|| श्री स्वामी समर्थ ||
टीप : लोकांचे लेख तसेच्या तसे कॉपी करून स्वामींच्या शिक्षेस पात्र ठरण्यापेक्षा स्वतःचा व्यासंग अभ्यास वाढवावा. कुणी असे लेख कॉपी केले तर आता वाचकांनीच जागृत व्हावे आणि सगळ्यांच्या निदर्शनास आणावेत म्हणजे हे प्रकार थांबतील.
पूर्वीच्या काळी विवाहाचे वय अगदी 9 वर्षे होते पण आज त्या वयाने 35 – 40 सुद्धा पार केली आहे. विवाह आणि वैवाहिक सौख्य ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . आज विवाहाला विलंब का होत असावा ह्याचे ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून कारण समजून घेण्याचा प्रयत्न करुया .
आपल्याला एक सहचारिणी असावी , विवाह करावा असा विचार मनात ज्या वेळी येतो , म्हणजे व्यक्ती वैचारिक , मानसिक , आर्थिक , लैंगिक सर्वार्थाने परिपक्व असते , तो क्षण खरा विवाहाचा असतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये. आपल्याला समोरचा त्याची मुलगी देयील का ? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला तर उत्तर मिळेल . विवाह सगळ्यांचे होतात पण टिकतात किती जणांचे हा विचार मंथनाचा विषय आहे. अनेकदा मुलांपेक्षा पालकांना आपल्या अपत्याच्या विवाहाची काळजी आणि नको तितकी घाई असते त्याला अनेक सामाजिक कारणे सुद्धा आहेत आणि त्यांच्या दृष्टीने ती पटण्यासारखी सुद्धा आहेत .
विवाह हा घाईत उरकून टाकण्याचा विषय नाही कारण हे नाते आयुष्यभर निभवायचे आहे . मुळात मी सर्वार्थाने विवाहाला योग्य आहे हे सांगणारा चंद्र पत्रिकेत उत्तम हवा. शेवटी प्रपंच त्याला मनापासून करायचा आहे म्हणजेच चंद्राची साथ हवीच .चंद्र म्हणजे मन आपले आणि समोरच्याचे सुद्धा ते समजून अर्थात आपल्या पती /पत्नीचे मन समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे . वैचारिक देवाण घेवाण जमली पाहिजे . हे सर्व मनाशी निगडीत आहे. वैवाहिक सुख म्हंटले कि शुक्र आलाच . दोघांच्यातील प्रणय फुलवणारा आणि नैसर्गिक ओढ निर्माण करणारा, जगवणारा आणि जगायला लावणारा ग्रह म्हणजे शुक्र . आज आपल्या पत्नीला बरे नाही तेव्हा बाजारहाट करून लवकर घरी गेले पाहिजे हि भावना कुणी सांगून येत नाही, ती मनात आपणहून आली तर हाच खरा संसार आणि ह्याचे बीज मनात कधी रुजेल जेव्हा चंद्र शुक्र उत्तम असतील तेव्हा. नुसते शारीरिक आकर्षण उपयोगाचे नाही कारण कालांतराने ते विरून जाणार आहे, ते क्षणिक आहे पण मनाचे धागे एकमेकात गुंफून ती वीण किती घट्ट होयील हे महत्वाचे .
मनाचे बंध जुळायला भावना लागतात आणि त्या जल तत्वाशी निगडीत असतात . एकमेकांबद्दल च्या भावना आणि आदर , प्रेम अलगद उलगडत गेल्या तर संसार खुलत जातो .आकर्षण उपयोगाचे नाही कारण ते अळवावरचे पाणी आहे. म्हणूनच चंद्र शुक्रासारखे अपर सौंदर्य आणि भावना असणारे ग्रह महत्वाचे आहेत .
विवाहाचे मुख्य स्थान सप्तम भाव . म्हणून सप्तम भाव आणि सप्तमेश सुद्धा महत्वाची कामगिरी बजावतो . ह्या भावावर , किंवा सप्तमेश , चंद्रावर शनीची दृष्टी असेल तर विवाहाला विलंब होयील कारण कुठल्याही गोष्टीला विलंब करणे हा शनीचा मुळ स्वभाव आहे. सप्तम , अष्टम भावातील मंगळ ( स्वराशीचा , शुक्राच्या राशीतील नसेल तर ) तसेच शुक्राचे शानिसोबत असणारे योग तपासावे लागतात . कन्या राशीतील , कन्या नवमांश , मकर राशी मकर नवमांश शुक्र वैवाहिक सौख्यात बाधा आणतो. शुक्र हा आकर्षण दाखवतो त्यामुळे पत्रिकेत शुक्र बलवान असेल तर लवकर वयात विवाह होवून वैवाहिक सुख प्राप्त होते .
शनी हा विलंब करतोच पण अनेकदा मंगळ सुद्धा 28 नंतर विवाह देतो . पितृदोष असेल तरीही विवाहास उशीर होतो . सप्तमेश किंवा सप्तम भावावर असलेली एकापेक्षा अनेक पापग्रहांची दृष्टी , प्रथम , सप्तम भावातून होणारा शनी मंगळ प्रतियोग , शुक्र हर्शल प्रतियोग तसेच लग्न भावातील हर्शल , राहू वक्री शनी हे विवाहातील अडथळे आहेत . सप्तम भावात ठाण मांडून बसलेले पापग्रह सुद्धा विवाहास उशीर किंवा अडथळे आणतात .
अतिशय महत्वाचा मुद्दा लक्ष्यात घ्या तो असा कि जोवर विवाहाचा योग येत नाही तोपर्यंत पत्रिका न जुळणे , आपला होकार असेल पण समोरच्याकडून नकार असेल. गोत्र नाडी काहीतरी प्रश्न उपस्थित होतात , दोघांच्या उंचीत फरक , आर्थिक बाबी म्हणजे पगार मिळकत मनासारखी नाही म्हणून तोलामोलाचे स्थळ नाही , मुलाला मुलगी आवडते पण पत्रिका जुळत नाही म्हणून घरचे नको म्हणतात अशी अनेक कारणे पुढे येतात तेव्हा समजावे कि विवाहाचा प्रबळ योग अजून आलेला नाही. पण जेव्हा हा योग येतो तेव्हा सर्वकाही क्षणात जुळून येते . म्हणूनच पत्रिकेत “ योग “महत्वाचा असतो. विवाह ठरला तर तो होणार कधी ? घटना घडणार कधी तर अर्थात तो अधिकार दशा स्वामीचा असतो . पूरक अंतर्दशेत आणि विदशेत विवाह संपन्न होतो.
अनेकदा विवाहाचा योग ३२ वर्षात असतो आणि २५ वर्षापासून स्थळे शोधायला सुरवात केली तर ३२ पर्यंत मन निराश होते. मुलांना सुद्धा नैराश्य येवू शकते म्हणूनच पत्रिका दाखवून सर्वप्रथम हा योग कधी आहे ते जाणून घ्यावे असे वाटते. नाहीतर मुलामुलींच्या मनात नैराश्य येते त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो , आपल्यातच काहीतरी वैगुण्य आहे कि काय असे वाटू लागते आणि मानसिकता बिघडते .
विवाह हा १६ सोळा संस्कातील मुख्य संस्कार तो योग्य होण्यासाठी शेवटी उत्तम “ योगाची “ वाट पहावीच लागते .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment