Sunday, 29 March 2020

आनंदाचे सॅशे (Sachet)...

||श्री स्वामी समर्थ ||





काळ जसा बदलत गेला तसे जीवन गतिमान होत गेले आणि रोजच्या जीवनातील गरजा वाढतच गेल्या. आधुनिकीकरण झाले आणि नवनवीन गोष्टी प्रचलित होवू लागल्या. मध्यंतरी दुकानात खरेदीसाठी गेले असता तेथील एका कोपर्याने लक्ष वेधून घेतले . तिथे प्रत्येक मोठ्या वस्तुसोबत त्याच वस्तूचे लहान पाकीट ज्याला आपण सॅशे म्हणतो ते होते . म्हणजे मोठी खोबरेल तेलाची बाटली त्याच्या शेजारी लहान खोबरेल तेलाचे सॅशे, मोठा सर्फ चा पुडा त्याच्याशेजारी लहानसे सर्फचे सॅशे. असे प्रत्येक गोष्टीसाठी एकेक सॅशे होते. 

खरय आजकाल एकत्र कुटुंब इतिहास जमा झाली आहेत त्यामुळे काही घरातून खूप समान भरण्याची प्रथा आता मोडीत निघाली आहे . शिवाय आजकाल हाकेच्या अंतरावर सर्व गोष्टी लगेच उपलब्ध होतात. तसेच कधीकधी लहानसहान प्रवासासाठी साबण, टूथपेस्ट,पावडर, खोबरेल तेल ह्या वस्तूंचे सॅशे सामानात सहज सामावले जातात आणि न्यायला सोपे पडतात. आजकाल कुठलीही वस्तू घ्या त्याचे सॅशे मिळतातच .

तिथून निघाले पण हे सॅशे प्रकरण मनात रुंजी घालत होते. घरी येवून चहाचा घोट घेताना लक्ष्यात आले अरेच्च्या ..हे सॅशे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. नकळत मी ह्याची तुलना आपल्या दैनंदिन आयुष्यातील आनंदाशी केली . आपल्या आयुष्यात पावलोपावली हे “ आनंदाचे सॅशे ” आपल्याला भेटतात . दिसायला लहान असले तरी आनंदाचा मोठ्ठा ठेवा असतो त्यात.

मंडळी हे “ आनंदाचे सॅशे ” अगदी सतत आपल्याला भेटत राहतात पण आपल्याला त्यातील आनंद लुटताच येत नाही .लहान सहान गोष्टी जसे अनेक वर्षांनी आपला खास मित्र किंवा मैत्रीण रस्त्यात किंवा घरी अचानक भेटायला येते आणि मग चहाच्या घोटासोबत आपण कित्येक वर्ष मागे जातो. 

आपल्यासहचारिणी सोबत एखादा छानसा सिनेमा पाहून घालवलेले चार सुखद क्षण, परदेशातून आपल्या मुलांचा अत्यंत काळजीपोटी आलेला फोन , मुलांना शाळा कॉलेज मध्ये मिळालेली बक्षिसे,सगळ्यात पहिल्यांदा आपण आजी आजोबा होतो तो क्षण.

आता तुम्ही गमतीने म्हणाल ,अग अस्मिता हि जेव्हा माहेरी चार दिवस जाते ते दिवस आमच्यासाठी खरे आनंदाचे सॅशे असतात. हो हो खरय तेही असतात. थोडक्यात असे सुखद क्षण जे आपल्या अंतर्मनात ओतप्रोत आनंद भरतील ते सर्व क्षण म्हणजेच आपले आनंदाचे छोटे छोटे सॅशेच असतात. आपल्याला हवे असलेले तिकिटाचे बुकिंग तात्काळ मध्ये होणे, एखादा वेगळा पदार्थ सहज उत्तम होणे, न मागता आले घातलेला वाफाळलेला चहाचा कप हातात येणे, खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस अलगद ओंजळीत घेणे ,बाहेरून येताना उशीर झाला तरी आपल्या आवडत्या सीरिअल च्या आधी घरात पोहोचणे , आजूबाजूच्या विभागातील लाईट जाणे पण आपले असणे, बस किंवा ट्रेन मध्ये खिडकीजवळ बसायला मिळणे .मनासारखी साग्रसंगीत पूजा होणे, देवदर्शन होणे , सणांच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र हसतखेळत केलेले  सहभोजन. 

मुलांना नोकरी लागली कि त्यांनी पहिला पगार वडिलांच्या हातावर ठेवून आशीर्वाद घेणे (अर्थात आता हे फारच दुर्मिळ झाले आहे ) .आपल्या म्हातारपणी मुलाने काहीही न बोलता फक्त डोळ्यातूनच (आई बाबा मी आहे )दिलेला दिलासा . हिला न सांगता surprise म्हणून आणलेली साडी तिला प्रचंड आवडणे आणि मग तिच्या केसात माळलेला तो गजरा .एक न दोन असंख्य आनंदाचे हे सॅशे आपल्याला जगवत असतात, कित्येक दुक्खाच्या किंवा एकाकी क्षणी ह्यातील एखादा क्षण जरी आठवला तरी चेहऱ्यावरील उदासीनता , मरगळ निघून जाते . तुम्ही आम्ही सर्वच हे अनुभवत असतो ...

तर मंडळी, हे सर्व लिहित असताना माझ्याही मनात माझ्या आयुष्यातील अनेक अनेक आनंदाचे सॅशे रुंजी घालू लागले आणि डोळे पाणावले...मला मुलगा झाला आणि सर्वप्रथम मी त्याला हृदयाशी धरले ,लुकलुकत्या डोळ्यांनी त्याने मला आणि मी त्याला पाहिले तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण कारण त्या क्षणी त्याने मला “ आई ” केले होते. हे सर्व आनंदाचे सॅशे हृदयाशी कवटाळूनच माझा पुढील प्रवास मी करणार आहे ....

तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातील पावलापावलावर विखुरलेले आनंदाचे सॅशे ओंजळीत साठवून ठेवा कारण हेच आपली आयुष्याची संध्याकाळ सुखद ,आनंदी करणार आहेत.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .

Antarnad18@gmail.com




Saturday, 28 March 2020

हत्या,वैर आणि ऋण चुके न कोणा...

|| श्री स्वामी समर्थ ||


श्री गजानन भक्त भास्कर पाटील ह्यास त्रिवार वंदन


श्री दासगणू महाराजांनी लिहिलेला रसाळ ग्रंथ “ श्री गजानन विजय “ म्हणजे अमृतकुंभ आहे . त्यातली प्रत्येक ओवी प्रत्येक शब्द आपल्या जीवनाशी समरसून गेलेला आहे किबहुना जीवन कसे जगावे हेच महाराजानी त्यातूनभक्तांना शिकवले आहे .

ह्यातील प्रत्येक ओवीवर विचारमंथन व्हावे इतका खोलवर अर्थ त्यात दडलेला आहे. आपण पारायण करतो पण प्रत्येक वेळी त्यातून नवीन काहीतरी उलगडते आपल्या समोर इतके विविध पेहलु आहेत ह्या ग्रंथास. नुसतेच विचारमंथन नाही तर ते प्रत्यक्ष जीवनात आपल्याला उतरवायचे आहे ,जे कर्मकठीण आहे .

“ श्री गजानन विजय ” ह्या ग्रंथातील ११ व्या अध्यायातील “ हत्या , वैर आणि ऋण चुके न कोणा ” हि ओवी बघा. किती खोलवर अर्थ आहे ह्या ३ शब्दात ..आपले संपूर्ण जीवन ह्या ३ शब्दातच बंदिस्त केले आहे जणू.

महाराजांचा निस्सीम भक्त भास्कर पाटील कुत्र्याचे दुध प्यायला गेला आणि मग कुत्रे चावल्यावर त्यातच त्याचा अंत झाला. प्रत्यक्ष महाराजांनीही त्याला सांगितले कि कुत्रे हे निम्मित्त झाले पण मुळातच तुझा जीवन प्रवास आता संपला आहे त्यामुळे मी तुला अभय देवून काय साध्य होणार कारण हा जन्ममृत्यूचा खेळ असाच चालू राहणार.
आपल्या आयुष्यात आपल्या हातून कळतनकळत अनेक चुका , पापे हि घडतच असतात. कितीही अमान्य केली तरी आपल्या अंतर्मनात आपण त्याची ग्वाही स्वतःलाच देत असतो .आपल्या पायाखाली चालताना असंख्य किडा मुंगी मारले जात असतात. हत्यां म्हणजे उठून प्रत्येक वेळी कुणालातरी मारणे हा अर्थ अभिप्रेत नाही इथे तर कळतनकळत होणारे गुन्हे हा आहे. घरात येणार अनेक प्राणी आपण मारतोच कि. आपल्या पूर्व प्रारब्ध प्रमाणे आपला हा जन्म त्यामुळे काही अगदी अक्षम्य गुन्हेही घडतात आपल्या हातून . काही वेळा प्रत्यक्ष माणसाची हत्याही होते मग त्यामागे असंख्य कारणेही असतील पण तसे होते ह्यात दुमत नाही.

संपूर्ण जीवनात आपले कुणाशीच वैर नाही असे होत नसते . सगळ्यांनाच आपण आवडतो असेही नाही आणि सगळे आपल्या आवडतील असा नियम नाही . तुम्ही कितीही आंजरा गोंजारा कुणीना कुणी आपला वैरी असतोच. पूर्व जन्मात आपण त्याचे काहीतरी वाईट केले असावे म्हणून मग ह्या जन्मी आपला नातेवाईक , शेजारी , मित्र , सोबती , नोकरीच्या ठिकाणी आपला सहकारी अश्या कुठल्यातरी रुपात येवून तो आपल्याला त्रास देणारच ,आपल्याशी वैर करणारच . काही नात्यात तर अगदी हाडवैर असते कि एकमेकांची तोंडेही पाहत नाहीत .त्याला वडिलोपार्जित संपत्ती, धनदौलत , इर्षा  अशी अनेक कारणे असू शकतात. कधीकधी हे वैर प्राणावर पण बेतते . कित्येक कुटुंबात तर पिढ्यानपिढ्याचे वैर असते जमिनीची मालकी ,संपत्ती, भाऊबंदकी अनेक करणे असतात . आपण ऐकतो ना भावाने भावाचाच खून केला त्यापैकीच आहे हे. कलियुगात लहानसहान गोष्टी सुद्धा वैर करण्यास कारणीभूत होतात. म्हणून आपले एखाद्याशी पटत नसेल तर चार हात दूर राहावे हे उत्तम.

अगदी जन्मल्या पासून आपण ऋणात असतो. मातेने जन्म दिला म्हणून पुढे मात्यापित्यानी संगोपन केले ,संस्कार केले आणि पायावर उभे केले ..हे आईवडिलांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. मोठे झालो कि सहजपणे आपल्या विश्वात गुंततो ,आकाशात उंच भरारी घेतली कि आई वडिलांना उद्धटपणे बोलतो (सगळेच नाही काही अपवाद निश्चित आहेत )त्यांचा म्हातारपणी सांभाळ करणे सुद्धा आपल्याला जड जाते...लहानपणी आपल्या आजारपणात आईने रात्ररात्र आपल्या उशाशी बसून जागरणे केली , आपल्या शिक्षणासाठी आयुष्यातील आनंद बाजूला ठेवून प्रसंगी आपल्या शिक्षणासाठी कर्ज घेतलेल्या आपल्या वडिलांचा आपल्याला सोयीनुसार विसर पडतो . अशी कित्येक उदाहरणे देता येतील पण लेखाची व्याप्ती वाढेल. असो तर सांगायचे असे कि प्रत्येक ओवी आणि प्रत्येक शब्द हा असाच नाही लिहिलाय तिथे ..

आपल्या जीवनाचे सार दडले आहे त्या प्रत्येक शब्दात. आपल्याला जितक्या लवकर त्याचे अवलोकन होयील तितके उर्वरित आयुष्य सुखात व्यतीत होईल.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा 


Antarnaad18@gmail.com



Wednesday, 25 March 2020

आत्मपरीक्षण

|| श्री स्वामी समर्थ ||







आज स्वामी समर्थ प्रगटदिन. आज बाहेरील स्थिती पाहता घरीच बसून मानसपूजा ,पोथी वाचन ,तारक मंत्र जे जसे जमेल तसे करुया. सर्व काही मान्य होणार आहे शंकाच नाही ,त्यांना आपला भाव समजतो. दर वर्षी स्वामी जयंती ,पुण्यतिथी घर नुसते फुलांनी भरलेले असते पण आज माझ्या देवाला चाफा नाही..त्यांचीच इच्छा. महाराजानी स्वतःला मठात आणि आपल्याला घरात बंदिस्त करून ठेवलेय . आता हा मिळालेला वेळ आपल्या स्वतःसाठी ,आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी योग्य ठरेल...कधी तरी सिंहावलोकन म्हणजेच Introspection करणे आवश्यक असते.

प्रत्येक भक्त हा आपल्या परीने गुरुसेवा करत असतो.. शेवटी भाव महत्वाचा. आजूबाजूला जे काही बघायला मिळत आहे ते आज आवर्जून लिहावेसे वाटते म्हणून हा लेखन प्रपंच. अध्यात्मात shortcut नाही आणि अनुकरण तर अजिबातच नाही. आपल्या अंतस्फूर्तीने जे वाटते ते करावे इतकच. पण हॉटेल मध्ये दुसर्याच्या टेबलावर काय खायला आलय तिथे आपले लक्ष असते आणि मग ते पाहून आपणही हे का नाही मागवले ? हा प्रश्न पडतो ..अगदी तसेच दुसर काय करतो तिथे आपले लक्ष अधिक . दुसरा पोथी वाचतो मग आपणही वाचलीच पाहिजे असे काही नसते. तुमचे मन नामस्मरण करण्यात रमत असेल तर ते करा ,बिघडले कुठे. आपल्याला जी गोष्ट निर्मळ सेवेचा आनंद देते महाराजांच्या अधिक जवळ नेते ती करावी त्यासाठी कुणाला काहीही विचारात बसू नये.
नामस्मरण कसे, कुठे ,कधी आणि कितीवेळ करावे ? कुठली माळ जपास घ्यावी ? आसन कुठले घ्यावे ? अंघोळ करावी कि तसेच करावे ? एकाच जागी बसून करावे कि जागा बदलली तर चालेल ? प्रश्नांची नुसती सरबत्ती असते. ह्या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर श्वासागणिक जप करावा जोवर आपला श्वास चालू आहे तोवर नाम घेत राहावे तेही जीव ओतून. पण आपण काय करतो ? जप करतो पण त्यात भाव नसतो . जप करत असताना सुनबाईना “ अग आमटीत मीठ घातले का ग ? ”हे विचारतो , दारात कोण आले ? कुणाचे कुरियर आले ह्याकडे आपले लक्ष असते ..मग आता तुम्हीच सांगा जपात किती लक्ष असते आपले ? नुसते शरीराने जपास बसतो आपण पण आपला आत्मा ? तो कुठे असतो ? आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणार तरी कसे ?पटतंय का? नाम घेताना फक्त नाम दुसर्या कशाचे भानही नाही राहिले पाहिजे आपल्याला .सर्वातून मन हळूहळू बाजूला नेण्याचा मनापासून प्रयत्न करून नामस्मरणात संपूर्ण लक्ष केंद्रित केले तर चित्त शुद्ध आणि एकाग्र होते ..गुरूबद्दल विश्वास वाढतो आणि जसजशी साधनेची बैठक बसते तसतसे मन शांत होत जाते , अनुभूती येवू लागतात आणि मग आपण स्वामीमय कधी होतो आपले आपल्याला समजत नाही .

स्वामिसेवा किंवा गुरुसेवा म्हणूया म्हणजे नक्की काय हा प्रश्नही अनेकवेळा विचारला जातो . सध्या सोप्प्या शब्दात सांगायचे म्हणजे स्वामिसेवा म्हणजे त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालणे, प्रपंच करून परमार्थ करणे. खुलभर दुधाची गोष्ट माहितच आहे सर्वाना . जप किती झाला ते मोजण्यापेक्षा तो कसा झाला ,त्याने आपल्याला किती समाधान दिले हे महत्वाचे. गुरुसेवा अनेक प्रकारे केली जाते जसे नाम घेवून , पूजा, मानसपूजा, प्रदक्षिणा पण जे करावे ते सच्चेपणाने,त्यात कुठलाही दांभिकपणा नसावा. महाराजांनी सांगितलेच आहे भक्तांना “ माझा फोटो ठेवून बाजार मांडू नकोस ”.

स्वामी माझा मी स्वामींचा

 कुठलीही गोष्ट हि दिखाव्यासाठी नको ती आत्मिक समाधानासाठी झाली पाहिजे. देवाला चांदीच्या मोठ्या समया ,निरांजने, ताम्हान आणि असे बरेच काही पण पूजा करताना मनात सात्विक विचार नसतील गुरुचरणी भाव नसेल तार ह्या श्रीमंतीचाही काहीही उपयोग नाही कारण त्यांना आपला भाव हवाय . भौतिक सुखाच्या लालसेने केलेली गुरुसेवा फोल ठरते. त्यांनीच आपल्याला घडवल आहे त्यामुळे त्यांच्यापेक्षा आपल्याला अधिक जास्ती कोण ओळखणार ?

स्वामी कुठल्या परग्रहावर नाही राहत ते इथेच आहेत तुमच्या माझ्यात आणि त्यांचे बारीक लक्ष आहे आपल्या प्रत्येक भक्तावर , आपल्या प्रत्येक कृतीवर ह्याचा क्षणभरही विसर आपल्याला पडला नाही पाहिजे.
म्हणूनच रोज सकाळी उठल्यावर अंतकरणाने स्वमिनाम घ्यावे आणि झोपतानाही. दिवसभरातील आपले आचरण शुद्ध ,सात्विक असायला हवे. आपल्या असंख्य गोष्टीना रोज स्वामी माफ करत असतात अगदी तसेच आपले मनही मोठे करून इतरांच्या चुका त्यांना दाखवून वेळप्रसंगी पोटात घालता यायला हव्यात. हे सर्व सोप्पे नाही कारण कितीही भक्ती केली तरी आम्ही आरे ला कारे करणारच ...अरे वा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे तो. म्हणूनच रोज आत्मपरीक्षणाची सवय मनास लावून घ्यावी . आपले कुठे चुकतेय ते पाहिले आणि उमजले तर सर्वच सोपे होवून जायील. वय वाढते तसे क्षमाशील वृत्तीही वाढली पाहिजे. पण कधीकधी वयातीत माणसेही हि अत्यंत दुखावणार्या स्वरात इतरांशी बोलतात ,त्यांच्या चुकांवर बोट ठेवून त्यांना दुखावतात. विचार करा उद्या स्वामिनी आपल्या चुकांसाठी हातात त्यांचा सोटा घेतला तर आपली काय अवस्था होईल. विचारानेच गाळण उडेल आपली.

हम गया नहि जिंदा है

म्हणूनच पुन्हा पुन्हा आत्मपरीक्षण गरजेचे आहे . दुसर्याने केलेली मदत विसरून जाणे आणि कामापुरती माणसे वापरणे हा आजकाल मनुष्यस्वभाव होत चालला आहे. सर्वत्र तेच आहे. समोरच्याने आपल्यासाठी काय केले आहे ह्याचा विसर ज्या क्षणी आपल्याला पडतो त्यावेळी समजावे आपली साधना निष्फळ आहे. आपल्याला आपलेच गुरु किती समजले आहेत हा ज्याचा त्यानेच अभ्यास केलेला बरा आहे. आपण सामान्य जीवन जगतो ,देविदेवता नाही त्यामुळे षडरिपू असणारच , त्यांची साथ अखेरपर्यंत पण आपली सेवा ,साधना भक्कम आणि भावनेने ओथंबलेली असेल तर ह्यातून परावृत्त नक्कीच होवू शकतो अर्थात त्यासाठी तितक्याच ताकदीचा मानस ,दृढ निश्चय असायला हवा.
आजकाल चार लोक एकत्र आली कि so call gossip सुरु होते. आपल्याला हेही समजत नाही कि तिथून आपण गेल्यावर आपल्याही बद्दल असलेले लोक हेच बोलणार आहेत. अगदी सहजपणे कुठलाही सारासार विचार न करता इतरांच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवतो. कुणाला पाण्यात पाहून ,त्याचा तिरस्कार , मत्सर करून आपण आपलीच पापे वाढवून घेतो .आपली प्रगती तर होत नाहीच उलट ह्या सर्वामुळे आपले अधपतन होते. आयुष्यातला किती वेळ अजून वाया घालवणार आहोत आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये ? ह्या सर्वामुळे कुणाचे कुटुंब विनाकारण उध्वस्त होवू शकते पण त्याहीपेक्षा जास्ती भविष्यात आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुक्खाच्या होळीला सामोरे जावे लागते. ह्या सर्वाला आपणच जबाबदार असतो त्यामुळे “ आधी विचार मग उच्चार ” हे जास्ती संयुक्तिक ठरेल .

मी आणि माझे स्वामी म्हणजे ..जसे दुग्ध शर्करा .इतके समरसून गेलो पाहिजे त्यांच्यात , तरच ह्या सर्व अनाठायी असणार्या गोष्टींतून बाहेर येवू . रोजची साधना वाढवली पाहिजे , श्वासागणिक नामस्मरण झाले पाहिजे ,गुरुतत्व काय ते समजून घेतले पाहिजे आणि आपण गुरु नेमके का केले ह्याचेही आत्मपरीक्षण करता आले पाहिजे.
उपास, व्रतवैकल्ये , पूजापाठ , पारायणे ह्यांचा स्वामींवर पाऊस पडूनही आपल्यातील ठासून भरलेला अगदी पराकोटीचा अहंकार जात नाही . आपणच काय ते विद्वान आणि बाकीचे सर्व मूर्ख , आपल्याला कुणी सांगणारा राहिला नाही अश्याच अविर्भावात आपले वागणे बोलणे असते. प्रत्येक मनुष्यात देव आहे आणि त्याचा आदर ,योग्य तो सन्मान करता आला पाहिजे. कितीही अध्यात्म केले तरी आपल्या घरातील ,कुटुंबातील लोकांशी आपले आचरण कसे असते ह्याचा खोलवर विचार करा . आपल्याच माणसांची मने वाचता येतात का आपल्याला ? त्यांची मने .भावना समजून घेता येतात का आपल्याला ? तर नाही मग स्वामींच्या समोर ४ टिपे गाळून ते आपल्याला खरच समजून घेतील अशी अपेक्षा तरी कशी ठेवू शकतो आपण ? म्हणूनच म्हंटले ह्या सर्वाचे सिंहावलोकन करणे आज क्रमप्राप्त आहे. आपला आपल्या जिभेवर, वाचेवर, भावनांवर काश्यावरच ताबा नाही हे सत्य आहे . त्याची परिणीती म्हणून मागे लागतात कित्येक आजारपणे आणि बोलण्याने ओढवून घेतलेली संकटे .

श्री स्वामी समर्थ 

आपल्या शरीरात “ जिव्हा ” हा असा एकाच अवयव आहे ज्यावर ताबा मिळवता आला तर ९९% प्रश्न सुटू शकतात. रोजच्या जीवनात अनेकांना अनेक समस्या , वैफल्य आहे पण गुरुसेवा करणे हा त्यावर जालीम उपाय आहे हे माझे वैयक्तिक मत आहे. शेवटी काही आपले भोगही आहेत आणि तेही भोगूनच संपवायचे आहे . जन्ममृत्यूच्या फेर्यात महाराज कधीच दखल देत नाहीत पण ते आपल्याला आत्मिक बळ नक्कीच प्रदान करतात.
स्वामींचे अस्तित्व आहे आणि त्याचे भान ठेवले तर आपल्याकडून योग्यच आचरण होईल ह्यात दुमत नसावे. स्वामी जयंती ,पुण्यतिथी , आठवड्यातील गुरुवार ह्या आणि इतर दिवशी आपण केलेली सर्व सेवा ,प्रार्थना ,तोडकीमोडकी पूजा त्यांच्यापर्यंत निश्चित जातेच हा माझा विश्वास आहे पण हि करत असताना दुसर्या बाजूने इतरांचा केलेला पाणउतारा , लोकनिंदा , असभ्य वर्तन ह्यामुळे आपल्या साधनेत अनेक अडथळे येतात आणि मग त्याचे अपेक्षित फळ मिळणे दूरच आपल्या भोवती ह्या सर्व दुष्कृत्यांचा नकारात्मक ओरा(वलय) तयार होतो आणि तो आपल्या विनाशाला कारणीभूत ठरतो .आपले जीवन त्यात होरपळून निघते . कालांतरानी आपण ह्या गर्तेत इतके ओढले जातो कि त्यातून बाहेर येण्याचा मार्गही दिसेनासा होतो. वैफल्य ,व्यसने ह्या गोष्टींमुळे जीवन अधिकाधिक दुखी होत जाते ,आशा धूसर होत जातात. म्हणूनच वेळीच सावध होवून आपण कुठल्या संगतीत आहोत , आपली रोजची दिनचर्या काय आहे , आपण कुणाची निंदानालस्ती करत नाही ना, ह्या सर्व गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे म्हणजे पुढील आयुष्य सुखासमाधानात , गुरुसेवेत जाईल.

आजन्म आपण महाराजांकडे काहीना काही मागतच असतो, पण ते आपल्याकडे काहीच मागत नाहीत. त्यांना हवा असतो फक्त खरा भाव ,अंतकर्णातून त्यांना हाक मारली आणि ते हाकेला धावून आले नाहीत असे होणे नाही.  . म्हणूनच आजच्या दिवशी आपण आपल्या सद्गुरुना गुरुदक्षिणा देवूया ..आपले वर्तन शुद्ध , सात्विक ठेवूया. परनिंदा न करण्याचे , शब्दाने कुणालाही न दुखावण्याचे आणि जास्तीतजास्त सेवा करण्यास वचनबद्ध होऊया. तरच खर्या अर्थाने आपले जीवन कृतार्थ होईल.कायम दुसर्यांच्या चुका काढणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वाना आज गरज आहे ती “ आत्मपरीक्षणाची ”. जगासमोर आपण कसेही वागू पण आपल्या सद्गुरुना मात्र आपला खरा चेहरा माहित असतो. त्यांच्यासमोर खोटे चालत नाही,एक सच्चा भक्तच त्यांच्या कसोटीवर खरा उतरू शकतो.ह्या सर्व अनाकलनीय शक्ती आहेत आणि त्या आपल्या आकलनाच्याही बाहेर आहेत .आपण फक्त त्यांच्यासमोर नतमस्तक होवू शकतो.

आज स्वतःशीच वचनबध्द होऊया आणि महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर मार्गस्थ होऊया. 

|| श्री स्वामी समर्थ || 

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा 

antarnad18@gmail.com




भटकंतीचे वेड जीवा लागले

|| श्री स्वामी समर्थ ||


वीणाताई सोबत




“गणपती बाप्पा मोरया ,मंगलमूर्ती मोरया...उंदीर मामा कि जय .” अशी श्री गणेशाला मानवंदना देवून , आपल्या प्रत्येक टूरचा श्रीगणेशा करणारा वीणा वर्ल्ड चा सक्षम टूर लीडर “ हितेश सोनावणे ह्याचा “ व्यक्ती विशेष ”मध्ये परिचय करून घेवूया आणि त्याच्या टुरिझम मधील प्रवासाबद्दलहि जाणून घेवूया.

मास मिडीया मधील पदवीधर असलेल्या हितेशने आपल्या करियर ची सुरवात स्वतःच्याच जाहिरात कंपनीत सुरु झाली होती. पण काही कौटुंबिक समस्यांमुळे त्याला त्यातून बाहेर पडावे लागले .टुरिझम ची गोडी कशी लागली हे सांगताना हितेशने फार पूर्वीचा एक किस्सा सांगितला . ठाण्यात सरकारी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यास त्यावेळचे राष्ट्रपती माननीय श्री.शंकरदयाळजी शर्मा येणार होते आणि ते हेलिकॉप्टर मधून येणार ते पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती . खूप वेळ झाला पण हेलिकॉप्टर आलेच नाही शेवटी त्याचे बाबा त्याला शोधत कार्यक्रमाच्या ठिकाणी आले पण हेलिकॉप्टर पाहिल्याशिवाय मी येणार नाही असे हितेशने ठामपणे सांगितले . शेवटी बाबांनी दिलेल्या १० रुपयावर २-३ वडापाव (तेव्हा मिळत असत ) खावून शेवटी हेलिकॉप्टर डोळे भरून पाहूनच स्वारी घरी परतली.

हितेश आज त्याच्या टुरिझम मधील करियरच्या खूप उंचीवर आहे . सगळ्या प्रकारची विमाने, हेलिकॉप्टर ,जहाजे , इतरही अनेक वाहनातून प्रवास झाला आहे पण हि लहानशी आठवण उरी अजून तशीच ताजी आहे . कदाचित हीच त्याच्या टुरिझम मधील प्रवासाची प्रेरणा असेल.

टूर लीडर हे काम अगदी round d clock करावे लागते. बरेचदा रात्रीचाच विमानप्रवास असल्याने झोपेचे खोबरे हि नित्याचीच बाब असते . प्रत्येक ठिकाणचा वातावरणातील बदल आणि वेळी अवेळी मिळणारी झोप ह्या सर्वातहि ताजेतवाने राहायचे असेल तर स्वतःची तब्येतही सांभाळावी लागतेच आणि ह्यासाठी नित्याचा व्यायाम ,चालणे ह्याला पर्याय नाही . आपल्या ४-५ मित्रांच्या ग्रुप सोबत सकाळचा व्यायाम हा त्याचा दिनक्रम आहे. त्याच बरोबर आपला आहार सांभाळणे ,सकाळचा नाश्ता , तसेच वेळोवेळी समोर येणारे पदार्थ प्रमाणात खाणे हे हळूहळू त्याच्या सवयीचे होवू लागले. जेव्हा टूर नसेल तेव्हा सकाळी ५ वाजता उठून नियमित चालायला जाणे हे आवर्जून मी करतोच, हे सांगताना हितेश म्हणाला कि माझ्या ह्या नियमित चालण्यामुळे मला एकप्रकारची उर्जा मिळते ,माझा आत्मविश्वास तर वाढतोच पण उत्साह येतो ,कामाचा ताण जाणवत नाही. मी कधीही जिम मध्ये जात नाही ,निसर्गाच्या वातावरणात चालणे हे मी अधिक पसंत करतो.

टुरिझम बद्दल बोलताना तो म्हणाला ,इतके सर्व देश फिरल्यावर  एक गोष्ट लक्ष्यात आली आहे कि आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत पण आपण त्या लोकांना दाखवत नाही .

टुरिझम हे २४ तास कार्यरत ठेवणारे क्षेत्र आणि त्यात यशस्वी दीर्घकालीन करिअर करायची असेल तर शारीरिक आणि मानसिक फिटनेस तितकाच आवश्यक आहे. त्याकडे कसे लक्ष्य देतोस हा माझा अर्थातच महत्वाचा प्रश्न होता.त्यावर त्याने सांगितले कि २१ जून हा “ योगा दिवस “ म्हणून जाहीर झाला तेव्हा आपणही ह्यात भाग घ्यायचा हे ठरवले. चैत्र गुढी पाडवा ते दिवाळीचा पाडवा हा काळ उत्तम असल्याने ह्यात जास्तीतजास्त वेळ व्यायामासाठी देण्याचा प्रयत्न करतो  . रोज नित्य नेमाने सूर्य नमस्कार घालणे हितेशने कटाक्षाने पाळले आणि आज तो रोज १०८ सूर्यनमस्कार घालतो. सूर्यनमस्कार हा एक सर्वांगीण व्यायाम असून प्रत्येकाने निदान ५ तरी सूर्य नमस्कार रोज घातलेच पाहिजेत आणि हळूहळू त्यात वाढ केली पाहिजे असे त्याने आवाहनाच केले आहे .

शारीरिक फिटनेस साठी मी वेगवेगळे पर्याय ठेवतो म्हणजे त्यात तोचतोच पणा न येता नाविन्य येते. सव्वा तासात १२ किलोमीटर चालणे तसेच कधी ५-६ किलोमीटर चालणे , ४-५ किलोमीटर धावणे अश्याप्रकारे विविधता आणून त्यातील गोडी कायम टिकवली आहे .कधी कधी आपल्या घराच्या इमारतीचे जिने ४-५ वेळा चढणे उतरणे हा सुद्धा साधा सोप्पा व्यायाम आहे. अश्याने व्यायामाचा कंटाळा न येता त्यातील गोडी वाढत जाते तसेच आपल्या शरीराला नक्की काय मानवते आहे ह्याचा आपणच अभ्यास करू शकतो . इतके करताना अजून काही जड व्यायामप्रकार करायची खरतर गरजच उरत नाही. टूर वर असताना अर्थातच असे २ तास व्यायामासाठी देता येणे शक्य नसते पण त्यावेळी तिथे दिवसरात्र होणारी धावपळ सुद्धा पुरेसा व्यायाम देते असे म्हंटले तर वावगे ठरू नये. गेल्या काही दिवसांपासून हितेश  १५ दिवसातून एक दिवस उपवास करून शरीराला ,पचनसंस्थेला थोडी विश्रांती देत आहे. भारतात आयुर्वेदाची पाळेमुळे खूप पूर्वापार खोलवर रुजली आहेत आणि त्याचा अभ्यास केला असता प्रकृतीसाठी लंघन म्हणजेच उपवास सर्वोत्तम असल्याचीच ग्वाही मिळते .

कुटुंबाचा पाठींबा असल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात तुम्ही उंच भरारी घेवूच शकत नाही. टूर लीडर ची करियर म्हणजे सतत वळकटी बांधून तयार आज इथे तर उद्या तिथे. देशोविदेशी प्रवास . ह्या सर्वासाठी घरच्यांनी कधी विरोध केला नाही का ह्यावर त्याने पूर्वीचा किस्सा सांगितला. सुरवातीला मी महाराष्ट्राबाहेर जाणार म्हणूनही खूप विरोध झाला ,जायचेच नाही ह्यावर सर्व ठाम होते . कामाच्या ठिकाणी सुरवातीला ५००० रुपये diposite भरायचे होते ,तेही मयुरेश राऊत ह्या मित्राने दिले. पण आजमात्र तसे नाही. आज माझ्या कुटुंबाचा नुसताच पाठींबा नाही तर त्यांना माझ्या कामाचा अभिमान सुद्धा आहे.आपल्या करियर बद्दल बोलताना हितेश म्हणाला कि मी करत असलेल्या कामाचा मला अभिमान आहे. माणसाने काम करावे पण त्यात आपला जीव ओतावा तरच ते सर्वांगसुंदर होते. कुठलेही यश असेच मिळत नाही त्यामागे परिश्रम , संयम आणि कष्ट लागतात . हे सर्व करणे म्हणजे एक प्रकारची साधनाच आहे आणि तीच तुम्हाला यशाची दालने खुली करून देते . अनेक देश पादाक्रांत केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि कुठलाही देश पाहताना तेथील लोकांशी संवाद साधायला चेहऱ्यावरील भाव सुद्धा पुरेसे काम करतात त्यासाठी तेथील बोलीभाषा आलीच पाहिजे हे बंधन नाही. समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीतून ,केलेल्या हावभावातून सुद्धा एकमेकांशी संवाद साधता येतो आणि तोही उत्तम .शालेय जीवनापासून अनेक संस्थांशी कार्यरत असल्याने समोरच्या व्यक्तीला काय सांगायचे आहे हे जाणून घ्यायची कला अवगत झाली आणि त्याचा माझ्या भटकंतीमध्ये खूप फायदा झाला...अनेक वर्ष ह्या क्षेत्रात काम केल्यामुळे हितेशकडे अनुभवांची शिदोरी मोठी आहे.

आजकालची तरुणाई जी ह्या क्षेत्रात आपली करिअर घडवू पाहत आहे त्यांना तु काय सांगशील ह्या प्रश्नावर हितेश म्हणाला ह्यावर तर खूपच बोलण्या आणि सांगण्यासारखे आहे .टुरिझम हे एक नाविन्याने भरलेले ,ग्लामरस क्षेत्र असले तरी त्यात अनेक आव्हानेही असतात . फक्त विमानात बसून इथेतिथे फिरायला मिळेल ह्या विचाराने कुणीही ह्या क्षेत्रात येवू नये. कुठलेही क्षेत्र निवडताना त्या क्षेत्राचा आणि आपल्यातील गुणांचा ,क्षमतेचा नीट अभ्यास करावा. टुरिझम हे क्षेत्र अभ्यासपूर्ण तर आहेच पण इथे रोज काहीतरी नवीन घडत असते त्याचे Updates असणे गरजेचे आहे. रोज अनेक प्रकारची माणसे आपल्याला भेटत असतात आणि त्या सर्वांच्या स्वभावाशी मिळतेजुळते घेताना आपल्या संयमाचाही कस पणाला लागतो...वेळीअवेळी प्रवास ,जागरणे ह्या सर्व गोष्टीसाठी मनाची ,शरीराचीही तयारी असायला लागते. तसेच कुठलेही काम कमी मानू नये तसेच त्याची लाज बाळगू नये. टूर वर कधीकधी गेस्टना त्यांचे सामान काही कारणाने उचलून त्यांना मदत करावी लागते , कधी SNACKS वाटायला लागतात ,अनेक गोष्टी कधीही अचानक पुढ्यात येतात तेव्हा ह्या सर्व कामांची मानसिक तयारी असणे आवश्यक ...इथे कुठलीही चौकट नाही किबहुना मी हेच करीन ते करणार नाही हे चालत नाही. संकुचित राहून चालत नाही कारण समाजातील अनेक स्थरातून अनेक लोक टूरवर येत असतात . सर्वाना एकत्रित बरोबर घेवून जावून त्यांना तो १०-१२ दिवसाच्या टूर चा आनंद देणे हे खरे कौशल्य असते ..संपूर्ण टूरवर अचानक येणाऱ्या अनेक समस्या असू शकतात . कधी विमान उशिरा येते तर कधी हॉटेल च्या रूम मधील AC चालत नसतो आणि मग अश्यावेळी टूर लीडरवर सामान्यपणे सर्व राग निघतो. खरतर ह्या गोष्टीत त्याची काहीच चूक नसते पण त्याला हे सर्व निभावून न्यावे लागते.

मी आजवर जितक्या टूर केल्या त्यामध्ये जवळजवळ सर्वच टूर मध्ये मला गेस्ट कडून सहकार्य आणि आशीर्वादच मिळाले आहेत . तूच टूर लीडर असतानाच पुन्हा पुन्हा टूरवर यायला आवडेल असे उद्गार गेस्ट जेव्हा काढतात तेव्हा घेतलेले सर्व कष्ट एका क्षणात भरून निघतात असे हितेशने अभिमानाने सांगितले.

 “ टूर लीडर ” हे प्रोफेशन नक्कीच सोप्पे नाही त्यामुळे त्याला सर्वप्रथम मान देणे हे अपेक्षित आहे..टूर लीडर तुमचा कंपनीने १० दिवसासाठी दिलेला नोकर नाही ,त्याचेही तुमच्याचसारखे कुटुंब असते ,आणि अगदी “तुमचे आमचे सेम असते “ असेच त्याचेही कुटुंब ,भावना असतात त्यामुळे त्याचा आदर करणे इतकी कमीतकमी अपेक्षा असते.

प्रवास मग तो कुठलाही असो त्यात कुठल्याही क्षणी कुठलेही आव्हान उभे ठाकते , एखाद्या गेस्ट ची तब्येत बिघडण्यापासून ते सामान ,पासपोर्ट गहाळ होण्यापर्यंत काहीही होवू शकते. तेव्हा संपूर्ण टूरवर ठेवायला लागतो तो “ संयम ” आणि तो ठेवण्याचे कौशल्य फक्त अनुभवातूनच येते. प्रवासाला येणाऱ्या लोकांना वर्षभराच्या त्यांच्या अत्यंत व्यस्त आयुष्यातून जेमतेम १०-१५ दिवस आपल्या कुटुंबीयांसोबत घालवायला मिळतात आणि त्यासाठी ते पैसा खर्च करून टूर कंपनीसोबत येतात, अश्या वेळी संपूर्ण टूरवर कुठल्याही कटकटी असू नयेत हि त्यांचीही माफक अपेक्षा असते. ह्या १०-१५ दिवसात त्यांना आराम ,शांतात हवी असते आणि म्हणूनच संपूर्ण टूर मध्ये आपल्या गेस्टची काळजी घेवून टूर यशस्वी करणे हे टूर लीडर साठी लीलया आव्हान असते . आपण ज्या प्रदेशात टूर करत आहोत तेथील इत्यंभूत माहिती ,तेथील सामाजिक जीवन, तेथील ठिकाणांची विस्तृत भौगोलिक माहिती आणि इतर अनेक बारकावे ह्याचा अभ्यास टूर लीडरचा असणे अत्यावश्यक आहे तसेच अनेक स्वभावाच्या लोकांशी मिळतेजुळते घेताना काही गोष्टी “Let Go ” करायला लागते ह्याचाही उल्लेख त्याने केला.

घड्याळ्याच्या काट्यावर असणारे हे काम करताना शरीरसंपदा असायलाच हवी.लहानपणापासून मी सगळे खेळ खेळायचो. टूरवर अनेक खेत्रातील लोक येतात .त्यांच्याकडून योगा ,फिटनेस ,आयुष्यातील आर्थिक नियोजन कसे करावे, शेअर मार्केट बद्दल माहिती , वैद्यकीय सल्ला ,आहार नियमन, ग्रुमिंग कसे असावा अश्या अनेक गोष्टींची माहिती आणि मार्गदर्शन अगदी विनामूल्य मिळते. ह्यागोष्टींसाठी बाहेर हजारो रुपये मोजायला लागतात त्या गोष्टी मला मी गेस्ट शी ठेवलेल्या ऋणानुबंधातून सहज मिळून जातात. वयाच्या ३५ नंतर आपल्या तब्येतीची काळजी वेळ काढून घ्यायलाच पाहिजे हे हितेशने आवर्जून सांगितले. निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम केल्याने त्यात तोचतोच पणा येत नाही . मी खवय्या आहे त्यामुळे खाण्यापिण्याची आवड जोपासताना वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ टेस्ट करायला आवडतात. त्यात तोचतोचपणा न राहता नाविन्य राहते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत नाविन्य शोधात राहिले तर खर्या अर्थाने जगण्याचा आनंद लुटता येतो.

हितेश प्रत्येक गोष्टीत इतका समरसून गेला आहे कि टुरिझम आणि त्याचे आयुष्य वेगळे राहिलेच नाही आहे. कुठल्याही विषयावर अगदी मोकळेपणाने बोलणार्या ह्या वल्लीसोबत गप्पा रंगल्या.

आजवर हितेशची ५९ देश आणि ५ खंड ह्यात मनसोक्त भटकंती झाली आहे हे सांगताना Antartica हा आवडता आणि खुणावणारा प्रांत राहिला आहे...त्याचाही योग येयीलच हि इच्छा त्याने बोलून दाखवली. जगभर भ्रमंती करूनही सर्वात आवडणारा प्रांत म्हणजे “ लेह लडाख ”. तेथील प्रवासाचा आणि विधात्याने उधळलेल्या निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद  विमानप्रवासा पेक्षा Road Travel नेच जास्ती घेता येयील.

भारतापेक्षा भारताबाहेरील भ्रमंती अधिक झाल्यामुळे तेथील अनुभव जास्ती आहेत. आपली तब्येत उत्तम तर सर्व उत्तम त्यामुळे नियमित योगा मी करतोच पण त्याही पेक्षा निसर्गाच्या सानिध्यात मग ते हिमालयातील एखाद्या नदीकाठचे ठिकाण असो किंवा स्विझर्लंड मधील एखाद्या बागेतील शांत ठिकाण असो ,अगदी नरीमन पोईट चा कट्टा असो ,मला त्याठिकाणी एकटे शांतपणे काहीवेळ बसणे मनापासून आवडते. ह्या वेळात होणार्या उत्तम साधनेत माझा मीच मला नव्याने भेटत राहतो. टुरीस्ट म्हणून तुम्ही जगभर फिरा पण निदान एकदा तरी युरोप ला भेट द्या हे सांगताना हितेश म्हणाला कि युरोप आपल्याला खूप काही शिकवतो ,युरोपिअन लोकांनी  आपल्या राजमहाराजांच्या वस्तू ,तेथील अनेक वास्तू , मुझियम ,संस्कृती कशी जतन करून ठेवली आहे हे अभ्यास करण्यासारखे आहे. तसेच युरोपचे आकर्षित करणारे अप्रतिम निसर्ग सौंदर्यहि पाहण्यासारखे आहे.

नियमित योगा, धावणे, चालणे, सूर्यनमस्कार ,सायकल चालवणे ह्या सर्व गोष्टीबरोबर कधीकधी उपवास सुद्धा तो करतो. आपले वय वाढत जाते तसे शरीरही बोलत जाते त्यामुळे आपल्या कितीही बिझी असणार्या दिनक्रमातून ह्या सर्वासाठी वेळ देणे अत्यावश्यक आहेच कारण ह्या सर्वांची पाळेमुळे भारतीय संस्कृतीत वर्षानुवर्ष रुजली आहेत. दिवसभरात काहीच व्यायाम केला नाही तर मनाला रुखरुख लागते इतके ते आता तनामनात रुजले आहे.

आपण आयुष्यात जे काही करतो ते पोटासाठी...शेवटी म्हन्त्लेच आहे ना कि .आपण नाही पण आपले पोट काम करत असते ..नियमित व्यायामासोबत सकस आहार सुद्धा सांभाळावा लागतो, कारण टूर वर प्रत्येक देशात वेगवेगळे पदार्थ मिळतात आणि ते खाण्याच्या वेळाही वेगवेगळ्या असू शकतात, दिवसरात्र प्रवास असतो त्यामुळे आहार महत्वाचा . भूक लागली म्हणून समोर आलेल्या पदार्थांवर तुटून पडणे असे न होता आवश्यक ते खावे. थोडे पोट रिकामेच राहिलेले बरे आणि अनुभवातून तेही होतेच. इतर वेळी मात्र जे मनाला आनंद देईल ,रुचेल ते सर्व खावे अगदी बिनधास्त ह्या मताचा मी आहे हे फक्त जे वाढलेले असते त्याचा मनापासून आनंद घ्या आणि अन्न फुकट घालवू नका. शेवटी अन्न हे पूर्णब्रम्ह.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो माणसात राहणे पसंत करतो त्यामुळे त्यास कुठलेही उपक्रम एखाद्या ग्रुपमध्ये करताना वेगळाच आनंद मिळतो .“ WIOTIO ”  ह्या ग्रुप चा विशेष उउलेख करताना त्यांनी केलेल्या सर्व उपक्रमांचे त्यांनी मनापासून कौतुक केले . “ चाला आणि चालताना आलेले अनुभव शेअर करा ” हि संकल्पनाच मुळात अत्यंत स्तुत्य आहे . नेहा येवले ह्यांनी हि संकल्पना राबवली आणि आज इतक्या मोठ्या संखेने हा ग्रुप कार्यरत आहे ह्याचा अभिमान वाटतो.

त्याचे वीणा वर्ल्ड सोबतचे अनुभव न संपणारे आहेत...त्याला ह्या क्षेत्रात काम करताना अनेक दिग्गजांना भेटण्याचा योग आला. अमेरिकेत इशा फौंडेशन च्या “सद्गुरुना” आणि “ जगप्रख्यात खेळाडू “ सचिन तेंडूलकर ” ,“बाबासाहेब पुरंदरे ” ह्यांना भेटण्याचे विलक्षण योग आले  , ह्यासाठी मी परमेश्वराचा सदैव ऋणी राहीन. ह्या माणसांकडून शिकावे तितके थोडेच आहे. ह्या सर्वाना भेटण्याचे भाग्य मला लाभले हे सांगताना त्याचे डोळे पाणावले .

जगभरचा हा प्रवासी कुटुंबाबद्दल बोलताना विलक्षण हळवा होवून गेला. आपले बाबा टूरवर निघून जाताना आपली भेट होणार नाही म्हणून माझी ३ वर्षाची मुलगी माझ्या Bag वर झोपत असे हि आठवण सांगताना हितेश मधील बाप सद्गदित झाला.

आपल्या प्रवासातून असंख्य अनुभव घेवून व्यक्तिगत जीवनातही हितेश प्रगल्भ होत गेला हे जाणवत होते . ह्या मुलाखतीच्या अनुषंगाने गेस्ट साठी काय सांगशील ह्या माझ्या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला. टूरला कुणीही आनंदासाठीच येत असतो पण त्याचबरोबर आपण ज्या देशात प्रवास करतो तेथील नियमांचे काटेकोर पणे पालन केले तर आपली आणि आपल्या देशाचीहि शान वाढते. प्रत्येक ठिकाणी आपले नियम ,हुकुम चालत नाहीत ह्याचे भान ठेवणे गरजेचे असते,विशेष करून युरोप अमेरिकेतील नियम कडक आहेत. मुळात टूरचा आनंद मनापासून घ्या जेणेकरून परत घरी गेल्यावरही ह्या आठवणी तुम्हाला कित्येक दिवस ताज्यातवान्या ठेवतील.

हितेश सोबतच्या गप्पा न संपणाऱ्या होत्या पण कुठेतरी थांबलेच पाहिजे...आज मलाही त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले . सदैव एकाच चौकटीत न जगता , प्रवास करत राहिले पाहिजे, विधात्याने ह्या धर्तीवर असंख्य सुरेख ठिकाणांची ,निसर्गाची उधळण केली आहे ,ते सौदर्य पाहण्यास आपण वंचित राहू नये . भटकंती म्हणजे नुसते शॉपिंग आणि काही ठिकाणे पाहणे नाही तर आपण भेट देत असलेल्या देशाचा अभ्यास झाला पाहिजे.. तेथील सामाजिक आणि राजकीय जीवन, तेथील समाजव्यवस्था, रोजचे सामान्य माणसाचे जीवन, तेथील प्रश्न, अगदी तेथील लग्नसंस्था ,हवामान , राहणी, लोककला , व्यवसाय , वाहतूक ,खाद्यसंस्कृती , त्या जागेचा इतिहास आणि ऐतीहासिक ठिकाणे ह्या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास म्हणजेच “टुरिझम” . आपण जितका प्रवास करू तितके शिकत राहू आणि जीवन समृद्ध होत राहील.

हितेशला त्याच्या पुढील आयुष्यासाठी आपल्या सर्वांकडून मनापासून खूप खूप शुभेछ्या.

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .

Antarnad18.gmail.com








गुढी उभारू “ निरोगी आयुष्याची ”

|| श्री स्वामी समर्थ ||








मंडळी नमस्कार ,

भारतीय संस्कृतीत सणांची रेलचेल असते . इंग्रजी नवीन वर्ष सुरु झाले कि संक्रांत , होळी आणि मग अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे “ गुढी पाडवा “. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस अनन्यसाधारण असून अनेक कारणांनी विशेष लक्षवेधी आहे. चैत्र महिना आला कि चाहूल लागते वसंत ऋतूची. साडेतीन मुहूर्तातील हा मुहूर्त असल्याने गुढी उभारून मोठ्या उत्चाहात आणि आनंदमयी वातावरणात हा दिवस साजरा केला जातो.
प्रतिपदेला सूर्योदयानंतर गुढी उभारली जाते . बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर कडूलिंबाची, आंब्याची पाने ,फुलांची माळ , रंगीत साखरेच्या गाठ्यांची माळ बांधून त्यावर टोकाला तांब्याचे भांडे उपडे ठेवून गुढी तयार केली जाते. दारात रांगोळी काढून, फुले अक्षता वाहून , गोडधोडाचा नेवैद्य दाखवून, गुढीला ओवाळून पूजा करण्याची प्रथा आहे.
आपल्या आयुष्यातील सर्वांगीण प्रगतीचे सूचक म्हणजे हि गुढी. ह्या दिवशी आपले नवीन वर्ष सुरु होत असल्याने सर्व मंगल व्हावे आणि अधिकाधिक यश मिळून आपल्या प्रगतीचा आलेख उंचच उंच जावा ह्याचे प्रतिक म्हणून आपण गुढी उभारतो .
ह्यादिवशी सरस्वती पूजन करून पंचांगाची पूजा करावी आणि संवत्सर फलाचे वाचन करावे आणि त्यानंतर कडुलिंबाची चटणी प्राशन करावी अशी प्रथा आहे. ओवा ,हिंग , मीठ ,साखर आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून केलेली हि चटणी आरोग्यदायी असते. आपल्या आहारात गोड ,तिखट ह्यासोबत कडू रसाचाही समावेश असणे आवश्यक आहे. अनेक आयुर्वेदिक गुणांनी संपन्न असा कडुलिंब हा बहुगुणी असून तो पित्तशामक ,थंडावा देणारा , आरोग्य प्रदान करणारा आहे.
मंडळी , गुढी सूचक करते “आनंद ,सौख्य, मांगल्य आणि भरभराट”. आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळावे म्हणून गुढी उभारून त्याचे पूजन करण्याचे प्रयोजन. पण ह्या सर्वांच्याही आधी आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे ते आपले आरोग्य.
२०२० च्या अगदी प्राथमिक महिन्यापासून “ Corona Virus ” ने जगभर धुमाकूळ घातला आणि आपल्या सर्वाना सळो कि पळो करून सोडले. ह्या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आपण आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस “गुढी पाडवा ” साजरा करत असताना अनेक गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे किबहुना क्रमप्राप्त आहे. आज ह्या समस्येतून आपण नक्कीच बाहेर येवू पण अश्यासारखे प्रसंग पुन्हा भविष्यात उद्भवू नयेत म्हणून आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे ..निसर्गाचा कोप आपल्याला महागात पडू शकतो .आधुनिकीकरणाच्या नावावर आज टोलेजंग इमारती उभारताना केलेली जंगलतोड आणि प्रवाहाच्या विरुद्ध केलेल्या अश्या अनेक गोष्टीस आपणच जबाबदार आहोत ..निसर्गही आता त्याच्या तंत्राने वागत आहे आणि त्याचे जिवंत उदा. म्हणजे वेळीअवेळी पडणारा पाऊस ... आज निसर्गानेच आपल्याला “स्वच्छतेचा धडा गिरवण्यास भाग पाडले आहे. आजच्या परिस्थितीने नुसतेच आपल्या डोळ्यात अंजन घातले नाही तर त्यात  भविष्यातील घटनांची समर्पक सूचनाही आहे.  स्वच्छता पाळा ” हाच तर संदेश निसर्ग आपल्याला देत नसेल का ह्याचा विचार व्हावा.
आज दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, फक्त मी आणि माझे असा स्वार्थी विचार न करता आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांचा , आजूबाजूच्या लोकांचा , सहकार्यांचा तसेच संपूर्ण समाजाचा विचार करणे आज गरजेचे आहे आणि त्याची पहिली पायरी म्हणजे घराबाहेर न पडणे. आज सोशल मिडिया तसेच अनेक द्रुकश्राव्य माध्यमातून सतत कोरोना विषयी जनजागृती करणारे संदेश दिले जात आहेत पण अजूनही संपूर्णतः त्याला यश आलेले दिसत नाही .. हे संकट जीवावरचे आहे आणि त्याचे गांभीर्य आज समजले नाही तर उद्या आपलेच आयुष्य धोक्यात येवू शकते. आज इटली किंवा चायना मधील परिस्थिती झोप उडवणारी , अंगावर काटा आणणारी आहे. बिनधास्त राहणे आपल्याला प्रचंड महाग पडू शकते . सरकार उत्तमरीतीने परिस्थिती हाताळत आहे, जनसामान्यापर्यंत सर्व सुविधा कश्या पोहोचतील हे सर्व जातीने पाहत आहे ,माननीय मुख्यमंत्री , प्रधानमंत्री कळकळीने विनंती करत आहे तेव्हा आता नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्यात कुठेही न चुकता प्रशासनाला सहकार्य करुया .आपल्याला आवश्यक तितक्याच गोष्टींचा साठा करा कारण इतरांनाही त्याची गरज लागू शकते. आपल्याला नवीन वर्षात असाच सतत भयभीत राहायचे आहे का? नाही ना? मग आज थोडी कळ काढा, घरातून बाहेर पडू नका आणि इतरांनी तसे केल्यास त्यानाही समजावून सांगा. भविष्यातही अनेक गुढी पाडवे येतील आणि आपण ते नक्कीच आनंदाने साजरे करू जर आज स्थिती नियंत्रणात राहिली तर नाहीतर भारताचा इटली व्हयायला कितीसा वेळ लागणार आहे ? हे वास्तव आहे, तेव्हा डोळे उघडा , संयम बाळगा ,परिस्थितीचे भान ठेवा आणि अर्थात परमेश्वराची आराधना करा.
आपले स्वतःचे आरोग्य आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे नक्कीच आपल्या हाती आहे आणि ह्याची सुरवात आपण स्वतःपासूनच केली पाहिजे. आपण परदेश दौरे करतो ,जगभर फिरतो. तेथील स्वछ्यता , शिस्त ,नीटनेटकेपणा ह्याची तोंडभरून स्तुती करताना आपण थकत नाही मग ह्याचे अनुकरण आपल्याकडे करावे असे का नाही वाटत आपल्याला ? परदेशात रस्त्यावर थुंकायची किंवा सिग्नल नसताना रस्ता क्रॉस करायची आपली हिम्मत होत नाही आणि आपल्या देशात ?
भारत भूमी हि संतांची भूमी समजली जाते . आपल्या देशाला अनेक भौगोलिक , ऐतिहासिक परंपरा, संस्कृतीचा लाभला आहे आणि निसर्गानेही आपल्याला भरभरून दिले आहे . कमतरता आहे ती फक्त शिस्तीची. शिस्त पाळण्यात आपला सुशिक्षित पणा कुठे जातो ?  परदेशातील लोकांनीही आपली शिस्त वाखाणावी असे वाटत नाही का आपल्याला ? आपल्याला एक सक्षम, आरोग्यसंपन्न समाजाची निर्मिती करायची असेल तर घरोघरी आज
“ आरोग्याची गुढी ” उभारण्याची गरज आहे. संपूर्ण जगाला सळो कि पळो करून सोडणाऱ्या ह्या “Corona Virus” च्या मागे विधात्याने भविष्यासाठी दिलेली आगाऊ सूचना आपल्याला आजच समजली तरच ह्या देशाचेच नाही तर संपूर्ण विश्वाचे आरोग्य आणि भविष्य उज्वल असेल ह्यात शंकाच नाही. नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या...तेव्हा आजच सावध होऊन झाल्या प्रसंगातून शिकणे गरजेचे आहे .
आज ह्या मंगलमय दिनी आपण अनेक शुभ कार्यांना प्रारंभ करतो, अनेक संकल्प करतो. तसेच आज आपल्या स्वतःची आणि आपल्या परिसराची ,देशाची स्वच्छता राखणे, आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास प्रयत्नशील राहणे हि आपलीच जबाबदारी आहे आणि त्यासाठीच आज एकत्र येवून “निरोगी आयुष्याची गुढी ” उभारू आणि हा आरोग्याचा , स्वच्छतेचा वारसा पुढील पिढ्यांना सुपूर्द करू.
आज गुढी उभारताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवूया तसेच ह्या स्थितीत ज्यांना आपले प्राण गमवायला लागले आहेत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थनाही करुया.
आपल्या सर्वाना हे नवीन वर्ष सुखाचे , भरभराटीचे, संकल्प पूर्तीचे आणि उत्तम आयुआरोग्याचे जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .


antarnad18@gmail.com