Monday, 7 November 2022

अध्यात्मिक पत्रिका

 || श्री स्वामी समर्थ ||


गेले तासभर मी तुकाराम महाराजांचे अभंग ऐकत होते . खरोखरच तो सर्व काळ आणि त्यांची निस्सीम भक्ती पांडुरंगाने केलेल्या लीला सगळ काही तसच्या तस्स डोळ्यासमोर उभे राहिले . आषाढी ची वारी आणि लाखो वारकर्यांच्या सोबत चंद्रभागेच्या वाळवंटात विठूच्या  गजरावर टाळ मृदुंगाच्या आवाजावर थिरकणारी प्रत्यक्ष पांडुरंगाची पाऊले सगळच अनुभवल मी. काही काळ मी माझे स्वतःचे अस्तित्व विसरून गेले आणि एक गोष्ट लक्ष्यात आली कि कुठल्याही गोष्टीत अंतर्मानापासून  समरसून  गेल्याशिवाय त्यातील अवीट गोडी चाखतच येत नाही .  

अध्यात्मिक पत्रिकांचा अभ्यास आपण त्यात किती खोल उतरतो , समरसून जातो ह्यावर निर्भर आहे हे निश्चित .निरंतर भक्ती हाच अभ्यासाचा  पाया आहे. अध्यात्माची जाण आणि त्यातील अंतर्स्फुर्ती देणारा परमेश्वरुपी नेपचून आपल्या आतच आहे. तोच आपल्याला आपल्या असण्या आणि नसण्याची , आपल्या परम कर्तव्यांची सतत जाणीव करून देत असतो . गुरुचे पत्रिकेवरील साम्राज्य अबाधित आहे . परमार्थाची अवीट गोडी चाखण्यास मदत करणारा गुरु फक्त अनुभवायचा आहे तर त्यातून निर्माण होणारा भाव शब्दबद्ध करायला बोलघेवडा बुध पुढे येयील. 


परमभक्तीचा आणि भक्तिरसाचा अविष्कार घडवणारा उच्चीचा शुक्र प्रपंच करताना परमार्थ कसा करायचा ते शिकवेल आणि दुर्दम्य इच्छा शक्ती देण्यासाठी मंगल पुढे सरसावेल. प्रपंच करून परमार्थ करा हे सांगणारा गुरु तर मुळातच प्रपंच हवाच कश्याला त्यापेक्षा विरक्ती बरी हे मनावर बिम्बवणारा आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीत संयम किती महत्वाचा हे सांगणारा शनी . आकाशात दुडूदुडू धावणारा चांदोमामा अध्यात्माचे प्रतिबिंब आपल्या मनातच दाखवेल तेव्हा डोळ्यातून अश्रुरूपी भक्ती ओसंडून वाहू लागेल आणि मग ज्ञानेश्वर माउलींनी अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी का व कशी घेतली , तुकाराम महाराजांच्या गाथा पुन्हा वरती कश्या आल्या , रामाचा वनवास आणि कृष्णाचे बालपण त्याने अर्जुनाला गीतेतून केलेले ज्ञान प्रबोधन ह्या सगळ्याचा उलगडा होयील. 


अध्यात्मिक पत्रिकेत चंद्र सोबत गुरु, शुक्र ,बुध नेप मंगळ शनी  ह्याच्या सोबत  राहूकेतू चा सुद्धा विचार महत्वाचा आहे तसेच ह्यांचा धर्म आणि मोक्ष त्रिकोणाशी असणारा संबंध बोलका असतो. प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या विशिष्ठ टप्प्यावर संसारातून विरक्त होते आणि मोक्ष मिळवण्यासाठी अध्यात्माच्या वाटेवर तिचा अविरत प्रवास सुरु होतो.  

राम कृष्ण हरी 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क 8104639230 


No comments:

Post a Comment