Monday, 1 March 2021

गुरु से बडा गुरु का ध्यास

 || श्री स्वामी समर्थ ||



लहानपणी गजानन महाराजांचा प्रगट दिन जवळ आला कि माझा मुलगा मला म्हणत असे आई महाराज निघाले असतील का ग शेगाव हून इथे मुंबईला यायला . तूच म्हणतेस ना कि ते आपल्या भक्तांना भेटायला येतात . हा निरागस प्रश्न म्हणजेच भक्ती ,श्रद्धा आणि आपल्या गुरुंबद्दल वाटणारे निस्सीम अपार प्रेम. महाराज कसे येणार ह्या गर्दीतून हे असे प्रश्न अश्या निरागस जीवांनाच पडू शकतात. 

५ मार्च, २०२१ रोजी संत शिरोमणी श्री गजानन महाराज ह्यांचा प्रगट दिन आहे.  आज हे आठवले आणि वाटले महाराज पण अधीर असतील आपल्या सर्व भक्तांना भेटायला. घराघरातून सर्व भक्तजनांची महाराजांच्या स्वागताची तयारी जोरात सुरु झाली असणार , महाराजांच्या सेवेत काहीच कमी नको पडायला , पोथी वाचन , नामस्मरण , पारायण ..भक्तीला श्रद्धेला अपरंपार पूर येयील जणू . महाराजांना तरी कुठे करमत आपल्या लाडक्या भक्तांशिवाय तेही तितकेच आतुर असतील .

आज आधुनिक जगात तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे पण पूर्वी तसे नव्हते. महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्याबद्दल सांगितले आणि भक्तांचे लोंढे शेगावकडे येऊ लागले.

शेगावला महाराजांच्या दर्शनाला जायचे म्हंटले कि अगदी तिकीट काढल्यापासून आपण तिथेच असतो महाराजांच्या गादिशी. काहीच सुचत नाही आपल्याला. कधी एकदा त्यांचे दर्शन घेतो असे वाटते.

शेगाव ला गेल्यावर तेथील वातावरण मंत्रमुग्ध करते. मंदिराचा शांत परिसर , संस्थानातील  शिस्त , संयम , महाराजांच्या आरतीच्या वेळी एकाच वेळी सर्व ठिकाणाहून होणारा घंटानाद ..महाराजांना सलामी ठोकत त्यांना मानवंदना देणारे त्यांचे गज ,अश्व  खरच डोळ्यांचे पारणे फिटते. 

नुसते डोळे मिटले तरी शेगाव आणि उघडले तरी शेगाव अशी प्रत्येकच भक्ताची अवस्था असते. देवळाच्या परिसरात घातलेल्या १०८ प्रदक्षिणा , महाप्रसाद काय लिहू आणि किती लिहू असे झालेय मला. . महाराजांच्या सेवेचे हे मोठे दान त्यांनी आपल्या पदरात टाकले आहे खरच ज्यांना ज्यांना हे भाग्य मिळाले आहे , त्यांनी ह्यामागील अर्थ जाणून घ्यावा ,नित्य त्यांच्या सेवेत राहावे आणि आपले जीवन कृतकृत्य करावे. महाराजांच्या शाळेत एकदा नाव घातले कि मग ते जे करतील ते. नित्य सेवा करावी आपल्याला पाहिजे तेव्हा नाही तो व्यवहार झाला. महाराजांना आपला भाव समजतो ,आपल्या अंतकरणातील तळमळ सगळे त्यांना समजते त्यांना काहीच सांगायला नको. 

आजही आपली सर्व भक्तांची अवस्था काय वर्णावी ,महाराजांच्या शिवाय आता काही दिसेना असेच  झाले आहे. प्रगट  दिन कसा करायचा ,महाराजांच्या आवडीचे कुठले पदार्थ करायचे ,त्यांच्या फोटोला मूर्तीला कसे सजवायचे, महाप्रसादाला काय करायचे अहो एक ना दोन नुसती लगीनघाई झाली आहे. 

हा जो काय आनंद आहे तो मला खरच आज शब्दांकित करायला शब्दच सुचत नाहीत .हा ज्याचा त्यानेच अनुभवायचा आहे.  साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात ते अगदी खरे आहे. आपल्या आनंदाला पारावर राहत नाही . महाराजांच्या येण्याकडे आपले डोळे लागले आहेत . प्रगट दिनाला मंगलसमयी सनई च्या मंगल सुरात धूप दीप निरांजने लावून महाराजांची मानसपूजा मग महाराजांच्या सेवेत पूर्ण दिवस कसा जायील कळणार नाही. डोळे भरून त्यांना पाहत राहणे. महाराजांच्या आवडीचे पदार्थ ,त्यांची दुपारी वामकुक्षी ,त्यांचे रात्रीचे भोजन त्यानंतर त्यांना आवडणारा विडा ,एक ना दोन . ह्या सगळ्यामध्ये माझे तर देहभान हरपले आहे. 

महाराजांनी मला भरभरून दिले आहे. माझी कुणाशी स्पर्धा नाही आणि मला काहीच मिळवायचे नाही त्यामुळे मनाची शांतता मी सतत अनुभवत असते. आपल्या गुरूंची सेवा ह्या लिखाणाच्या माध्यमातून मी करायचा प्रयत्न करत असते. अत्यंत शांत तृप्त समाधानी आहे. जीवनाचा खरा अर्थ घेण्यात नाही तर देण्यात आहे हे मला ह्या अध्यात्मानेच शिकवले आहे. श्री गजानन महाराज आणि स्वामी समर्थ ह्या माझ्या दोन्ही गुरूंची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले हे मी माझे भाग्य समजते .त्यांच्यासाठी किती आणि काय करू असे मला होवून जाते . त्यांना विचारल्याशिवाय मी आयुष्यात काहीच करत नाही आणि करणारही नाही. 

त्यांच्या सेवेत भक्तीत  जेव्हा एकरूप होतो तेव्हा बोलण्यासारखे सांगण्यासारखे  काही उरत नाही . मग आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी दासगणू महाराजांनी गजानन विजय ह्या ग्रंथात म्हणले आहे कि “ संतांच्या जे जे येयील मनी तेते येयील घडोनी भरवसा त्यांच्या चरणी ठेवून स्वस्थ राहावे .”

 “ आम्ही इथेच आहोत , कुठेच गेलो नाही ” हे महाराजांनी भक्तांना दिलेल्या वाचनाची आजही प्रचीती येते .क्षणोक्षणी महाराज मला सांभाळत आहेत आणि माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत तेच मला बघणार हा माझा विश्वास अभेद्य आहे.

अपेक्षा विरहित केलेली सेवा आणि भक्ती हि महाराजांच्या जवळ आपल्याला लवकर घेवून जाते . आपल्या भक्तीत १६ आणे खरेपणा हवा हे मात्र खरे. ज्यांना महाराज समजले त्यांन जीवनात सर्वच मिळाले असे मी म्हणीन . आताही मी लिहिताना ते वाचत आहेत पोरगी काय लिहितेय आणि तुम्ही सर्व वाचतानाही ते पाहणार आहेत . महाराजांच्या प्रगट दिनाची ,आपण शेगावला त्यांच्या दर्शनाला जाण्याची आपण डोळ्यात प्राण आणून वाट पहात असतो ..मी नेहमी शेगावला जाताना विचार करते कि मी महाराजान मी हे सांगीन ते सांगीन असे बोलीन तसे बोलीन पण प्रत्यक्ष ते समोर आल्यावर काहीही सुचत नाही ...त्यांची मूर्ती दिसली कि डोळ्यातून माझ्याही नकळत अश्रू वाहू लागतात . त्यांच्याकडे पहिले कि ते खुदकन हसून जणू सांगत आहेत कि “ अग काहीच बोलू नकोस ..आपली भेट झाली ...”   .  महाराजांच्या भेटीची आस लागणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे.

नुसते पारायण करून होणार नाही तर त्यावर चिंतन ,मनन ,त्यातील प्रत्येक ओवीवर विकॅह्र होणे आवश्यक आहे. आजही घरात आपण अन्न फुकट घालवतो , फ्रीज मध्ये भाज्या ,फळे फुकट जातात . आपल्याला आपल्या मनाविरुद्ध घटना घडली तर राज अनावर होतो , आपल्या तोंडूनही कधी अशुभ कथन होते. म्हणूनच आपण किती नामस्मरण केले किती पारायणे केली त्याहीपेक्षा त्यातून आपण काय बोध घेतला हे महत्वाचे आहे. आपण  सामान्य माणसे आहोत आणि आपल्यात षडरिपू आहेतच .आपल्यात सुधारणा एका रात्रीत होणे अशक्य आहे. म्हणूनच २१ रुपी अध्यायाचा हा मोदक रुपी श्री गजानन विजय नामक प्रसाद आपल्याला महाराजांनी दासगणू महाराजांच्या हस्ते पाठवला आहे. त्याचा स्वीकार करून त्यांच्या सेवेत रुजू होवून आपले आयुष्य आणि मिळालेला जन्म सार्थकी लावणे हेच आपले काम .

गुरुंपेक्षाही त्यांच्या भेटीसाठी होणारी तळमळ ,त्यांच्या भेटीचा लागलेला ध्यास हीच सर्वात मोठी गुरुसेवा आहे. 

श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या आपल्या सर्वाना मनापासून शुभेच्या . आपल्या सर्वांच्या मनोकामना श्री कृपेने पूर्ण होवूदेत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

अस्मिता

ह्या गजाननरुप  जमिनीत  जे जे काही पेराल सत्य ,ते ते मिळणार आहे परत ,बहुत होऊनी तुम्हाला.





 


 


 


2 comments:

  1. अप्रतिम लेख. गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete