Sunday, 18 February 2024

वधू वरांसाठी ( अनुभव कथन नक्की वाचा )

 || श्री स्वामी समर्थ ||




काल दोन पत्रिकांचे गुणमिलन केले . व्यवस्थित होते गुणमिलन आणि ग्रहमिलन दोन्ही ठीक होते. मुलाची पुढील दशा आर्थिक दृष्टीने स्थैर्य नक्कीच देणार तसेच नाडी , संतती सर्व काही ठीक होते. असो . त्या मुलीचा पगार हा मुलाच्या पगारापेक्षा २ लाख अधिक होता त्यामुळे तिला तो पूर्णतः पसंत नव्हता . याचा अर्थ आर्थिक बाजू हा पसंतीचा निकष होता हे उघड आहे. मी तिला म्हंटले अग आत्ता त्याला पगार तुझ्यापेक्षा कमी आहे पण तो निर्व्यसनी आहे , उत्तम संस्कारित मुलगा आहे हे विसरू नकोस . उद्या त्याचा पगार वाढणार आहे हे येणारी दशाच सांगते . कदाचित पुढे तुझीच नोकरी तू स्वखुशीने मुले झाली म्हणून सोडूही शकतेस तेव्हा तुम्हाला काहीही कमी पडणार नाही कारण मुळात तुझ्या पैशावर त्याचे घर चालत नाही आहे आणि चालणार सुद्धा नाही . तेव्हा तुझ्या दोन लाखांचे तारे तू नाही तोडलेस तर बरे होईल. 


आपल्यापेक्षा अधिक धन कमावणारा , मोठे घर , दर वर्षी एक परदेशवारी , सासू सासरे वेगळे हवेत नसतील तर सोन्याहून पिवळे ह्या अश्या कल्पना विश्वात राहिलात तर तुमचा पगार नक्कीच वाढेल पण त्यासोबत वय सुद्धा वाढेल आणि तुमच्या अपेक्षांच्या चौकटीत बसणारा मुलगा मग ह्या अखंड विश्वात सापडणे कठीण होऊन बसेल. 


कुठलेही स्थळ शोधताना सर्वांगीण विचार व्हावा . पैसा हा नेहमीच वाढत जातो पण फक्त त्याभोवती आपले जग नसावे . मुलगा उत्तम शिकलेला , कसलीही जबाबदारी नाही , वडिलांचे उत्तम घर , आणि मुळात निर्व्यसनी असे इतके गुण असताना त्या दोन लाखांचा खो घालायची खरच गरज आहे का? हा प्रश्न दूरगामी विचार करून स्वतःला विचार असे मी तिला सांगितले आणि फोन ठेवला. 


नको त्या वाजवी अपेक्षा , आईवडिलांच्या डोक्याला लागलेला “ मुलांचे लग्न “ हा घोर ..आता ह्या सर्वांचा विचार मुलामुलींनी करावा असे मी सुचवीन . आजकाल मुलीना पोतभर पगार आहेत पण मग त्यानुसार अप्क्षाही आहेत , त्यांच्यासाठी योग्य स्थळे शोधणे हि आज जीवघेणी स्पर्धा आहे. पालकांचाही विचार करावा तसेच फक्त पैसा मोठे घर सगळी सुखे अगदी पायाशी अशी चौकट न शोधण्यापेक्षा आपले मन समजून घेणारा जोडीदार शोधावा .हे सर्व भौतिक सुखांचे निकष लावत बसलात तर विवाहाच्या सारीपाटावरून कधी दूर फेकले जाल समजणार सुद्धा नाही . हि सुखे हवीत नाही कोण म्हणतोय पण त्याला मर्यादा हवी आणि त्याला किती प्राधान्य द्यायचे ते ज्याचे त्याला समजले पाहिजे.


सहजीवन हे प्रेमावर टिकते आणि मनात प्रेम असेल तर भौतिक सुख हा सुखाचा निकष कधीच नसतो . कुठे थांबायचे आणि नेमके कश्याला प्राधान्य द्यायचे ते ठरवता आले तर सुखाचे आनंदाचे क्षण आपल्या अगदी जवळच आहेत हे उमगेल.


सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230 


No comments:

Post a Comment