|| स्वामी समर्थ ||
गुरुपौर्णिमेच्या शुभेछ्यांचा नुसता पाऊस पडत आहे . पण खरच गुरुतत्व आपल्याला समजले आहे का? प्रत्येक क्षणी आपण ते आचरणात आणतो का ? हा महत्वाचा प्रश्न आहे. सतत अर्धसत्य किंवा खोटे बोलणे , कुठल्याही गोष्टीत एकाग्रता नसणे , अत्यंत अस्थिर मन , कारण नसताना उगीचच भोचक आणि अर्थहीन प्रश्न विचारत माहिती काढत राहणे , ह्या अश्या गोष्टी आज पाहायला मिळतात ,अनुभवायला मिळतात आणि मन विषण्ण होते . हजारो छापील मेसेज इथे तिथे पाठवून गुरु समजायला लागले तर बघायलाच नको. इतक का हे सर्व सोपे आहे. त्याला मनाच्या गाभार्यातून येणारी तळमळ आणि भक्तीचा ओलावा लागतो . महाराजांचे आपल्या प्रत्येक कृतीवर आणि बोललेल्या शब्दा शब्दावर लक्ष्य आहे ह्याचे जेव्हा भान राहील तो क्षण म्हणजे “ गुरुपौर्णिमा “ . आपल्या एखाद्या कृत्याची आपल्यालाच लाज वाटते मग महाराजांना काय वाटेल हा विचार मनात येयील तो क्षण म्हणजे “ गुरुपौर्णिमा “ . कुणीही कसेही वागले तर जेव्हा आपला स्वाभिमान जागृत होतो आणि आपल्यातील महाराजांचाही तो अपमान आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव होते तो क्षण म्हणजे “ गुरुपौर्णिमा “ . नुसते ढीगभर हार आणि फळे ,मिठाई ठेवुन महाराज कधीही आपले होणार नाहीत ,उलट ते दूर जातील . पण जिथे त्यांना अत्यंत खरेपणाचे अस्तित्व जाणवेल तिथे त्यांचे अस्तित्व अबाधित असणार ह्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. कितीवेळा ते आपल्याला हात देतात आणि कुठून कुठून बाहेर काढतात हे आपले आपल्याला सुद्धा कळणार नाही इतकी हि शक्ती अनाकलनीय आहे. महाराजांनी सांगितले आहे “ माझा फोटो ठेवुन बाजार मांडू नका “ . आपण तेच करतोय . आपल्या भक्तीचा भावनांचा सगळ्याचा बाजार मांडतोय . मी हे केले नि मी ते केले. सगळा नुसता शो शो आणि शो . महाराजांना सुद्धा कुठल्याही प्रसिद्धीची हाव नाही आणि तामझाम सुद्धा नकोय त्यांना , उबग आहे त्यांना ह्या सर्वच गोष्टींचा . कधी बाहेर येणार आपण ह्या सर्वातून .
अश्या किती गुरुपौर्णिमा आल्या आणि गेल्या . पुढेही येत राहतील . पण आपल्यात किती बदल झाला किंवा तो खरच करायची तळमळ आपल्यात आहे ? विचारा प्रश्न स्वतःलाच . त्यांना खरा खुरा भक्त हवाय ,जशी आई आपल्या मुलांवर कुठलीही अपेक्षा न ठेवता आजन्म प्रेम करत राहते अगदी तसेच त्यांना तुमचे खरे , शंभर नंबरी प्रेम हवे आहे . देव त्याच भक्तीचा भुकेला आहे.
आषाढी वारी संपली , गुरुपौर्णिमा गेली पण आमचे आयुष्य जैसे थेच. कुठल्याही गोष्टीसाठी तळमळ नाही. कालच्या पानावरून पुढे चालू , गुरुसेवेचा ध्यास लागला पाहिजे आणि गुरुतत्व जगता आले पाहिजे. आपण चुकलो तर इतर फालतू गप्पा न करता मोठ्या मानाने ज्या क्षणी आपण समोरच्याची माफी मागू त्या क्षणी आपण आपल्या सद्गुरूंच्या समीप जाऊ ह्यात शंकाच नाही . पण आमचा अहंकार महाराजांच्याही पेक्षा प्रचंड मोठा आहे. तीर्थयात्रा करा नाहीतर अभिषेक , जेवणावळी घाला जोवर आपल्या प्रत्येक श्वासात आणि नसा नसातून खरेपणा येत नाही तोवर सगळे फोल आहे.
आज मी स्वतः हेच चित्र पाहते ,हे माझे विचार आहेत सगळ्यांना पटतील असे नाही आणि ते पटावे हा आग्रह तर अजिबात नाही. जो खरा भक्त आहे तो चुकला तर रात्री झोपणार नाही इतका धाक महाराजांचा ज्याला आहे तो खरे जीवन जगेल आणि त्याच्याच मागे महाराज आजन्म उभे राहतील . अध्यात्म जी जगण्याची कला आहे . आपल्याला गणू जवर्या व्हायचे आहे विठोबा घाटोळ नाही आणि लक्ष्मण घुडे तर अजिबातच नाही .
द्या सर्व त्यांच्यावर सोडून आणि बघा काय घडवतील ते तुम्हाला तेव्हाच जीवनाचा खर अर्थ उमगेल. श्री स्वामी समर्थ .
संकलन : सौ . अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment