|| श्री स्वामी समर्थ ||
मध्यंतरी एका जोडप्याचे समुपदेशन केले. विवाह होऊन अनेक वर्ष झालेली पदरात दोन मुले . संसार व्यवस्थित चालू होता . नवर्याची सरकारी नोकरी आणि पत्नी बँकेत होती. मध्यंतरीच्या काळात तिची बाहेर बदली झाली . तिने खूप प्रयत्न केला पण प्रमोशन होते त्यामुळे बदली होती , नोकरी सोडून कसे चालेल म्हणून परिस्थिती स्वीकारली. तिची तृतीय भावाची अंतर्दशा लागली होती . काही दिवस बरे गेले. मग नवर्याला इथे एकट्याला सर्व करणे अवघड गेले . तोही समजूतदार होता मुलांचेही नीट करत होता. अनेकदा खूप कामामुळे तिला फोन करणे किंवा घरी फेरी मारणे जमेनासे झाले. त्याचे षष्ठ भाव लागले होते. असो मग मनात तिच्याबद्दल संशय , लहान सहान कारणावरून भांडणे , सुरु झाली. माझ्याकडे पत्रिका घेवून आले तेव्हा पहिलेच वाक्य “ मला घटस्फोट हवा आहे “. मी त्यांना विचारले तिलाही हवा आहे का? काहीच उत्तर नाही. असो .
दोघांच्याही पत्रिका पाहिल्यावर हे प्रकरण अजिबात घटस्फोटाचे नाही , हि पेल्यातील वादळे आहेत हे लक्ष्यात आले. दोघांचाही वैवाहिक सुखाचा शुक्र सुस्थितीत होता तसेच कुटुंबस्थान सुद्धा नीट होते . मी त्यांना स्पष्ट सांगितले घटस्फोट घेण्यासारखे ठोस करणच नाही. तुमचे तुमच्या पत्नीवर प्रेम आहे म्हणून तर इतके वर्ष संसार नीट झाला. आता तिचा विरह तुम्हाला सहन होत नाही म्हणून त्यातून हि लटकी भांडणे , संशय असे सर्व काही होत आहे. त्यांना म्हंटले थोडे दिवस थांबा कारण 5 महिन्यांनी तिची चतुर्थाची दशा सुरु होणार होती आणि ती घरी येणार होती. तसेच त्याचेही 2 7 भाव लागणार होते . म्हंटले पुरुषी अहंकार बाजूला ठेवा आणि मनातील संशयाचे भूत सुद्धा . उगीचच प्रकरण विकोपाला न्यायची गरज नाही . विचारांची दिशा बदलणे अत्यावश्यक आहे. मुलांना घेवून तुमची तिला भेटून या.
काही दिवसांनी तिची स्वतःच्या गावात बदली झाली आणि घराला घरपण आले. नवर्याची बदली होणे आणि पत्नीची ह्यात नक्कीच फरक आहे पण म्हणून उगीचच लहान सहान कारणावरून संशयाचे भूत डोक्यात घालून घटस्फोट घेण्यापर्यंत विचार मनात येणे हे कमकुवत मनाचे लक्षण आहे. पण खर सांगू का अनेकदा ग्रहस्थिती मुळे सुद्धा व्यक्ती सरभरीत होते आणि चुकीचे निर्णय घेते . आज ते दोघेही पुन्हा सुखाने संसार करत आहेत .
अनेकदा 3 6 8 12 ह्या भावांच्या दशा अंतर्दशा कधीकधी संसारात किंवा आयुष्यात भरती ओहोटी आणतात पण आपण त्यातूनही निभावून जातो फक्त मन खंबीर हवे. अनेक वर्ष संसार करूनही आपल्या जोडीदारावर संशय घेणे अशी ग्रहस्थिती आपल्या उद्विग्न मनस्थितीचे कारण असू शकते खरतर प्रत्यक्ष आयुष्यात तसे काहीच नसते.
गृहस्थाश्रमात संयम महत्वाचा असतो आणि नोकरी टिकवण्यासाठी असे निर्णय अनेकदा अनेक व्यक्तीना घ्यावे लागतात . अश्यावेळी संसाराचा गाडा हाकताना अनेक जबाबदार्या सुद्धा अंगावर पेलाव्या लागतात . “ नोकरीतील बदली “ हि तात्पुरती घटना असते , सर्व स्थिती स्वीकारून पुढे जावे लागते . अश्या घटना खरतर तुमची परीक्षा घेत असतात , व्यक्ती दूर गेली म्हणजे प्रेम कमी होत नसते . मी त्यांना म्हंटले तुमची बदली झाली असती आणि तुमचा काही काळ घरापासून दूर राहिल्यामुळे संपर्क कमी झाला असता तर बायकोचे तुमच्यावरचे प्रेम कमी झाले असते का? किंवा तुमच्यावर तिने संशय घेतला असता का? मनात खजील झाले . असो त्यांना त्यांची चूक समजली . प्रत्येक भांडणाची परिणीती घटस्फोटात होत नसते हेच सूचित करण्यासाठी हा लेखन प्रपंच. ज्योतिषाने सुद्धा सल्ला देताना पुढील दशा अंतर्दशा पहिल्या तर अनेक घटस्फोट सुद्धा वाचतील. जातकाचे मत परिवर्तन करणे आणि त्याला संयमित होण्यास मदत करणे हे समुपदेशनाचे मर्म आहे असे वाटते . सहमत ???
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230