Monday, 5 December 2022

अहंकार हा आत्मा असणारे कृत्तिका नक्षत्र

 || श्री स्वामी समर्थ ||



टीप : माझा प्रत्येक लेख मी अनेक पत्रिका आणि व्यक्तीमत्वांचा अभ्यास करून लिहिते तेव्हा कृपया माझे नाव काढून किंवा ह्यातील संदर्भ काढून बदलून स्वतःच्या नावावर पोस्ट करू नये हि विनंती . माझेच लेख नाव काढून मलाच whatsapp वर येत आहेत म्हणून आज स्पष्ट लिहिले.

गेल्या आठवड्यात पाहिलेल्या 3 पत्रिकेतील ग्रहांचा विलक्षण योग हा  “ कृत्तिका “ ह्या रवीच्या नक्षत्राशी होता . म्हणून आज हा लेखन प्रपंच .

एकाच राशीत 4 चरण येणाऱ्या नक्षत्राचे वैशिष्ठ वेगळे असते. एकाच राशीत त्यांना आपले सर्व गुण व्यक्त करता येतात . कृत्तिका ह्या रवीच्या नक्षत्राचे एक चरण मेष राशीत आणि ३ चरण जेव्हा वृषभ राशीत जातात तेव्हा ह्या नक्षत्राला कात्री लागते आणि त्याला त्रिपाद नक्षत्र म्हणून संबोधले जाते . 

मेष ह्या सेनापती मंगळाच्या राशीत आलेले हे रविचे तेजस्वी नक्षत्र आहे. कृत्तीकेवर प्रभाव आहे अग्नीचा अंगिरस ऋषींचे गोत्र असलेले हे नक्षत्र 7 तारकांनी बनलेले असून देवता अग्नी आहे. म्हणूनच कृत्तीकेवर अग्नीचा प्रभाव आहे. हे कफ प्रवृत्ती आणि पृथ्वी तत्वाचे आहे. 

कृत्तिका म्हणजे कापणे ,धारधार बोचणे ह्याची जाणीव असते. कृत्तिका नावाची मुलगी फटाकडी असते उद्धट उर्मट असते पण कर्तुत्ववान सुद्धा असते ,ध्येय असते काहीतरी मिळवायचे असते कारण अग्नी हि प्रेरणा असते . वृषभेत 3 चरण येत असल्यामुळे दिसायला सुंदर असतात पण हे नक्षत्र सुरु होते ते मंगळाच्या मेष राशीपासून सुरु होते. कृत्तिका हे प्रथम नक्षत्र मानून त्याला पूर्वजांनी देव नक्षत्राचा मान दिला आहे .

ह्या नक्षत्राची देवता आहे प्रत्यक्ष रवी जो रोज आपल्याला दर्शन देतो.  सर्वाना समानतेने वागवणारा , जीवन चैतन्यमय करणारा , वैभव सौख्य ह्या सर्वाचे एकत्रित संघटन करणारा रवी आणि त्याची प्रखर पण तेजोपुंज अशी सूर्य किरणे सर्वत्र विखुरली कि आयुष्य नव्याने जगावेसे वाटते . नक्षत्र देवता जी असते त्याचे गुण त्या नक्षत्रात येतात .

हि माणसे कडक शिस्तीची असतात . कुणाला घाबरत नाही. आयुष्यातील सगळ्या लढाया लढताना शूरता दाखवतात . इच्छाशक्ती , आत्मविश्वास प्रचंड असतो. अग्नी हि देवता आहे. ह्याला अनेक प्रतिक आहेत . कुणी ह्याला वस्तरा म्हंटले आहे तर कुणी ह्याला द्राक्षाचा घोष म्हंटले आहे. चाकू सुरी परशु अश्या धारधार शस्त्रांचे आवरण आहे. 

मेष राशीतील हे नक्षत्र आणि मेषेचे प्रतिक मेंढा आहे जो कुठेही चढू शकतो. कृत्तीकेवर प्रभाव आहे अग्नीचा . अग्नी हीच देवता आहे.  अग्नी म्हणजे काहीतरी सुरु करून देणारा . वेदकाळापासून अग्नीला अनन्य साधारण महत्व दिले आहे. अग्नीत आहुती देतो तेव्हा भूलोकातून इतर लोकात अग्नीत दिलेल्या आहुतीच्या मार्फत आपण आपले मेसेज पाठवत असतो. 

अग्नीतत्व दाहक असले तरी उर्जा देते , अंधार दूर करते आणि सत्य समोर आणते. रूप समोर आणते. ह्या नक्षत्राला प्राण्यांचे प्रतिक म्हंटले तर शेळी आहे. शेळीचे दूष अनेक रोगांवर चालते. शेळी हवी तिथे अगदी काटेरी बाभळीची पाने सुद्धा बिनदिक्कत खाते. म्हणजेच अत्यंत कठीण अश्या कामातून वाट काढण्याचे काम हे नक्षत्र करते .हवे तिथे जावू शकते . डोंगर्याच्या माथ्यावर . निसर्गावर जास्ती अवलंबून आहे. झाडपाला खाणार . शेळीच्या दुधात आयुर्वेदिक सत्व गुण आहेत. इतर पदार्थांना हा प्राणी तोंड लावत नाही. स्वछ्य आणि निसर्गतः शुद्ध असलेले तिचे दुध आहे. हे नक्षत्रही तसेच आहे. महत्वाच्या कामासाठी उपयुक्त ठरणारे हे नक्षत्र आहे. 


सर्व चांगल्या वाईट गुणांचे इथे मिश्रण आहे . एखादी तिखट बोलणारी स्त्री ,तिच्या नादी लागणे योग्य नाही . प्रखर आणि स्पष्ट बोलणे , अंतर्बाह्य एकच असलेले व्यक्तिमत्व ह्या कृत्तिका नक्षत्राचे आहे . अत्यंत सचोटी प्रामाणिकपणा आणि त्याग . प्राण जाये पण वचन न जाये अश्या मनोवृत्तीची माणसे ह्या नक्षत्रात आहेत . 

धारधार वस्तूंचे प्रतिक असल्यामुळे ह्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व धारधार आहे. नाही पटले तर कात्रीने कापून टाकावे . माणसे जोडणे आणि टिकवण्याचे काम भरणी नक्षत्र करते. 

निष्ठुरपणे माणसे तोडून टाकणारे हे नक्षत्र आहे. हे एखाद्या  महान व्यक्तीचे ऋषी मुनींचे असू शकते कारण त्याला कोण किती माझ्या मागे येते आहे , त्याची फिकीर नाही किती अनुयायी आहेत ह्याची काही पडलेली नाही . ज्याला पटेल तो येयील. माझ्यावर कितीजणांनी प्रेम करावे ह्याची फिकीर नाही. ह्या नक्षत्राला भावनिकता आत्मीयतेचा ओलावा नाही. समर्पणाची वृत्ती आहे . घालून पाडून बोलणे तोडून टाकणारे हे नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राच्या व्यक्तींच्या जवळ जायलाही लोक भितात . ह्यांना भावना नाहीत कठोर आहे. तिका म्हणजे आव्हान देणे आणि घेणे . 


ह्या नक्षत्राचा अभ्यास करताना काही गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे  लग्न बिंदू रवी ,चंद्र लग्नेश किंवा महत्वाचे ग्रह ह्या नक्षत्रात असतील तर त्यांची उर्जा वाढते. परिस्थिती काहीही असो , विनाशाकडे जावू शकतात , आक्रमक होतात . शुक्र किंवा रवी बिघडला असेल तर परिणाम वाईट असतात . स्पष्टवक्ते असतात . बोलणे धारधार असत. भूक फार असते. ह्यांचा राग व्यक्त करणे हा रवीचा राग आहे. राजाला सतत रागावून चालत नाही . ह्या व्यक्ती ध्येयवादी असतात पण त्यामुळे भावनाविरहित होतात , कित्येकदा कोरड्या असतात त्यामुळे फार गोड बोलू शकत नाहीत. म्हणून ह्यांना लवंगी मिरची नाव दिले आहे. रवि हा राजा आहे त्याला बंधनात ठेवलेले आवडणार नाही म्हणून ह्यांचा स्वभावही तसाच मुक्त असतो, कुणीही त्यांच्यावर अधिकार गाजवलेला आवडणार नाही. ह्यांना सतत कौतुक करून घेणे आवडते. थोडक्यात काय तर आत्मस्तुती आणि आत्मप्रौढी मिरवणे सतत मी हे केले आणि मी ते केले . स्वतःच्या भोवती आरत्या ओवाळून घेणे आवडते . एखादी गोष्ट मोठी करून सांगणे जे छान जमते . राजा हा स्तुतीप्रीय असतोच पण हलक्या कानांचाही असतो त्यात अश्या लोकांचा बुध सुद्धा बिघडला असेल तर वैचारिक बैठक , सारासार विचारशक्ती आणि एखाद्या गोष्टीची शहानिशा करून न घेता वक्तव्य करणे ह्या चुका वारंवार होतात .

