Monday, 25 July 2022

प्रश्नशास्त्र

 || श्री स्वामी समर्थ ||


एखादा प्रश्न विचारून आपल्या शंकेचे समाधान करून घेणे हा मनुष्य स्वभाव आहे. भविष्याच्या उदरात काय आहे ह्याबद्दल आपल्या मनात अनेकविध प्रश्न असतात . काही लोकांचे प्रश्न रास्त असतात तर काहीना प्रश्न विचारण्याचा चाळा असतो . असे लोक रोज काहीना काही प्रश्न विचारतच असतात. 

ज्योतिष शास्त्र हे दैवी शास्त्र आहे . ह्या शास्त्राचा आधार घेवून आपण आपल्या मनातील प्रश्नांचा मागोवा घेवू शकतो. प्रश्न कर्त्याने प्रश्न मनापासून विचारला असेल आणि प्रश्न पाहणार्याची सुद्धा तितकीच तळमळ असेल तर हे शास्त्र आपल्याला अचूक उत्तरापर्यंत नेऊन पोहोचवते यात शंकाच नाही आणि येथील अनेकांनी त्याची प्रचीती घेतलीच असेल. 

एखादी समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्न पाहू नये हा ह्या शास्त्राचा दंडक आहे. उठसुठ ज्योतिष बंद केले पाहिजे . वेळ जात नाही म्हणून हे शास्त्र नाही .त्यामुळे प्रश्नाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन जातकाने प्रश्न विचारला पाहिजे आणि ज्योतिषाने तो पाहिलाही पाहिजे. 

सध्याच्या प्रगत युगात मानवी मनाला अनेक प्रश्न ,समस्या भेडसावत असतात . त्यापैकी बहुतांश प्रश्न हे शिक्षण , नोकरी व्यवसाय कि दोन्ही , परदेशगमन , वास्तू , कर्ज , विवाह , संतती , आरोग्य ह्या विषयाभोवतीच रुंजी घालत असतात . अनेक वेळा ह्या समस्या खूप गहन असतात अश्यावेळी योग्य मार्गदर्शनासाठी जातक ह्या दैवी शास्त्राचा आधार घेवू पाहतो आणि त्यात काहीच गैर नाही .

प्रश्न कधी पहावा ह्यासाठी काही नियम आहेत. एखाद्या व्यक्तीला खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल आणि त्याने त्यासंबंधी प्रश्न विचारला तर योग्य आहे . अनेक स्थळे पाहूनही योग्य जोडीदार मिळाला नाही तर त्यासंबंधी विचारलेला प्रश्न रास्त आहे पण आपण आपल्याकडून काहीही प्रयत्न न करता उठसुठ प्रश्न विचारले तर कसे होणार अश्यावेळी मिळालेले उत्तर सुद्धा चुकीचेच असेल कारण म्हंटलेच आहे ना प्रयत्नांती परमेश्वर .

प्रश्न पाहणार्याची तळमळ सुद्धा विचारणाऱ्या व्यक्ती इतकीच असली तर उत्तर हमखास बरोबर येते. पूर्वीच्या काळी प्रश्न विचारणाऱ्या जातकाने ज्योतिषाकडे फळे , सुगंधी फुले आणि दक्षिणा घेवून जाऊन त्यांना नमस्कार करून आणि ह्या शास्त्रावर अगाध श्रद्धा ठेवुन प्रश्न विचारण्याची पद्धत होती . आजकालच्या कलियुगात फळे फुले नकोत पण निदान ज्योतिषाचे मानधन आणि त्याला सन्मानपूर्वक वागणूक हि तरी नक्कीच अपेक्षित आहे. त्याचे मानधन न देता फुकट प्रश्न विचारू नये . कुणाचेही पैसे चुकवले तर शेवटी आपल्याला त्यालाच म्हणजे वरच्याला उत्तर द्यायचे आहे ह्याचा विसर पडू देऊ नये.

आपला स्वतःचा प्रश्न ज्योतिषाकडे घेवून जावा . इतरांचे प्रश्न ज्याचे त्यालाच विचारू द्यावेत . प्रश्नांची खैरात न करता अत्यंत आवश्यक असा प्रश्न विचारावा . समोरच्याच्या आणि आपल्याही वेळेला किंमत आहे . 

ज्योतिष शास्त्र हे पुरातन शास्त्र आहे आणि दिवसागणिक त्याबद्दल कुतूहल वाढताना दिसते . पण आपल्याकडे म्हण आहे ना “ अर्ध्या ह्ळकुंडाने पिवळे होणे “ ती अगदी योग्य आहे. आजकाल सोमवारी एक मंगळवारी दुसरा ज्योतिषी असे १० ज्योतिषांचे सल्ले घेणे चालू असते त्यामुळे आपल्याकडे आलेला जातक सुद्धा अगदी सहज बोलून जातो ह्याने मला असे सांगितले आणि त्याने मला तसे सांगितले. आपल्याकडून गेल्यावर सुद्धा तो अजूनही १० जणांकडे जाणार असतो . मला ह्या सगळ्या गोष्टींचे नेहमीच नवल वाटत आले आहे आणि मनात एक प्रश्न नेहमी येतो कि असे का होत असावे? पहिल्या ज्योतिषाकडे गेल्यावर आपल्याला हवे ते ऐकायला मिळाले नाही म्हणून दुसर्याच्या घराची पायरी चढायला लागली कि हा एक चाळाच लागला आहे. असो सुज्ञास सांगणे न लगे.

अनेकदा आजारपणाचे प्रश्न असतात . अश्यावेळी जातकाची मनस्थिती बरी नसल्यामुळे ज्योतिषाने आपल्या मानधनाचा प्रश्न दुय्यम ठेवावा ,त्याबद्दल काहीच बोलू नये. आपले पैसे कुठेही जात नाहीत देतील ते नंतर म्हणून शांत राहावे. अनेकदा एखाद्या व्यक्तीची समस्या गंभीर असते , व्यक्तीचे हाल बघवत नाहीत म्हणून शेवटी ज्योतिषाला “ ह्या व्यक्तीकडे अजून किती वेळ आहे ?” असाही प्रश्न विचारला जातो . आपण समजू शकतो हे विचारताना सुद्धा त्या व्यक्तीला किती क्लेश होत असावेत . पण तरीही अश्या प्रश्नांची उत्तरे किबहुना असे प्रश्न सुद्धा टाळावेत कारण जन्म ,विवाह आणि मृत्यू हि कार्ड देवाने आपल्याकडेच ठेवली आहेत . जरी एखाद्या ज्योतिषाला त्याच्या साधनेमुळे किंवा ज्ञानामुळे मृत्यू कधी होणार हे समजले तरीसुद्धा त्याबद्दल त्याने वाच्यता करू नये. येणारा एक दिवस जाणारच आहे. 

अनेकदा एखाद्या व्यक्तीला दोन स्थळे एकाच वेळी आवडतात किंवा दोन ठिकाणांहून नोकरीसाठी पत्र येते किंवा दोन वास्तू आवडतात . अश्यावेळी कुठला चोईस करावा असे प्रश्न विचारले जातात जे रास्त आहेत . प्रश्नशास्त्र हे स्वतःच एक अखंड दालन आहे. ह्या दालनात शिरण्याचे सुद्धा अनेक मार्ग आहेत जसे पारंपारिक ज्योतिष किंवा कृष्णमुर्ती पद्धती अजूनही कितीतरी आहेत . 

कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये आपल्याला त्या दिवसाचे ग्रह घेवून प्रश्नाचे उत्तर देता येते . अनेकदा ह्या शास्त्राची टर उडवली जाते पण २५ लोक घरी एखाद्या समारंभासाठी आलेले असताना वीज गेली तर त्या क्षणी ती कधी येणार ह्यापेक्षा दुसरा महत्वाचा प्रश्न घरातील गृहिणीसाठी दुसरा असूच शकत नाही . त्यामुळे अश्या प्रश्नांची उत्तरे देणार्या कृष्णमुर्ती पद्धती ह्या शास्त्रासमोर नतमस्तक आहे. 

एकदा तर एका स्त्रीने मला तिचा कित्येक वर्ष अंथरुणाला खिळलेल्या नवर्याकडे अजून किती अवधी आहे हे विचारले होते . मला खरच खूप वाईट वाटले कारण मनात प्रेम असूनही त्यांचे तिला करणे आता शक्यच नव्हते .हतबल होऊन तिने हा प्रश्न विचारला होता . मी काय बोलणार शेवटी प्रार्थना हेच आपल्या हाती आहे ती करत राहावी .

आपल्याला ज्योतिष येते म्हंटल्यावर जवळचे मित्र मंडळी , आप्तेष्ट उठसुठ काहीतरी विचारत बसतात ,अगदी काळा वेळेचेही भान न ठेवता मग मंडई असो कि बस स्टोप  त्यांचे विचारणे चालूच असते. जसे आज क्रिकेट मध्ये कोण जिंकणार , पेट्रोल चे भाव कमी होणार कि नाही , सरकार कुणाचे ? एक ना दोन लोकांकडे रिकामा वेळ खूप आहे पण ज्योतिषाने तारतम्य ठेवुन ह्या प्रश्नांची दखल सुद्धा घेवू नये 

जातक आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर घेऊनच आलेला असतो . त्यामुळे योग्य वेळी अत्यंत तळमळीने विचारलेल्या प्रश्नासाठी हे दैवी शास्त्र मदतीला येणारच ह्यात तिळमात्र शंका नाही . ज्योतिषी जेव्हा प्रश्न पाहत असेल त्यावेळची वेळ घेवून प्रश्नकुंडली पहावी . प्रश्नशास्त्र आणि निसर्ग ह्यांचे अतूट नाते आहे . निसर्ग आपल्याला संकेत देत असतो फक्त ते समजण्याची क्षमता आपल्यात अनेकदा कमी पडते . अनेकदा हे संकेत इतके बोलके असतात कि प्रश्नकुंडली मांडायची सुद्धा निष्णात ज्योतिषाला आवश्यकता भासत नाही. जसे विवाहाचा प्रश्न असेल आणि सनई किंवा मधुर संगीत कानावर आले, कुणीतरी घरात मिठाई घेवून आले तर तो शुभसंकेत समजावा .एखादा शेअर मार्केट चा प्रश्न असेल आणि बाल्कनीत वरून खाली एखादे जळमट आले तर हा शेअर विकत घेवू नये असे सांगावे. कुत्र्याचे रडणे विव्हळणे ऐकू आले आणि आजाराचा प्रश्न असेल तर हा संकेत अशुभ समजावा . अश्या अनेक संकेतांचा उपयोग आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचवतो. 

प्रश्न कुंडलीत लग्नेश , कारक ग्रह आणि चंद्राची स्थिती अत्यंत महत्वाचे आहे . चंद्र ज्या स्थानात असतो त्याच भावाशी जातकाचा प्रश्न निगडीत असतो. अश्या प्रकारे प्रश्न शास्त्र हे जातकाच्या कुठल्याही प्रश्नाचे अचूक उत्तर देणारे शास्त्र आहे. जातक आणि ज्योतिषी ह्यांनी ह्यासाठी बंधनकारक असणारे सर्व नियम पाळले तर हे दैवी शास्त्र तुम्हाआम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल ह्यात दुमत नाही.

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 












 







Wednesday, 13 July 2022

खराखुरा भक्त

 || स्वामी समर्थ ||




गुरुपौर्णिमेच्या शुभेछ्यांचा नुसता पाऊस पडत आहे . पण खरच गुरुतत्व आपल्याला समजले आहे का? प्रत्येक क्षणी आपण ते आचरणात आणतो का ? हा महत्वाचा प्रश्न आहे. सतत अर्धसत्य किंवा खोटे बोलणे , कुठल्याही गोष्टीत एकाग्रता नसणे , अत्यंत अस्थिर मन , कारण नसताना उगीचच भोचक आणि अर्थहीन प्रश्न विचारत माहिती काढत राहणे , ह्या अश्या गोष्टी आज पाहायला मिळतात ,अनुभवायला मिळतात आणि मन विषण्ण होते . हजारो छापील मेसेज इथे तिथे पाठवून गुरु समजायला लागले तर बघायलाच नको. इतक का हे सर्व सोपे आहे. त्याला मनाच्या गाभार्यातून येणारी तळमळ आणि भक्तीचा ओलावा लागतो . महाराजांचे आपल्या प्रत्येक कृतीवर आणि बोललेल्या शब्दा शब्दावर लक्ष्य आहे ह्याचे जेव्हा भान राहील तो क्षण म्हणजे “ गुरुपौर्णिमा “ . आपल्या एखाद्या कृत्याची आपल्यालाच लाज वाटते मग महाराजांना काय वाटेल हा विचार मनात येयील तो क्षण म्हणजे “ गुरुपौर्णिमा “ . कुणीही कसेही वागले तर जेव्हा आपला स्वाभिमान जागृत होतो आणि आपल्यातील महाराजांचाही तो अपमान आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव होते तो क्षण म्हणजे “ गुरुपौर्णिमा “ . नुसते ढीगभर हार आणि फळे ,मिठाई ठेवुन महाराज कधीही आपले होणार नाहीत ,उलट ते दूर जातील . पण जिथे त्यांना अत्यंत खरेपणाचे अस्तित्व जाणवेल तिथे त्यांचे अस्तित्व अबाधित असणार ह्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. कितीवेळा ते आपल्याला हात देतात आणि कुठून कुठून बाहेर काढतात हे आपले आपल्याला सुद्धा कळणार नाही इतकी हि शक्ती अनाकलनीय आहे. महाराजांनी सांगितले आहे “ माझा फोटो ठेवुन बाजार मांडू नका “ . आपण तेच करतोय . आपल्या भक्तीचा भावनांचा सगळ्याचा बाजार मांडतोय . मी हे केले नि मी ते केले. सगळा नुसता शो शो आणि शो . महाराजांना सुद्धा कुठल्याही प्रसिद्धीची हाव नाही आणि तामझाम सुद्धा नकोय त्यांना , उबग आहे त्यांना ह्या सर्वच गोष्टींचा . कधी बाहेर येणार आपण ह्या सर्वातून . 

अश्या किती गुरुपौर्णिमा आल्या आणि गेल्या . पुढेही येत राहतील . पण आपल्यात किती बदल झाला किंवा तो खरच करायची तळमळ आपल्यात आहे ? विचारा प्रश्न स्वतःलाच . त्यांना खरा खुरा भक्त हवाय ,जशी आई आपल्या मुलांवर  कुठलीही अपेक्षा न ठेवता आजन्म प्रेम करत राहते अगदी तसेच त्यांना तुमचे खरे , शंभर नंबरी प्रेम हवे आहे . देव त्याच भक्तीचा भुकेला आहे. 

आषाढी वारी संपली , गुरुपौर्णिमा गेली पण आमचे आयुष्य जैसे थेच. कुठल्याही गोष्टीसाठी तळमळ नाही. कालच्या पानावरून पुढे चालू , गुरुसेवेचा ध्यास लागला पाहिजे आणि गुरुतत्व जगता आले पाहिजे. आपण चुकलो तर इतर फालतू गप्पा न करता मोठ्या मानाने ज्या क्षणी आपण समोरच्याची माफी मागू त्या क्षणी आपण आपल्या सद्गुरूंच्या समीप जाऊ ह्यात शंकाच नाही . पण आमचा अहंकार महाराजांच्याही पेक्षा प्रचंड मोठा आहे. तीर्थयात्रा करा नाहीतर अभिषेक , जेवणावळी घाला जोवर आपल्या प्रत्येक श्वासात आणि नसा नसातून खरेपणा येत नाही तोवर सगळे फोल आहे. 

आज मी स्वतः हेच चित्र पाहते ,हे माझे विचार आहेत सगळ्यांना पटतील असे नाही आणि ते पटावे हा आग्रह तर अजिबात नाही. जो खरा भक्त आहे तो चुकला तर रात्री झोपणार नाही इतका धाक महाराजांचा ज्याला आहे तो खरे जीवन जगेल आणि त्याच्याच मागे महाराज  आजन्म उभे राहतील . अध्यात्म जी जगण्याची कला आहे . आपल्याला गणू जवर्या व्हायचे आहे विठोबा घाटोळ नाही आणि लक्ष्मण घुडे तर अजिबातच नाही . 

द्या सर्व त्यांच्यावर सोडून आणि बघा काय घडवतील ते तुम्हाला तेव्हाच जीवनाचा खर अर्थ उमगेल. श्री स्वामी समर्थ .

संकलन : सौ . अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




 





Tuesday, 12 July 2022

उत्तम कर्म हीच सर्वश्रेष्ठ साधना ( शनी )

| श्री स्वामी समर्थ ||


शनीमहाराज आपली कुंभ राशी सोडून वक्री अवस्थेत मकर राशीत आले आहेत . वर्क वर्क आणि वर्क हे सांगणारे शनी महाराज त्यांच्या कर्म भूमीत आहेत . जरा जरी कर्म चुकले आणि अहंकार आला तर गय केली जाणार नाही हाच संदेश ते देत असावेत. पैसा हा आयुष्यासाठी हवा पण त्याने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत. आजकाल लोक पैशाच्या बळावर माणूसच काय तर देवालाही विकत घेऊ पाहतात . 

शनी कर्माचा कारक आहे. प्रत्येक शब्द ,कृती अगदी आपल्या मनातील विचारांवर त्याचे अधिराज्य आहे कारण तो आपल्यातच आहे. शनी , गुरु ,केतू हे सर्वच मोक्ष प्रिय असणारे ग्रह . हे सर्वच आपल्याला पारलौकिक जगात नेण्यासाठी उत्सुक असतात पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा. गुरु प्रपंच करून परमार्थ करा सांगणारा ग्रह तर शनीला प्रपंच मुळीच नको . केतुला बिचार्याला दिसतच नाही म्हणून तो आपल्या आत पहा , अंतर्मुख व्हा आणि मोक्षाला चला हे सांगणारा .

शनी विरक्त करणारा ग्रह. जन्म आणि मृत्यू हे दोन महत्वाचे पत्ते परमेश्वराने  स्वतःजवळ ठेवले आहेत पण खेळायला मोठी धावपट्टी दिली आहे . जीवनभर कर्म कसे करायचे ते शेवटी आपल्याच हातात आहे आणि आपण जसे कर्म करू त्या प्रमाणे फळ मिळणार हे त्रिवार सत्य आहे . त्यामुळे चांगले झाले कि आपले आणि वाईट झाले कि दुसर्याला दोष देवून मोकळे होणार्या सर्वांनी शनीच्या कर्माचा सिद्धांत जाणून घ्यावा आणि इतरांना दोष देणे बंद करावे .

अनेकांना पूर्व आयुष्यात श्रम आणि उत्तर आयुष्यात भोग तर कुणाला त्या उलट स्थिती असते पण आपले सगळे हिशोब अगदी व्याजासकट शनी महाराज चुकते करत असतात . शनी महाराज न्यायाधीश आहेत , तत्वनिष्ठ आहेत. जो जो चुकेल त्याला शासन करण्याचे डिपार्टमेंट त्यांच्याकडे असल्याने ते पक्षपात न करता शिक्षा ठोठावतात .

षडरीपु ताब्यात ठेवायचे असतील तर साधनेची बैठक पक्की असावी लागते . उत्तम साधना आपल्याला शांत राहून योग्य निर्णय घेण्यास मदत करते . चांगल्या वाईट गोष्टीतील फरक लक्ष्यात आणून देते . कलियुगात साधनेला पर्याय नाही .
शनी महाराज आपली कुंभ राशी सोडून आपल्या मकर राशीत वक्री अवस्थेतच प्रवेश करत आहेत . धनु राशीची साडेसाती आता पुन्हा सुरु होते आहे. जानेवारी २०२३ रोजी जेव्हा शनीमहाराज कुंभ राशीत आपले सिंहासन स्थापन करतील तेव्हा धनु राशीची साडेसाती संपेल. उत्तम कर्म करीत राहणे , आपल्या प्रपंचाची जबाबदारी व्यवस्थित पेलणे , घरातील वडीलधार्या व्यक्तींची देखभाल , कुणालाही उणादुणा शब्द नाही , स्वछ्य व्यवहार , व्यसनांपासून दूर आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहून जे आपले जीवन व्यतीत करतील त्यांना साडेसातीचा त्रास कदापि होणार नाही . अश्या व्यक्ती शनी महाराजांच्या कृपेच्याच धनी ठरतील.

अत्यंत कष्टाने मिळवलेली संपत्ती पण हवा डोक्यात गेली तर त्याला अहंकाराचा दर्प येतो आणि मनुष्य बेभान होऊन वागू लागतो . पैशाच्या जीवावर सगळे काही विकत घेवू पाहतो आणि तिथेच चुकतो. अश्यांना शनी महाराज  कधीच सोडत नाही. अष्टम स्थानात उगीच नाही त्यांचे कारकत्व . शनी विलंबाचा कारक आहे म्हणून मृत्यू सुद्धा अश्यांना विलंबाने येतो कारण अष्टम स्थान मृत्यूचे स्थान आहे.  अष्टम स्थानातील ग्रह मृत्यू कसा येयील त्याचे स्वरूप दर्शवतात . शनी असेल तर मृत्यू उशिरा म्हणजे दीर्घायुष्य . पण शनी चांगला असेल तर अन्यथा हे आयुष्य म्हणजे मरणप्राय यातना , भोगांची शृंखला . मग त्या मृत्यूची जणू भिक मागावी अशी शोकांतिका होते मग असे दीर्घायुष्य काय कामाचे . 

कायेने , वाचेने आणि मनाने सुद्धा कुणालाही दुखवू नये . हा धडा गिरवला तर आयुष्यातील बर्याच गोष्टी सुसह्य होतील. एखादा वसा घ्यावा पण तो आयुष्यभर निभवावा . श्री गजानन विजय ग्रंथाचे नियमित वाचन , गुरुचरित्र , साई चरित्र , सप्तशती , गुरूलीलामृत , गीतेचे नियमित पठाण ,नामस्मरण  ह्या गोष्टी आयुष्य सुसह्य करतात , निर्णयक्षम बनवतात आणि सन्मार्गाने जगायला शिकवतात .  

केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते त्याशिवाय गत्यंतर नसते . मग ते चांगले असो अथवा वाईट . त्यासाठी जपतप ,दानधर्म करून त्याचे परिमार्जन करता येत नाही .  आपल्या शरीरात सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे “ जिव्हा “ बहुतेक वाईट कर्म ह्या मुळेच घडतात . आपण कुणाला काय बोलतोय आणि त्याचा परिणाम काय होतोय ह्याचा विचार न करता ह्या जिभेचा उपयोग तलवारी सारखा अव्याहत चालूच असतो आणि मग शेवटच्या क्षणी ventilator वर सगळे आठवते कुणाला काय बोललो ते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते . ती जाऊ नये म्हणूनच साधना हवी , शब्द जपून वापरायला हवेत . अनेक लोकांना राग आला कि दुसर्याच्या तोंडावर दार लावायची किंवा आपटण्याची सवय असते . प्रत्यक्ष लक्ष्मीच मग अश्यांसाठी दार लावते जे कितीही केले तरी उघडतच नाही. अश्या लोकांच्या घरी कालांतराने लोकांचाही वावर कमी होत जातो . आर्थिक स्थर उतरणीला लागतो आणि जीवनाची दशा दशा होते . किती हा माज ? अरेरे वेळीच सावरा . 
शनी कुठल्या राशीत आहे ? तो मार्गी आहे का वक्री ? मग आता त्याचे परिणाम काय ? एक ना दोन हजार प्रश्न तेच विचारतात ज्यांच्या मनात शिक्षेची भीती , भयगंड आहे. जो कर्मप्रधान व्यक्ती आहे तो हे प्रश्न विचारणार नाही कारण शनीने दाखवून दिलेल्या मार्गावर तो प्रत्येक क्षणी चालत आहे. शनी त्याला समजला आहे म्हणूनच  त्याचे जीवन आनंदी आहे. शनी आपला कुटुंबप्रमुख आहे आणि कुटुंबप्रमुख आपल्यावर मायाच करतो .वेळप्रसंगी आपल्याला मार्गदर्शन आणि चुकलो तर आणि तरच शिक्षा हे सूत्र इथे लागू आहे.  शनीने रास कुठली बदलली ह्याकडे लक्ष्य कश्याला आपल्या वागणुकीकडे लक्ष्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला मी बरोबरच वागतो आहे असेच वाटत राहते आणि तिथेच चुकते . 

तसेच प्रारब्ध भोग हे भोगूनच संपवायचे असतात . अनेक अनेक जन्माच्या पाप पुण्याचे गाठोडे घेवून आपली याही जन्मात वाटचाल सुरूच असते . त्यात ह्या जन्मातील पाप पुण्याची भर होत असते असे जन्मोजन्मी चालूच असते . हा फेरा खंडित होण्यासाठीच प्रबळ साधना , शरणागती आणि समर्पण लागते . 
नामस्मरणाने काय अशक्य आहे? पण आम्ही ते करायला दोन क्षण सुद्धा बसत नाही इतके चंचल मन आहे आमचे. आमच्या नुसत्या मोठमोठ्या गप्पा असतात , माळ कुठली घ्यावी , आसन कुठले ? अंघोळ करायची कि नाही एक ना दोन नुसती प्रश्नावली पण पुढे प्रत्यक्ष कृती शून्य . सगळच फोल . अध्यात्म इतक सहज सोप्पे असते तर अजून काय हवे होते. मी आज जसा वागीन तसा माझा उद्याचा दिवस असणार आहे नुसते हे जरी लक्ष्यात ठेवले तरी अनेक अनेक चुका पापे टळतील.

हो आहे शनी महाराजांचा धाक आपल्याला ....असायलाच हवा .कुणालाच जुमानत नाही आपण हे कसे चालणार ? बंधन हवेच .  कुणी कितीही काहीही म्हंटले तरी ज्योतिष विद्या हि आहेच आणि हे ग्रहतारे आपलयाला मदत करण्यासाठीच आहेत . प्रत्येक ग्रहाचा वेगळा रस , वृत्ती , रुची , भाव अनमोल आहे म्हणूनच तर जीवनात हार्मोनी आहे नाहीतर जीवन बेचव नुसते रखरखीत वाळवंट झाले असते . काहीही झाले कि कुठल्या ना कुठल्या ग्रहाला आपण नावे ठेवत असतो पण आपली स्वतःची कर्मे किबहुना कुकर्मे पाहत नाही .

प्रत्येक ग्रह तुमच्या प्रारब्धा प्रमाणेच पत्रिकेत स्थान ग्रहण करून बसला आहे ,त्याचा मान राखला पाहिजे . ग्रहांशी मैत्री करता आली पाहिजे , सुसंवाद साधता आला पाहिजे . साडेसाती आली कि लगेच घाबरणे , उठ सुठ कारण नसताना भयभीत होऊन ह्या ज्योतिषाला त्या ज्योतिषाला पत्रिका दाखवत फिरणे हे अस्थिर मनाचे आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास नसण्याचे चिन्ह आहे. खरच समस्या असेल तर ज्योतिष शस्त्रासारखा मार्गदर्शक नाही पण उठसुठ काय .ह्या सर्वात वेळ घालवण्यापेक्षा शांतपणे नामस्मरण केले तर विचारात अमुलाग्र बदल होऊन आपल्याला मार्ग मिळेल ह्यात वाद नाही . 
साडेसाती येवूदे नाहीतर शनी राशीपरीवर्तन करुदे आपले जीवन चालूच राहणार आहे आणि त्याला अध्यात्माची जोड असली तर उत्तम. शनी हा न्यायी ग्रह आहे तो कुणाचाच मित्र नाही कि शत्रू नाही . तटस्थ राहून तो फक्त न्याय करणार इतकच.  त्याच्या साठी कुणीही आवडते नावडते असे नाही . 

सारांश असा कि आपले कर्म जितके शुद्ध , सात्विक असेल तितके शनीमहाराज अधिकाधिक प्रसन्न होतील . सहमत ??

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230


 







 





    



Thursday, 7 July 2022

अमृतघन

 || श्री स्वामी समर्थ ||






आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा . आपण अनेक व्यक्तींकडून अगदी घरातील लहान मुलांकडून सुद्धा खूप काही शिकत असतो . हे सर्वच आपल्याला घडवत असतात . आयुष्यातील बरया वाईट अनुभवातून सुद्धा आपण घडत जातो. म्हणूनच अनुभव हाच गुरु असे म्हणतात ते खोटे नाही. 

अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारे , आपल्याला जे दिसत नाही त्याच्याही पलीकडे नेणारे आपले गुरु त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस . त्यांच्या चरणाशी समर्पित होण्याचा हा क्षण . अध्यात्मातील खडकाळ रस्त्यावरून चालताना जागोजागी ठेच लागते पण आपला हात त्यांच्याच हाती असतो म्हणून आपण नामस्मरणात दंग होऊन वाटचाल करत राहतो . खरतर मनुष्य जन्म हा मोक्षासाठीच असतो. मोक्ष म्हणजे सगळ्यातून मुक्ती . मनाचा क्षय . पण ते तितके सहज खचितच नसते आणि म्हणूनच मोक्षाची वाटचाल सुद्धा सोपी नाही .

भजन ,कीर्तन , प्रवचन , नामस्मरण , पारायण , पूजा , आरती , महाप्रसाद , शेजारती एक ना दोन अनेक माध्यमातून आपण त्यांच्या समीप जाण्याचा प्रयत्न करत असतो. अध्यात्मात खोटेपणाला वाव नाही म्हणूनच हे सर्व करत असताना आपण किती श्रद्धेने समर्पणाने त्यांच्या सेवेत रुजू आहोत हे सर्वात महत्वाचे आहे. भक्तीचा परमोच्चबिंदू म्हणजे मानसपूजा . मानसपूजा आपल्याला महाराजांच्या अत्यंत समीप घेवून जाते . आपल्या आयुष्याचा सुकाणू ज्यांच्या हातात आहे आणि ज्यांचे अधिराज्य आपल्या अखंड श्वासावर आहे त्या आपल्या महाराजांची भेट मानसपूजेतून जेव्हा होते तेव्हा काळ क्षणभर स्थिरावल्यासारखा वाटतो .

महाराजांच्या भेटीची आस असायला हृदयात प्रचंड कळकळ लागते. नुसते हारतुरे , नारळांची तोरणे , जेवणावळी ,शाली देवून काहीच होत नाही. अहो महाराज ह्या सगळ्याच्या पलीकडे आहेत म्हणूनच समजायला अत्यंत कठीण आहेत .  पंढरीची वारी म्हंटली कि जिथे कानात टाळ मृदुंगाचे स्वर घुमायला लागतात , विठूचा गजर करणारा तहान भूक विसरलेला वारकरी दिसायला लागतो , जशीच्या तशी वारी दिसायला लागते तेव्हा समजायचे महाराज पांडुरंगाच्या रुपात आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी आहेत . अश्या परम भक्तांसाठी महाराजंचे फक्त “ असणे “ हेच असते . त्यांचे अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवते आणि म्हणूनच महाराजांचा स्पर्श , त्यांच्या चेहऱ्यावरील भाव ,चेहऱ्यावरील स्मितहास्य ,आशीर्वादासाठी आपल्या डोक्यावर असलेला त्यांचा हात . ह्या सगळ्या सगळ्याची सोळा आणे प्रचीती म्हणजेच उच्च कोटीची मानसपूजा .

आजचा दिवस खास . महाराजांचा वरदहस्त डोक्यावर असला कि आयुष्य मार्गी लागते . अशक्य हि शक्य करतील स्वामी हे त्यांनी म्हंटले आहेच . त्यांच्या सेवेत कुठेही कमी पडायचे नाही हे तर आहेच पण आपण त्यांचे शिष्य आहोत हे सांगताना त्यांचीही मान ताठ राहावी असे उत्तम शुद्ध कर्म आपल्या कडून झाले पाहिजे .  कुठलीही कृती करताना त्यांचा विचार आपल्या मनात प्रथम आला पाहिजे म्हणजे दुष्कृत्य घडणारच नाही हे नक्की. जो अनन्यभावे माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालविन हे वचन महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेच आहे . 

महाराज आणि भक्त हे एक वेगळेच समीकरण आहे . दुधात साखर विरघळावी तसे त्यांचे नाते असते . आपल्या मनात विचार यायच्या खूप आधी तो त्यांना समजलेला असतो . प्रत्येक गुरुपौर्णिमेला काहीतरी वेगळे केले पाहिजे . आपल्यातील एखादा वाईट गुण सोडून दिला पाहिजे जसे सतत खरेदी करत राहणे ,पैशाचा अपव्यय करणे ,घरातील आपल्याच आईवडिलांची काळजी न घेणे . आपल्यातील कुठला गुण जो वाईट आहे हे आपल्याच माहित असते तो सोडून देता आला पाहिजे . आपला अहंकार आपल्याला आपल्या ताब्यात ठेवता आला पाहिजे .कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. गरजूना मदतीचा हात दिला पाहिजे , अन्नदान केले पाहिजे आणि हे सर्व करताना त्यातून निर्लेप पणे बाहेर येऊन जीवन जगता आले पाहिजे . एखादी गोष्ट मिळवण्याचा ध्यास असावा पण हव्यास नको .

गुरु ह्या शब्दात खूप भावार्थ सामावलेला आहे . आपल्या संस्कृतीत गुरुशिष्य परंपरा खूप मोठी आहे आणि इतिहासाने वेळोवेळी त्याचे दाखले दिले आहेत . माझ्या संपूर्ण आयुष्यात अध्यात्मिक क्षेत्रात लाभलेले गुरु म्हणजे शेगाव संस्थानाचे सर्वेसर्वा कै. भाऊ साहेब पाटील. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेली शिकवण अखेरच्या श्वासापर्यंत मनात राहील. ह्या सर्व शक्ती आपल्या आकलनाच्या खूप बाहेर आहेत हे ते नेहमीच सांगत असत.  आपल्याला त्यांना भेटायची किती आस आहे ह्यावर त्यांची आपली भेट अवलंबून आहे म्हणूनच नामात राहणे ,पारायण करत राहणे हे सर्वात उत्तम. संपूर्ण आयुष्य महाराजांच्या चरणाशी राहून त्यांना समर्पित करणाऱ्या ह्या योग पुरुषाकडून किती शिकावे आणि किती नाही . संस्थानातील त्यांचा वावर अक्षरशः अतिसामान्य अश्या साधारण सेवेकर्या सारखाच असे. त्यांची शिस्त वाखाणण्याजोगी होती. कुठेही वशिला नाही कि मागील दरवाज्यातून प्रवेश नाही . सर्वसाधारण वारकर्या प्रमाणे साधा सदरा आणि धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी ह्या वेषा व्यतिरिक्त मी त्यांना आजवर कधीच पहिले नाही . जे आहे ते सर्व महाराजांचे आहे आणि आपण फक्त ते सांभाळत आहोत ह्या विचारापासून ते कधीच परावृत्त झाले नाही . अध्यात्म हि काय चीज आहे हे भाऊनी सांगितलेल्या अनेक अनेक गोष्टींवरून उमजत गेले. सगळ्यात असून कश्यातच नाही अशी जेव्हा मनाची अवस्था होते तेव्हा तुम्ही त्यांच्या निकट आहात असे समजायला हरकत नाही . अश्या ह्या गुरुतुल्य व्यक्तीचा आशीर्वाद मला लाभला हे मी माझे भाग्य समजते . आपला प्रत्येक श्वास हा त्यांच्यासाठी जगणे हि त्यांची शिकवण मी आत्मसात केली आणि त्याचप्रमाणे वागण्याचा पुढेही प्रयत्न करीन. 

हे सर्व लिहिताना सुद्धा शेगाव संस्थान ,पारायण कक्ष जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले आहे , सकाळी 11 वाजता मंदिरात सर्वत्र एकच वेळी होणारा घंटानाद , महाराजांचे अश्व ,गजराज त्यांना सलामी देतात दे दृश्य सगळे अगदी तसेच्या तसे समोर आहे आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत . शरीर कुठेही असो मन मात्र तिथे त्यांच्या चरणापाशी आहे. शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज ह्या दोन्ही गुरुनी माझ्याकडून आणि माझ्या पुढील पिढ्यांकडून सुद्धा आजन्म ,अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करून घ्यावी अशी प्रेमळ विनंती आज त्यांच्या चरणापाशी आहे . अध्यात्माची ताकद प्रचंड आहे आणि त्यातील अनुभ व्यक्तीला अंतर्बाह्य बदलण्याची ताकद ठेवतात . जसा वाल्याचा वाल्मिकी झाला तसाच प्रत्येक व्यक्ती ह्या अध्यात्मिक मार्गात येऊन जणू कृतकृत्य होतो. अहो सुख दुक्ख प्रत्येकाला आहे. देवाने सर्वाना सर्व दिले नाही आणि म्हणूनच जे दिले आहे त्यात आनंद मानला पाहिजे . आपले आचार विचार सात्विक ठेवुन नामस्मरण हेच आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय ठेवले पाहिजे . सर्वस्व त्यांच्यावर सोडून द्या आणि मग बघा काय घडवतील ते तुम्हाला. लहान मुलाला खेळवताना आपण त्याला आकाशात उंच उडवतो पण ते वरतीजावूनही त्याच्या चेहऱ्यावर हसू असते ,आपण खाली पडू अशी भीती जराही नसते अगदी तसेच आपल्याला कुठल्याही प्रसंगात झेलणारे आपले महाराज आहेत  आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथातील गणू जवर्या . धोंडे कितीही उडाले तरी गणू कपारीत निर्धास्त होता तो महाराजांच्याच कृपेने .  

त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहणे आणि त्यांच्या चरणाशी लीन होण्यासारखी गुरुदक्षिणा नाही. आज मागायचे तरी काय ? सारखे काहीतरी मागतच राहिले पाहिजे का? तर अजिबात नाही . पण आज हक्काने मागायचे ...आमरण वारी घडो ,सदैव तुमचे चिंतन राहो . महाराजांची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर राहूदे . काळ कुणासाठी थांबत नाही आणि किती संकटे आली तरी त्यांच्यावरील भक्ती ,श्रद्धा कधीही कमी होऊ द्यायची नाही . जगावर आलेले करोनाचे संकट सुद्धा आपण ह्याच श्रद्धेमुळे पार केले आहे  . 

सर्वांच्याच आयुष्यातील सर्वच गुरु आणि गुरुतुल्य व्यक्तीना माझा सादर प्रणाम. गुरुपौर्णिमेच्या अनंत शुभेछ्या .

श्री गजानन जय गजानन 

श्री स्वामी समर्थ  

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Wednesday, 6 July 2022

सखा पांडुरंग

 || श्री स्वामी समर्थ ||




पंचप्राण डोळ्यात आणून ऊनपावसाची कश्याचीही तमा न बाळगता आपले सर्वस्व अर्पण करून माऊलीच्या भेटीसाठी धाव घेणारा वारकरी जेव्हा प्रत्यक्ष त्या पांडुरंगाच्या समोर उभा ठाकत असेल तेव्हा दोघांच्याही मनातील भावनांचे आणि होणार्या त्या गळा भेटीच्या अलौकिक सोहळ्याचे वर्णन कुणीच करू शकणार नाही. हा एक दिव्य अनुभव आणि तो घेण्यासाठी रस्ता तुडवत , दरी खोर्यातून वाट काढत आणि  डोंगरा इतके अडथळे आले तरी त्यांना हसत हसत पार करणार्या वारकर्याला घडवताना देवाने तरी काय काय विचार केला असेल नाही. 

आषाढी एकादशीचे अनन्य साधारण असे महत्व शास्त्रात सांगितले आहे. हि 18 दिवस चालणारी वारी पांडुरंगाच्या चरणाशी आषाढी एकादशीला विलीन होईल . मंदिराचा कळस दिसायला लागला कि वारकरी तहान भूक हरवल्यासारखे त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी धावत सुटतात . त्यांच्या भेटीकडे डोळे लावून बसलेला खुद्द पांडुरंग सुद्धा चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांच्या भेटीला येतो आणि मग काय विचारता , याची देही याची डोळा असा प्रसंग पाहायला मिळतो. संपूर्ण आसमंत टाळ, मृदुंग आणि विठ्ठलाच्या जयजयकाराने दुमदुमून जाते आणि विठ्ठल आणि वारकरी भक्तिरसात न्हावून निघतात .  लाखो वारकर्यांची हि अद्भुत वारी ,त्यांच्या भेटीला 28 युगे विटेवर उभा राहिलेला विठ्ठुराया सुद्धा भेटीच्या ओढीने धावत येतो तिथेच ह्या भेटीतील प्रेम ,साधनेची खोली ,अलौकिक भक्ती आणि श्रद्धेची अनुभूती चाखायला मिळते.

तुकाराम महाराज , ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज , सोपान मुक्ताई  सगळेच कुणाच्याना कुणाच्या रुपात भक्तिरसात आपले देह्भान विसरतात . अखंड चराचरात फक्त एकच रूप असते आणि ते म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाचे . जिथे जागा दिसेल तिथे पसारी टाकायची मिळेल ते अन्न ग्रहण करायचे ,कुठली तक्रार नाही कि कुणाकडून कसली अपेक्षा नाही . मुखी अखंड त्याचेच नाम आणि डोळ्यासमोर त्याचेच रूप असणारी हि वारी म्हणजे आपल्यासाठी अध्यात्माची मोठी शिकवण आहे . 

आपले आयुष्य म्हणजे सुद्धा एक वारीच असते कि . ह्या वारीत प्रत्येक वळणावर आपल्याला पांडुरंग अनेक रुपात भेटत असतो फक्त तो आपल्याला ओळखता येत नाही इतकेच . चांगले वाईट खडतर कितीही प्रसंग आले तरी पांडुरंगाच्या दर्शनापुढे सगळे फोल ठरवणारी हि वारी आपल्याला आयुष्य जगायचे धडे देऊन जाते. पांडुरंग भक्तांच्या रक्षणासाठी 28 युगे एकाच जागी उभा आहे पण आपल्याला 28 सेकंद सुद्धा एका गोष्टीवर चित्त केंद्रित करता येत नाही . वारकरी जसे पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास घेतात तसेच आपणही आपल्या आयुष्यात आपली कर्तव्ये ,आपली उद्दिष्ठे पूर्ण करण्याचा ध्यास घेतला पाहिजे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली पाहिजे . जातीपाती ,उच्च नीच , गरीब श्रीमंत हेवेदावे ह्या सर्वांच्याही किती तरी पटीने अधिक महत्वाचा आहे तो पांडुरंग आणि त्याच्या एका कटाक्षा साठी संपूर्ण जीवन पणाला लावणारा हा वारकरी आपल्या वारीतील प्रवासात मूर्तिमंत भक्तीचा अविष्कार घडवतो , अगदी तसेच आपल्याही आयुष्यात आपल्याला मदत करणाऱ्या आणि आपल्याला घडवणाऱ्या कुटुंबाप्रती आपण नतमस्तक होणे आवश्यक आहे. 

वारी म्हणजे भक्तीची पाठशाला आहे . पांडुरंगाची अनंत रूपे दाखवणारी हि वारी आहे . दोन पावले वारीसोबत जरूर चालावी पण ती फक्त पांडुरंगासाठी ,त्याच्यावरील प्रेमापोटी फोटो सेशन साठी नको. आज आयुष्यातील किती गोष्टी आपण स्वतःच्या आनंदासाठी करतो आणि किती गोष्टी दुसर्याला दाखवण्यासाठी आणि मोठेपणा मिरवण्यासाठी करतो हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा शो ऑफ करण्याच्या नादात आपण खरी भक्तीच विसरून गेलो आहोत . वारी हे एक अग्निदिव्य आहे आणि पांडुरंगावर ज्याची निस्सीम श्रद्धा आहे भक्ती आहे त्यालाच  ते पार करता येते. 

पांडुरंगाच्या भक्तीची परिसीमा म्हणजे वारी , आपल्या विठूवरील निस्सीम प्रेमाचा अविष्कार म्हणजे वारी ,आसमंतात दुमदुमणारा भक्तीचा जल्लोष म्हणजे वारी , पांडुरंगाच्या भेटीने डोळ्यातून वाहणार्या अश्रुधारा म्हणजे वारी ,त्याच्यावर जीव ओवाळून टाकावा अशी हि वारी आणि जगायला बळ देणारी हि वारी , मी आहे तुमच्यामागे खंबीर उभा हे आश्वासन देणारी हि वारी. ह्या वारीचे मोल कश्यातच करता येणार नाही .

जवळ पैका नाही आणि अंगभर वस्त्र सुद्धा नाही कि पोटभर अन्न नाही असा हा वारकरी देहभान विसरून जेव्हा टाळ मृदुंगांच्या तालावर फेर धरतो तो हा आनंद जगातील सर्व संपत्ती ,भौतिक सुखाच्या परे जातो.  पांडुरंगाचे प्रेम मिळवायचे असते ते कुठेच विकत घेता येत नाही .मूल झाल्यावर जसा आईला पान्हा फुटतो अगदी तसेच पांडुरंगाच्या आठवणीने डोळ्यातून अश्रु वाहायला लागतात . त्याच्या भेटीने जीव कासावीस होतो आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात “ भेटीलागी जीवा लागलीसे आस “ . भक्ताचे मन फक्त आपल्या विठुरायाच्या चरणापाशीच असते. 

वारी जगायची असते. हा एक दिव्यभव्य अनुभव असतो . वारी म्हणजे निष्ठा ,वारी म्हणजे समर्पण . आपले जीवन आणि वारी ह्याचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे . आपली जीवनरूपी वारी यशस्वी करायची असेल तर समर्पण लागते , नामस्मरणाची ,अध्यात्माची कास धरायला लागते . आयुष्यातील कुठलीही गोष्ट आपल्याला तामझाम केल्याशिवाय करताच येत नाही . आपल्या पुढे मागे नाचत असतो तो आपला अहंकार . 

हि वारी करणारे वारकरी. कोण आहेत हे ? खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ना अंगभर वस्त्र ,ना गाठीला शेकडो रुपये , कुणा मोठ्या माणसाची ओळख नाही कि प्रसिद्धीची हाव नाही ,प्रामुख्याने असणारा हा शेतकरी वर्ग खेड्यापाड्यातून आपली शेतीची कामे करून पांडुरंगाच्या सेवेत रुजू होतो तोच मुळी परमभक्तीचा आनंद लुटण्यासाठी . शेतकरी मातीत बीज पेरतो म्हणून अन्नधान्य मिळते, तसेच भक्तीची बीजे पेरणारा हा वारकरी सुद्धा आपल्याला परमार्थाची बीजे पेरण्याचे धडे देतो. परमार्थातील आनंद हा मिळत नसतो तर मिळवायचा असतो तोही ज्याचा त्यानेच . त्यालाही पूर्वसुकृत असावे लागते . 

पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास हे एकच ध्येय असणारी हि वारी निर्विघ्नपणे पार पडते कारण त्यांच्यामागे सर्वशक्तीनिशी उभा असतो तो त्यांचा “ सखा पांडुरंग “

तुम्हाआम्हा सर्वांच्याही जीवनात ह्या पांडुरंगाच्या रूपातील “ सखा “  भक्तिरसाचा अविष्कार घडवूदे हीच त्याच्या चरणी प्रार्थना .

सरतेशेवटी हेच म्हणावेसे वाटते “ हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा .....”

सर्वाना आषाढी एकादशीच्या अनंत शुभेछ्या .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230