Thursday, 7 July 2022

अमृतघन

 || श्री स्वामी समर्थ ||






आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा . आपण अनेक व्यक्तींकडून अगदी घरातील लहान मुलांकडून सुद्धा खूप काही शिकत असतो . हे सर्वच आपल्याला घडवत असतात . आयुष्यातील बरया वाईट अनुभवातून सुद्धा आपण घडत जातो. म्हणूनच अनुभव हाच गुरु असे म्हणतात ते खोटे नाही. 

अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारे , आपल्याला जे दिसत नाही त्याच्याही पलीकडे नेणारे आपले गुरु त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस . त्यांच्या चरणाशी समर्पित होण्याचा हा क्षण . अध्यात्मातील खडकाळ रस्त्यावरून चालताना जागोजागी ठेच लागते पण आपला हात त्यांच्याच हाती असतो म्हणून आपण नामस्मरणात दंग होऊन वाटचाल करत राहतो . खरतर मनुष्य जन्म हा मोक्षासाठीच असतो. मोक्ष म्हणजे सगळ्यातून मुक्ती . मनाचा क्षय . पण ते तितके सहज खचितच नसते आणि म्हणूनच मोक्षाची वाटचाल सुद्धा सोपी नाही .

भजन ,कीर्तन , प्रवचन , नामस्मरण , पारायण , पूजा , आरती , महाप्रसाद , शेजारती एक ना दोन अनेक माध्यमातून आपण त्यांच्या समीप जाण्याचा प्रयत्न करत असतो. अध्यात्मात खोटेपणाला वाव नाही म्हणूनच हे सर्व करत असताना आपण किती श्रद्धेने समर्पणाने त्यांच्या सेवेत रुजू आहोत हे सर्वात महत्वाचे आहे. भक्तीचा परमोच्चबिंदू म्हणजे मानसपूजा . मानसपूजा आपल्याला महाराजांच्या अत्यंत समीप घेवून जाते . आपल्या आयुष्याचा सुकाणू ज्यांच्या हातात आहे आणि ज्यांचे अधिराज्य आपल्या अखंड श्वासावर आहे त्या आपल्या महाराजांची भेट मानसपूजेतून जेव्हा होते तेव्हा काळ क्षणभर स्थिरावल्यासारखा वाटतो .

महाराजांच्या भेटीची आस असायला हृदयात प्रचंड कळकळ लागते. नुसते हारतुरे , नारळांची तोरणे , जेवणावळी ,शाली देवून काहीच होत नाही. अहो महाराज ह्या सगळ्याच्या पलीकडे आहेत म्हणूनच समजायला अत्यंत कठीण आहेत .  पंढरीची वारी म्हंटली कि जिथे कानात टाळ मृदुंगाचे स्वर घुमायला लागतात , विठूचा गजर करणारा तहान भूक विसरलेला वारकरी दिसायला लागतो , जशीच्या तशी वारी दिसायला लागते तेव्हा समजायचे महाराज पांडुरंगाच्या रुपात आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी आहेत . अश्या परम भक्तांसाठी महाराजंचे फक्त “ असणे “ हेच असते . त्यांचे अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवते आणि म्हणूनच महाराजांचा स्पर्श , त्यांच्या चेहऱ्यावरील भाव ,चेहऱ्यावरील स्मितहास्य ,आशीर्वादासाठी आपल्या डोक्यावर असलेला त्यांचा हात . ह्या सगळ्या सगळ्याची सोळा आणे प्रचीती म्हणजेच उच्च कोटीची मानसपूजा .

आजचा दिवस खास . महाराजांचा वरदहस्त डोक्यावर असला कि आयुष्य मार्गी लागते . अशक्य हि शक्य करतील स्वामी हे त्यांनी म्हंटले आहेच . त्यांच्या सेवेत कुठेही कमी पडायचे नाही हे तर आहेच पण आपण त्यांचे शिष्य आहोत हे सांगताना त्यांचीही मान ताठ राहावी असे उत्तम शुद्ध कर्म आपल्या कडून झाले पाहिजे .  कुठलीही कृती करताना त्यांचा विचार आपल्या मनात प्रथम आला पाहिजे म्हणजे दुष्कृत्य घडणारच नाही हे नक्की. जो अनन्यभावे माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालविन हे वचन महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेच आहे . 

महाराज आणि भक्त हे एक वेगळेच समीकरण आहे . दुधात साखर विरघळावी तसे त्यांचे नाते असते . आपल्या मनात विचार यायच्या खूप आधी तो त्यांना समजलेला असतो . प्रत्येक गुरुपौर्णिमेला काहीतरी वेगळे केले पाहिजे . आपल्यातील एखादा वाईट गुण सोडून दिला पाहिजे जसे सतत खरेदी करत राहणे ,पैशाचा अपव्यय करणे ,घरातील आपल्याच आईवडिलांची काळजी न घेणे . आपल्यातील कुठला गुण जो वाईट आहे हे आपल्याच माहित असते तो सोडून देता आला पाहिजे . आपला अहंकार आपल्याला आपल्या ताब्यात ठेवता आला पाहिजे .कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. गरजूना मदतीचा हात दिला पाहिजे , अन्नदान केले पाहिजे आणि हे सर्व करताना त्यातून निर्लेप पणे बाहेर येऊन जीवन जगता आले पाहिजे . एखादी गोष्ट मिळवण्याचा ध्यास असावा पण हव्यास नको .

