Sunday, 12 December 2021

ज्योतिष कथन करताना तारतम्य हवेच .

 || श्री स्वामी समर्थ ||


आपण सगळेच ह्या दैवी शास्त्राचे उपासक आहोत ह्याचे भान विसरून चालणार नाही . नुसतीच शास्त्राची तोंडओळख असताना आपण एखाद्याच्या पत्रिकेबद्दल भाष्य करणे कितपत उचित ठरेल ? तर त्याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. हि विद्या अवगत करण्यासाठी अपार कष्ट , संयम , वाचन , मनन आणि चिंतन तर लागतेच पण त्यासोबत उपासनेची , साधनेची बैठक सुद्धा तितकीच भक्कम लागते . ज्योतिष कथन करणार्याच्या मुखात सरस्वतीचा वास असतो त्यामुळे त्याने भाकीत अभ्यासपूर्वक करावे.

आपल्यासमोरील जातक काय प्रश्न घेऊन आला आहे ते शांतपणे ऐकून घ्यावे. जातक नेहमी त्याचे उत्तर सुद्धा सोबत घेऊन येतो. 

पत्रिकेवर एक कटाक्ष टाकला तर आपल्याला अनेक गोष्टी ज्ञात होतात . जातकाशी साधलेल्या  सुसंवादातून  त्याच्या पत्रिकेबद्दलचे  आपले अंदाज बरोबर आहेत कि नाही ह्याची खात्री पटत जाते. 

जातकाच्या प्रश्नावर आपले लक्ष पूर्ण केंद्रित केले तर उत्तर अचूक मिळेल , जसे नोकरीचा प्रश्न असेल तर त्याच्या विवाहासंबंधी किंवा त्याला वारसाहक्काने धन मिळेल कि नाही ह्याचा विचार सुद्धा करायचा नाही . फक्त आणि फक्त त्याची जी आजची समस्या आहे ती दर्शवणाऱ्या पत्रिकेतील स्थानावर लक्ष्य केंद्रित करणे हितावह ठरते.

जातकाचा प्रश्न नीट समजून घेणे हि पहिली पायरी .नाहीतर  आपण पटकन ह्यांचा विवाहयोग अगदी नक्कीच आहे असे अविचाराने म्हणू आणि जातक म्हणेल कि हि माझ्या 79 वर्षाच्या आजीची पत्रिका आहे . आपल्यावर खजील होण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रसंगावधान आणि परिस्थितीचे तारतम्य बाळगणे अत्यावश्यक आहे. अथवा असे मजेशीर प्रसंग घडू शकतील. 

अस्मिता

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish


No comments:

Post a Comment