Wednesday, 24 July 2024

सहवास तुझाची घडावा देवा

 || श्री स्वामी समर्थ 

सुग्रास भोजन कुणाला आवडणार नाही ? नुसत्या फोडणीच्या वासाने सुद्धा भूक चाळवते आपली . पण आपल्या विष्ठेचा वास आपल्या सुद्धा सहन होत नाही . परमेश्वराने शरीराची रचना तशीच केली आहे . आपण जे अन्न ग्रहण करतो त्यातील शरीराला जे हवे ते ठेवून नको असलेले शरीर विष्ठेच्या मार्फत बाहेर फेकून देते . अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनातील नको असलेल्या विचारांची गर्दी बाहेर टाकून दिली पाहिजे. वर्षानुवर्षे अनेक नको त्या आठवणी घडलेले प्रसंग आणि कुणाचे शब्द आपण लक्ष्यात ठेवतो , त्याचे थरावर थर मनात साठवून ठेवतो आणि त्यातूनच अनेक मोठे आजार सुद्धा आपणच जन्माला घालत असतो . धबधब्यासारखे बोलणार्या , हसत्या खेळत्या व्यक्तींना सहसा आजारपण येत नाही ते ह्याच कारणामुळे. मन निर्मल आणि मनात आले ते बोलून मोकळे व्हायचे , मन आपले साफसूफ . 


सुख दुक्ख सापेक्ष आहे. निसर्ग  आणि मानवी जीवन ह्याचा घनिष्ठ संबंध आहे . जिथे ऋतू सुद्धा सतत बदलत राहतात तिथे मानवी जीवन ते काय . म्हणूनच सुख दुक्ख सुद्धा कायम नाही. नवग्रहांच्या दशा सुद्धा कायम नाही . एखाद्या ग्रहाची दशा परदेशगमन देयील तर एखाद्या ग्रहाची विवाह तर एखादी असाध्य आजार , काहीच शाश्वत नाही . माणसाने सोडून द्यायला शिकले पाहिजे . कुणी कितीही चांगले केले तरी आपण ते लक्ष्यात न ठेवता त्याने वाईट काय केले ते आपण बरोबर लक्ष्यात ठेवतो . विसरण्याची क्षमता आपल्याला देवाने दिली आहे म्हणून आपले जीवन सुसह्य आहे  . अनेकदा आपल्या जवळची व्यक्ती हे जग सोडून जाते आणि आपल्याला दुक्खाच्या खाईत लोटून जाते . जो जातो तो सुटतो पण मागे राहणाऱ्यांची खरी परीक्षा असते . इतके सहज नाही हे सर्व विसरणे . ह्याच सर्व क्षणात महाराज आपल्याला मदत करतात . त्यांचा मायेने पाठीवरून फिरणारा हात आपल्याला जगण्याची उमेद देवून जातो . 

कुठल्याही कठीण प्रसंगातून आपण पार होतो ती त्यांचीच कृपा आहे. अचंबित करणारे प्रसंग आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जणू ग्वाही देतात . अनुभूती मिळवण्यासाठी अपार श्रद्धा , निस्सीम भक्ती आणि प्रचंड विश्वास हवा . वरवरची सेवा उपयोगी नाही . महाराज म्हणजे न समजणाऱ्या अनाकलनीय शक्ती आहेत . समाज सुधारण्यासाठी आणि मनुष्याच्या जीवनाला अध्यात्माची गोडी आणि योग्य वळण लावण्यासाठी ईश्वराने संतरुपामध्ये वावर केला. संतांच्या पत्रिका अभ्यासल्या तर त्यानाही किती त्रासातून जावे लागले आहे ह्याचा प्रत्यय येईल.

संत शिरोमणी श्री गजानन महाराजांनी  शेगाव मध्ये वास्तव्य केले ते अखेरपर्यंत .भास्कर पाटील , गणू जवर्या , बंकटलाल , भाऊ कवर ह्यांच्यावर महाराजांची कृपा होती , त्यांच्यासारखे भक्त आणि त्यांच्या लीला ह्यांचे रसभरीत वर्णन श्री गजानन विजय ग्रंथात आपल्याला दिसतेच . बारा वर्ष एक थेंब सुद्धा पाणी नाही आले त्या विहिरीला महाराजांनी एका क्षणात जलमय केले आणि हि लीला बघून भास्कर पाटील ह्या निस्सीम भक्ताने आपला अवघा प्रपंच त्यांच्या चरणाशी वाहिला हि सोपी गोष्ट खचितच नाही. 

आज आपण इतके वर्ष पोथी वाचत आहोत , नित्य सेवा आणि नामस्मरण करत आहोत आणि हे अभिमानाने मी केले मी केले असेही सांगत आहोत . खरच इतक्या वर्षात आपल्या वृत्तीत , देहबोलीत , मानसिकतेमध्ये , विचारात असे कितीसे बदल झाले ??? ह्याचा विचार सुद्धा आवश्यक आहे. -पशु पक्षी सुद्धा त्यांच्या आज्ञेत वागतात आणि आम्ही ? प्रश्न गंभीर आहे पण विचारमंथन करण्यास योग्य आहे. आजकाल घरोघरी महाराजांचे फोटो असतात पण तरीही त्यांच्यातील गुरुतत्व आपल्यात उतरू नये किबहुना आपण भक्तीत किती कमी पडत आहोत ह्याची जाणीव खुद्द आपल्याला सुद्धा असू नये  ह्याचा खेद आहे. 

आज म्हणूनच महाराजांकडे काहीतरी खास मागुया ...हे जीवन हा त्यांचा प्रसाद मानला तर ते जीवन मी कसे व्यतीत केले पाहिजे ? एकेक पाऊल मृत्यूकडे जात असताना माझ्या वेळेचा सदुपयोग मी कसा केला पाहिजे ? 

त्यांचा सहवास अधिकाधिक मिळावा हाच प्रसाद आज मागुया. त्यांचे नाम इतके सतत घेता आले पाहिजे कि क्षणभर सुद्धा त्यांचा विसर पडू नये .हरीचे नाम मुखात आणि वृत्तीत असावे जेणेकरून जन्ममृत्युचा हा फेरा चुकवता आला पाहिजे हाच आशीर्वाद मागुया . त्यांचा वियोग हि कल्पना सुद्धा सहन होणारी नाही त्यामुळे तुमचा वियोग होवू नये हेच मागणे आहे. 

आजच्या कलियुगात आपणच आपले प्रश्न वाढवून ठेवले आहेत आणि म्हणूनच अध्यात्माची खरी गरज लहान मुले , युवा पिढीपासून सर्वांनाच आहे. आज आपण सगळे मिळवले आहे पण समाधान हरवून बसलो आहोत . कसलेतरी सततचे दडपण आणि अनामिक भीतीने आपले मन पोखरत चालले आहे . काळजी चिंता आपल्या मागच्या पिढ्यांना सुद्धा होतीच कि पण त्यांनी त्याचा बाऊ केला नाही ,त्यांची श्रद्धा अधिक बळकट होती , जीवनाला आकार उकार होता आणि सर्वात महत्वाचा म्हणजे संयम होता . आज हे सर्व लोप पावत आहे त्यामुळे मग झोपेची गोळी लागते , मन निराश होते आणि व्यसनात कधी गुरफटते आपल्याला सुद्धा समजत नाही . महाराजांच्या लीलांनी ओथंबून वाहणारा श्री गजानन विजय ग्रंथ हा अक्षरश रिसर्च करायला लावणारा विषय आहे. तो समजणे तितके सोपे नाही त्याचा प्रसार अधिकाधिक होण्याची आवश्यकता आहे . आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा त्यातील असंख्य गोष्टी सांगून त्याची गोडी लावली पाहिजे . आपली भक्ती विश्वास वाढतो तेव्हाच आपण संकटांशी दोन हात करू शकतो , त्यातून मार्ग काढू शकतो . प्रत्येक लीला थक्क करणारी आहे. महाराजांनी समाधी घेतली हे भक्तांच्या स्वप्नात जावून सांगितले म्हणून हजारोंचा लोंढा शेगाव कडे आला . तेव्हा फोन नव्हते पण महाराजांनी स्वप्नात जावून भक्तांना आपण समाधी घेतल्याचे सुतवाक्य  केले .

महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले किती भाग्यवान असतील नाही का. आपल्याला आपल्या पारायणाच्या नामस्मरणाच्या मानस पूजेच्या माध्यमातून जो सहवास मिळतो आहे तो अखंड राहावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .

जय जय राम कृष्ण हरी 

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230



No comments:

Post a Comment