गुरु ह्या शब्दात खूप भावार्थ सामावलेला आहे . आपल्या संस्कृतीत गुरुशिष्य परंपरा खूप मोठी आहे आणि इतिहासाने वेळोवेळी त्याचे दाखले दिले आहेत . माझ्या संपूर्ण आयुष्यात अध्यात्मिक क्षेत्रात लाभलेले गुरु म्हणजे शेगाव संस्थानाचे सर्वेसर्वा कै. भाऊ साहेब पाटील. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेली शिकवण अखेरच्या श्वासापर्यंत मनात राहील. ह्या सर्व शक्ती आपल्या आकलनाच्या खूप बाहेर आहेत हे ते नेहमीच सांगत असत.  आपल्याला त्यांना भेटायची किती आस आहे ह्यावर त्यांची आपली भेट अवलंबून आहे म्हणूनच नामात राहणे ,पारायण करत राहणे हे सर्वात उत्तम. संपूर्ण आयुष्य महाराजांच्या चरणाशी राहून त्यांना समर्पित करणाऱ्या ह्या योग पुरुषाकडून किती शिकावे आणि किती नाही . संस्थानातील त्यांचा वावर अक्षरशः अतिसामान्य अश्या साधारण सेवेकर्या सारखाच असे. त्यांची शिस्त वाखाणण्याजोगी होती. कुठेही वशिला नाही कि मागील दरवाज्यातून प्रवेश नाही . सर्वसाधारण वारकर्या प्रमाणे साधा सदरा आणि धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी ह्या वेषा व्यतिरिक्त मी त्यांना आजवर कधीच पहिले नाही . जे आहे ते सर्व महाराजांचे आहे आणि आपण फक्त ते सांभाळत आहोत ह्या विचारापासून ते कधीच परावृत्त झाले नाही . अध्यात्म हि काय चीज आहे हे भाऊनी सांगितलेल्या अनेक अनेक गोष्टींवरून उमजत गेले. सगळ्यात असून कश्यातच नाही अशी जेव्हा मनाची अवस्था होते तेव्हा तुम्ही त्यांच्या निकट आहात असे समजायला हरकत नाही . अश्या ह्या गुरुतुल्य व्यक्तीचा आशीर्वाद मला लाभला हे मी माझे भाग्य समजते . आपला प्रत्येक श्वास हा त्यांच्यासाठी जगणे हि त्यांची शिकवण मी आत्मसात केली आणि त्याचप्रमाणे वागण्याचा पुढेही प्रयत्न करीन. 

हे सर्व लिहिताना सुद्धा शेगाव संस्थान ,पारायण कक्ष जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले आहे , सकाळी 11 वाजता मंदिरात सर्वत्र एकच वेळी होणारा घंटानाद , महाराजांचे अश्व ,गजराज त्यांना सलामी देतात दे दृश्य सगळे अगदी तसेच्या तसे समोर आहे आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत . शरीर कुठेही असो मन मात्र तिथे त्यांच्या चरणापाशी आहे. शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज ह्या दोन्ही गुरुनी माझ्याकडून आणि माझ्या पुढील पिढ्यांकडून सुद्धा आजन्म ,अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करून घ्यावी अशी प्रेमळ विनंती आज त्यांच्या चरणापाशी आहे . अध्यात्माची ताकद प्रचंड आहे आणि त्यातील अनुभ व्यक्तीला अंतर्बाह्य बदलण्याची ताकद ठेवतात . जसा वाल्याचा वाल्मिकी झाला तसाच प्रत्येक व्यक्ती ह्या अध्यात्मिक मार्गात येऊन जणू कृतकृत्य होतो. अहो सुख दुक्ख प्रत्येकाला आहे. देवाने सर्वाना सर्व दिले नाही आणि म्हणूनच जे दिले आहे त्यात आनंद मानला पाहिजे . आपले आचार विचार सात्विक ठेवुन नामस्मरण हेच आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय ठेवले पाहिजे . सर्वस्व त्यांच्यावर सोडून द्या आणि मग बघा काय घडवतील ते तुम्हाला. लहान मुलाला खेळवताना आपण त्याला आकाशात उंच उडवतो पण ते वरतीजावूनही त्याच्या चेहऱ्यावर हसू असते ,आपण खाली पडू अशी भीती जराही नसते अगदी तसेच आपल्याला कुठल्याही प्रसंगात झेलणारे आपले महाराज आहेत  आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथातील गणू जवर्या . धोंडे कितीही उडाले तरी गणू कपारीत निर्धास्त होता तो महाराजांच्याच कृपेने .  

त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहणे आणि त्यांच्या चरणाशी लीन होण्यासारखी गुरुदक्षिणा नाही. आज मागायचे तरी काय ? सारखे काहीतरी मागतच राहिले पाहिजे का? तर अजिबात नाही . पण आज हक्काने मागायचे ...आमरण वारी घडो ,सदैव तुमचे चिंतन राहो . महाराजांची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर राहूदे . काळ कुणासाठी थांबत नाही आणि किती संकटे आली तरी त्यांच्यावरील भक्ती ,श्रद्धा कधीही कमी होऊ द्यायची नाही . जगावर आलेले करोनाचे संकट सुद्धा आपण ह्याच श्रद्धेमुळे पार केले आहे  . 

सर्वांच्याच आयुष्यातील सर्वच गुरु आणि गुरुतुल्य व्यक्तीना माझा सादर प्रणाम. गुरुपौर्णिमेच्या अनंत शुभेछ्या .

श्री गजानन जय गजानन 

श्री स्वामी समर्थ  

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment