Friday, 25 November 2022

त्यांनीच दिली त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही

 || श्री स्वामी समर्थ ||





कालचा दिवस स्मरणात राहील असाच होता. परवा सुरु केलेले श्री गजानन विजय पारायण महाराजांनी माझ्याकडून काल पूर्ण करून घेतले . पारायण करत असताना माझ्या डोळ्यासमोर सारख्या 2 चांदीच्या कॉईन येत होत्या . एक बाबांची आणि गजानन महाराजांची . त्या मला कुणीतरी दिल्या होत्या नक्की आठवत नाही. काही वर्षापूर्वी काही वस्तूंमध्ये त्या आमच्या प्लंबर काकांकडे नजर चुकीने गेल्या होत्या . शिर्डीची वारी करणारे आमचे काका त्यांनी प्रामाणिक पणाने मला त्या परत आणून दिल्या होत्या . घरातील वस्तू इथे तिथे ठेवायच्या आणि मग त्या हरवल्या कि ओरडत सुटायचे ह्यात माझा नेहमीच पाहिला नंबर असतो .असो. 


त्या दोन कॉईन अचानक स्मरणात आल्या आणि पारायण झाल्यावर त्याची शोध मोहीम सुरु झाली. अवसान गळाले कारण प्रत्यक्ष महाराज हरवले होते. आपली वस्तू नीट न ठेवण्याची खोड महाराज आज चांगलीच जिरवत आहेत हेही लक्ष्यात आले. पारायण पूर्तीचा आनंद कुठेच निघून गेला होता . डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. महाराजांच्या पेक्षा अनमोल , अमुल्य काहीच नाही आणि मी त्यांनाच हरवून बसले होते. महाराजांची क्षमा मागितली  आणि सांगितले कि पुन्हा असे होणार नाही पण मला त्या वस्तू नजरेस पडूदेत. आपली इतक्या वर्षांची घट्ट मैत्री आहे आपली  फ्रेन्डशिप जगावेगळी आहे. सगळी  C 90 महाराजांसमोर ऐकवून झाली . पुन्हा शोधले आणि एकदाच्या त्या कॉईन मिळाल्या...घरभर “ मिळाल्या म्हणून “ नाचत सुटले , महाराजांचे गालगुच्चे घेतले ,आपली फ्रेन्डशिप पुढे चालू असे म्हणून महाराजांना मिठीच मारली आणि खूप रडले. 


आयुष्य असेच असते नाही. माणूस असते तेव्हा त्याची किंमत नसते पण दूर जाते तेव्हा आपला जीव कासावीस होतो. महाराज दिसेपर्यंत मला अन्न पाणी गोड लागेना पण मग उठले आणि झुणका भाकरी कांदा मिरच्या गुळ असा नेवैद्य केला . मला भाकरी अजिबात येत नाही करता हे खरेच आहे पण तरी केली ( माझे महाराज खातात माझी भाकरी हा विश्वास ) ,आरती केली आणि खूप वेळ एकटीच बसून राहिले. काय शिकलो आपण ह्या प्रसंगातून ? मनोमन लाज वाटू लागली .


महाराजांचे अस्तित्व आयुष्यातून वजा केले तर उरले शून्य ह्याची पुनश्च ग्वाही मिळाली . आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कुणी काहीही म्हणो “ ते आहेत “ ह्याचा दाखलाही मिळाला. 


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




 


No comments:

Post a Comment