटुंबातून देखील हि स्थिती आज पाहायला मिळते.
मंडळी, ज्योतिषशास्त्राचा विचार केलात तर पत्रीकेतील चतुर्थस्थान आणि चतुर्थेश शुभ योगात असेल किंवा त्यावर गुरूची दृष्टी असेल ,शुक्र गुरु आणि मंगळ सुद्धा शुभअसतील, चतुर्थ स्थानाशी निगडीत महादशा असेल तर स्वतःची उत्तम वास्तू होणार ह्यात शंकाच नाही . पण मुळातच स्वतःची वास्तू होण्याचेच योग नसतील तर सर्व व्यर्थ आहे.
मंडळी घराला खरे घरपण हे घरातील माणसांमुळे येते.
घरातील आनंद , सौख्य एकमेकांबद्दल असणारे प्रेम ,आदर म्हणजेच आपल्या घराचे खरे “ वास्तुशास्त्र ” आहे असे मला वाटते .
लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.
Antarnad18@gmail.com
अस्मिता