Thursday, 8 December 2022

वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी

 || श्री स्वामी समर्थ ||


आज श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण महाराजांनी पूर्ण करून घेतले. हा ग्रंथ म्हणजे श्री दासगणू महाराजांचा अनमोल ठेवा समस्त मानव जातीला संदेशप्रत आहे. आपले ग्रंथवैभव म्हणजे पारमार्थिक खजिना आहे. कुठलाही ग्रंथ जीवन कसे जगावे आणि जीवनाची मुल्ये शिकवून जाणारा आहे. प्रत्येक शब्द रसाळ आणि भक्तीचा कस लावणारा आहे. हे ग्रंथ वाचून एखाद्याला परमार्थाची गोडी नाही लागली तरच नवल इतके सामर्थ्य ह्यात सामावलेले आहे.  देव आपल्या भोळ्या भक्तीसाठी आसुसलेला आहे. हा ग्रंथ वाचून प्रापंचिक अडचणींवर  कशी मात करता येते हे ह्यातील 21 व्या अध्यायात  विषद केले आहे. 

भक्त होणे कठीण आणि परमभक्त होणे म्हणजे एक दिव्यच म्हंटले पाहिजे. ह्या ग्रंथातील महाराजांचे सर्वच भक्त त्यांच्या अनेक परीक्षा पार करत कसे परमभक्त झाले ह्याचे सुरेख विश्लेषण वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपले मन सहजरीत्या त्या काळात विहार करून येते . मला तर हा ग्रंथ वाचताना आणि इतर वेळी सुद्धा शरीर इथे आणि मन महाराजांच्या चरणी असल्यासारखेच वाटत राहते . 

प्रचीतीविना भक्ती नाही पण ती येण्यासाठी तितकीच समरसता हवी अन्यथा ग्रंथ नसून एक पुस्तक वाचल्या सारखेच आहे नाही का? ग्रंथातील प्रत्येक शब्दात त्यांचे अस्तित्व जाणवले तर आपण ह्या ग्रंथात समरसून गेलो आहोत असे समजायला हरकत नाही ,अन्यथा सर्व फोल आहे. भावनारहित वाचन उपयुक्त नाहीच . 

जीवन मृत्युच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि आता मला तारणारे फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात ह्या उत्कट भावनेने जर हा ग्रंथ वाचला तर सर्व मनोकामना पूर्ण होतील ह्यात शंका नसावी . पण तो भाव आणि ती एकरूपता आपण आणत नाही. अत्यंत निष्काम भक्तीने केलेले वाचन निश्चित फलद्रूप ठरेल. 


आपल्याला त्यांच्याकडे काहीही मागायची खरच गरज नाही पण आपण सामान्य माणसे आहोत. संकट समयी जे मनात येयील ते बोलतो पण त्यामागे तूच सुखकर्ता तूच दुखकर्ता हा भाव असतो . परमेश्वर हा माणसाच्या जीवनाचा आधार आहे आणि म्हणूनच त्याचे प्रत्यक्ष अस्तित्व असणारे सर्वच ग्रंथ अनमोल , अद्भुत आणि असामान्य आहेत .तरीही फक्त कठीण प्रसंगात परमेश्वराची आठवण होते हे सत्य आहे.  नित्य पठण करणारेही अनेक भक्त आहेत आणि त्यांना त्याची अनुभूतीही येत असते .

जसजशी पारायणे होत जातात तसतसे आपल्या स्वतःच्याही विचारांमध्ये परिवर्तन होत जाते . आपले अशांत असलेले मन हळूहळू स्थिरावत जाते . अनेक वेळा “ सद्गुरू कृपे साठी काय करावे “ असा प्रश्न विचारला जातो . कश्याला असा विचार करायचा ? सद्गुरू कृपा दिसत नाही पण जाणवते . 

मला शेगाव ला जावेसे वाटत आहे, तिकीट नाही मिळाले जीव तळमळत आहे, पोथी वाचताना अश्रू अनावर होत आहेत . मनोमन त्यांच्याच चरणी असल्याचा भास होत आहे , हे सर्व काय आहे? हि गुरुकृपा नाही तर अजून काय आहे? आपल्या आयुष्यात अध्यात्मिक मार्गावर पडणारे पहिले पाऊल हि सुद्धा त्यांचीच कृपा आहे. आपला वाल्याचा वाल्मिकी त्यांच्याच कृपेने होतो . माझे गुरु आहेत आणि ते मला सांभाळत आहेत हा विश्वास असणे हीच तर गुरुकृपा आहे. सतत त्यांचे होणारे भास , त्यांच्या भेटीची आस , त्यांच्याबद्दलचे वाचन, लिखाण, अनुभव कथन हे सर्व गुरु कृपा नाहीतर अजून काय आहे? गुरु आपल्या अत्यंत समीप , अवती भवतीच आहेत आणि त्यामुळे आपण सुरक्षित आहोत .

आपल्यासोबत जन्मोजन्मी आपले गुरु आहेत , ह्याच नाही तर आधीच्या अनेक जन्मात त्यांनी आपली साथ दिली आहे, आईप्रमाणे आपला सांभाळही केला आहे पण ते ओळखण्याची ताकद आणि कुवत आपल्यात नसल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही . खरतर आपण जन्मापासून त्यांच्याच कृपेच्या छायेखाली वावरत आहोत आणि म्हणूनच एका क्षणी आपल्या हाती हे अद्भुत ग्रंथही येतात . सद्गुरू आपल्या सोबत अखंड असतात पण ते आहेत ह्याची जाणीव आपल्याला होणे तो क्षण म्हणजे आपला अध्यात्मातील प्रवेश . 


सद्गुरूकृपेसाठी वेगळे काहीच करायला नको , ती आपल्यावर आहेच आहे. आपल्याला समाजात अनेक लोक त्रास देतात , कित्येक वेळा मान अपमानाचे प्रसंग येतात पण अश्यावेळी शांत राहून आपण सद्गुरुवर ह्या गोष्टी सोडून देतो . आपण काय तर आपण चार थोबाडीत मारू पण त्यांनी केलेली शिक्षा आयुष्यभर धडा शिकवणारी असते . 

आज अनेकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत जसे नोकरी , अर्थार्जन . महाराज आपल्याला पोस्टाने चेक नाही पाठवणार पण काम नक्कीच आणून देतील , आता ते केले नाही आणि पोथी पुराणे वाचत बसले तर कसे होणार ? स्वामिनी स्पष्ट सांगितले आहे आळशी माणसाचे तोंड सुद्धा पाहू नये . 

परमेश्वर आपल्याकडे काहीच मागत नाही , त्यांनीच आपल्याला घडवले आहे . आपल्याकडे त्याला देण्यासारखे आहे तरी काय ? देवाचिये द्वारी उभा क्षणभरी . पण तो एक क्षण सुद्धा पुरता नाही देत आपण त्याला.

आपल्या मनात अनेक विचारांचे काहूर उठलेले असते पण ग्रंथ वाचनाने आणि नामस्मरण केल्यामुळे ते हळूहळू कमी होत जाते . अध्यात्माचा रंग आयुष्याला वेगळीच दिशा देतो आणि जीवन कृतार्थ होते . एखाद्या गोष्टीचा हव्यास धरतो आपण, अमुक एक हवे,  हे झाले पाहिजे असे सतत वाटत राहते आणि ते मिळवण्यासाठी माणूस आयुष्यभर धडपडत राहतो पण कालांतराने त्या गोष्टी किती निष्फळ आहेत ह्याची जाणीव होते . म्हणूनच दासगणू म्हणतात “ एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आण , सत्य एक त्यांनाच कळे . “ म्हणूनच अध्यात्म कळणे  अवघड पण एकदा समजले कि त्याची गोडी चाखत आयुष्य सहज पुढे जात राहते .


मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लागणे त्याहून कठीण .  सद्गुरूंचा जीवनाला खूप मोठा आधार वाटत राहतो , ज्याचे कुणी नाही त्याचा देव आहे  , नाही का? गुरूंच्या शिवाय जीवनाला अर्थ हि नाही . त्यांच्या सेवेत दुक्खाची झळ लागत नाही आणि संकटांचा माराही जाणवत नाही. एकदा का त्यांच्या शाळेत नाव घातले आणि त्यांचे बोट धरले कि मग ते नेतील तिथे आणि करतील ते आपल्या भल्यासाठी हा विश्वास भक्तांनी अभेद्य ठेवलाच पाहिजे. 

सरतेशेवटी म्हणावेसे वाटते  “ वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी “

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




 

 

   


 


No comments:

Post a Comment