हि लोक इतरांना  स्वार्थी वाटतात. नक्षत्र बिघडले असेल तर कुणाचेच ऐकत नाहीत , खादाडी खूप आहे त्यामुळे पचनाचे प्रोब्लेम होतात . सतत खाण्याने विचार सुद्धा दुषित होतात. भिन्नलिंगी आकर्षण असू शकते. जे खात आहे ते नाही पचले तर आरोग्य बिघडते , बुद्धीचा उपयोग नीट नाही केला तर इतरांना चुकीचे ज्ञान देतात . मेषेसारख्या तडफदार राशीतील हे नक्षत्र आहे . मेंढ्या सारखे ह्या व्यक्ती कुठेही अवघड स्थितीत टिकून राहू शकतात . मेंढ्यांना लहान सहान वाटातून बाहेर कसे पडायचे ते चांगले समजते तसेच हि माणसेही धूर्त असतात .कुठून कोणाकडून कशी कामे करून घ्यायची लोकांना कसे manage करायचे ते छान जमते. आपले काम झाले कि माणसे कशी वापरून फेकून द्यायची हे ह्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. पण त्याची वाईट फळ सुद्धा त्यांना भोगावीच लागतात .

हे रविचे नक्षत्र असूनही शुभ कार्याला वर्ज आहे. क्रूर राक्षस गण प्राप्त झाला आहे.  कठोर आहे, स्वकेंद्रित असतात . तोडणे हा स्वभाव आहे. अधोमुखी आहे. अग्नीतत्व आहे म्हणून भूगर्भात उसळणार्या उर्जा ज्वालामुखी ह्यांचे संशोधन करतात . कुणी जवळ केले नाही तर दुक्ख करीत बसायला ह्या नक्षत्रा जवळ वेळ नाही. वृषभ राशीत ह्या नक्षत्राचे ३ चरण आहेत . शुक्र स्वामी आहे. शुक्र म्हणजे वैभव शांतता  प्रेम आणि सुख . शुक्र वैवाहिक सुखाचा कारक आहे. आणि जेव्हा हे नक्षत्र इथे येते म्हणजे पती पत्नीत येते तेव्हा ह्या नक्षत्राला शुक्राचा कोमलपणा सांभाळता येत नाही. 

अग्नीने पेटलेले हे नक्षत्र आहे. नुसती ठिणगी पडायचा अवकाश .ह्यात कोण जळतय भस्म होतंय . बेपर्वा असलेले हे नक्षत्र आहे. रवी ह्या नक्षत्रावर आपले स्वामित्व सिद्ध करतो आहे. रवीच्या अधिकाराचा स्वीकार इथे शुक्र करत आहे. कुणाला आपण काय बोलतोय आणि त्यात कुणाला किती दुक्ख होतंय ह्याचा विचार नसल्यामुळे लोक फार जवळ करत नाहीत . पण दुर्दैव असे कि त्यांना हे समजत नाही .

शुक्र हा वैवाहिक सुखाचा रसिक ग्रह आहे.जल तत्वाचा आहे. शुक्र हा कृत्तिकेत गेला तर हा अग्नीच संसाराची विल्हेवाट लावतो. लग्नाच्या वेळी साथ देण्याचे वाचन अग्नीभोवती फेरे घालून केलेले असते. पण हा शुक्र कृत्तिकेत असल्यामुळे ह्याची वाट लागते.

अहंकार , मोठेपणा आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचीच त्यांची अव्याहत धडपड चालू असते  . अहंकार हा ह्या नक्षत्राचा आत्मा आहे.  हे नक्षत्र अग्नीचे असल्यामुळे आणि अग्नी वरवर जातो. अग्नीचे वैशिष्ठ काय आहे . जुन्याला चिटकून बसणारे हे नाही . वेगळ्या संकटांचे आव्हान स्वीकारणारे आहे.  जितके मोठे आणि खडतर आव्हान तितके ते पेलवते . जिद्द आणि जिद्दीतून निर्माण होणारा अहंकार जो नको आहे. रावणात अहंकार होता . शिवभक्त होता पण अहंकाराने वाट लागली. त्याच्या अनन्यसाधारण  भक्तीला प्रसन्न होवून शंकर त्याच्यासोबत जायला निघाले. तरी कैलास पतीला मी माझ्यासोबत घेवून चाललो हा पराकोटीचा अहंकार त्यामुळे विनाश झाला आणि तो धुळीला मिळाला.

मी मोठा आहे माझ्याशिवाय काही होणार नाही हा अहंकार खूप आहे . इतरांना नजरेतून कमी लेखणे. अग्नी हे प्रतिक काय सांगते. म्हणून ह्या नक्षत्रात शुक्र असलेल्या स्त्रिया बरेचदा आत्मघात करून घेतात . ६ तारकांचे हे नक्षत्र पण ह्याला सप्ततारका म्हणून संबोधले जाते. पण ६ च तारका दिसतात . 

जरी हे नक्षत्र क्रूर असले एक घाव दोन तुकडे करणारे , तरी त्याची सहनशीलता ,त्याग,आत्मसमर्पण ह्याचा विचार करून चंद्र वृषभेत उच्च झाला . अग्नी आहे संतापला पेटला तर कुणाच्या हाती येणार नाही .

अग्नी हा माणसाच्या जीवनाला माणूसपण देणारा आहे. पहिली पाठशाला ह्या अग्नीने शिकवली. आधी तो माकड होता संस्कृतीचा गंध नव्हता , काहीही खावे कसेही जगावे . पण हा अग्नी जेव्हा त्यांना सापडला चकमकीच्या रुपात त्यांना सुखाचे वरदान मिळाले. त्यामुळे त्यांना माणुस होता आले. माणूस कच्चे मांस खात होता . जसा आहार तसा विकार . 

अग्नीचा शोध लागला आणि अन्न शिजवून खायची कल्पना समजली रुजली आवडली आणि प्रत्यक्षात आली तेव्हा ह्या माणसाच्या खाण्यात आलेल्या ह्या अन्नाचे पचन लवकर होऊ लागले आणि हा अग्नी त्यांना सहाय्यभूत झाला. धर्म म्हंटले कि अग्नीच येतो. अग्नी धर्माचे प्रतिक आहे . अग्निहोत्र करणारे लोक आहेत . अग्नी सकाळी पेटला कि जीवन सुरु होते. अग्नी नसेल तर शरीर प्रेतवत थंड होईल. अंगात अग्नी आहे म्हणून शरीरातील रक्त विशिष्ठ पद्धतीने वाहत आहे. शरीरात चैतन्य आहे. ह्या नक्षत्रामध्ये कामाची तडफ आहे चैतन्य आहे. काम पूर्ण करण्याची जिद्द आहे. बोलतील ते करून दाखवतील. प्रखरता आहे. म्हणून ह्या अग्नीतत्वामुळे सुसंकृत मानवजात निर्माण झाली.

अग्नीने बुद्धीला अग्नी दिला. कुठल्या माणसाला कधी जवळ करायचे आणि कुणाला कधी तोडायचे ह्याचे उत्तम उत्कृष्ठ संतुलन करणरे हे नक्षत्र आहे. भावनिकता नाही . कुणाला काही बोलल्याची खंत नाही. अश्या विचारांचे नक्षत्र आहे.अग्नीतत्वाचा  मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे . अग्नीचे स्वरूप वेगवेगळ्या रीतीने व्यक्त केले आहे. होमहवन यज्ञ ह्यासाठी अग्नी लागतो. आहुती अर्पण करतो तेव्हा स्वाहा म्हंटल नाही तर कुठलीही देवता त्या स्वीकारणार नाही. स्वाहा नावाची तारका होती आणि तिचे प्रेम अग्नीवर असल्यामुळे ती अग्निकडे आकर्षिले जात होती. अग्नीला स्वाहा बद्दल आकर्षण नव्हते. म्हणून तिने अग्नी सोबत आपले अस्तित्व ह्या यज्ञात संपवले.  स्वाहाचा हात पकडून अग्नीने तिला वरदान दिले कि इथून पुढे जो कुणी यज्ञ करील आणि कुठल्याही देवतेला आहुती देयील पण तुझा उल्लेख केला नाही तर कुठलीच देवता ती आहुती स्वीकारणार नाही. 

पुन्हा त्याग आणि त्यातून आलेला मोठेपण . स्वाहा चा जयजयकार करा . स्वाहा हि देवी आहे तिचे अस्तित्व तिथे आहे तिला जागृत करून मान देवून तिच्या अस्तित्वाची जाण ठेवून आपण आहुती देतो. सुसंकृत मन इथे दिसते , ज्याने आपल्यासाठी त्याग केला तर त्याची जाण ठेवणे हे ह्या नक्षत्राकडे आहे. 

हा अग्नी जसा ब्रम्हांडात आहे तसा पिंडात आहे. पोटात सुद्धा अग्नी आहे . जेव्हा अग्नी प्रज्वलित होईल म्हणजे भूक लागेल तेव्हाच अन्न ग्रहण करावे म्हणजे ते पचेल अन्यथा पचणार नाही .म्हणून कृत्तिका हे आकाशातच नाही तरी ते प्रत्येकाच्या शरीरात आहे. अन्न  पचवण्यासाठी आवश्यक आहे. 

ह्या व्यक्तीच्या लोकांना टाकावू वस्तू ,अडगळ चालत नाही . घरात स्वछ्यता लागते. सूर्यप्रकाश जिथे जातो तिथे समाधान शांती निरोगी उत्चाही वातावरण असते.  “feel good factor” असतो. प्रकाश आहे तिथे सुख समाधान वैभव आहे . हा प्रकाश ह्या कृत्तीकेच्या कडून हा प्रकाश मिळतो. एखाद्या फटीतून सुद्धा प्रकाश आत येतो. नित्य नियमाने सूर्य येतो आणि चैतन्याचा पाऊस बरसून जातो. 

अपयश ह्या नक्षत्राला सोसवत नाही , तेज प्रखरता आहे. रवी आणि अग्नी मंगळ सर्वांचे तेज आहे. ह्या नक्षत्राचे जे अग्नीतत्व आहे ते प्राणवर्धक आहे तसेच प्राणघातक सुद्धा आहे. 

मी पणा अहंकार लोभ मत्सर ,पेटून घेवून मारणे , अविचार ह्यांनी व्यापलेली माणसे . अरेरावी विचार करून घेवून जीवनाचा शेवट करतात . कुठल्याही गोष्टीला २ टोके असतात एक सृजनशीलतेचे आणि एक विनाशाचे. ह्या लोकात चैतन्य असते बुद्धी तीव्र असते कारण माणसे तेजोमय असतात . 

अग्नी हा नेहमी वर जातो ,प्रगती पथावर जातो. राजस मनोवृत्तीचे लोक असतात . मिळवण्याचा हव्यास आहे. घर झाले आता बंगला झाला पाहिजे. पुढे जात राहणार . आयुष्यात सतत काहीतरी ध्येय ठेवतील आणि ते मिळवण्यासाठी कष्टांची पराकाष्टा हि करतील.

ज्ञानाची भूक कर्तुत्वाचा हव्यास . स्वतःचा गौरव मीपण मोठेपणा . ह्यात जगत राहणारी हि अग्नी शलाका आहे. म्हंटले तर उपयोगी पडणारी आहेत पण खावूनही पोट भरले नाही तर सतत  आहुती टाक सतत सांगत राहतो. सतत खात राहतील. फळ खातील पण काहीतरी खाणे हे आहे. खादाड नक्षत्र आहे.  अविरत खाण्यामुळे शरीर आजारी पडते आणि अनेक रोगांसाठी  दवाखान्याच्या पायर्या चढायला लागणार . सगळ्याचा व्यय होणार. इथे महत्वाचा घटक हा रवी आहे. रवी हा राजा आत्मा चैतन्य आनंद सुख प्रकाश सकाळचे कोवळे ऊन सुखावह वाटते. रवी जवळ नव निर्मितेचे सामर्थ्य आहे. 

रवी हा राजा आहे . प्रजेच्या सुखासाठी राजा नियम करतो पण प्रजेसाठी चांगल्या योजनाही करतो. सर्वांच्या सुखाची चिंता वाहणारा राजाच असतो . तसे हे नक्षत्र आहे. हे लोक मदत करणारेही असतात .भरणी भरण पोषण करत असेल तर कृत्तिका हे व्यक्तिमत्वाला अटकेपार झेंडे लावण्याचे सामर्थ्य तेज बुद्धी कर्तुत्व असामान्य कर्तुत्व देते. 

एकदा एक ठरवले कि ते करणारच. ह्या नक्षत्राला रवीच्या तेजाचेही वरदान आहे. 

रवी हा जीव जीवात्म्यांचा आत्मा , नवग्रहांना प्रकाश देणारा , ग्रहांचा राजा स्वयंभू प्रकाशाचा ग्रह ह्याचे स्वामित्व कृत्तीकेला लाभले आहे. हा रवी धन्वंतरी आहे 

ह्या लोकात अहंगंड रुबाबदार पणे राहणे त्याचबरोबर आत्मकेंद्रित असणे हेही आहेच . 

कृत्तिका नक्षत्र क्रूर असेल तर इथे चंद्राचे भावनाशीलता कसे चालणार .जर चंद्र इथे पापग्रहांच्या दृष्टीत आला तर बिघडतो. 

कुठलाही ग्रह हा पूर्ण शुभ किंवा अशुभ नाही. तो कुठल्या नक्षत्रात स्थानात आहे आणि त्यावर कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे ह्यावरून फलीताला वेगवेगळे कंगोरे देतो.

अग्नी हा संरक्षक आणि संवर्धक असतो. अग्नी आहे म्हणून भूक आहे म्हणून हि लोक खादाड असतात त्यांना भूक असते आणि आजार होतात . हि लोक फार विद्वान असतात . ज्ञान खातात . हे शास्त्र शिकावे ते शिकावे . अधाशी असणे ह्याला मर्यादा असायला हवी. 

श्रीकृष्णाचा चंद्र हा वृषभ राशीत कृत्तिका नक्षत्रात आहे म्हणून विश्वरूप दर्शन दिले. सर्व प्रकारच्या मनोवृत्ती सामावून घेण्याची वृत्ती होती. शिशुपालाला योग्य वेळेला शासन करणे, दुर्योधनाला योग्य वेळी यम सदनाला पाठवणे . जरासंधाला त्याच्याच पद्धतीने मारणे . द्रौपदीला योग्य वेळी अभय दान देणे. हे कौशल्य होते. 

6 8 १२ मध्ये ह्या नक्षत्रात आलेले ग्रह क्रूर अश्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतात . किंवा ज्या भावात हे नक्षत्र आलेले आहे आणि ज्या ग्रहाच्या वाट्याला आलेले आहे त्यानुसार त्याची फळे पाहायला मिळतात. मंगळ आणि रवी दोघेही लाल रंग आणि हा रंग इथे अधिक आहे क्रूरतेचे प्रतिक आहे. ह्यांना १ आणि ३ अंक शुभ आहे.

हे लोक दीर्घद्वेषी आणि शीघ्रकोपी असतात .अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व , त्यांचा शब्द म्हजे हृदय कापून टाकतील. त्यांचा राग म्हणजे एखाद्याला पुरून उरेल हट्टी दुराग्रही असतात . ८ -८ दिवस बोलणार नाही स्वतःला कोंडून घेतील. विचार स्फोटक असतात .  अतिविचार करून बाहेर पडतील आणि अपघात होईल. विष खातो , मारून घेतो ,नस कापून घेतील इतका संताप होतो.. 

धारधार शास्त्राने दुसर्याला मारतील.

ह्या नक्षत्रात मंगळ राहू केतु हे ग्रह आले  तर त्रास होतो . कृत्तिका नक्षत्रात शुक्र आला आणि मंगळाच्या दृष्टीत आला . मंगळ हर्शल केंद्रयोग असेल तर पापाचा प्रादुर्भाव अधिक असतो. प्लुटो पण असेल तर जागतिक दुक्ख विध्वंसक होईल. भूकंप ज्वालामुखी होतात तेव्हा ह्या नक्षत्रातून गोचरीचे भ्रमण होत असते. 

विवाहात अडथळे असतात . इथे रवी असेल तर हट्टी आणि उग्र स्वभाव असतो. सारखे रागावणे बोलणे आक्रमक तडजोड करत नाहीत .कृत्तिका नक्षत्रातील संतती सुद्धा हट्टी दुराग्रही असते कुणाचेही ऐकत नाही. आईवडिलांचा सल्ला ऐकत नाहीत त्यांच्या सुखाची काहीच जाण नसते. पंचम भाव जर ग्रह  कृत्तिका नक्षत्रात असेल तर मुले होण्यास अडचणी होतात . गर्भपात होतो.

हे नक्षत्र तृतीयात आले आणि पापाग्रहानी युक्त दुष्ट नसेल तर मोठ्या प्रकारचा मानसन्मान मिळवते. रविमुळे ताप येणे ,पंचम सप्तम दशम स्थानात हे नक्षत्र आले तर त्रासदायक . मुले जाणे, गर्भपात होणे मुले मोठी होवून मारणे, लागलेली नोकरी अचानक जाणे.गळवे होणे , अल्सर होणे. एखादी कृत्तिका नक्षत्रातील सासू कारण नसताना सुनेचा छळ करते .

स्वयंपाक घर चालवणे , बेकरीत काम करणे ,लोहारकाम , सोनारकाम ,भीषण अश्या आगीला विझवण्यासाठी लागणारी यंत्रणा वापरणे. रवी हा राजा मंगळ हा सेनापती म्हणून प्रशासकीय अधिकारी , निवडणुकीत निवडून येणारे लोक, रवी हा धन्वंतरी आहे. गुरु हा विज्ञान दर्शक आणि मेडिकल शी संबंधित आहे त्यामुळे उत्तम डॉक्टर , सर्जन ह्या नक्षत्रात होतात . 

धाडस आहे त्यामुळे मोठे पोलीस अधिकारी , सरकारी नोकरीत काम करणारे लोक . शस्त्र बनवणे चाकू सुरया बनवणे . मेडिकल संबंधी उत्पादने तयार करणे . इंजेक्शन च्या सुया किंवा औषधे बनवणे. निर्मिती क्षमता ह्या नक्षत्रात आहे. फिरते व्यवसाय ,दवाखाने , यात्रेच्या ठिकाणचे दवाखाने चालवणारे हे लोक असतात . MR , औषध देणारे नर्स कारण रवी हा पावित्र्याचे लक्षण आहे आणि गुरु हा पवित्राचे लक्षण आहे . सेवाभाव आहे. ते पांढरे कपडे घालून विचारांचे पवित्र प्रगट करतात . योग शिकवणारे करणारे .पौरोहित्य करणारे लोक पांढरे कपडे घालणारे . गुरु हा ज्ञानी धर्माशी संबंधित , रवीचा संबंध अग्नीशी आहे. म्हणून रवी म्हणजे नेता राजा . यज्ञ करणारे लोक ह्यात येतात . अग्निहोत्र करणारे लोक .

लग्न बिंदू ,सप्तमेश , धनेश , अष्टमेश , शुक्र , मंगळ , चंद्र ( विशेषतः प्रथम चरणात )कृतिकेत असेल तर त्या पत्रिका अभ्यासपूर्ण असतात .

कृत्तिका हे अग्नी तत्वाचे नक्षत्र आहे ते सुंदर रूप देते , ज्ञानाची अन्नाची किंवा लैंगिक भूक असेल ती ह्या लोकात सर्वाधिक असते.  अग्नी हा वणव्यासारखा पसरतो. त्यामुळे ह्यांची कीर्ती किंवा अपकीर्ती सुद्धा असू शकते. 

कुठलीही रास , नक्षत्र ,ग्रह हे परिपूर्ण नाहीत ,त्याला अनेक कंगोरे आहेत . जिथे फटकळपणा आहे तिथे कर्तुत्व सुद्धा आहे हे विसरून चालणार नाही . पण त्यातील अवगुण पुढे आले तर चांगल्या गुणांची सुद्धा माती होते ह्याचा विसर पडू न देणे हे महत्वाचे आहे. 

जप : ओम अग्नेय नमः


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



No comments:

Post a Comment