|| श्री स्वामी समर्थ ||
आयुष्यातील प्रवासात सुख दुक्ख हि माणसाचे सोबती असतात . मनासारखे झाले कि हुरळून जायचे आणि दुख झाले कि गर्भगळीत व्हायचे हा मनुष्य स्वभाव आहे आणि त्यातून आपली सुटका नाहीच . पण अध्यात्मिक प्रगती जसजशी होत जाते तसे ह्या सर्वाचे दाह कमी होत जातात . अनेकवेळा एखादी गोष्ट आपण खूप मनाला लावून घेतो कालांतराने त्याचे दुक्ख किंवा त्यासंबंधीचे मनातील विचार कमी होत जातात . अनेक वेळा तशीच किंवा तीच मनाला त्रास देणारी घटना पुन्हा घडते पण त्यावेळी मात्र आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही , ती आपण सहज स्वीकारतो आणि विसरून सुद्धा जातो .
अश्यावेळी समजावे कि आपली अध्यात्मिक प्रगती एक पाऊल निश्चितपणे पुढे गेली आहे. आपण ह्या प्रापंचिक सुख दुक्खापासून दूर पण सद्गुरूंच्या समीप जायला लागलो आहोत हाच त्याचा अर्थ आहे.
षडरिपू कमी होत आहेत आणि मनाचे शुद्धीकरण होत आहे . ह्या सर्व प्रक्रिया अश्याच होत नसतात . नित्य नेमाने केलेली साधना , उपासना, नामस्मरण , पवित्र ग्रंथांचे नित्य पठण ह्या सर्व गोष्टींमधील सातत्य ह्याचे हे फळ असते . जे दिसत नाही पण अनुभवायला मिळते.
सहज मनात विचार येतो कि आज आपण ह्या गोष्टीसाठी चिडलो नाही ज्याचा आधी आपल्याला क्षणात राग येत होता . परिस्थिती तीच आपणही तेच पण विचार बदलले. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात एक सुंदर वाक्य आहे. “ एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आन , सत्य एक त्यांनाच कळे “
आपल्या विचारात परिवर्तन घडणे , एखाद्या गोष्टीकडे , घटनेकडे आपला बघण्याचा दृष्टीकोण बदलणे ,मन अधिकाधिक सत्शील होणे , आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या कर्माबद्दल सतर्कता येणे ह्या सर्व खचितच सोप्या नसणार्या गोष्टी सद्गुरुकृपा झाली तर सहज शक्य होताना दिसतात , अनुभवायला मिळतात .
कुणावर राग धरून , कुणाचा मत्सर करून , हेवेदावे करून काहीच होत नाही पण ह्यातून आपण मात्र आपले कर्म मात्र वाढवत असतो . ह्याचे एक उदा द्यावेसे वाटते . अनेकदा अनेक लोक आपल्या तोंडावर दार लावतात . समोरचा घरातून बाहेर पडला कि लगेच धाडकन दरवाजा लावतात किंवा कुणाच्याही तोंडावर दरवाजा लावण्याची त्यांना सवय असते . आता ह्यात असे आहे कि ज्यांच्या तोंडावर दरवाजा लावला त्यांना त्याचा काडीचाही त्रास होताना दिसत नाही उलट जो दरवाजा लावतो त्याने आपले कर्म नाही कुकर्म वाढवून घेतले आणि त्याचे फळ निश्चित पणे वाईट आहे. त्यालाच नाही तर त्याच्या पुढील पिढ्यांना सुद्धा ते वाईट. आपला राग मत्सर द्वेष समोरच्यावर काढून काय उपयोग त्यातून आपण नवीन कर्माची निर्मिती करत असतो पण दुर्दैवाने हे आपल्याला समजत नाही . मग पुढे अश्या घरात धननाश , शिक्षणासाठी पुरेसा पैसा नसणे , व्यसने , धंदा व्यवसायात बरकत नसणे , घरातील मुख्य व्यक्तीला आजार अशी अनेक शुक्ल्काष्ट मागे लागतात . असे आजार होतात ते आपल्याला स्मशानापर्यंत नेतात . अश्या घरात वरवरचे सर्व चांगले दिसले तरी नसते हे मी वेगळे सांगायला नको.
कुणाच्याही तोंडावर दार लावणे किंवा घरात आलेल्याला आतून काय हवे ? असे विचारून त्रासिक चेहरा करणे त्यासारखे पाप ते काय . अहो ह्याच दरवाज्यातून पै पाहुणा , प्रत्यक्ष लक्ष्मी आणि सद्गुरू सुद्धा प्रवेश करणार त्या दरवाज्याचा अपभ्रंश का करावा? अश्या वास्तूत प्रचंड वास्तू दोष तयार होतो मग घरी येणार्यांची वर्दळ कमी होते , रोजचे जीवन जेमतेम जगता यावे इतके धन सुद्धा कमावणे अशक्य होते . दीर्घकाळ टिकणारे आजार , मानसिक दौर्बल्य , निद्रानाश , मनावरील दडपण ह्यासारख्या गोष्टींची न संपणारी शृंखला तयार होते. ह्या सगळ्याचा उगम दुर्दैवाने आपल्याच चुकीच्या कृतीने झालेला असतो त्यामुळे आपल्या दारात आलेली व्यक्ती मग ती कुणीही असो त्यात परमेश्वरी अंश आहे असे समजले तर आपण कुणाच्याही तोंडावर दार लावायला धजावणार नाही हे नक्की.
आता ह्याची दुसरी बाजू अशी आहे कि ज्याने दरवाजा लावला त्याने त्याचे कर्म वाढवले पण ज्याच्या तोंडावर लावला त्याचे मन दुखावले गेले आणि त्याने दिलेले शिव्याशाप सुद्धा प्रखर असतात आणि अश्या लोकांची हाय लागते . आपण असे वागलो तर एकदिवस आपल्या दरवाज्यात कुणीही येणार नाही . दुसर्याच्या तोंडावर दरवाजा लावायला व्यक्ती तरी हवी ना समोर . हा खूप गहन आणि चिंतनाचा विषय आहे. वाटतो तितका वरवरचा नाही तर सखोल चिंतनाचा विषय आहे . मनुष्याने आपले कर्म करताना त्रिवार विचार करावा नाहीतर शेवटचा क्षण सुखाचा येणार तरी कसा . निदान त्यासाठी तरी चांगले वागावे . मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे , चार माणसे आपल्याकडे येऊ नयेत असे वाटणे किंवा त्यांना अपमानित करणे हा पराकोटीचा अहंकार आहे .
ज्याच्या तोंडावर दरवाजा लावला किंवा आपटला त्याने असा विचार करावा कि ह्या दरवाज्यातून मला त्रास होणार आहे म्हणून त्या व्यक्तीला तशी बुद्धी झाली पण त्याच वेळी आपले गुरु आपल्यासाठी आपल्या फायद्याचे द्वार उघडत असतात त्यातून आपला आयुष्याचा पुढील प्रवास असतो जो अत्यंत सुखकर असतो .
कुठले कर्म आयुष्याच्या कुठल्या वळणावर उभे राहील आणि आपल्याला उत्तर द्यायला लावील सांगता येत नाही म्हणून जपून वागले पाहिजे. पत्रिकेत चंद्र पूर्णपणे बिघडलेला असेल तर अशी माणसे अशी कृती करत असावी ज्यांना समोरच्याला काय वाटेल , समोरचा किती दुखावला जायील ह्याचीही काही पडलेली नसते . केव्हडा हा पराकोटीचा अहंकार. अरेरे....
आपल्या आर्थिक स्थितीला उतरती कळा लागते किंवा धंदा व्यवसाय नोकरी ह्यात धनलाभ होत नाही तेव्हा अंतर्मुख होऊन विचार करा आपले कुठे चुकले ? आपण कुणाचा दुस्वास मत्सर तर नाही करत ? कुणाचा अपमान नाही ना केला? . सरतेशेवटी आपण फार साधी माणसे असतो आपल्याला राग लोभ सगळ्याच भावना आहेत पण त्या व्यक्त करायची पद्धत चुकली तर मात्र आपणच अनर्थ ओढवून घेतो हे नक्की .
अश्या अनेक गोष्टींमुळे वास्तू दोष निर्माण होतो . आपली वास्तू वास्तुच राहते त्याला घरपण कधीच येत नाही . पुढे भाऊ बंदकी ह्या समस्या आभाळाइतक्या होतात .
प्रत्येकातील ईश्वराचा मान ठेवा ,कुणाचाही काहीही झाले तरी अपमान करू नका, कुणाचेही क्लेश घेवू नका . दुसर्याचा अपमान करून द्वेष मत्सर करून, समोरच्याला पाण्यात बघून आपले कधीही चांगले होत नाही . आपल्या श्वासात नामस्मरण असू द्या मत्सर नाही . आजकाल ज्याच्या त्याच्या घरात कुलस्वामिनी , साईबाबा , गजानन महाराज , स्वामी समर्थ सगळ्यांचे फोटो असतात , हेच शिकवतात का हे आपल्याला आपले महाराज ? विचार करा आपल्यासोबत अश्या कृतीमुळे आपण आपल्या गुरुंचीही मान खाली घालत आहोत . चालणार आहे हे आपल्याला आणि त्यानाही ?
पूर्वीच्या काळी असणार्या काही पद्धती किती योग्य होत्या त्याची आता सत्यता पटते . पूर्वी घरी कुणी आले कि त्याला गुळ आणि पाणी देत असत . गडी माणसांचा वावर मागील दरवाज्यातून होत असे तसेच घरातील स्त्रीवर्गाला मुख्य दरवाज्यात सुद्धा येण्याची परवानगी नसे . घराच्या दरवाज्यात आत बाहेर गप्पा कधी मारू नये धननाश आणि मोठी आजारपणे निश्चित.
आज अनेकांना आपली स्वतःची हक्काची वास्तू नाही . घर होण्यासाठी घरघर लागते पण घर होत नाही. ज्यांची आहे त्यांनी ती जपा आणि वृद्धिंगत करा इतकच .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment