|| श्री स्वामी समर्थ ||
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने। जन्मांतर सहस्त्रेषु दारिद्रयं नोपजायते।।
अकाल मृत्यूहरणं सर्वव्याधी,विनाशनं। सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारम्यांमहं।।
रात्रीच्या अंधकाराला दूर करून सर्व विश्वाला , चराचराला प्रकाशमान करणारा रवी म्हणजेच सूर्य ज्याला आपण आदित्य , भास्कर अश्या विविध नावांनी विभूषित केले आहे. सूर्य हा भारीच वक्तशीर आहे , ठरलेल्या वेळी सूर्योदय आणि सूर्यास्त होणारच , निसर्ग ह्याबाबत आजवर कधीच चुकला नाही. एखादे वेळी पृथ्वीचे सूर्याभोवतीचे भ्रमण थांबले तर काय होईल ? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे नाही का? सूर्याचे आपल्या जीवनात अनन्य साधरण महत्व आहे. चराचर सृष्टीचा चालक ,मालक ,पालक हा सूर्यच आहे.
एखादी गोष्ट आपल्या नजरेला दिसते म्हणजे नेमके काय होते ? एखादी गोष्ट आपल्या चक्षुना दिसते ती सूर्याच्या किरणांमुळे.हि प्रभावी सूर्य किरणे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा साक्षात्कार दाखवतात . आपण नेहमी म्हणतो , डोक्यात प्रकाश पडला का ? किंवा सत्य हे सूर्य प्रकाशासारखे आहे ...हीच ह्या रवी किरणांची असामान्य , अद्भुत प्रतिभा आहे जी आपल्याला सत्य आणि असत्याच्या मधील फरक सहज उलगडून दाखवते.
सूर्य हि एक चैतन्य शक्ती आहे . सूर्योदय झाला कि मरगळलेल्या मनास सुद्धा उभारी येते , पुनःश्च हरिओम करून जगावेसे वाटते , आशा , विश्वास पल्लवित करणारी सूर्यकिरणे आपल्याला जगायची उभारी देतात .अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा आणि असत्याकडून सत्याकडे नेणारा हा सूर्य आहे जो शिस्तबद्ध , विवेकी आहे, भेदभाव जणू त्याला माहीतच नाही , तो सर्वांचा आहे आणि सर्वत्र आहे.
सूर्य म्हणजेच सवितृ जी दिवसाला जन्म देणारी आहे , अरुणोदय झाला म्हणजेच दिवसाची सुरवात झाली .वेदांमध्ये सूर्याचा उल्लेख सवितृ असाच केला आहे. सवितृ हाच आपल्या विश्वाचा निर्माता आहे आणि त्याचा मंत्र म्हणजेच गायत्री मंत्र आहे. काय आहे हा मंत्र ? त्याचा नेमका अर्थ जाणून घेवूया . आपण ह्या शक्तीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करतो कि मला विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त होऊ दे ज्यायोगे मला बुद्धी (बुद्धिमत्ता ), शुद्धी ( पवित्रता ) , वृद्धी ( समृद्धी आणि वाढ ), सिद्धी ( पूर्णत्व ) प्राप्त होऊ देत.
गायत्री मंत्राच्या नित्य आराधानेमुळे आपला मेंदू अश्या प्रकारे कार्यरत होतो कि आपल्या जीवनाचे चार महत्वाचे पिलर्स ज्यावर आपले संपूर्ण आयुष्य आहे म्हणजे बुद्धी शुद्धी वृद्धी आणि सिद्धी मजबूत होतात आणि आपले आयुष्य पूर्णत्वाला गेल्याचे जाणवते. आपल्या आयुष्यात कितीही स्थित्यंतरे , गंडांतरे आली , काहीही असो सगळे अडथळे दूर करून आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचे दैवी सामर्थ्य गायत्री मंत्रात सामावलेले आहे. सवितृ म्हणजेच सूर्य जो प्रत्येक जीवाला जन्माला घालतो . प्रातःसमयीचा सूर्य हा ब्रम्हाचे प्रतिनिधित्व करतो , मध्यान्हीचा विष्णूचे तर सूर्यास्ताचा महादेवाचे .
संपूर्ण आकाशमंडल सूर्याभोवतीच फिरत आहे. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे भ्रमण काही क्षणासाठी जरी थांबले तरी चराचर सृष्टी नष्ट होईल. पृथ्वी असो कि सूर्य कि इतर ग्रह ,प्रत्येक जण क्रांतीवृतातून धर्माचे पालन करत अखंड भ्रमण करत आहेत .म्हणूनच भूलोकाचे अस्तित्त्व सूर्यामुळेच अबाधित आहे , स्वर्गलोक इंद्रामुळे . अग्नी सूर्य आणि इंद्र हे कंट्रोलर आहेत .
आपल्या पहिल्या 4 राशी अग्नी ,पुढील 4 सूर्य आणि शेवटच्या 4 स्वर्ग अशी विभागणी केली तर त्यांचे महत्व लक्ष्यात येते.
सात घोड्यांच्या रथातून सूर्य आकाशातून भ्रमण करत असतो . हे सात सूर्य म्हणजे इंद्रधनुष्याची सात किरणे आहेत. अरुणा हा सूर्याच्या रथाचे सारथ्य करत आहे. अरुणा म्हणजेच वरुण. व म्हणजे पाणी .अरुणा सूर्याचा रथ महासागरावरून घेऊन जातो ,सागरातील पाणी घेऊन ते पृथ्वीवर पावसाच्या रुपात नेऊन सोडतो . अश्याप्रकारे वरुणा मधील व जावून अरुणा राहते . वरुणा आणि अरुणा ह्यांचा पावसाशी संबंध आहे. अरुणाला पाय नाहीत . त्याला गरजच नाही ,त्याला सारथ्य करायचे आहे ,त्याला कुठेच जायचे नाही . 12 आदित्याचे दर्शन आपल्याला 12 महिन्यातून घडत असते.
ब्रिटीशांच्या राज्यात सूर्य कधीच मावळत नसे कारण ते 12 नंबर चा उपयोग करत असत . सगळ्या गोष्टी डझनात मोजत पण ज्यावेळेपासून डेसिमल सिस्टीम आली तेव्हापासून त्यांनी सूर्याला सोडले आणि त्यांच्या प्रगतीवर ,ब्रिटीश साम्राज्यावर अवकळा आली.
सूर्याबद्दल जाणून घ्यावे तितके कमीच आहे. पण सारांश एकच आहे कि सूर्य आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, आपल्या आयुष्याचा अखंड प्रवास त्याच्यासमवेत आहे त्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरवात त्याच्या स्मरणाने केली तर दिवसच नाही तर संपूर्ण आयुष्य सुद्धा प्रकाशमान राहील ह्यात शंका नसावी .
जप : “ॐ सवितृ सूर्यनारायणाय नमः। ”
अस्मिता
संपर्क : 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish
No comments:
Post a Comment