Sunday, 21 July 2024

हृदयी वसंत फुलताना ....

 || श्री स्वामी समर्थ ||


टीप : आपल्या देवावर प्रेम आहे ना ? मग लेख कॉपी करू  नका . आपली साधना वाढवा आणि स्वतः लेखन करा , आम्ही नक्कीच वाचू .

आपले संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त प्रेमावर निर्भर असते . प्रेम आयुष्याला पूरक ठरते ,आयुष्यात बहार आणते , जगावेसे काहीतरी करून दाखवावेसे वाटते जर प्रेमाची माणसे जवळ असतील. प्रेमाशिवाय आयुष्य अळणी होते . आयुष्यातून प्रेम वजा केले तर आयुष्य अर्थहीन , जगणेच निरर्थक होईल . कुटुंब व्यवस्था सुद्धा प्रेमाच्या धाग्याने बांधलेली आहे . मुलांना घरी यायला थोडासा उशीर झाला मग मुले कितीही मोठी होवूदेत आईचा जीव वरखाली होतो. तर असे हे प्रेम आणि त्याचे प्रतिक मानले गेलेला “ चंद्रमा “ आपल्या हृदयात सतत प्रेमाची ज्योत तेवत ठेवतो . पत्रिकेतील पंचम भाव  म्हणजे प्रेम प्रणय विद्या संतती , उपासना आणि पूर्व कर्म सुद्धा .

पंचम भाव हा अनुबंधाचा आहे. आपण कुणावर तरी प्रेम करावे आणि कुणीतरी आपल्यावर ह्या भावनेशी निगडीत असणारे हे पंचम स्थान आहे . ह्या भावाशी चंद्र जो मनाचा कारक , शुक्र जो कामभावना देणारा , मंगळ धाडस आणि पुष्टी देणारा आणि शनी वायू आहे त्या भावनांना हवा देणारा ह्या सर्वांचा पंचामाशी संबंध आला तर प्रेमसंबंधाची निर्मिती होणारच .ह्या सर्वात मेरुमणी म्हणजे लाग्नेशाचा सुद्धा काही युती किंवा दृष्टीने संबंध आला तर .1 2 3 4 5 7 9 11 ह्या भावात हे योग निर्माण होतात . चंद्र म्हणजे मन आणि शुक्र प्रेम , मंगल धडाडी . ह्यासोबत राहू भुलवणारा फसवणारा आणि हर्शल शुक्राला बिघडवण्यात उस्ताद . पंचमेश आणि पंचम भाव बघा उत्तर मिळेल , त्यावर असणारे पापग्रहांचे कुयोग आणि दृष्टी सर्व काही सांगून जायील . प्रेम एकदाच होते आणि तेही आपल्या नकळत , माझ्यावर प्रेम कर हा आजपासून हे सांगावे लागत नाही . आज एकावर उद्या दुसर्यावर प्रेम करणे हे प्रेम नसून विकृती आहे. असो.

प्रेम आणि आकर्षण ह्यात खूप फरक आहे. आजकाल विवाहाचा विचार करताना सुद्धा मला मुलगी आवडली हे एक फोटो बघून सांगणारा मुलगा “ आवडली म्हणजे नक्की काय “ ह्या प्रश्नावर नक्कीच गोंधळून जाईल . चेहरा मोहक आहे म्हणून आवडली कि सुंदर आहे म्हणून कि अजून काही ? पण आवडली. 


तर आकर्षण हे कुणाहीबद्दल आणि कुठल्याही वयात असू शकते अर्थात त्यात गैर नाही जर त्या आकर्षणाने लक्ष्मण रेषा ओलांडली नाही तर. कारण हे अनकेदा काय नेहमीच क्षणिक असते. अश्या संबंधात अनेकदा चंद्र शुक्र हर्शल तसेच 5 8 अनेकदा १२ सुद्धा चा ह्यांचा संबंध पाहायला मिळतो . प्रत्येक पत्रिकेचा अभ्यास वेगवेगळा आहे. आजकाल सगळे अगदी 10- 12 तास कार्यालयात काम करतात आणि सहवासाने सुद्धा प्रेम जुळून येते . त्याचेच उदा आज पाहूया .


मध्यंतरी एका मुलीने पत्रिका दाखवली , मुलगी कसली दोन मुलांची आई होती . म्हंटले प्रश्न काय ? सर्व चांगले दिसत आहे कि पत्रिकेत . तर म्हणाली माझा दिसरा विवाह कसा होईल ? त्याचा योग आहे का ? असल्यास कधी ? मी ऐकतच राहिले ? म्हंटले पहिल्या विवाहाची होळी झाली आहे असे सुतराम चिन्ह पत्रिकेत दिसत नाही , काय झालेय काय ? हळूहळू बोलू लागली. म्हणाली माझी ऑफिस मधील एकजण मला आवडतो आणि त्यालाही मी आवडते ... आम्ही दोघेही विवाहित आहोत पण आम्हाला एकमेकांशीच लग्न करायचे आहे. त्यालाही एक मुलगा आहे. मी डोक्याला हात लावला आणि काय ते समजले. आश्चर्य म्हणजे त्याचीही पत्रिका हि वेडी घेवून आली होती. 


दोन्ही पत्रिका बघितल्या , त्या बघायची गरज सुद्धा नव्हती . पंचमात चंद्र आणि त्यावरून राहूचे गोचर भ्रमण चालू होते .  मी तिला विचारले काल कसली भाजी केली होतीस ?  म्हणाली रसभाजी कारण नवर्यानं आणि मुलानाही आवडते म्हणून . बघा ह्या एका उत्तरातच तिच्या प्रश्नाचे उत्तर होते . अगदी गेल्या २४ तासात प्रेमाने कुटुंबासाठी उत्तम स्वयपाक करणारी आज द्वितीय विवाहाचा प्रश्न घेवून आली आहे मग हे खरे कि ते खरे .

मी तिला विचारले नवरा दारू पितो का? घरी येवून मारतो का? त्याचे बाहेर काही आहे का? सगळ्या प्रश्नांची उत्तरे “ नाही “ अशीच होती. तेव्हा मी तिला म्हंटले गेले १५ मिनिटे आपण बोलत आहोत पण त्यात एकदाही तू नवर्याबद्दल शब्द सुद्धा वाईट बोलली नाहीस मग दुसर्या विवाहाचा प्रश्न येतोच कुठे ? 

तुम्हाला सगळी रामकथा लक्ष्यात आली असेलच .  ऑफिसमध्ये सहवासातून निर्माण झालेल्या “ त्या भावनाना “ ती “ प्रेम “ समजू लागली होती पण ते निव्वळ आकर्षण होते . हे अळवावरचे पाणी अनेकदा आपल्या मनाला फुंकर घालते पण आपली साधना असेल तर आपण वेळीच त्यातून सावध होवून बाहेर येतो .बरे त्याचाही उत्तम संसार चालू आहे मग दोन घर मोडून तिसरा संसार थाटण्याचे प्रयोजनच नाही. 


तिला म्हंटले त्याला सांग तू आधी घटस्फोट घे मग मी घेते . करेल तो असे ? कधीही करणार नाही . मग गप्प बसली . मी म्हंटले तो तुझ्या भावनांशी खेळत आहे असेही मी म्हणणार नाही कारण तू स्वतःच तुझ्या भावनांचा बाजार मांडला आहेस . दोन मुले आहेत तुला , इतक्या वर्षांचा संसार एका क्षणात मोडायला निघालीस . अग किती अविचारी आहेस तू आणि तू तुझ्या दोन मुलांना कसे घडवणार आहेस . कठीण आहे. मी म्हंटले आज महाराजांची क्षमा माग ते नक्कीच माफ करतील. मोडायला वेळ लागणार नाही पण संसार बहरायला प्रेमाचे विश्वासाचे खत पाणी घालावे लागते जे तू इतके वर्ष घातले आहेत . महाराज आपलेच आहेत ते आपल्याला अंतर्बाह्य ओळखतात . 


काही दिवसांनी फोन आला म्हणाली ताई तुमच्याशी बोलले तो दिवस स्मरणात राहील कायम . मनात म्हंटले आता काय केले हिने ?काय बोलणार पुढे ह्याकडे कान होते माझे. पण तिची पत्रिका घटस्फोटाची नव्हती हे मला आठवत होते . ती म्हणाली आता माझ्या मनातून सर्व विचार गेले . आम्ही दोघेही पूर्वीसारखेच चांगले स्नेही आहोत पण आता त्या भावना नाहीत. लक्ष्यात आलेच असेल .. चंद्रावरून गोचरीच्या राहूचे भ्रमण चालू होते .माणसाच्या मनाचा कारण चंद्र आणि आपला भूलभूल्लया राहू त्याने मनाला फसवले त्यात तिथे शुक्र सुद्धा ज्याने आकर्षण दिले . राहूची विदशा संपली आणि प्रेमाचा बहर मौसम  पण संपला .

पण त्यातून एक चांगले झाले नव्याने आयुष्य सुरु झाले आणि त्यात ती पुन्हा रमली ...

ह्यात आता चूक कुणाचीच नाही . ग्रहांचे खेळ असेच असतात पण ते आपल्याला अनेकदा समजत उमजत नाहीत . कधी आपण शेअर मार्केट मध्ये आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावतो तर कधी कधी त्याची मोठी किंमत आयुष्यभर चुकवावी लागते . हा वरचा प्रकार घडतो . अविचार , अविचार आणि अविचार फक्त . 

चंद्र हा प्रेम दर्शवतो. माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो आणि जीवनात कुणीतरी आपले जवळचे लागते , कुणासाठी घरी परत जायचे ? हा प्रश्न असतो . ऑफिस सुटल्यावर घरचे प्रेमाचे बंध घरची ओढ लावतात आणि आपण घरी परतत असतो . पण अनेकांच्या नशिबात हा प्रेमाचा ओलावा नसतो , त्यांना घरी यावेसेच वाटत नाही . आयुष्यभर प्रेमासाठी आसुसलेले राहतात आणि प्रेमाच्या शोधात राहतात . आकर्षण देणारे , मोहात फसवणारे अनेक क्षण येतात पण कुठे थांबायचे ते ठरवायला आपली साधना आणि भक्ती उपयोगी येते . महाराज आपल्याला लक्ष्मण रेषेबाहेर जावूच देणार नाहीत . प्रेमाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते . 

प्रेम करता आले पाहिजे , देताही आले पाहिजे , प्रेमासाठी जीव तळमळला पाहिजे , प्रेम होत जाते , ते करावे लागत नाही तरच त्यात गम्मत असते . आपणही प्रेमाच्या लायक बनायला हवे , हीच पंचम भावाची खरी ओळख आहे. आपलं कुणावर किती प्रेम करू शकतो आणि जगाकडून आपल्याला किती प्रेम मिळणार हे हा भाव दर्शवतो . सगळ्यात महत्वाचे आणि जे कधीही मोजता येणार नाही ते आपल्या सद्गुरूंचे आपल्यावर असलेले प्रेम ,आणि आपले त्यांच्यावर असलेले निर्व्याज्य प्रेम . ते मात्र १०० नंबरी सोन्यासारखे असते . महाराज एखाद्या आईसारखे आपल्या सर्व भक्तांवर अपरिमित प्रेम करतात , त्या प्रेमाच्या वर्षावात आपले जीवन व्यतीत व्हावे ह्यासाठी आपणही खरे खुरे भक्त होण्याची धडपड करत राहिले पाहिजे .

प्रेमाला व्याख्या नाही त्या भावना सापेक्ष आहे , ते फक्त व्यक्तीवरच असेल असे नाही .कुणाचे एखाद्या कलेवर प्रेम असते तर कुणाचे संगीतावर , खाद्यपदार्थांवर , एखाद्या वस्तूवर , झाडांवर , आपल्या मुलांवर आणि अर्थात आपल्या भगवंतावर , इष्ट देवतेवर . 

प्रेम करताना ते खरेच प्रेम आहे कि क्षणिक आकर्षण ह्याचा विचार केलात तर पुढचा अनर्थ टळेल कारण म्हंटले आहेच  आहे प्रेमा तुझा रंग कसा ? चुकीच्या व्यक्तीवर केलेले प्रेम ( प्रेम कुठले , क्षणिक आकर्षण ते ) आयुष्य रंगहीन करेल ,सहमत ? 

आज चंद्राचेच श्रवण नक्षत्र आहे. कुठे थांबायचे ते न समजणे आणि एखाद्या गोष्टीत वाहवत जाणे हे बिघडलेल्या चंद्राचे आणि कमकुवत लग्न भावाचे , लग्नेशाचे लक्षण आहे. चंद्र पराकोटीचा बिघडला असेल तर कुठलीही उपासना सुद्धा फलित होत नाही . पत्रिकेतील पंचम भाव शुद्ध असावा. 


श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230






 






No comments:

Post a Comment