Monday, 19 December 2022

अध्यात्माची Expiry Date

 || श्री स्वामी समर्थ ||


आता तुम्ही म्हणाल हे काय आता नवीन ?? हो खरच नवीन आहे , मीही आज पहिल्यांदा ऐकले आणि त्यावर लिहिल्याशिवाय झोप लागायची नाही म्हणून ह्या चार ओळी लिहिण्याचा लेखनप्रपंच .


आज एका व्यक्तीचे समुपदेशन केले . मुलाच्या आजारपणाचा प्रश्न होता. असो. सर्व यशाशक्ती बोलून झाल्यावर त्या म्हणाल्या ताई मला समजले आता कायकाय करायचे ते आणि कश्यासाठी करायचे .  म्हंटले मनात विश्वास ठेवा ज्या देवतेचे पूजन करता तिला शरण जा आणि मगच उपाय फलद्रूप होताना दिसतील. 


मुलाच्या आजारपणाचा प्रश्न होता . पत्रिकेतील शनी षष्ठ स्थानात त्यावर गोचर शनी व्ययातून बघतोय आणि मूळ पत्रिकेतील मंगळ तृतीयात . पोटाचा आजार होणारच , वायुतत्व बिघडले कि पचन बिघडणार . लग्नेश षष्ठ स्थानात .असो गेले दोन वर्ष शनी मुळे त्या मुलाला अधिक त्रास झाला. 


पुढे त्या जे म्हणाल्या ते ऐकून मी अक्षरश हतबुद्ध झाले. गेले दोन वर्षापूर्वी त्यांनी कुणाकडून तरी घरात होम हवन , पूजा शांती दोन दिवस अखंड जप असे बरेच काय काय करून घेतले तरीही काहीही फरक नाही . गेल्या वर्षी त्यांनी विचारले कि अजून काहीच फरक नाही तेव्हा उत्तर मिळाले कि “ हे सर्व उपाय फक्त वर्षभरासाठी असतात , वर्ष झाले आता त्याचा परिणाम गेला आता पुन्हा करायला लागतील.” सर्वसामान्य माणसाच्या खूप पलीकडे असणारे हे उत्तर मलाही पचनी पडले नाही . व्रत वैकल्ये , अध्यात्म साधना ह्याला  Expiry Date असते हे मला आज नव्यानेच समजले आणि ज्ञानात भर पडली . 

एखाद्या देवतेचे पूजन हे मनापासून केले तर देवता प्रसन्न होणार कि म्हणणार “ संपले आता Expiry Date झाली “ .


मुळातच आपल्याला कुणीही काहीही करायला सांगितले तर ते नेमके कश्यासाठी आहे ? हे जाणून घेतले पाहिजे आणि जर स्वतःच्या बुद्धीला पटले तर आणि तरच केले पाहिजे. उठसुठ कुणी काहीही सांगेल आपण ते करणार का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे ,दुसर्याला दोष देवून काहीही उपयोग नाही . डोळे मिटून एखाद्या गोष्टीचे मर्म जाणून न घेता केलेली कुठलीही गोष्ट व्यर्थ आहे. विचार करा तुम्हालाही पटेल. 


निर्बुद्ध पणाने केलेली गोष्ट सर्वार्थाने व्यर्थ जायील.  वरील उदाहरणात शनी मुले ज्या गोष्टी होत आहेत त्याला शनीचीच उपासना हवी , षष्ठ स्थान पोट दर्शवते आणि शनी वायुतत्व असंतुलित करत असल्यामुळे हनुमान चालीसा , जप ,शनीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणे ह्या गोष्टीमुळे फरक पडणार आणि ह्या आपण का करत आहोत ह्याचे कारण समजले तर आपण अजून कळकळीने करू , हो ना? 


आज आयुष्यात जे काही करायचे ते अत्यंत जागरूक पणे,  डोळसपणे करायचे , आम्हाला ह्यातले काही समजत नाही असे न म्हणता समजून घ्यायचे आणि मग करायचे . सांगकामेगिरी अजिबात करायची नाही . श्रद्धा , भक्ती ,उपासना ह्या नक्कीच फलद्रूप होतात त्यांना Expiry Date नसते हे लक्ष्यात ठेवा . उलट जितकी अधिक उपासना तितके मोक्षाचा मार्ग सुकर . महाराजांचे चरणाशी अश्या भक्तांना नक्कीच जागा प्राप्त होते . 


आयुष्य हे रोलर कोस्टर राईड सारखे आहे ,सगळे दिवस आपण बघतो चांगले वाईट . काही आपले भोगही असतात आणि ते भोगल्याशिवाय आपली सुटका नसते त्यामुळे ते भोगून उलट एकेक हिशेब चुकते करावे . कधीकधी काळ आणि वेळ जावा लागतो आणि पुन्हा जीवन पहिल्या सारखे लयबद्ध होते , सूर जुळतात आणि जीवन आनंदी होते . जरा डोके दुखले कि लगेच गोळी घ्यायची सवय घटक आहे कारण आपल्याला सहन करण्यासाठी लागणारा संयम संपला आहे.

समुपदेशन करताना समोरचा जातक फोनवर समस्या सांगायच्या आधीच तुम्ही उपाय पण सांगणार ना? हा प्रश्न विचारतो म्हणजे समस्या आहे हे गृहीतच धरले का तुम्ही ? म्हणून मी नेहमी सांगते अत्यंत आवश्यकता असल्याशिवाय सगळे उपाय ठाकले तर फक्त मार्गदर्शन म्हणून पत्रिका बघा , उठसुठ अजिबात नाही. पत्रिका पवित्र आहे ती खिरापत नाही सगळीकडे वाटायला. रोज तुम्हाला कुणीना कुणी काहीतरी करायला सांगेल तुम्ही करणार का? विचार करा .जागृत व्हा .


गोचर ग्रह अनेकदा परिणाम करतात चांगले आणि वाईट पण ते तात्पुरते असतात ,जीवन उध्वस्त होत नाही त्यांनी पण आपली लगेच पळापळ सुरु . असो .तहान लागली म्हणून विहीर खणू नये . गुरुसेवेचा ध्यास घ्यावा . गुरुतत्वाचे अखंड  पालन करावे , शुद्ध आचरण आणि भक्ती महाराजांच्या समीप नेते. काहीतरी मिळावे म्हणून सेवेत राहू नये . उपासना नित्याची असावी , संकटे येतीलच ती हवीतही , जीवनाचा तोही एक भाग आहे जो अपरिहार्य आहे पण त्याचे निरसन सुद्धा होते महाराज मार्ग दाखवतात ,आपल्याकडे हवे ते गुरूंच्या प्रती निष्ठा , संयम आणि सातत्य . 

आपल्या जीवनाला नक्कीच Expiry Date आहे पण आपल्या सेवेला , श्रद्धेला , समर्पणाला , भक्तीला नाही ...


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment