Monday, 28 November 2022

कर्म दाता

 || श्री स्वामी समर्थ ||

ग्रहमालिकेतील सर्वात महत्वाचा ग्रह शनी ,जो शिस्तबद्ध आहे पण त्याला भावना नाहीत असे अजिबात नाही . घरात कुणाचाच धाक नसेल तर आपले आयुष्य आणि कुटुंब दिशाहीन होईल. कुणी तरी हवेच ज्याला आपण उत्तर द्यायला बांधील आहोत . अगदी तसेच शनी महाराज आहेत , त्यांचा धाक आहे म्हणून आपण जरा तरी नीट वागतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये. पण म्हणून समस्त जनतेने त्यांना जे व्हिलन ठरवले आहे ते मात्र कदापि योग्य नाही. शिस्त कुणालाच नको असते आणि शिस्त लावणारा तर डोळ्यासमोर नको असतो पण ती आहे म्हणून आयुष्याला वळण आहे नाहीतर सगळीकडे अंदाधुंदी अराजकता माजली असती. 

मी आणि माझा भाऊ लहानपणी अजिबात भात खात नसू म्हणजे नकोच असायचा . पण बाबा पंक्तीला असतील तेव्हा गपचूप खात असू ...सर्वांगीण आहार हवा म्हणून सगळे थोडे थोडे खाल्लेच पाहिजे हि शिस्त लावणारे बाबा तेव्हा आम्हाला शनी सारखेच भासत पण त्यांची शिस्त आज आमच्या मुलांना लावताना पटते आहे. 


शनी आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. शनी महादशा किंवा शनी साडेसाती आली कि कुणीतरी जवळचे गेल्यासारखे चेहरे करून बसणाऱ्या लोकांना सांगावेसे वाटते कि तुम्ही भाग्यवान आहात कारण आता तुम्हाला साडेसाती , शनी दशा येते आहे. अजिबात घाबरू नका , शनी घ्यायला नाही तर द्यायलाच येत आहे , आपल्याला घेता आले पाहिजे . शनीला का घाबरायचे ? कारण तो आपले वाईट करणार , मोठे आजार देणार , विलंबाने बरी होणारी दुखणी , मानसिक त्रास देणार , सगळे अडथळे आयुष्यात निर्माण करणार हे आपण अगदी गृहीत धरतो आणि तिथेच चुकतो. 


शनी कुणी परका नाही तर तो आपलाच सखा आहे. शनी आणि गुरु दोघेही अध्यात्माचे , मोक्षाचे ग्रह फक्त त्यांचा मार्ग वेगवेगळा आहे . आता मोक्ष  कुणी पाहिलाय ? हाही एक प्रश्नच आहे . पण असे वागलात तर नरकात जाल आणि तसे वागलात तर मोक्ष मिळेल ह्या धाकाने तरी आपले जीवन वागणे बदलेल नाही का? 

शनीला आपला बेस्ट फ्रेंड बनवा . बघा आपल्या घरी आपला भाऊ / दीर जेवायला येणार असतील तर आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतो जेणेकरून त्यांना आनंद देता येयील . अगदी तसेच ह्या आपल्या शनी महाराजांना खुश ठेवायचे असेल तर त्यांना जेजे आवडते ते सर्व करा म्हणजे काय ? शनी महाराजांना अहंकार , व्यसने , व्यभिचार , चुकीचे व्यवहार , चोरी  लबाडी आवडत नाही , त्यांना त्याचा तिटकारा आहे. त्यांना नीतीने वागणारी माणसे प्रिय आहेत , शिस्तप्रिय , खरे वागणे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे नम्रता . अहंकार असणार्या व्यक्तींची साडेसाती मध्ये काय अवस्था शनी महाराज करतात ते मी सांगायला नको .  वादळ झाले कि नारळी सुपारी सारखे सरळसोट वृक्ष नेस्तनाबूत होतात पण भाताची लव्हाळी तशीच राहतात हे सगळ्यांनी लक्ष्यात ठेवले पाहिजे.  जे आयुष्यात लाव्हाळ्या सारखे वागतात म्हणजे “ Low Profile “ जगतात त्याना शनिदेव कश्याला त्रास देतील उलट अश्या व्यक्ती  बक्षीसपात्र ठरतात . रावाचा रंक करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांच्या चरणाशी आपल्या अहंकाराचा त्याग करणे हेच उत्तम. 


साडेसाती येणार म्हंटल्यावर कुणाची घाबरगुंडी उडते? त्यांचीच ज्यांना त्यांचे मन खात असते ...आपण केलेली चुकीची कर्म अनेक आजारांच्या रुपात आपल्या समोर एकेक करून हात जोडून उभी राहतात आणि आपल्याला त्यांना उत्तर देणे क्रमप्राप्त असतेच . ज्यांनी चुकीची कर्म केली आहेत त्यांचे मन त्यांना खात असते आणि म्हणूनच मग साडेसातीची भीती वाटू लागते . ज्यांनी काहीच वाईट केले नाही त्यांनी का आणि कश्याला कुणाला घाबरायचे ? 


साडेसाती चंद्राला लागते . चंद्र म्हणजेच मन . आपण केलेल्या चुका त्यांची फळे प्राप्त होण्याची वेळ म्हणजेच साडेसातीचा काळ.  आपल्या चुकांचे ओझे आपल्यालाच पेलेनासे होते आणि  म्हणून आपली झोप उडते . निद्रानाश हे साडेसातीचे पहिले पाऊल. शनी महाराज आपल्या चुकांची जाणीव करून देतात त्यातून तुम्ही सुधारलात त्या मान्य केल्यात आणि नीतीने वागलात तर बरे नाहीतर आहेच मग त्यांचा दंड .

आयुष्यभर आपण सतत दुसर्याला दोष देत असतो , अर्ध आयुष्य आपण दुसर्यांना अक्कल शिकवण्यात आणि कमी लेखण्यात घालवतो .पण आपल्या स्वतःच्या अवगुणांचे काय ? म्हणूनच साडेसाती म्हणजे सिंहावलोकन , आत्मपरीक्षण . आपल्या आत डोकावले तर वेगळ्याच विश्वाचे दर्शन घडेल जे आपल्याला करायला शनीच शिकवतो. शनी जीवनाला वळण लावतो , संकट समयी आपले कोण हे दाखवणारा शनी आहे. आपल्याला जगाची अगदी जवळून ओळख करून देणारा शनी . कष्टाची भाकर किती गोड आहे आणि इतर मार्गाने मिळवलेली लक्ष्मी कशी निषिद्ध आहे ह्याची जाणीव करून देणारा शनीच आहे . अहंकार ,मत्सर , सगळ्यांना पाण्यात बघणारी व्यक्ती लक्ष्मीपासून परास्त राहते त्यामुळे साडेसाती आली कि मग एकामागून एक दणके बसायला लागतात . ज्याची कधीही शक्यताही वर्तवली नव्हती त्या गोष्टी प्रत्यक्षात घडायला लागतात आणि झोप उडते . मनोमनी हे सर्व आपल्याच कुकर्माचे फळ आहे ह्याची जाणीव झाली तरी अजूनही शनीवर त्याचे खापर फोडणे मात्र आपले चालूच असते . अररे किती सांगावे , किती बोलावे पण शहाण्याला सुद्धा न कळावे हि खरीच शोकांतिका  म्हणावी .अश्यांना पळता भुई थोडी झाली नाही तरच नवल . चुका करताना आपल्याला शनीची आठवण येत नाही मग आता कश्याला भीती वाटायला हवी . इतका माज आहे ना ? मग भोगायला सुद्धा तयार रहा.

ह्या उलट जे नम्र आहेत त्यांचे आयुष्य शनी एका वेगळ्याच उंचीवर नेतो . परदेशगमन , विवाह , नोकरी , उच्च शिक्षण ,पद ,नवीन वस्तूचा लाभ . एक ना दोन अश्या सर्व गोष्टी शनी प्रदान करतो तोही मुक्त हस्ताने. हे बक्षीस असते चांगले वागल्याचे आणि पुढेही चांगले वागत राहण्याचे. म्हणून शनीला कर्मदाता म्हंटले आहे. जसे कर्म तसे फळ .

आपला आजचा जन्म हे आपले वास्तव असले तरी ह्याही आधी आपण अनेकदा जन्म घेतला आहे  आणि त्या प्रत्येक जन्मात कर्म केले आहे अर्थात चांगले आणि वाईट . त्या सर्वाची फळे भोगण्यासाठी मग पुढील जन्म घेत राहिलो आहोत . म्हणूनच आता ह्या सगळ्याची जाणीव झाल्यावर निदान उरलेला जन्म तरी चांगली कर्म करण्यात घालावूया , काय पटतय का? त्यांनी माझा अपमान केला मग मी आता त्याचा करणार हि शृंखला आपणच मोडली पाहिजे . जावूदे त्याचे कर्म त्याच्यापाशी पण मी नाही माझे कर्म वाढवणार असा विचार करून आपले जीवन चुकीच्या कर्मापासून वाचवू शकतो.

शनी महादशा आली किंवा साडेसाती तर आपण जगणे सोडून देणार का? श्वास घ्यायचा बंद करणार का? नाही ना? उलट शनी दशा साडेसाती आली तर उपासना वाढवावी ,तशीही ती वाढतेच . उत्तम उपासक शनी राहुच्याच दशेत तयार होतात .

काही गोष्टी लक्ष्यात ठेवण्यासारख्या आहेत त्या म्हणजे  गोचरीचा शनी मूळ शनीवरून किंवा समोरून जाताना त्रासदायक परिस्थिती असते अनेक आव्हाने समोर येत राहतात . शनी जर पत्रिकेत षष्ठ स्थानात असेल तर विलंबी आजार होतात आणि ते तुम्हाला अगदी स्मशानापर्यंत नेतात . पण षष्ठ स्थान हे रोजच्या कर्माचे स्थान आहे आणि शनी तुमच्या कर्माचा हिशोब ठेवणारा त्यामुळे तुम्ही रोजचे कर्म उत्तम केलेत तर शनीचा दुष्परिणाम कमी होयील असा उदात्त विचार का नाही करत आपण. घरातील समाजातील आबाल वृद्धांची सेवा , उपासना , आपण बरे आपले काम बरे , दान ह्यासारख्या गोष्टी आपले आयुष्य सुकर करतात .सर्वात मुख्य म्हणजे आपला अहंकार , त्याच्यावर अंकुश ठेवता आला पाहिजे. म्हंटले आहेच अहंकारं बलं दर्पं, कामं क्रोधं च संश्रिताः . अहंकार हा सर्वार्थाने विनाशास कारणीभूत ठरतो. 

शनी केतू , शनी चंद्र , शनी राहू , शनी मंगळ , शनी रवी ह्या युती पत्रिकेत काहीतरी परिणाम करणारच ते आपले प्रारब्ध आहे पण म्हणून आपण जगायचे सोडून देत नाही ना . शनी महाराज आपल्या निकट आहेत आणि त्यांची आपल्या प्रत्येक कृतीवर पूर्ण दृष्टी आहे ह्याचा विसर पडू दिला नाही तर अनेक अनर्थ टळतील, नाही का?

सगळे आहे पण मनाची शांतता नाही , झोप नाही हि अवस्था शनीच करू शकतो . म्हणूनच वृद्धांची सेवा ,चतुर्थ श्रेणीतील लोकांना भूतदया दाखवणे ह्यात सातत्य बाळगावे . सर्वप्रथम मी काय तो एकता शहाणा आणि इतर मूर्ख असे वागणे सोडून द्यावे . कुणाच्याही व्यंगावर किंवा आर्थिक स्थितीवर हसू नये , कुणालाही कमी लेखू नये कारण पुढील वळणावर आपल्या आयुष्यात काय आहे हे आपल्याला सुद्धा माहित नाही . 

1 अहंकार त्यागावा 

2 मंगळवारी मारुतीचे दर्शन घ्यावे .

3 मंदिरात शनी किंवा मारुतीच्या चेहऱ्याकडे न बघता चरणा कडे बघून नतमस्तक व्हावे 

4 कणकेचा दिवा ( 11 शनिवार चढते आणि 11 शनिवार उतरते ) मारुतीच्या मंदिरात लावावा.

5 ओं शं शनैश्चराय नमः जप करावा 23000

6 एका मातीच्या पणतीत तेल भरून घ्यावे आणि त्यात आपला चेहरा एक मिनिट न्याहालावा . नंतर ते तेल मारुतीच्या        मंदिरात समई असते त्यात घालावे . आपली पिडा त्यात जळेल . तिथे जाऊन चुकूनही मारुतीच्या डोक्यावर ते तेल ओतू नये. 

7 हनुमान चालीसा नित्य पठण करावे 

8 वागण्यातील ताठा सोडून द्यावा .

9 अपंग , वृद्ध मंडळी ह्यांची सेवा करावी .

10 अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. 

शनी हेच अंतिम सत्य आहे हे विसरून चालणार नाही . आपल्या सर्वांवर शनी महाराजांची असीम कृपा राहूदे हीच प्रार्थना . 

ओं शं शनैश्चराय नमः

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 








 


Saturday, 26 November 2022

वास्तू द्वार उघडते भाग्याचे द्वार

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्यातील प्रवासात सुख दुक्ख हि माणसाचे सोबती असतात . मनासारखे झाले कि हुरळून जायचे आणि दुख झाले कि  गर्भगळीत व्हायचे हा मनुष्य स्वभाव आहे आणि त्यातून आपली सुटका नाहीच . पण अध्यात्मिक प्रगती जसजशी होत जाते तसे ह्या सर्वाचे दाह कमी होत जातात . अनेकवेळा एखादी गोष्ट आपण खूप मनाला लावून घेतो कालांतराने त्याचे दुक्ख किंवा त्यासंबंधीचे मनातील विचार कमी होत जातात . अनेक वेळा तशीच किंवा तीच मनाला त्रास देणारी घटना पुन्हा घडते पण त्यावेळी मात्र आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही , ती आपण सहज स्वीकारतो आणि विसरून सुद्धा जातो . 


अश्यावेळी समजावे कि आपली अध्यात्मिक प्रगती एक पाऊल निश्चितपणे पुढे गेली आहे. आपण ह्या प्रापंचिक सुख दुक्खापासून दूर पण सद्गुरूंच्या समीप जायला लागलो आहोत हाच त्याचा अर्थ आहे. 

षडरिपू कमी होत आहेत आणि मनाचे शुद्धीकरण होत आहे . ह्या सर्व प्रक्रिया अश्याच होत नसतात . नित्य नेमाने केलेली साधना , उपासना, नामस्मरण , पवित्र ग्रंथांचे नित्य पठण ह्या सर्व गोष्टींमधील सातत्य ह्याचे हे फळ असते . जे दिसत नाही पण अनुभवायला मिळते. 


सहज मनात विचार येतो कि आज आपण ह्या गोष्टीसाठी  चिडलो नाही ज्याचा आधी आपल्याला क्षणात राग येत होता . परिस्थिती तीच आपणही तेच पण विचार बदलले. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात एक सुंदर वाक्य आहे. “ एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आन , सत्य एक त्यांनाच कळे “ 

आपल्या विचारात परिवर्तन घडणे , एखाद्या गोष्टीकडे , घटनेकडे आपला बघण्याचा दृष्टीकोण बदलणे ,मन अधिकाधिक सत्शील होणे , आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या कर्माबद्दल सतर्कता येणे ह्या सर्व खचितच सोप्या नसणार्या गोष्टी सद्गुरुकृपा झाली तर सहज शक्य होताना दिसतात , अनुभवायला मिळतात .

कुणावर राग धरून , कुणाचा मत्सर करून , हेवेदावे करून काहीच होत नाही पण ह्यातून आपण मात्र आपले कर्म मात्र वाढवत असतो . ह्याचे एक उदा द्यावेसे वाटते . अनेकदा अनेक लोक आपल्या तोंडावर दार लावतात . समोरचा घरातून बाहेर पडला कि लगेच धाडकन दरवाजा लावतात किंवा कुणाच्याही तोंडावर दरवाजा लावण्याची त्यांना सवय असते . आता ह्यात असे आहे कि ज्यांच्या तोंडावर दरवाजा लावला त्यांना त्याचा काडीचाही त्रास होताना दिसत नाही उलट जो दरवाजा लावतो त्याने आपले कर्म नाही कुकर्म वाढवून घेतले आणि त्याचे फळ निश्चित पणे वाईट आहे. त्यालाच नाही तर त्याच्या पुढील पिढ्यांना सुद्धा ते वाईट.  आपला राग मत्सर द्वेष समोरच्यावर काढून काय उपयोग त्यातून आपण नवीन कर्माची निर्मिती करत असतो पण दुर्दैवाने हे आपल्याला समजत नाही . मग पुढे अश्या घरात धननाश , शिक्षणासाठी पुरेसा पैसा नसणे , व्यसने , धंदा व्यवसायात बरकत नसणे , घरातील मुख्य व्यक्तीला आजार अशी अनेक शुक्ल्काष्ट मागे लागतात . असे आजार होतात ते आपल्याला स्मशानापर्यंत नेतात . अश्या घरात वरवरचे सर्व चांगले दिसले तरी नसते हे मी वेगळे सांगायला नको. 


कुणाच्याही तोंडावर दार लावणे किंवा घरात आलेल्याला आतून काय हवे ? असे विचारून त्रासिक चेहरा करणे  त्यासारखे पाप ते काय . अहो ह्याच दरवाज्यातून पै पाहुणा , प्रत्यक्ष लक्ष्मी आणि सद्गुरू सुद्धा प्रवेश करणार त्या दरवाज्याचा अपभ्रंश का करावा? अश्या वास्तूत प्रचंड वास्तू दोष तयार होतो मग घरी येणार्यांची वर्दळ कमी होते , रोजचे जीवन जेमतेम जगता यावे इतके धन सुद्धा कमावणे अशक्य होते . दीर्घकाळ टिकणारे आजार , मानसिक दौर्बल्य , निद्रानाश , मनावरील दडपण ह्यासारख्या गोष्टींची न संपणारी शृंखला तयार होते.  ह्या सगळ्याचा उगम दुर्दैवाने आपल्याच चुकीच्या कृतीने झालेला असतो त्यामुळे आपल्या दारात आलेली व्यक्ती मग ती कुणीही असो त्यात परमेश्वरी अंश आहे असे समजले तर आपण कुणाच्याही तोंडावर दार लावायला धजावणार नाही हे नक्की.      

आता ह्याची दुसरी बाजू अशी आहे कि ज्याने दरवाजा लावला त्याने त्याचे कर्म वाढवले पण ज्याच्या तोंडावर लावला त्याचे मन दुखावले गेले आणि त्याने दिलेले शिव्याशाप सुद्धा प्रखर असतात आणि अश्या लोकांची हाय लागते . आपण असे वागलो तर एकदिवस आपल्या दरवाज्यात कुणीही येणार नाही . दुसर्याच्या तोंडावर दरवाजा लावायला व्यक्ती तरी हवी ना समोर . हा खूप गहन आणि चिंतनाचा विषय आहे. वाटतो तितका वरवरचा नाही तर सखोल चिंतनाचा विषय आहे . मनुष्याने आपले कर्म करताना त्रिवार विचार करावा नाहीतर शेवटचा क्षण सुखाचा येणार तरी कसा . निदान त्यासाठी तरी चांगले वागावे . मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे , चार माणसे आपल्याकडे येऊ नयेत असे वाटणे किंवा त्यांना अपमानित करणे हा पराकोटीचा अहंकार आहे . 

ज्याच्या तोंडावर दरवाजा लावला किंवा आपटला त्याने असा विचार करावा कि ह्या दरवाज्यातून मला त्रास होणार आहे म्हणून त्या व्यक्तीला तशी बुद्धी झाली पण त्याच वेळी आपले गुरु आपल्यासाठी आपल्या फायद्याचे द्वार उघडत असतात त्यातून आपला आयुष्याचा पुढील प्रवास असतो जो अत्यंत सुखकर असतो .

कुठले कर्म आयुष्याच्या कुठल्या वळणावर उभे राहील आणि आपल्याला उत्तर द्यायला लावील सांगता येत नाही म्हणून जपून वागले पाहिजे.  पत्रिकेत चंद्र पूर्णपणे बिघडलेला असेल तर अशी माणसे अशी कृती करत असावी ज्यांना समोरच्याला काय वाटेल , समोरचा किती दुखावला जायील ह्याचीही काही पडलेली नसते . केव्हडा हा पराकोटीचा अहंकार. अरेरे....


आपल्या आर्थिक स्थितीला उतरती कळा लागते किंवा धंदा व्यवसाय नोकरी ह्यात धनलाभ होत नाही तेव्हा अंतर्मुख होऊन विचार करा आपले कुठे चुकले ? आपण कुणाचा दुस्वास मत्सर तर नाही करत ? कुणाचा अपमान नाही ना केला? . सरतेशेवटी आपण फार साधी माणसे असतो आपल्याला राग लोभ सगळ्याच भावना आहेत पण त्या व्यक्त करायची पद्धत चुकली तर मात्र आपणच अनर्थ ओढवून घेतो  हे नक्की . 


अश्या अनेक गोष्टींमुळे वास्तू दोष निर्माण होतो . आपली वास्तू वास्तुच राहते त्याला घरपण कधीच येत नाही . पुढे भाऊ बंदकी ह्या समस्या आभाळाइतक्या होतात .


प्रत्येकातील ईश्वराचा मान ठेवा ,कुणाचाही काहीही झाले तरी अपमान करू नका, कुणाचेही क्लेश घेवू नका . दुसर्याचा अपमान करून द्वेष मत्सर करून, समोरच्याला पाण्यात बघून आपले कधीही चांगले होत नाही . आपल्या श्वासात नामस्मरण असू द्या मत्सर नाही . आजकाल ज्याच्या त्याच्या घरात कुलस्वामिनी , साईबाबा , गजानन महाराज , स्वामी समर्थ सगळ्यांचे फोटो असतात , हेच शिकवतात का हे आपल्याला आपले महाराज ? विचार करा आपल्यासोबत अश्या कृतीमुळे आपण आपल्या गुरुंचीही मान खाली घालत आहोत . चालणार आहे हे आपल्याला आणि त्यानाही ? 

पूर्वीच्या काळी असणार्या काही पद्धती किती योग्य होत्या त्याची आता सत्यता पटते . पूर्वी घरी कुणी आले कि त्याला गुळ आणि पाणी देत असत . गडी माणसांचा वावर मागील दरवाज्यातून होत असे तसेच घरातील स्त्रीवर्गाला मुख्य दरवाज्यात सुद्धा येण्याची परवानगी नसे . घराच्या दरवाज्यात आत बाहेर गप्पा कधी मारू नये धननाश आणि मोठी आजारपणे निश्चित.

आज अनेकांना आपली स्वतःची हक्काची वास्तू नाही . घर होण्यासाठी घरघर लागते पण घर होत नाही. ज्यांची आहे त्यांनी ती जपा आणि वृद्धिंगत करा इतकच . 


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 

 


Friday, 25 November 2022

त्यांनीच दिली त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही

 || श्री स्वामी समर्थ ||





कालचा दिवस स्मरणात राहील असाच होता. परवा सुरु केलेले श्री गजानन विजय पारायण महाराजांनी माझ्याकडून काल पूर्ण करून घेतले . पारायण करत असताना माझ्या डोळ्यासमोर सारख्या 2 चांदीच्या कॉईन येत होत्या . एक बाबांची आणि गजानन महाराजांची . त्या मला कुणीतरी दिल्या होत्या नक्की आठवत नाही. काही वर्षापूर्वी काही वस्तूंमध्ये त्या आमच्या प्लंबर काकांकडे नजर चुकीने गेल्या होत्या . शिर्डीची वारी करणारे आमचे काका त्यांनी प्रामाणिक पणाने मला त्या परत आणून दिल्या होत्या . घरातील वस्तू इथे तिथे ठेवायच्या आणि मग त्या हरवल्या कि ओरडत सुटायचे ह्यात माझा नेहमीच पाहिला नंबर असतो .असो. 


त्या दोन कॉईन अचानक स्मरणात आल्या आणि पारायण झाल्यावर त्याची शोध मोहीम सुरु झाली. अवसान गळाले कारण प्रत्यक्ष महाराज हरवले होते. आपली वस्तू नीट न ठेवण्याची खोड महाराज आज चांगलीच जिरवत आहेत हेही लक्ष्यात आले. पारायण पूर्तीचा आनंद कुठेच निघून गेला होता . डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. महाराजांच्या पेक्षा अनमोल , अमुल्य काहीच नाही आणि मी त्यांनाच हरवून बसले होते. महाराजांची क्षमा मागितली  आणि सांगितले कि पुन्हा असे होणार नाही पण मला त्या वस्तू नजरेस पडूदेत. आपली इतक्या वर्षांची घट्ट मैत्री आहे आपली  फ्रेन्डशिप जगावेगळी आहे. सगळी  C 90 महाराजांसमोर ऐकवून झाली . पुन्हा शोधले आणि एकदाच्या त्या कॉईन मिळाल्या...घरभर “ मिळाल्या म्हणून “ नाचत सुटले , महाराजांचे गालगुच्चे घेतले ,आपली फ्रेन्डशिप पुढे चालू असे म्हणून महाराजांना मिठीच मारली आणि खूप रडले. 


आयुष्य असेच असते नाही. माणूस असते तेव्हा त्याची किंमत नसते पण दूर जाते तेव्हा आपला जीव कासावीस होतो. महाराज दिसेपर्यंत मला अन्न पाणी गोड लागेना पण मग उठले आणि झुणका भाकरी कांदा मिरच्या गुळ असा नेवैद्य केला . मला भाकरी अजिबात येत नाही करता हे खरेच आहे पण तरी केली ( माझे महाराज खातात माझी भाकरी हा विश्वास ) ,आरती केली आणि खूप वेळ एकटीच बसून राहिले. काय शिकलो आपण ह्या प्रसंगातून ? मनोमन लाज वाटू लागली .


महाराजांचे अस्तित्व आयुष्यातून वजा केले तर उरले शून्य ह्याची पुनश्च ग्वाही मिळाली . आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कुणी काहीही म्हणो “ ते आहेत “ ह्याचा दाखलाही मिळाला. 


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




 


Thursday, 10 November 2022

जातकाची मानसिकता

 || श्री स्वामी समर्थ ||



काहीतरी महत्वाची  समस्या असल्याशिवाय कुठलाही जातक ज्योतिषाकडे जात नाही. एखाद्या गोष्टीसाठी अथक परिश्रम करूनही जर यश आले नाही तर ह्या शास्त्राचा आपले उत्तर शोधण्यासाठी आधार घ्यावासा वाटतो आणि मग त्या शास्त्राच्या जाणकाराकडे पावले वळतात .


जातकाच्या प्रश्नांचे निदान करण्यापूर्वी आपण त्याची मानसिकता समजून घेणे खूप आवश्यक असते . ती समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. जातक आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर घेवूनच आलेला असतो.  अनेकदा ठरवून सुद्धा जातक आणि ज्योतिषी ह्यात संवाद होत नाही कारण प्रश्न विचारणारा कधी प्रश्न विचारणार ह्याची वेळ विधात्याने  निश्चित केलेली असते . त्याच वेळी जातक प्रश्न विचारतो. 


आज प्रत्येकाला खूप बोलायचे आहे , मन मोकळे करायचे आहे पण कुणाकडे तेच समजत नाही कारण ह्या व्यावहारिक जगात माणसा माणसातील प्रेम , नात्यातील गोडवा ,विश्वास माया ओलावा कमी होत आहे.  


आपल्याकडे आलेल्या जातकाला आपण योग्य व्यक्तीकडे आलेलो आहोत ह्याची खात्री पटते तेव्हाच तो आपल्याशी त्याच्या मनातील खर्या शंका विचारतो आणि तेच खरे हितगुज . अनेक घरगुती किंवा काही गुंतागुंतीचे प्रश्न , काही नात्यातील नाजूक प्रश्न अश्या अनेक गोष्टी जातक बोलताना मग कचरत नाही कारण जातक आणि ज्योतिषी ह्यात विश्वासाचे नाते तयार होते. जातकाने आपल्याशी मनमोकळे बोलावे हि जबाबदारी ज्योतिषा चीच असते . आयुष्यात कुठलाही प्रश्न असुदे त्यातून मार्ग निघतोच ,  नव्हे तो आपण काढायचा असतो हा विश्वास जातकाला देणे महत्वाचे असते.

प्रत्येक जातकाला आपली समस्या जगातील सगळ्यात मोठी समस्या वाटत असते आणि ज्योतिषाकडे जणू अल्लौदिन चा दिवा आहे आणि तो घासला कि आपली समस्या सुटणार असा (  भाबडा ) विश्वास किंवा अपेक्षा  त्याला असते .आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी अत्यंत अधीर असणारा जातक आपला संयम कधीतरी घालवून बसतो.  इतकच नाही तर अनेकदा आपले उत्तर सुद्धा ज्योतिषाकडून त्यांना सकारात्मकच हवे असते. आपल्याला हवे तेच उत्तर समोरच्याने दिले तर आपण दिल से खुश नाहीतर आपला स्वर बदलतो हा मनुष्य स्वभाव आहे त्याला कोण काय करणार म्हणा .असो. 

आजकाल इंटरनेट च्या माध्यमातून जग जवळ आलेले आहे त्यामुळे फोन , झूम च्या माध्यमातून सुद्धा समुपदेशन करता येते . त्यामुळे जगाच्या कानाकोपर्यातून कुणाशीही कधीही संपर्क करता येणे शक्य झाले आहे .  प्रश्न विचारताना जातकाच्या मनस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अनेकदा एखाद्या आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा आजारपणाचा प्रश्न असतो ,अश्यावेळी भावूक झालेल्या जातकाला संयमाने उत्तरे देणे गरजेचे असते.  एखाद्याच्या पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तर तसे नकारात्मक उत्तर पचवण्याची ताकद जातकात नसल्यामुळे ते वेगळ्या शब्दात त्याला सांगावे लागते . हीच गोष्ट संततीसाठीही आहे. अश्या अत्यंत नाजूक प्रश्नांची उत्तरे जातकाला न दुखावता देणे हे ज्योतिषासमोरचे आव्हान असते. 


आज आपण अनेक आघाड्यांवर एकच वेळी लढत असल्यामुळे नोकरी , आर्थिक स्थैर्य , घर , विवाह ,संतती ह्या गोष्टी एकत्र गुंतलेल्या आहेत . एखाद्या गोष्टीसाठी उपाय सांगा हा सगळ्यांचाच प्रश्न असतो आणि तो गैर नाही. अनेक गोष्टी आपली मानसिकता बदलून आपल्याला साध्य करता येतात . अश्यावेळी योग , मेडीटेशन उपयुक्त ठरते. पण असे आहे कि देवाने सगळ्यांना सगळे दिले नाही. म्हणूनच जगी सर्व सुखी असा कोण आहे हे म्हंटले आहे . त्यामुळे आयुष्यात विवाह योग नसेल तर हि गोष्ट मिळणार नाही हा योग नाही हे जातकाला कधीतरी स्वीकारावे लागते आणि जितका लवकर तो ती स्वीकारेल तितका लवकर सुखी होईल , नाही का? 


परदेशगमन ,आजकाल प्रत्येकालाच परदेशी जायचे वेध लागले आहेत पण तो योग आपल्या पत्रिकेत नसेल तर परदेशगमन होणार नाही. पण त्यामुळे त्यासाठी निराश न होता आहे त्या नोकरीत सुद्धा मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न का करू नये ? शेवटी आहे त्यात समाधान मानावेच लागते ,जगणे सोडून तर चालणार नाही ना .


जातकांच्या समस्या म्हणजे पूर्वकर्म आणि प्रारब्ध ह्याचा मेळ आहे. जे आहे ते आहे . काही गोष्टी नियतीला आणि सद्गुरुना सुद्धा बदलता येत नाहीत कारण ते तुमचे प्राक्तन असते त्यामुळे भोग आहेत ते भोगून संपवणे उत्तम. मुलगी शिकलेली  मिळेल , कि गोरी , जवळची मिळेल कि दूरची हे सांगणे कठीण ,विवाहयोग आहे कि नाही हे सांगता येयील. शेवटी ज्योतिष हे कालविधान शास्त्र आहे , एखादी घटना कधी घडेल हे ज्ञात होईल इतकेच. प्रश्न विचारणाऱ्या जातकानेही आपण योग्य प्रश्न योग्य वेळीच विचारात आहोत कि नाही ह्याचे भान ठेवले पाहिजे . शाळेत जाणार्या मुलाचा मुलाचा विवाहाचा प्रश्न उचित नाही ,येतंय का लक्ष्यात ? त्यामुळे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी दैवी उपायही नसतात . काही गोष्टी आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारावी लागते . ज्योतिषी हा सुद्धा जातक असतोच कि , त्याच्याही आयुष्यात प्रश्न असतात त्यामुळे त्याला जातकाची मानसिकता समजणे फारसे अवघड नसते.


प्रश्न इथून तिथून सारखेच असतात ,आपण जातकाची मानसिकता समजून घेवून त्याला कशी उत्तरे देतो हे त्या क्षणी आव्हान असते .कठीण प्रश्नाचे उत्तर सोपे केले तर जीवनातील आनंद सुद्धा चिरकाल राहील. प्रत्येकाला जगण्यासाठी देवाने काहीतरी चांगले दिले आहे . पत्रिकेतील वर्मावर बोट न ठेवता , त्याला देवाने बहाल केलेल्या अत्यंत उत्तम गुणांची ओळख त्याला ज्योतिषाने करून दिली तर जातक आपले दुक्ख कुरवाळत न  बसता ,उमेदीने आयुष्य जगायला लागेल आणि आपला प्रश्न विसरून जायील . त्याला जगण्याचे नवचैतन्य , दिशा प्राप्त होईल. सहमत ?

ज्योतिषी तुमचा मित्र किंवा शत्रू नाही आहे तो तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची भाषा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून काम करतोय इतकच.


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





  

 







Monday, 7 November 2022

अध्यात्मिक पत्रिका

 || श्री स्वामी समर्थ ||


गेले तासभर मी तुकाराम महाराजांचे अभंग ऐकत होते . खरोखरच तो सर्व काळ आणि त्यांची निस्सीम भक्ती पांडुरंगाने केलेल्या लीला सगळ काही तसच्या तस्स डोळ्यासमोर उभे राहिले . आषाढी ची वारी आणि लाखो वारकर्यांच्या सोबत चंद्रभागेच्या वाळवंटात विठूच्या  गजरावर टाळ मृदुंगाच्या आवाजावर थिरकणारी प्रत्यक्ष पांडुरंगाची पाऊले सगळच अनुभवल मी. काही काळ मी माझे स्वतःचे अस्तित्व विसरून गेले आणि एक गोष्ट लक्ष्यात आली कि कुठल्याही गोष्टीत अंतर्मानापासून  समरसून  गेल्याशिवाय त्यातील अवीट गोडी चाखतच येत नाही .  

अध्यात्मिक पत्रिकांचा अभ्यास आपण त्यात किती खोल उतरतो , समरसून जातो ह्यावर निर्भर आहे हे निश्चित .निरंतर भक्ती हाच अभ्यासाचा  पाया आहे. अध्यात्माची जाण आणि त्यातील अंतर्स्फुर्ती देणारा परमेश्वरुपी नेपचून आपल्या आतच आहे. तोच आपल्याला आपल्या असण्या आणि नसण्याची , आपल्या परम कर्तव्यांची सतत जाणीव करून देत असतो . गुरुचे पत्रिकेवरील साम्राज्य अबाधित आहे . परमार्थाची अवीट गोडी चाखण्यास मदत करणारा गुरु फक्त अनुभवायचा आहे तर त्यातून निर्माण होणारा भाव शब्दबद्ध करायला बोलघेवडा बुध पुढे येयील. 


परमभक्तीचा आणि भक्तिरसाचा अविष्कार घडवणारा उच्चीचा शुक्र प्रपंच करताना परमार्थ कसा करायचा ते शिकवेल आणि दुर्दम्य इच्छा शक्ती देण्यासाठी मंगल पुढे सरसावेल. प्रपंच करून परमार्थ करा हे सांगणारा गुरु तर मुळातच प्रपंच हवाच कश्याला त्यापेक्षा विरक्ती बरी हे मनावर बिम्बवणारा आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीत संयम किती महत्वाचा हे सांगणारा शनी . आकाशात दुडूदुडू धावणारा चांदोमामा अध्यात्माचे प्रतिबिंब आपल्या मनातच दाखवेल तेव्हा डोळ्यातून अश्रुरूपी भक्ती ओसंडून वाहू लागेल आणि मग ज्ञानेश्वर माउलींनी अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी का व कशी घेतली , तुकाराम महाराजांच्या गाथा पुन्हा वरती कश्या आल्या , रामाचा वनवास आणि कृष्णाचे बालपण त्याने अर्जुनाला गीतेतून केलेले ज्ञान प्रबोधन ह्या सगळ्याचा उलगडा होयील. 


अध्यात्मिक पत्रिकेत चंद्र सोबत गुरु, शुक्र ,बुध नेप मंगळ शनी  ह्याच्या सोबत  राहूकेतू चा सुद्धा विचार महत्वाचा आहे तसेच ह्यांचा धर्म आणि मोक्ष त्रिकोणाशी असणारा संबंध बोलका असतो. प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या विशिष्ठ टप्प्यावर संसारातून विरक्त होते आणि मोक्ष मिळवण्यासाठी अध्यात्माच्या वाटेवर तिचा अविरत प्रवास सुरु होतो.  

राम कृष्ण हरी 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क 8104639230 


Thursday, 3 November 2022

भास आभासांचा खेळ – राहू

 || श्री स्वामी समर्थ ||


राहू हा मायावी आहे , भास आभास निर्माण करणारा , छल कपट करणे हे सर्व त्याचे गुण आपल्याला ज्ञात आहेत. प्रत्येक ग्रहाची चांगली आणि वाईट अशी बाजू असते . कुठलाही शुभ ग्रह संपूर्ण शुभ फळे प्रदान करत नाही आणि अशुभ ग्रह प्रत्येक वेळी वाट लावेल असेही नाही. 


राहू आणि केतू ह्यांनी तर जीवनाची लढाई जिंकली आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही कारण एका अमृताच्या थेंबाने त्यांना जीवनदान दिले आहे तरीही आमरण त्यांची जीवनाशी झुंज चालूच आहे. राहू म्हंटल कि लगेच दडपण येते . शनी परवडला पण राहू नको अशी अवस्था राहू दशेत व्यक्तीची होते . असंख्य अनाकलनीय घटना , सततचे दडपण , भास आभास , निद्रानाश अश्या विविध समस्या व्यक्तीला भेडसावत राहतात . राहू व्यक्तीला प्रलोभनात अडकवतो त्यामुळे व्यक्तिगत फसवणूक , आर्थिक फसगत ह्यासारख्या गोष्टीनी व्यक्ती घेरली जाते . राहूच्या दशेत माणसाने आपले राहते घर भाड्याने देऊ नये दिलेच तर व्यवस्थित चौकशी करून द्यावे . घर घेतानाही विचारपूर्वक घ्यावे .


राहू हा फार महत्वाचा ग्रह आहे. राहू केतू ह्या ग्रहांना डावलून भाकीत करणे अशक्य असते .  राहू हा इंटरनेट चा कारक मानला आहे तर केतू टेक्नोलोजी चा. त्यामुळे कलियुगात त्यांचे प्रस्त वाढले आहे आणि अढळ स्थानसुद्धा.


आपले आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर ची राईड आहे. धडाडी , आत्मविश्वास आणि घेयाकडे वाटचाल करायला लावणारी मंगळाची दशा आली कि माणसाला काहीतरी करायची उमेद निर्माण होते .त्यांनतर राहू महाराज येतात आणि सगळी सूत्र हाती घेवून होत्याचे नव्हते करतात . प्रत्येक वेळी वाईट घडतेच असे नाही. शेअर मार्केट हे राहुच्याच अमलाखाली येत असल्यामुळे ज्यांचा राहू चांगला असतो त्यांना त्या दशेत आर्थिक उन्नती व्यावसायिक यशाची गोडी चाखता येते . पण राहूच्या दशेत अनेक विस्मय चकित करणाऱ्या , अचंबित करणाऱ्या घटनांची शृंखला अनुभवायला मिळते हे नक्की . सगळच अधांतरी असल्याचा भास होत राहतो . राहुनंतर जीवन सावरायला गुरु महाराज येतात अश्या जीवनाच्या अनेक दशा आपल्याला अनुभवाव्या लागतात . कधी चांगला काळ तर कधी वाईट .


राहू म्हणजे फसवणूक म्हणून ह्या दशेत माणसाने समाजात फारसे मिसळू नये किंवा सावध राहावे . आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा राहूच समजावा म्हणजे सावध राहून व्यवहार करावे म्हणजे जगणे सुसह्य होयील . राहू कुणाला सर्वात अधिक बिघडवत असेल तर बुधाला त्यामुळे वक्तव्य सांभाळून करावे. कित्येकदा समजलेली बातमी पडताळून पहावी . वयात येणाऱ्या मुलांची राहूची दशा असेल तर पालकांनी सर्वार्थाने सावधगिरी बाळगावी . 

व्यसने , दिशाभूल होणे , भूल पडणे , वाईट संगत ह्यापासून आपल्या मुलांना दूर ठेवावे त्यांच्यावर नको तितका आंधळा विश्वास तर अजिबात ठेवू नये. 


राहूच्या दशेत  समाजात आपल्याबद्दल इतरांचे गैरसमज अधिक होत असतात .राहू सतत संभ्रम निर्माण करतो त्यामुळे कुठलाही निर्णय अनेकदा चुकीचा घेतला जातो . सतत अनामिक भीती वाटत राहणे , आपल्याला कुठलातरी मोठा आजार झालाय , दडपण , निद्रानाश , विचित्र स्वप्ने पडणे ह्या गोष्टी हमखास घडतात . राहू हा आकाशगंगेतील एक लहानसा ठिपका आहे. कित्येक मैल दूर असणारा जो दिसत नाही पण आहे. मायावी आहे आणि त्याचा प्रभाव आपल्या जनजीवनावर किती होतो ह्याचा विचार केला तर राहू च्या ताकदीचा पुसटसा तरी अंदाज नक्कीच येयील. 


राहू मुळे सगळेच वाईट होते का तर नाही . राहूमुळे आज जग जवळ आले आहे. आज पुण्यातील सदाशिव पेठेतील सासूबाई आपल्या लेकीसुनांना झूम च्या सहाय्याने करंज्या शंकरपाळे शिकवत असतात आणि नातवंडाना गोष्टीही सांगत असतात . राहूच्या दशेत ज्योतिष शास्त्र ह्या दैवी शास्त्राचा उत्तम अभ्यास करता येतो , अनेक संशोधने , उच्च शिक्षण ह्याच राहूमुळे घेता येते. राहू परदेश गमनासाठी तत्पर असल्यामुळे राहूच्या दशेत परदेशी जाण्याचे स्वप्न साकारले जाते त्यामुळे राहूची फक्त काळीच बाजू आहे असे नाही. पण अनेकदा तीच पुढे येते . एक सावली अनामिक भीती आपली पाठ सोडत नाही म्हणून राहूचा धाक सर्वांनाच आहे. राहू जर पत्रिकेत दुषित असेल तर राहूच्या दशेत आयुष्याची  अक्षरशः दशा होते आणि राहू चांगला असेल तर व्यक्तीचे आयुष्य प्रचंड उंचीवर जाते .शेअर मार्केट मध्ये असामान्य आर्थिक यश देणारा राहूच आहे. 


लग्नेश किंवा लग्न बिंदू राहूच्या नक्षत्रात असेल तर व्यक्ती हावरट असते . लग्नात राहू व्यक्तीला दशेत सरभरीत करतो .  धनेश , सप्तमेश राहूच्या नक्षत्रात किंवा राहुशी निगडीत असल्यास त्याची फळे मिळतात . 3 6 10 11 ह्या स्थानात  राहू चांगला फळतो . राहू दशमात सुस्थितीत असेल तर राजकारणात यश मिळते .


राहूच्या दशेत शंकराची उपासना नक्कीच फलदायी ठरते . राहुबद्दल अजूनही खूप लिहिण्यासारखे आहे . योगायोगाने आज पाहिलेल्या सगळ्या पत्रीकांमधील प्रश्नाशी राहू निगडीत होता . आज राहुचेच नक्षत्र आहे. 


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230