| श्री स्वामी समर्थ ||
शनीमहाराज आपली कुंभ राशी सोडून वक्री अवस्थेत मकर राशीत आले आहेत . वर्क वर्क आणि वर्क हे सांगणारे शनी महाराज त्यांच्या कर्म भूमीत आहेत . जरा जरी कर्म चुकले आणि अहंकार आला तर गय केली जाणार नाही हाच संदेश ते देत असावेत. पैसा हा आयुष्यासाठी हवा पण त्याने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत. आजकाल लोक पैशाच्या बळावर माणूसच काय तर देवालाही विकत घेऊ पाहतात .
शनी कर्माचा कारक आहे. प्रत्येक शब्द ,कृती अगदी आपल्या मनातील विचारांवर त्याचे अधिराज्य आहे कारण तो आपल्यातच आहे. शनी , गुरु ,केतू हे सर्वच मोक्ष प्रिय असणारे ग्रह . हे सर्वच आपल्याला पारलौकिक जगात नेण्यासाठी उत्सुक असतात पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा. गुरु प्रपंच करून परमार्थ करा सांगणारा ग्रह तर शनीला प्रपंच मुळीच नको . केतुला बिचार्याला दिसतच नाही म्हणून तो आपल्या आत पहा , अंतर्मुख व्हा आणि मोक्षाला चला हे सांगणारा .
शनी विरक्त करणारा ग्रह. जन्म आणि मृत्यू हे दोन महत्वाचे पत्ते परमेश्वराने स्वतःजवळ ठेवले आहेत पण खेळायला मोठी धावपट्टी दिली आहे . जीवनभर कर्म कसे करायचे ते शेवटी आपल्याच हातात आहे आणि आपण जसे कर्म करू त्या प्रमाणे फळ मिळणार हे त्रिवार सत्य आहे . त्यामुळे चांगले झाले कि आपले आणि वाईट झाले कि दुसर्याला दोष देवून मोकळे होणार्या सर्वांनी शनीच्या कर्माचा सिद्धांत जाणून घ्यावा आणि इतरांना दोष देणे बंद करावे .
अनेकांना पूर्व आयुष्यात श्रम आणि उत्तर आयुष्यात भोग तर कुणाला त्या उलट स्थिती असते पण आपले सगळे हिशोब अगदी व्याजासकट शनी महाराज चुकते करत असतात . शनी महाराज न्यायाधीश आहेत , तत्वनिष्ठ आहेत. जो जो चुकेल त्याला शासन करण्याचे डिपार्टमेंट त्यांच्याकडे असल्याने ते पक्षपात न करता शिक्षा ठोठावतात .
षडरीपु ताब्यात ठेवायचे असतील तर साधनेची बैठक पक्की असावी लागते . उत्तम साधना आपल्याला शांत राहून योग्य निर्णय घेण्यास मदत करते . चांगल्या वाईट गोष्टीतील फरक लक्ष्यात आणून देते . कलियुगात साधनेला पर्याय नाही .
शनी महाराज आपली कुंभ राशी सोडून आपल्या मकर राशीत वक्री अवस्थेतच प्रवेश करत आहेत . धनु राशीची साडेसाती आता पुन्हा सुरु होते आहे. जानेवारी २०२३ रोजी जेव्हा शनीमहाराज कुंभ राशीत आपले सिंहासन स्थापन करतील तेव्हा धनु राशीची साडेसाती संपेल. उत्तम कर्म करीत राहणे , आपल्या प्रपंचाची जबाबदारी व्यवस्थित पेलणे , घरातील वडीलधार्या व्यक्तींची देखभाल , कुणालाही उणादुणा शब्द नाही , स्वछ्य व्यवहार , व्यसनांपासून दूर आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहून जे आपले जीवन व्यतीत करतील त्यांना साडेसातीचा त्रास कदापि होणार नाही . अश्या व्यक्ती शनी महाराजांच्या कृपेच्याच धनी ठरतील.
अत्यंत कष्टाने मिळवलेली संपत्ती पण हवा डोक्यात गेली तर त्याला अहंकाराचा दर्प येतो आणि मनुष्य बेभान होऊन वागू लागतो . पैशाच्या जीवावर सगळे काही विकत घेवू पाहतो आणि तिथेच चुकतो. अश्यांना शनी महाराज कधीच सोडत नाही. अष्टम स्थानात उगीच नाही त्यांचे कारकत्व . शनी विलंबाचा कारक आहे म्हणून मृत्यू सुद्धा अश्यांना विलंबाने येतो कारण अष्टम स्थान मृत्यूचे स्थान आहे. अष्टम स्थानातील ग्रह मृत्यू कसा येयील त्याचे स्वरूप दर्शवतात . शनी असेल तर मृत्यू उशिरा म्हणजे दीर्घायुष्य . पण शनी चांगला असेल तर अन्यथा हे आयुष्य म्हणजे मरणप्राय यातना , भोगांची शृंखला . मग त्या मृत्यूची जणू भिक मागावी अशी शोकांतिका होते मग असे दीर्घायुष्य काय कामाचे .
कायेने , वाचेने आणि मनाने सुद्धा कुणालाही दुखवू नये . हा धडा गिरवला तर आयुष्यातील बर्याच गोष्टी सुसह्य होतील. एखादा वसा घ्यावा पण तो आयुष्यभर निभवावा . श्री गजानन विजय ग्रंथाचे नियमित वाचन , गुरुचरित्र , साई चरित्र , सप्तशती , गुरूलीलामृत , गीतेचे नियमित पठाण ,नामस्मरण ह्या गोष्टी आयुष्य सुसह्य करतात , निर्णयक्षम बनवतात आणि सन्मार्गाने जगायला शिकवतात .
केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते त्याशिवाय गत्यंतर नसते . मग ते चांगले असो अथवा वाईट . त्यासाठी जपतप ,दानधर्म करून त्याचे परिमार्जन करता येत नाही . आपल्या शरीरात सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे “ जिव्हा “ बहुतेक वाईट कर्म ह्या मुळेच घडतात . आपण कुणाला काय बोलतोय आणि त्याचा परिणाम काय होतोय ह्याचा विचार न करता ह्या जिभेचा उपयोग तलवारी सारखा अव्याहत चालूच असतो आणि मग शेवटच्या क्षणी ventilator वर सगळे आठवते कुणाला काय बोललो ते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते . ती जाऊ नये म्हणूनच साधना हवी , शब्द जपून वापरायला हवेत . अनेक लोकांना राग आला कि दुसर्याच्या तोंडावर दार लावायची किंवा आपटण्याची सवय असते . प्रत्यक्ष लक्ष्मीच मग अश्यांसाठी दार लावते जे कितीही केले तरी उघडतच नाही. अश्या लोकांच्या घरी कालांतराने लोकांचाही वावर कमी होत जातो . आर्थिक स्थर उतरणीला लागतो आणि जीवनाची दशा दशा होते . किती हा माज ? अरेरे वेळीच सावरा .
शनी कुठल्या राशीत आहे ? तो मार्गी आहे का वक्री ? मग आता त्याचे परिणाम काय ? एक ना दोन हजार प्रश्न तेच विचारतात ज्यांच्या मनात शिक्षेची भीती , भयगंड आहे. जो कर्मप्रधान व्यक्ती आहे तो हे प्रश्न विचारणार नाही कारण शनीने दाखवून दिलेल्या मार्गावर तो प्रत्येक क्षणी चालत आहे. शनी त्याला समजला आहे म्हणूनच त्याचे जीवन आनंदी आहे. शनी आपला कुटुंबप्रमुख आहे आणि कुटुंबप्रमुख आपल्यावर मायाच करतो .वेळप्रसंगी आपल्याला मार्गदर्शन आणि चुकलो तर आणि तरच शिक्षा हे सूत्र इथे लागू आहे. शनीने रास कुठली बदलली ह्याकडे लक्ष्य कश्याला आपल्या वागणुकीकडे लक्ष्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला मी बरोबरच वागतो आहे असेच वाटत राहते आणि तिथेच चुकते .
तसेच प्रारब्ध भोग हे भोगूनच संपवायचे असतात . अनेक अनेक जन्माच्या पाप पुण्याचे गाठोडे घेवून आपली याही जन्मात वाटचाल सुरूच असते . त्यात ह्या जन्मातील पाप पुण्याची भर होत असते असे जन्मोजन्मी चालूच असते . हा फेरा खंडित होण्यासाठीच प्रबळ साधना , शरणागती आणि समर्पण लागते .
नामस्मरणाने काय अशक्य आहे? पण आम्ही ते करायला दोन क्षण सुद्धा बसत नाही इतके चंचल मन आहे आमचे. आमच्या नुसत्या मोठमोठ्या गप्पा असतात , माळ कुठली घ्यावी , आसन कुठले ? अंघोळ करायची कि नाही एक ना दोन नुसती प्रश्नावली पण पुढे प्रत्यक्ष कृती शून्य . सगळच फोल . अध्यात्म इतक सहज सोप्पे असते तर अजून काय हवे होते. मी आज जसा वागीन तसा माझा उद्याचा दिवस असणार आहे नुसते हे जरी लक्ष्यात ठेवले तरी अनेक अनेक चुका पापे टळतील.
हो आहे शनी महाराजांचा धाक आपल्याला ....असायलाच हवा .कुणालाच जुमानत नाही आपण हे कसे चालणार ? बंधन हवेच . कुणी कितीही काहीही म्हंटले तरी ज्योतिष विद्या हि आहेच आणि हे ग्रहतारे आपलयाला मदत करण्यासाठीच आहेत . प्रत्येक ग्रहाचा वेगळा रस , वृत्ती , रुची , भाव अनमोल आहे म्हणूनच तर जीवनात हार्मोनी आहे नाहीतर जीवन बेचव नुसते रखरखीत वाळवंट झाले असते . काहीही झाले कि कुठल्या ना कुठल्या ग्रहाला आपण नावे ठेवत असतो पण आपली स्वतःची कर्मे किबहुना कुकर्मे पाहत नाही .
प्रत्येक ग्रह तुमच्या प्रारब्धा प्रमाणेच पत्रिकेत स्थान ग्रहण करून बसला आहे ,त्याचा मान राखला पाहिजे . ग्रहांशी मैत्री करता आली पाहिजे , सुसंवाद साधता आला पाहिजे . साडेसाती आली कि लगेच घाबरणे , उठ सुठ कारण नसताना भयभीत होऊन ह्या ज्योतिषाला त्या ज्योतिषाला पत्रिका दाखवत फिरणे हे अस्थिर मनाचे आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास नसण्याचे चिन्ह आहे. खरच समस्या असेल तर ज्योतिष शस्त्रासारखा मार्गदर्शक नाही पण उठसुठ काय .ह्या सर्वात वेळ घालवण्यापेक्षा शांतपणे नामस्मरण केले तर विचारात अमुलाग्र बदल होऊन आपल्याला मार्ग मिळेल ह्यात वाद नाही .
साडेसाती येवूदे नाहीतर शनी राशीपरीवर्तन करुदे आपले जीवन चालूच राहणार आहे आणि त्याला अध्यात्माची जोड असली तर उत्तम. शनी हा न्यायी ग्रह आहे तो कुणाचाच मित्र नाही कि शत्रू नाही . तटस्थ राहून तो फक्त न्याय करणार इतकच. त्याच्या साठी कुणीही आवडते नावडते असे नाही .
सारांश असा कि आपले कर्म जितके शुद्ध , सात्विक असेल तितके शनीमहाराज अधिकाधिक प्रसन्न होतील . सहमत ??
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment