Wednesday, 3 June 2020

चंद्रमा मनसो जातः

||श्री स्वामी समर्थ ||



मनाचा कारक चंद्र 

आज नुसते गुगल सर्च केले तर आपले मन स्थिर कसे राहिल , चिंतन मनन किती गरजेचे आहे, मनाचा समतोल राखणे कसे आवश्यक आहे , ह्या आणि अश्या अनेक विषयावर बरीच माहिती वाचण्यास मिळते. ह्यासर्व गोष्टींचा आपल्याला नक्कीच फायदा होतो पण अंशतः. कुठलीही  अन्य व्यक्ती तुमचे मन संतुलित करू शकत नाही . मग हे कुणी करायचे असते तर तुम्ही स्वतःच . 

मन हे उदबत्तीच्या धुरासारखे सतत सैरभैर होत असते ,चंचल असते. मनाचा कारक चंद्रमा ..चंद्रमा मनसो जात: .मन स्वतःच्या काबूत असणे हे अवघड आहे परंतु अशक्य नाही . आपल्या आयुष्याचा संपूर्ण लगाम आपल्याच तर हातात आहे . 

चंद्र मनाचा कारक . मनाचे सौंदर्य चंद्रावर अवलंबून आहे. मन आणि अंतर्मन ह्यात सतत घालमेल होत असते . भरती ओहोटी सुद्धा चंद्रावरून बघितली जाते . ज्योतिष शास्त्राचा आधार घेता  चंद्र रवी युती हा अमावास्या योग दर्शवते . चंद्र रवी एकमेकांसमोर असतात त्यास पौर्णिमा म्हंटले जाते. चंद्ररवी युती हि ६ ८ १२ मध्ये असू नये. चंद्रासोबत जर हर्शल , शनी , राहू , केतू , बुध ह्यापैकी एखाद्या ग्रहाची युती असेल तर चंद्र बिघडतो आणि त्याची फळे म्हणजे मनाची अस्थिरता , वैफल्य ,नकारात्मक विचार ह्या गोष्टी दर्शवते . चंद्र नेपचून शुभयोगात व्यक्ती अध्यात्मिक ,गूढ विद्येची अभ्यासक आणि दृष्टी असते. चंद्र हर्शल युतीत आकस्मित मनाचा तोल जावून अचानक संतापणे ह्या गोष्टी अनुभवयास मिळतात. 


मन थार्यावर असले , शांत असले तर संपूर्ण शरीरही स्वस्थ्य राहते. अत्यंत बिघडलेला चंद्र मनाची असंतुलित अवस्था दर्शवतो तसेच अश्या व्यक्ती अमावस्या पोर्णिमा च्या आसपास सैरभैर होताना दिसतात . अर्थात ह्या सोबत चंद्र दुषित होण्याची अन्य कारणेही असू शकतात . अशांत मनामुळे वैफल्य , मानसिक आजार निर्माण होतात जे दिसत नाहीत . काही व्यक्ती कधी शांतच नसतात सतत hyper उद्विग्न झालेल्या असतात .मनाचा समतोल ढळला तर माणूस व्यसनाकडेही झुकू शकतो पुन्हा इथे नमूद करावयासे वाटते कि ह्यास अन्य ग्रहस्थिती सुद्धा कारणीभूत असते . प्रत्येक वेळी चंद्र बिघडला तर माणूस व्यसनी असेलच असे नाही .प्रत्येक वेळी परीस्थितीही कारणीभूत असते . घरात आपले वडील रोज घरी दारू पिऊन आईला मारतात ,धिंगाणा घालतात ह्याचा परिणाम घरातील चिमुकल्या जीवांवर नाही झाला तरच नवल.अश्यावेळी लहानपणापासून पाहिलेल्या गोष्टींचा इतका खोलवर परिणाम असतो कि ह्या मुलांचेसंगोपन करताना , भविष्य घडवताना विशेष काळजी घ्यावी लागते .

एखाद्यावेळी चंद्र फारच बिघडला असेल तर मग अनेक मानसिक आजार निर्माण होतात आणि मग अश्यावेळी मानसोपचार तज्ञांची गरज भासू शकते. 

मन आजारी असेल तर शरीरही आजारी पडते. काही व्यक्तींचा चंद्र इतका बिघडलेला असतो अश्यावेळी ह्या व्यक्ती आपल्यासमोर गप्पा मारत बसल्या असल्या तरी त्यांचे लक्ष्य भलतीकडेच म्हणजे मन सैरभैर झालेलं असते आणि त्यांच्या चेहऱ्यावरूनच ते आपल्याला समजते आणि आपण नकळत विचारतो “ लक्ष्य कुठे आहे ?”

 आपल्याला ह्या सर्व गोष्टीतून मार्ग नक्कीच काढता येतो . उपासना ह्यातून आपल्याला बाहेर काढते. रोज सकाळी लवकर उठून आपल्या दिनक्रमास सुरवात करण्याआधी जर नियमित उपासना केली तर आपले मन हळू हळू एकाग्र होण्यास मदत होते. सर्व गोष्टी लगेच होणार नाहीत पण संयम आणि विश्वास ह्या दोन शस्त्रांनी आपण मनाची लढाई जिंकू शकतो हे नक्की . मी मनाने कमकुवत आहे आणि मला खंबीर व्हायचे आहे हे सर्वप्रथम आपल्या मानाने स्वीकारले पाहिजे . तसे झाले तर आणि तरच केलेले उपाय फळास येतील. आपण स्वतःचाच अभ्यास केला पाहिजे . नक्की कधी ,कुठल्या परिस्थितीत किंवा कुठल्या गोष्टींमुळे  मला राग येतो ? किती वेळ राग टिकतो ? मी रागावतो आणि लग्गेच शांत होतो कि मी माझ्या रागावर अजिबात संयम मिळवू शकत नाही. मग त्या काळात मी कसा वागतो ? मनात कल्पविकल्प येतात का? रागाच्या भरात माझे सर्व शरीर कापत असते का ? मी उगीचच एकटाच शून्यात पाहत बसतो का? मनात कुढत बसतो का? मी व्यक्त होवू शकत नाही का ?एखादी गोष्टी माझ्या मानाविरुद्ध झाली कि मला संताप अनावर होतो कि मी सदैव चिडलेलाच असतो ? ह्या आणि अश्या  अनेक प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःच अभ्यासायला सुरवात करावी. काही व्यक्तींचा चेहराच इतका गूढ असतो कि त्यांच्या मनात काय चालू आहे ह्याचा थांगपत्ताही कधीच लागत नाही. 

विशेष करून लहान मुलांना अगदी लहानपणापासून सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला कि मनाचे श्लोक , रामरक्षा , शुभंकरोती ह्या गोष्टी आवर्जून शिकवल्याच पाहिजे त्यामुळे त्यांना देवाचीही गोडी तर लागतेच व मनाची बैठक तयार होते .आत्मविश्वास निर्माण होतो आणि मनाची एकाग्रता होवून अभ्यासातही प्रगती होते. काही मुले भयंकर हट्टी असतात, जरा त्यांच्या मनाविरुद्ध झाले कि घर डोक्यावर घेणे, डोके जमिनीवर आपटून घेणे , घरातून निघूनच जाणे ,अनेक उपद्व्याप करतात आणि मग त्यांना आवर घालता घालता शेवटी घरातील मंडळी त्यांच्या मनासारखे वागू लागतात जेणेकरून मूळ रडायचे थांबेल पण हा तात्पुरता उपाय झाला. आपण रडलो कि आपल्या मनासारखे होते हे मुलास समजते आणि मग ते निगरगट्ट होते .सर्व घरास वेठीस धरते किंवा आपल्या मनासारखे वागण्यास प्रत्येकाला भाग पाडते .अश्या गोष्टीना सुरवातीपासूनच आळा घातला पाहिजे .ओमकार आणि गायत्री मंत्र मुलांना लहानपणापासून शिकवला पाहिजे.


आपले कुलदैवत , कुलस्वामिनी , इष्ट दैवत ह्यापैकी कुठल्याही एकाचा जप करत असाल म्हणजे कराच तर त्यात सातत्य ठेवा . प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी आपल्या सत्कार्मांची , निष्ठेची आणि सातत्त्याची आहुती द्यावी लागते तरच त्याची फळे चाखावयास मिळतात . आपण जसे कपडे बदलतो तसे  देवही बदलतो . आज काय ह्याने सांगितले म्हणून हे केले मग उद्या दुसर्याने काही भलतेच सुचवले मग ते केले असे न करता आपल्याला आवडणाऱ्या देवतेची किंवा आपली पत्रिका उत्तम जाणकार ज्योतिषास दाखवून( अर्थात प्रथम त्याचे मानधन देवून ) योग्य मार्गदर्शन घ्यावे , किंवा सर्वात उत्तम आपल्या इष्टदेवतेचा जप करावा . पण जो कराल त्यात सतत बदल नको. अत्यंत निष्ठेने , एकाग्र चित्ताने ,आणि सर्वात मुख्य म्हणजे समर्पणाची भावना ठेवून करावा. खात्रीने सांगते ह्या सारखा उपाय नाही .मुहूर्त पाहून जपास प्रारंभ होतो पण काही दिवसांनी पुन्हा येरे माझ्या मागल्या कारण संयम नाही . रिझल्ट लग्गेच हवा असतो आणि त्यासाठी आवश्यक असणारा संयम मात्र अजिबात नसतो. 
कमकुवत चंद्र चांचल्य देतो आणि मनाची अवस्था कमकुवत करतो . अश्या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणत नैराश्य ,संभ्रमावस्था आणि त्या अनुषंगाने होणारे मानसिक विकार होतात . त्यांना खर्या आयुष्याला सामोरे जावून लढायची ताकद नसते आणि मग अश्यातच व्यसनाच्या आहारी जावून आपल्याच कोशात धुंद राहणे ,आत्महत्या करणे प्रसंगी दुसर्याचाही जीव घेणे ह्या टोकाच्या गोष्टी होवू शकतात . 
आपल्या मनावर जर ताबा मिळवायचा असेल तर तो स्वतःला आणि त्यासाठी साधनेची तपश्चर्येची , निश्चयाची आणि दुर्दम्य इच्छा शक्तीची गरज आहे जी तुम्हाला तुमची उपासना देवू शकते. ज्या देवतेचा जप करता तीच तुमची नैया पार करू शकते .


प्रत्येक गोष्ट सहजप्राप्त होत नाही पण मला ह्यातून बाहेर पडायचेच आहे हा निश्चय आणि अर्थात कुटुंबाचा पाठींबा तुमचे आयुष्य नक्कीच फुलवू शकते.. ह्या सर्वच उच्चाबिंदू म्हणजे ध्यान धारणा . ध्यानाने मन एकचित्त होते, स्थिर राहते  . सुरवातील जमत नाही अगदी २ मिनिटे सुद्धा आपण बसू शकत नाही . पण हळूहळू हे करायचेच हे एकदा मनी ठरवले कि मग सर्व अपोआप होवू लागते . सुरवातीला मनात खळबळ निर्माण होते . असंख्य विचारांची भाऊगर्दी होते आणि मन सैरभैर होते . कपाळावर असंख्य आठ्या घेवून नकोच ते असे सुरवातीला होते अगदी  बसलो कधी आणि उठलो कधी हे समजतच नाही . पण थोडा धीर धरला तर आयुष्यातल्या खर्या आनंदाला आपण मुकणार नाही हे नक्की. नियमित केलेला सराव आपल्याला मन शांत होण्यास मदत करते . काही दिवसांनी मग ध्यानाचीही गोडी लागायला लागते आणि मग हळूहळू त्याचा वेळ वाढू लागतो आपल्याही नकळत . आपण केलेल्या उपासना , ध्यानधारणा ह्याचा खचितच उल्लेख करू नये त्याने आपल्या साधनेत व्यत्यय येतात , त्यात खंड पडतो आणि आपल्याही नकळत अहंकार फुलतो. बाह्य जगापेक्षा आपल्या आतील जग हे कितीतरी जास्त पटीने सुंदर आहे ह्याची ह्याच देही ह्याच डोळा प्रचीती आपल्याला ध्यानातच येते. 
ध्यानामुळे सहज समाधी अवस्थाही प्राप्त होते आणि मग आपण ह्या विश्वाचाच एक भाग आहोत वेगळे काही उरतच अशी मनाची सहज अवस्था प्राप्त होते . 
अशक्य असे काहीही नसते ..केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.

अस्मिता


लेख आवडल्यास अभिप्राय जरूर लिहा 

Antarnad18@gmail.com