Thursday, 31 December 2020

आनंद पोटात माझ्या माईना

 ||श्री स्वामी समर्थ ||

 

गुरुपुष्याला पारायण करायचे म्हणून कधीपासून तयारी केली होती . वर्षाचा अखेरचा दिवस. हे वर्ष खरच लक्ष्यात राहण्याजोगे गेले पण शेवटच्या दिवशी गुरुपुष्य आले म्हणून शेवटचा दिवस खरच गोड झाला आणि नवीन वर्षाची सकाळ सुद्धा. काल दुपारी पारायण सुरु केले आणि गुरुपुष्य संध्याकाळी सुरु झाल्यावर २१ वा अध्याय वाचला .आरती केली नेवैद्य झाला. महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले म्हणून त्यांचे मनापासून आभार मानले.

माझ्या अनेक ओळखीचे लोक गेल्या काही दिवसात ई-पास घेवून शेगावला दर्शन करून आले म्हणून माझ्याही मानत सारखे येत होते कि आपण इथेच राहिलो आपल्याला दर्शन कधी होईल. महाराजांच्या एका कृपा कटाक्षाची अभिलाषी मी नेहमीच असते. पण म्हणतात ना भक्तांचे त्यांच्यावरील प्रेम, तळमळ त्यांना नक्कीच समजते आणि आपल्यावर त्यांचा वरदहस्त कायम असतोच ह्याचा पुन्हा एकदा अनुभव आला.

आज वर्षाचा पहिला दिवस. आज सकाळीच 5 वाजता walk ला गेले असताना माझ्या ओळखीचे एकजण माझ्या समोर आले आणि त्यांनी माझ्या हातावर शेगावच्या गजानन महाराजांचा प्रसाद ठेवला. सद्गदित झाले .पुढे माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल ते तुम्हाला समजलेच असेल. खरोखरच निशब्द झाले. आनंद पोटात माझ्या माईना ग माईना अश्या अवस्थेत घरी आल्यावर त्यांच्या फोटो कडे पाहून नमस्कार केला ,मनाने मी कधीच शेगावला पोहोचले होते. ..अग मुली शेगावला पण बोलवीन तुला पण आज प्रसाद पाठवलाय बघ नवीन वर्षाची सुरवात आनंदात कर असेच जणू ते मला सांगत होते. प्रसाद सर्वाना वाटला आणि आनंद द्विगुणीत झाला.

खरच २०२१ आपल्या सगळ्यांसमोर अनेक आव्हाने, व्यवसायातील अनेक संधी घेवून उभे ठाकले आहे. सगळ्यात सांभाळायची आहे ती आपली प्रकृती आणि मानसिकता. हे सर्व करताना प्रत्यक्ष सद्गुरूकृपा लाभली तर अजून काय हवे ? आणि त्यासाठी सतत आपल्या गुरूंचे स्मरण , नित्य उपासना ह्याची सातत्याने गरज आहे. आयुष्य कसेही असो कितीही चढउतार असुदेत आपण त्यांचे चरण सोडायचे नाही आणि नित्य सेवेत राहायचे इतकेच मला समजते . अनेक संकल्प आपण करत असतो अनेक आराखडे बांधत असतो ,आपल्या अध्यात्मिक सेवेचाही असाच आराखडा मी प्रत्येक वर्षी करते. कमीतकमी इतकी तरी सेवा झालीच पाहिजे कारण हि उपासनाच आपल्याला सुखाचे , समाधानाचे क्षण आणि शांत झोप मिळवून देयील.

आपल्या नित्य प्रापंचिक ,धकाधकीच्या जीवनातून सहज जमेल अशीच हि उपासना आहे ,करून बघा.

वर्षातून एकदातरी महाराजांचे दर्शन घ्यावे. वर्षातून निदान एका व्यक्तीला श्री गजानन विजय पोथी भेट द्यावी जेणेकरून वर्षातून आपल्याकडून एक भक्त महाराजांच्या सेवेत रुजू होईल.

वर्षातून २१ पारायणांचा नेवैद्य महाराजांना अर्पण करावा. प्रत्येक महिन्याच्या १ ते २१ तारखेपर्यंत रोज एक अध्याय असे प्रत्येक महिन्यात एक पारायण होईल.अशी वर्षातून १२ पारायणे होतील. प्रगट दिन , ऋषी पंचमी , गुरु पौर्णिमा , दत्त जयंती , माघी गणेश जयंती , श्रावण आणि मार्गशीर्ष गुरुवार ४ अशी २१ पारायणे वर्षातून करावीत . ह्या उपर जमेल तशी पारायणे करत राहावी ,मनात दृढ निश्चय हवा पुढे महाराज आपल्याकडून करून घेण्यास समर्थ आहेत . नित्य जमेल तसा महाराजांचा जप आणि मानसपूजा करावी. ह्या सर्वांमुळे साधनेत सातत्य राहते. संकट आले कि मग महाराज असे होत नाही.

शेवटी त्यांच्याकडे एकाच मागायचे आहे ..आमरण वारी घडो आणि सदैव तुमचे चिंतन राहो.

अस्मिता

 

 

No comments:

Post a Comment