|| श्री स्वामी समर्थ ||
पत्रिकेतील १२ स्थाने काय दर्शवतात |
लेख क्र. 2.
मंडळी , पत्रिकेचे विभाजन १२ भावात (स्थानात) झाले आहे आणि ह्या पलीकडे आपले आयुष्य नाही. सोबत असलेल्या पत्रिकेत प्रथम स्थानात १ अंक आहे ,जे प्रथम स्थान दर्शवते . अश्या प्रकारे पत्रिकेतील १२ स्थाने आहेत . १२ अंक हा व्ययस्थान शेवटचे स्थान दर्शवतो. प्रत्येक स्थान विशिष्ठ गोष्टी सूचित करते . जसे प्रथम स्थानावरून आपले स्वतःचे व्यक्तिमत्व समजते. अश्याप्रकारे प्रत्येक स्थान आणि त्यातील ग्रह आपल्याला बर्याच गोष्टी सूचित करतात .
जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवणारी रास म्हणजे आपले लग्न किंवा लग्नराशी . प्रथम स्थानात चंद्र किंवा शुक्र असेल तर व्यक्ती देखणी , रंगाने गोरी असते . चेहरा गोल असतो . हर्शल ह्या स्थानात असता व्यक्तीचा स्वभाव विक्षिप्त असू शकतो. २रे स्थान आपले कुटुंब ,वाणी आपले बोलणे, कुटुंबाकडून मिळणारे धन आणि आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी सांगते.चंद्र शुक्र गुरु असतील तर गोड बोलण्याकडे आणि खाण्याकडे कल असतो तर येथील मंगळ वाणी जहाल करतो तसेच तेलकट चमचमीत खाणे पसंत असते. येथील राहू व्यसनेही दर्शवतो. शनी असल्यास मितभाषी आणि वेळ प्रसंगी मनावर जखमा करणारे कायद्याची भाषा बोलणारे असणारे असतात . हर्शल असेल तर आर्थिक स्थिती आयुष्यभर तशीच राहते. ३ र्या स्थानात शनी मंगळ ,किंवा रवी , राहू असता व्यक्ती पराक्रमी , धीट असते. ह्या स्थानातील पाप ग्रह आपल्याला पराक्रमी बनवतात पण शेजार्यांशी ,भावंडांशी संबंध चांगले ठेवत नाहीत. ३र्या स्थानावरून जवळचे प्रवास पहिले जातात ,इथे चंद्र असेल तर आयुष्यात पुष्कळ प्रवास होतात . ३र्या स्थानातील अशुभ ग्रहांची युती जास्तीकरून मंगळाशी भावंडांच्या बाबत एखादी अशुभ घटना दर्शवते . लहान भावंडांशी पटणे कठीण होते .
पराक्रम स्थानात गुरु सारखा ग्रह काही अंशी निष्फळ ठरतो परंतु गुरु सारखा शुभग्रह हस्ताक्षर सुरेख वळणदार आणि मोठे असते . पापग्रह असतील तर अक्षर वाचताही येत नाही . इथे पापग्रह असता म्हातारपणी कमी ऐकू येते. ४थ्या स्थानाचा स्वामी जर ३ र्या स्थानात असेल तर मानले तर सुख असेच म्हणायला लागेल. कारण चतुर्थेश चतुर्थेशाच्या व्ययात . चतुर्थ स्थानावरून मातेचे सुख , वाहन , घर आणि शिक्षण पाहिले जाते.. तिथे गुरु किंवा शुक्र ह्यासारखे ग्रह उत्तम वाहन आणि घराचे सौख्य देतात .तिथे बुधासारखा ग्रह एकापेक्षा अनेक वास्तू प्रदान करतो. पण चतुर्थ स्थानात जर शनी मंगळ युती राहू मंगळ युती शनी केतू युती ह्या सारख्या युती नमूद केलेल्या गोष्टीत न्यूनता आणतात . ४थ्या स्थानात मंगळ धुमसत राहतो , घरात सतत मनाविरुद्ध घटना ,वाद होतात . येथे हर्शल असता आई मुलाच्या नात्यात वैचित्र्य असते . स्वयपाकघरात काम करताना काळजी घ्यावी लागते. ३र्या स्थानावरून आपले अंतर्मन सुद्धा पहिले जाते आणि ४थ्या स्थानावरून आपले मन . ५ वे स्थान संतती ,प्रेम प्रणय विद्या दर्शवते. येथील पंचमेश ७व्या स्थानात किंवा सप्तमेशा सोबत पंचमात किंवा सप्तमात असेल तर प्रेमविवाह होण्याची शक्यता अधिक असते. ५ व्या स्थानात चंद्र ,गुरु किंवा शुक्र असेल तर संतती बुद्धिमान आणि आज्ञाधारक, देखणी असते. ५ वे स्थान हे पुर्व कर्माचेही स्थान आहे .
सट्टा बाजार ह्यातील यशापयश येथून पहिले जाते . तिथे राहू ,राहू नेप युती असेल किंवा राहू असेल तर संतती सौख्य मनासारखे मिळत नाही. तिथे रवीबुध असतील तर संतती हुशार असते. ६ व्या स्थानावरून आजार , स्पर्धात्मक परीक्षात मिळणारे यश आणि सवत पहिली जाते .६ वे स्थान म्हणजे रोग ऋण आणि शत्रू स्थान . ६ व्या स्थानात राहू असेल तर सर्वाना पुरून उरतो. इथे राहू मंगळ युतीत असतील तर पोटाचे विकार ,आणि एकदातरी टायफॉईड होण्याची शक्यता असते .आयुष्यातील शत्रु ह्या स्थानावरून पाहतात तसेच घरात काम करणारे नोकरचाकर सुद्धा ह्य्च स्थानावरून पाहतात . ७ व्या स्थानात हर्शल किंवा हर्शल नेप असतील तर लग्न जमताना व्यवस्थित चौकशी करावी कारण फसवणूक होण्याची शक्यता असते , नुसता हर्शल असेल तर विवाहात वैचित्र्य आढळते तसेच पती किंवा पत्नी विजोड असतात . कधीकधी आकस्मिक विवाह होतो तर कधी होतही नाही. इथे शनी सारखा ग्रह असेल तर विवाहास विलंब सर्वसाधारण पणे वयाच्या 30 नंतर विवाह होतो . चंद्र असेल तर पत्नी चांगली मिळते . अर्थात हे सर्व ग्रह कुठल्या राशीत आहेत ह्यावरही बरेच काही अवलंबून आहे . विवाह हा खूप मोठा विषय आहे त्यावर आपण पुढे अभ्यास करणारच आहोत.
८ व्या स्थानात शनी असेल तर तो आयुष्य वृद्धी करतो . अष्टमेश उत्तम स्थितीत किंवा अष्टमात असेल वडिलोपार्जित इस्टेट मिळतेच . अष्टम स्थान हे मृत्युस्थान म्हणून ओळखले जाते. गंडांतर योग ८ व्या स्थानातून पाहतात .पण अष्टमेश कुठला ग्रह आहे हेही महत्वाचे. ९ वे स्थान म्हणजे भाग्यस्थान. ह्यातील गुरु शनी केतू हे ग्रह अध्यात्मिक प्रगती दर्शवतात . राहू भाग्यात अडथळे निर्माण करतो पण तो साधना अध्यात्मिक प्रगतीही दाखवतो. ९ व्या स्थानावरून वडिलांचा बोध होतो. १० व्या स्थानावरून नोकरी व्यवसाय पहिला जातो. इथे जर हर्शल नेप सारखे ग्रह असतील तर अनेक वेळा नोकरीमध्ये बदल होतात . १० वे स्थान हे मान सन्मानाचेहि आहे . ११ व्या स्थानाला लाभ स्थान म्हणतात . हे पत्रिकेतील महत्वाचे स्थान कारण आयुष्यात होणारे सर्व लाभ हे ११ व्या स्थानावरून समजतात . मोठा भाऊ इथून पाहतात .इथे चंद्र असेल तर स्त्री वर्गाकडून लाभ होतो . ११ वे स्थान हे मुख्यत्वे मित्रांचे स्थान आहे. ११ व्या स्थांनामध्ये शुक्र हर्शल किंवा शनी मंगळ ह्यासारखे ग्रह असतील तर कदाचित चुकीच्या संगतीने आयुष्य वेगळ्या वाटेवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवनात संगत फार महत्वाची आहे. आपल्या बरोबर असलेल्या लोकांवरून आपली ओळख होत असते. १२ वे स्थान म्हणजे व्यय स्थान . १२ व्या स्थानावरून परदेशगमन, तुरुंगवास, दवाखाना ज्ञात होतात. १२ व्या स्थानात गुरु राहू शनी परदेश गमनास पूरक असतात . शनी , गुरु असेल तर पश्चिमेकडील देश ,राहू असल्यास यवनांचे देश यात भाग्योदय होतो. २र्या स्थानाचा मालक जर १२ व्या स्थानात असेल तर अश्या व्यक्तीकडे पैसा टिकत नाही त्याचा व्यय होतो.
प्रथम स्थानापासून बारावे स्थान ज्याला व्यय स्थान म्हणतो तिथपर्यंत प्रत्येक स्थान आपल्याला काय देते हे ह्या कोष्टकात लिहिलेले आहेच. आपली पत्रिका उघडून पहिलीत तर अनेक गोष्टींचा खुलासा तुमचा तुम्हालाच होईल.
मंडळी, शनी हा प्रत्येक गोष्टीत विलंब करतो. चंद्र हा अत्यंत जलद गतीने जाणारा ग्रह आहे म्हणूनच चंद्र एका राशीत सव्वा दोन दिवस तर शनी एका राशीत अडीच वर्षे असतो . शनीचे लग्न म्हणजेच मकर किंवा कुंभ लग्न असेल तर ज्योतिषाला सुद्धा अश्या जातकाची पत्रिका करायला आणि बघायलाही काही ना काही कारणाने विलंब होतो. शनी ज्या स्थानात असेल त्या गोष्टीस विलंब करतो . जसे ५ व्या स्थानात असेल तर संतती होण्यास विलंब होतो तसेच ८ व्या स्थानात असेल तर दीर्घायुष्य देतो. अश्याप्रकारे आपण आपल्या पत्रिकेचा अभ्यास स्वतःच करू शकतो. आपल्या ओळखीत अगदी वयाची ९० वर्षे पार करणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत बहुतांश वेळेला शनी ८ व्या स्थानात असेल. शनीचे लग्न म्हणजेच मकर किंवा कुंभ असणार्या व्यक्ती सडपातळ बाधा असणार्या आणि सावळ्या ,उंच असतात. पत्रिकेत ८वे स्थान वडिलोपार्जित संपत्ती दर्शवते अर्थात ती जमीनजुमला किंवा आर्थिक म्हणजे रोख रक्कम ह्या स्वरूपातही असते आणि ८ व्या स्थानाचा मालक ग्रह सुस्थितीत असेल तर ती मिळते अन्यथा नाही. कधीकधी ती मिळूनही तिचा उपभोग घेणे नशिबात नसते. वडिलोपार्जित संपत्ती वरून घरे पेटतात आणि नात्यात दरी निर्माण होते तीही कायमची हे सर्वश्रुत आहे.
मंडळी तर आज ह्या १२ भावांचा अभ्यास करताना तुमच्या हे नक्कीच लक्ष्यात आले असेल कि आपले प्रश्न हे ह्या भावांशी निगडीत असतात . नोकरी व्यवसायाचा प्रश्न १० भावावरून तर लग्नाचा २ ७ ११ ह्या भावांवरून , आजारपण , परदेशगमन १२ व्या भावावरून तर वाहनसौख्य ४ ११ ह्या भावांवरून पहिले जाते. नोकरी जाणे किंवा स्वेछ्येने सेवानिवृत्ती घेणे ह्यासाठी ९ आणि २ भावांचा विचार होतो. उच्च शिक्षणासाठी ९ वा भाव आणि परदेशातील उच्च शिक्षणास ९ १२ हे भाव विचारात घ्यावे लागतात .प्रत्येक भाव किंवा स्थान पुढील भावाचे अथवा स्थानाचे सुख देत नाही . जसे ६ वे स्थान कार्यान्वित झाले तर स्पर्धात्मक परीक्षेत यश येयील पण विवाह जमण्यास अडचणी कारण ६ च्या पुढील स्थान म्हणजे ७ वे स्थान त्याचे फळ मिळणार नाही.
जेव्हा आपण नोकरीचा प्रश्न पाहतो तेव्हा अर्थात १० व्या स्थानाचा विचार करतो . १० व्या स्थानाचा संबंध ३ ९ किंवा १२ शी येत असेल तर नोकरीचे स्थान दूरवर किंवा फिरतीचे असते ,त्याउलट ४ त्या स्थानाशी संबंध येत असेल तर नोकरी घराजवळ असू शकते. सर्व करारमदार, अग्रीमेट ३ र्या स्थानावरून पहिले जातात तसेच मिडिया क्षेत्र हे ३ र्या स्थानावरून पहिले जाते. मेडिकल आणि इंजिनियरिंग ह्यातील शिक्षणासाठी ८ वे स्थान पाहतात .
काही माणसे आयुष्यात कधीच एकही पैसा न मिळवता हि उत्तम आयुष्य जगतात कारण त्यांचे पूर्वसुकृत . आणि कधी कधी अत्यंत कष्टात आयुष्य असणार्यांच्या पदरी काडीचेही सुख नसते. चंद्र मनाचा कारक त्यावरून आपल्या मनाची बैठक समजू शकते. ५ स्थान आपले पूर्वसुकृत दर्शवते . ५ स्थानावरून प्रथम संतती पाहायला मिळते . त्या स्थानात राहू किंवा नेप ,राहू , शनी राहू असतील तर त्या स्थानाच्या सुखात म्हणजेच संततीच्या सुखात वैगुण्य पहावयास मिळते.
९ स्थानावरून उच्चशिक्षण पाहतात. आजकाल MBA , MTch, MS असे उच्च शिक्षण घेताना CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात . स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी ६ वे स्थान आवश्यक आहे तसेच ९वे स्थानही . आजकाल ह्या परीक्षां साठी बरीच मोठी फी आकारण्यात येते त्यामुळे ह्या परीक्षेस बसण्यापूर्वी ज्योतिष सल्ला घ्यायला हरकत नाही . माझ्या घरातच उदाहरण आहे, माझा मुलगा नोकरी सांभाळून MBA चा अभ्यास करत होते ,खूप कष्ट घेत होता पण त्या वर्षी त्याला गुरूचा पाठींबा नव्हता . हि परीक्षा पुढील वर्षी दिलीस तर नक्कीच जास्ती चांगेल यश मिळेल हे त्याला सांगितल्यावर त्याने अभ्यास स्थगित केला पण परीक्षा दिली तेव्हा त्याला CET मध्ये ८३ % मार्क मिळाले आणि यानंतर च्या वर्षात ९९.४% इतके मार्क मिळवून यश मिळाले. मुद्दा हा कि आपल्या आयुष्यातील उत्तम काळ समजला आणि त्यावेळी कष्टांची जोड दिली तर तीच गोष्ट जास्ती चांगली होवू शकते . ८ व्या स्थानाशी मंगळाचा संबंध आला तर technical शिक्षण होवू शकते तसेच . ८ व्या स्थान हे मृत्य स्थान म्हंटले आहे. ८ व्या स्थानाशी निगडीत महादशा असेल तर विमा एजंट ची नोकरी किंवा तत्सम व्यवसाय लाभेल . मृत्युपश्चात अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दुकान सुद्धा चालू शकेल किंवा एखादे पौरोहित्य करणारे गुरुजी असतील तर मंगळागौर , सत्यनारायण ह्या पुजेऐवजी त्यांनी अन्तेष्टी दहावे तेरावे चे विधी करावेत . ६ , ७ आणि १० ह्या स्थानाचा संबंध असेल तर व्यक्तीचा ओढ व्यवसायाकडे असू शकतो. बांधकाम क्षेत्रात किंवा बांधकाम क्षेत्रातील agent म्हणून काम करताना पत्रिकेतील मंगळ उत्तम लागतो.
पत्रिकेत प्रत्येक स्थानाचे एक वेगळे वैशिष्ठ आहे आणि त्या भावानी दर्शवलेल्या गोष्टींसाठी त्या त्या भावाचा विचार करावा लागतो. पत्रिका बघताना आपले logic पावरावे लागते . एकदा आपल्याला प्रत्येक स्थान काय देते हे समजले कि पाया भक्कम होतो आणि मग प्रश्न सोडवताना बरोबर त्याच स्थानाचा आणि त्या स्थानाने दर्शवलेल्या गोष्टींचा विचार केला जातो. जसे ७ व्या स्थानाचे म्हणजे विवाह स्थानाचे भाग्यास्थान ३रे स्थान आहे. त्यामुळे विवाहसौख्य किंवा वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न आला आणि ३र्या स्थानात पापग्रह ठाण मांडून बसले असतील तर ज्योतिषी काय समजायचे ते समजतो.
असंख्य गोष्टींचा अभ्यास, अनेक नियम, ग्रहांची स्थिती ,महादशा आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करून ज्योतिषी एखादा निष्कर्षा पर्यंत येवू शकतो . प्रश्नकर्त्याला नेहमीच उत्तराची घाई असते . वरील विवेचनावरून हा अभ्यास किती सखोल आहे ह्याची झलक पाहायला मिळाली असेल . ज्योतिषाकडून एखाद्या प्रश्नासंबंधी मार्गदर्शन घेताना कारण नसताना घोड्यावर बसून जावू नका , त्याला त्याचा वेळ घेवू द्या , अभ्यास करूदेत नाहीतर अपुर्या अभ्यासामुळे आणि तुम्ही केलेल्या लगीन घाईमुळे उत्तर नक्कीच चुकू शकते ..मग ज्योतिषाच्या नावाने बोंबलायला आपण मोकळे ..तसे होवू नये म्हणून आपणही काळजी घेतली पाहिजे. कारण त्याच्या उत्तरावर पुढचे बरेच काही अवलंबून असते . इथे पी हळद हो गोरी हा नियम लागू पडत नाही. विशेष करून लग्नाच्या पत्रिका पाहताना अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो . अगदी प्रेमविवाह असेल तरी जोडप्याने ज्योतिष मार्गदर्शन घ्यावे असे आजकालची परिस्थिती पाहून वाटते .
लग्न ह्या विषयावरील लेखात त्या सर्व गोष्टी आपण पाहूच.
चलातर मग आपापल्या पत्रिकेतून स्थानाचा अभ्यास करण्यास सुरवात करुया . पुढील लेखात पत्रिकेतील ग्रह आणि त्यांच्या योगां बद्दल जाणून घेवूया.
अस्मिता
लेख आवडल्यास अभिप्राय जरूर लिहा
antarnad18@gmail.com