Friday, 26 March 2021

तळतळाट ,हाय,शाप

 || श्री स्वामी समर्थ ||



आज आपण एकविसाव्या शतकात आहोत त्यामुळे ह्या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आज तंत्रज्ञान ,विज्ञान युगात  असणार्या आपल्यासारख्या लोकांची ह्याबाबत अनेक मतांतरे असू शकतात . 

मानवी मनाचे कंगोरे आजवर कुणालाच समजले नाहीत . आपल्या  आयुष्यात बर्या वाईट घटना घडतच असतात . हत्या वैर आणि ऋण चुके ना कुणा – हे श्री गजानन विजय मधील वाक्य चिंतन मनन करण्याजोगे आहे. आपल्या उभ्या आयुष्यात कधीना कधी आपले कुणाशी वैमनस्य होते कधी अगदी नुसतीच पेल्यातील भांडणे तर कधी त्याचे रूप हाडवैरामध्ये कधी होते ते आपल्याही कळत नाही  . 

पूर्वीच्या काळी एखाद्या घराशी असणारे वाद हे पिढ्यानपिढ्या चालू असत. मग अनेक पिढ्या त्या अमुक एक घराला सर्वार्थाने वंचित राहत असत . मग त्या घरातील सर्व कार्ये ,जाणेयेणे सर्व काही वर्ज केले जात असे. 

पिढ्या बदलल्या तरी माणसाची वृत्ती काही बदलली नाही. वारसाहक्काने मिळालेली संपत्ती , जमीन जुमला ,द्रव्य दागदागिने ह्यातील हक्कांसाठी आजही लोक कोर्टाची पायरी चढताना दिसतात . हे खरेतर न संपणारे वाद आहेत . 4 गुंठे जागा आणि तोळाभर सोन्यासाठी आयुष्यभर जपलेली नाती माणूस क्षणात संपवतो. जमीन आणि दागिने मरणांती आपल्यासोबत नेता येणार नाहीत हे माहित असूनही त्यासाठी धडपड करत राहतो .

आयुष्यभर ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो ते सर्व एका क्षणात विसरतो आणि ती नातीही परकी करून टाकतो.  जमीन जुमला , शेतजमीन , घर ह्यावरून होणार्या वाटणीमधून जर एखाद्याला कमी वाटा  मिळाला किंवा त्याला जाणूनबुजून डावलले गेले तर त्याच्या मनाला झालेले दुक्ख हे त्याच्या तोंडून निघालेल्या शापवाणीत परावर्तीत होते . त्याच्या हक्काचे त्याला मिळाले नाही म्हणून त्याचा जीव जळतो  आणि अश्यावेळी ज्यांनी त्याला हे हक्क मिळू दिले नाहीत त्यांना ह्याची अक्षरशा हाय लागते . 

आयुष्यात आपण अनेकासाठी अनेक गोष्टी जीव ओतून करत असतो ,प्रसंगी स्वतःचा पैसा खर्च करूनही आपण कुठलाही विचार न करताही जीवाचे रान करून मदत करतो . पण प्रसंग निभावला कि समोरची व्यक्ती सोयीस्कर रीतीने हे सर्व विसरून जाते . आपल्याला साधी ओळख सुद्धा दाखवत नाही . अश्यावेळी आपल्याला अत्यंत मानसिक वेदना आणि क्लेश होतात. जगातील सगळ्या चांगल्या गोष्टींवरचा आपला विश्वास निघून जातो . ह्या मानसिक वेदनातून तोंडातून मग कधीतरी शब्दांच्या भावनांच्या रुपात निघालेले तळतळाट मात्र त्यांना भोवल्याशिवाय राहत नाहीत .

कधीतरी आपल्या मैत्रिणी किंवा संबंधितांशी आपले काही काळापुरते बिनसते पण जसा काळ जातो तसे पुन्हा सर्व नाती पहिल्यासारखी होतात . पण मधल्या काळात जर आपल्याकडे हळदीकुंकू असेल आणि फक्त त्यावेळी मनात राग असल्यामुळे त्या मैत्रिणीला आपण बोलावले नाही तर ते नक्कीच चांगले नाही. कारण आपला राग हा क्षणाचा असतो. जिला आपण ह्या कार्यक्रमातून वगळले तीच स्त्री खरतर आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी उभी राहिलेली असते . पदराचा पैसा खर्च करून आपल्याला मदत केलेली असते . पण आपल्याला त्याचा विसर पडतो आणि १० बायकांना आमंत्रण जाते पण तिला नाही . अश्यावेळी तिचे मन दुखावते आणि तिचे तळतळाट आपल्याला भोवल्याशिवाय राहत नाहीत . 

काही काही लोकांना आपल्या कामासाठी माणसे वापरून घ्यायची आणि मग ती फेकून द्यायची सवय असते .हा त्यांचा स्वभाव त्यांना नक्कीच घातक ठरू शकतो. 

आपल्या क्षणिक रागापोटी आपण आपले आयुष्यभराचे नुकसान करत असतो . आताच्या कलियुगात आई वडिलांनी आपल्या मृत्युपत्रात लिहिलेल्या गीष्टींची पूर्तता सुद्धा न करणारे महाभाग आहेत . मृत्यू पत्रातील जाणार्याने लिहिलेल्या गोष्टींचे पालन करणे म्हणजे त्याच्या अंतिम इच्छेचे पालन करणे मग आपल्याला ते आवडो अथवा न आवडो . आपण त्याच्याशी सहमत असू अथवा नसू . असे न केल्याने आपण त्याचे शाप तळतळाट ओढवून घेतो . ते आपल्यापुरते सीमित न राहता आपल्या पुढील पिढ्यानाही भोगावे लागतात .

पैसा हा मायावी आहे तो भल्या भल्यांची मती गुंग करणारा आहे . पण त्याच्या मोहात पडून आपल्याच रक्ताच्या नातेवाईकांशी जन्माचे वितुष्ट आणले तर तो पैसा आपल्याला खरच किती समाधान , रात्रीची शांत झोप मिळवून देयील ह्याचा विचार ज्याचा त्यानेच केलेला बरा.

ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासात आपल्याला राहू हा पूर्वजांचा शाप तळतळाट दाखवतो .

अनेक शापित कुंडल्या बघितल्या तर कुठेना कुठे तरी राहूचा संदर्भ लागतोच. 

एखाद्याची राहती जागा छलकपट करून किंवा खोटे दस्तावेज करून हडपणे, एकट्या स्त्रीला तिच्या परिस्थितीचा फायदा घेवून मानसिक शारीरिक छळ करणे , राहत्या घरातून आपल्याच आईवडिलांना त्यांच्या वार्धक्याचा फायदा घेवून हाकलून देणे किंवा त्यांच्या मनाविरुद्ध वृद्धाश्रमात ठेवणे , त्यांचे औषधपाणी , रोजच्या गोष्टींची हेळसांड करणे , एखाद्या वृद्ध व्यक्तीला त्यांच्या अगदी शेवटच्या काळात राहत्या जागेसाठी शिव्याशाप देणे ,ती जागा आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्यांना मानसिक क्लेश देणे ,फसवून एखाद्या मुलीचे लग्न एखाद्या व्यंग असणार्या मुलाशी लावणे इतकच नव्हे तर सामाजिक जीवनात लोकांच्या पैशाची अफरातफर करणे , ह्या सर्वाचे परिणाम म्हणून लोकांचे किंवा तत्सम व्यक्तीचे तळतळाट शाप ,त्यांची हाय आपल्याला आणि पर्यायाने आपल्या कुटुंबियानाही लागते आणि ती आपल्याला भोगावीच लागते. त्यांच्या दुखावलेल्या मनातून आलेले हे शाप आपले आयुष्य उध्वस्त करतात .

ह्याचा परिणाम म्हणजे प्रत्येक पिढीत एखादा अविवाहित राहणे, विवाह मोडणे , कुटुंब कालांतराने लहान होत जाणे ,घरात धार्मिक कार्ये न होणे ,मुले न जगणे , कुटुंबात कुणालाही एकमेकांप्रती प्रेम जिव्हाळा नसणे ,राहत्या घरात वास्तुदोष ,असह्य विलंबी आजार ,आकस्मिक संकटे येणे ह्या गोष्टींची जणू शृंखलाच तयार होते. 

आपल्या कुलस्वामिनी आणि कुलदैवताचे सुद्धा नित्य उपासना पूजा करणे हे आपले कर्तव्य आहे. हा देवधर्माचे सुद्धा पालन नीट झाले नाही तर त्यांच्या कृपादृष्टीस आपण अपात्र ठरतो . त्यामुळे आपल्या घराण्याचे रीतीरिवाज , परंपरेचे पालन आपले विज्ञान आणि आधुनिकता बाजूला ठेवून अवश्य करावे.

आपण काहीतरी कर्म करायला इथे आलो आहोत आणि ते झाले कि आपण इथून निरोप घेणार हे विधिलिखित आहे. त्यामुळे शाप , कुणाची हाय  ,तळतळाट लागणे ह्यावर विश्वास असो अथवा नसो , मुळातच आपले कर्म शुद्ध सात्विक असावे. संपत्ती मिळवावी पण आपल्या कष्टाने कारण तीच लाभते आणि तीच आपल्याला शांत झोप सुद्धा देते .

आधुनिक काळातील अनेकांचा ह्यावर विश्वास नसतो पण जसजसे आयुष्यातील संकटांचे डोंगर वाढू लागतात आणि ती अडथळ्याची शर्यत पार करताना आपली दमछाक होते तेव्हा आपण मग जो सांगेल तो उपाय करायला सज्ज होतो. त्यापेक्षा आधीच ह्या घटना घडू नयेत म्हणून सतर्क राहिले पाहिजे.

आपण आपले नित्य कर्म करत राहावे .कुणाचे काहीतरी हिरावून घेवून पदरी काय पडते ते आपण पहिलेच . त्यामुळे आशीर्वाद कमी मिळाले तरी चालतील पण कुणाच्या शाप ,तळतळाटाला कारणीभूत न होणे हे तरी नक्कीच जमेल आपल्याला ,त्यासाठी प्रयत्नशील राहूया. 

आपलेही अनुभव अवश्य लिहावे.

अस्मिता

antarnad18@gmail.com


2 comments:

  1. छान लेख,पटण्यासारखे

    ReplyDelete
  2. अगदी खर आहे ताई.पण तुम्ही हे सबितल आहे
    काही काही लोकांना आपल्या कामासाठी माणसे वापरून घ्यायची आणि मग ती फेकून द्यायची सवय असते .हा त्यांचा स्वभाव त्यांना नक्कीच घातक ठरू शकतो.

    आपण अशा व्यक्तींशी कसं वागायचं हा मोठा प्रश्न आहे.

    ReplyDelete