|| श्री स्वामी समर्थ ||
पंचप्राण डोळ्यात आणून ऊनपावसाची कश्याचीही तमा न बाळगता आपले सर्वस्व अर्पण करून माऊलीच्या भेटीसाठी धाव घेणारा वारकरी जेव्हा प्रत्यक्ष त्या पांडुरंगाच्या समोर उभा ठाकत असेल तेव्हा दोघांच्याही मनातील भावनांचे आणि होणार्या त्या गळा भेटीच्या अलौकिक सोहळ्याचे वर्णन कुणीच करू शकणार नाही. हा एक दिव्य अनुभव आणि तो घेण्यासाठी रस्ता तुडवत , दरी खोर्यातून वाट काढत आणि डोंगरा इतके अडथळे आले तरी त्यांना हसत हसत पार करणार्या वारकर्याला घडवताना देवाने तरी काय काय विचार केला असेल नाही.
आषाढी एकादशीचे अनन्य साधारण असे महत्व शास्त्रात सांगितले आहे. हि 18 दिवस चालणारी वारी पांडुरंगाच्या चरणाशी आषाढी एकादशीला विलीन होईल . मंदिराचा कळस दिसायला लागला कि वारकरी तहान भूक हरवल्यासारखे त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी धावत सुटतात . त्यांच्या भेटीकडे डोळे लावून बसलेला खुद्द पांडुरंग सुद्धा चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांच्या भेटीला येतो आणि मग काय विचारता , याची देही याची डोळा असा प्रसंग पाहायला मिळतो. संपूर्ण आसमंत टाळ, मृदुंग आणि विठ्ठलाच्या जयजयकाराने दुमदुमून जाते आणि विठ्ठल आणि वारकरी भक्तिरसात न्हावून निघतात . लाखो वारकर्यांची हि अद्भुत वारी ,त्यांच्या भेटीला 28 युगे विटेवर उभा राहिलेला विठ्ठुराया सुद्धा भेटीच्या ओढीने धावत येतो तिथेच ह्या भेटीतील प्रेम ,साधनेची खोली ,अलौकिक भक्ती आणि श्रद्धेची अनुभूती चाखायला मिळते.
तुकाराम महाराज , ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज , सोपान मुक्ताई सगळेच कुणाच्याना कुणाच्या रुपात भक्तिरसात आपले देह्भान विसरतात . अखंड चराचरात फक्त एकच रूप असते आणि ते म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाचे . जिथे जागा दिसेल तिथे पसारी टाकायची मिळेल ते अन्न ग्रहण करायचे ,कुठली तक्रार नाही कि कुणाकडून कसली अपेक्षा नाही . मुखी अखंड त्याचेच नाम आणि डोळ्यासमोर त्याचेच रूप असणारी हि वारी म्हणजे आपल्यासाठी अध्यात्माची मोठी शिकवण आहे .
आपले आयुष्य म्हणजे सुद्धा एक वारीच असते कि . ह्या वारीत प्रत्येक वळणावर आपल्याला पांडुरंग अनेक रुपात भेटत असतो फक्त तो आपल्याला ओळखता येत नाही इतकेच . चांगले वाईट खडतर कितीही प्रसंग आले तरी पांडुरंगाच्या दर्शनापुढे सगळे फोल ठरवणारी हि वारी आपल्याला आयुष्य जगायचे धडे देऊन जाते. पांडुरंग भक्तांच्या रक्षणासाठी 28 युगे एकाच जागी उभा आहे पण आपल्याला 28 सेकंद सुद्धा एका गोष्टीवर चित्त केंद्रित करता येत नाही . वारकरी जसे पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास घेतात तसेच आपणही आपल्या आयुष्यात आपली कर्तव्ये ,आपली उद्दिष्ठे पूर्ण करण्याचा ध्यास घेतला पाहिजे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली पाहिजे . जातीपाती ,उच्च नीच , गरीब श्रीमंत हेवेदावे ह्या सर्वांच्याही किती तरी पटीने अधिक महत्वाचा आहे तो पांडुरंग आणि त्याच्या एका कटाक्षा साठी संपूर्ण जीवन पणाला लावणारा हा वारकरी आपल्या वारीतील प्रवासात मूर्तिमंत भक्तीचा अविष्कार घडवतो , अगदी तसेच आपल्याही आयुष्यात आपल्याला मदत करणाऱ्या आणि आपल्याला घडवणाऱ्या कुटुंबाप्रती आपण नतमस्तक होणे आवश्यक आहे.
वारी म्हणजे भक्तीची पाठशाला आहे . पांडुरंगाची अनंत रूपे दाखवणारी हि वारी आहे . दोन पावले वारीसोबत जरूर चालावी पण ती फक्त पांडुरंगासाठी ,त्याच्यावरील प्रेमापोटी फोटो सेशन साठी नको. आज आयुष्यातील किती गोष्टी आपण स्वतःच्या आनंदासाठी करतो आणि किती गोष्टी दुसर्याला दाखवण्यासाठी आणि मोठेपणा मिरवण्यासाठी करतो हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा शो ऑफ करण्याच्या नादात आपण खरी भक्तीच विसरून गेलो आहोत . वारी हे एक अग्निदिव्य आहे आणि पांडुरंगावर ज्याची निस्सीम श्रद्धा आहे भक्ती आहे त्यालाच ते पार करता येते.
पांडुरंगाच्या भक्तीची परिसीमा म्हणजे वारी , आपल्या विठूवरील निस्सीम प्रेमाचा अविष्कार म्हणजे वारी ,आसमंतात दुमदुमणारा भक्तीचा जल्लोष म्हणजे वारी , पांडुरंगाच्या भेटीने डोळ्यातून वाहणार्या अश्रुधारा म्हणजे वारी ,त्याच्यावर जीव ओवाळून टाकावा अशी हि वारी आणि जगायला बळ देणारी हि वारी , मी आहे तुमच्यामागे खंबीर उभा हे आश्वासन देणारी हि वारी. ह्या वारीचे मोल कश्यातच करता येणार नाही .
जवळ पैका नाही आणि अंगभर वस्त्र सुद्धा नाही कि पोटभर अन्न नाही असा हा वारकरी देहभान विसरून जेव्हा टाळ मृदुंगांच्या तालावर फेर धरतो तो हा आनंद जगातील सर्व संपत्ती ,भौतिक सुखाच्या परे जातो. पांडुरंगाचे प्रेम मिळवायचे असते ते कुठेच विकत घेता येत नाही .मूल झाल्यावर जसा आईला पान्हा फुटतो अगदी तसेच पांडुरंगाच्या आठवणीने डोळ्यातून अश्रु वाहायला लागतात . त्याच्या भेटीने जीव कासावीस होतो आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात “ भेटीलागी जीवा लागलीसे आस “ . भक्ताचे मन फक्त आपल्या विठुरायाच्या चरणापाशीच असते.
वारी जगायची असते. हा एक दिव्यभव्य अनुभव असतो . वारी म्हणजे निष्ठा ,वारी म्हणजे समर्पण . आपले जीवन आणि वारी ह्याचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे . आपली जीवनरूपी वारी यशस्वी करायची असेल तर समर्पण लागते , नामस्मरणाची ,अध्यात्माची कास धरायला लागते . आयुष्यातील कुठलीही गोष्ट आपल्याला तामझाम केल्याशिवाय करताच येत नाही . आपल्या पुढे मागे नाचत असतो तो आपला अहंकार .
हि वारी करणारे वारकरी. कोण आहेत हे ? खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ना अंगभर वस्त्र ,ना गाठीला शेकडो रुपये , कुणा मोठ्या माणसाची ओळख नाही कि प्रसिद्धीची हाव नाही ,प्रामुख्याने असणारा हा शेतकरी वर्ग खेड्यापाड्यातून आपली शेतीची कामे करून पांडुरंगाच्या सेवेत रुजू होतो तोच मुळी परमभक्तीचा आनंद लुटण्यासाठी . शेतकरी मातीत बीज पेरतो म्हणून अन्नधान्य मिळते, तसेच भक्तीची बीजे पेरणारा हा वारकरी सुद्धा आपल्याला परमार्थाची बीजे पेरण्याचे धडे देतो. परमार्थातील आनंद हा मिळत नसतो तर मिळवायचा असतो तोही ज्याचा त्यानेच . त्यालाही पूर्वसुकृत असावे लागते .
पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास हे एकच ध्येय असणारी हि वारी निर्विघ्नपणे पार पडते कारण त्यांच्यामागे सर्वशक्तीनिशी उभा असतो तो त्यांचा “ सखा पांडुरंग “
तुम्हाआम्हा सर्वांच्याही जीवनात ह्या पांडुरंगाच्या रूपातील “ सखा “ भक्तिरसाचा अविष्कार घडवूदे हीच त्याच्या चरणी प्रार्थना .
सरतेशेवटी हेच म्हणावेसे वाटते “ हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा .....”
सर्वाना आषाढी एकादशीच्या अनंत शुभेछ्या .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment