|| श्री स्वामी समर्थ ||
प्रत्येक भक्त हा आपल्या परीने गुरुसेवा करत असतो.. शेवटी भाव महत्वाचा. आजूबाजूला जे काही बघायला मिळत आहे ते आज आवर्जून लिहावेसे वाटते म्हणून हा लेखन प्रपंच. अध्यात्मात shortcut नाही आणि अनुकरण तर अजिबातच नाही. आपल्या अंतस्फूर्तीने जे वाटते ते करावे इतकच. पण हॉटेल मध्ये दुसर्याच्या टेबलावर काय खायला आलय तिथे आपले लक्ष असते आणि मग ते पाहून आपणही हे का नाही मागवले ? हा प्रश्न पडतो ..अगदी तसेच दुसर काय करतो तिथे आपले लक्ष अधिक . दुसरा पोथी वाचतो मग आपणही वाचलीच पाहिजे असे काही नसते. तुमचे मन नामस्मरण करण्यात रमत असेल तर ते करा ,बिघडले कुठे. आपल्याला जी गोष्ट निर्मळ सेवेचा आनंद देते महाराजांच्या अधिक जवळ नेते ती करावी त्यासाठी कुणाला काहीही विचारात बसू नये.
नामस्मरण कसे, कुठे ,कधी आणि कितीवेळ करावे ? कुठली माळ जपास घ्यावी ? आसन कुठले घ्यावे ? अंघोळ करावी कि तसेच करावे ? एकाच जागी बसून करावे कि जागा बदलली तर चालेल ? प्रश्नांची नुसती सरबत्ती असते. ह्या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर श्वासागणिक जप करावा जोवर आपला श्वास चालू आहे तोवर नाम घेत राहावे तेही जीव ओतून. पण आपण काय करतो ? जप करतो पण त्यात भाव नसतो . जप करत असताना सुनबाईना “ अग आमटीत मीठ घातले का ग ? ”हे विचारतो , दारात कोण आले ? कुणाचे कुरियर आले ह्याकडे आपले लक्ष असते ..मग आता तुम्हीच सांगा जपात किती लक्ष असते आपले ? नुसते शरीराने जपास बसतो आपण पण आपला आत्मा ? तो कुठे असतो ? आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणार तरी कसे ?पटतंय का? नाम घेताना फक्त नाम दुसर्या कशाचे भानही नाही राहिले पाहिजे आपल्याला .सर्वातून मन हळूहळू बाजूला नेण्याचा मनापासून प्रयत्न करून नामस्मरणात संपूर्ण लक्ष केंद्रित केले तर चित्त शुद्ध आणि एकाग्र होते ..गुरूबद्दल विश्वास वाढतो आणि जसजशी साधनेची बैठक बसते तसतसे मन शांत होत जाते , अनुभूती येवू लागतात आणि मग आपण स्वामीमय कधी होतो आपले आपल्याला समजत नाही .
स्वामिसेवा किंवा गुरुसेवा म्हणूया म्हणजे नक्की काय हा प्रश्नही अनेकवेळा विचारला जातो . सध्या सोप्प्या शब्दात सांगायचे म्हणजे स्वामिसेवा म्हणजे त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालणे, प्रपंच करून परमार्थ करणे. खुलभर दुधाची गोष्ट माहितच आहे सर्वाना . जप किती झाला ते मोजण्यापेक्षा तो कसा झाला ,त्याने आपल्याला किती समाधान दिले हे महत्वाचे. गुरुसेवा अनेक प्रकारे केली जाते जसे नाम घेवून , पूजा, मानसपूजा, प्रदक्षिणा पण जे करावे ते सच्चेपणाने,त्यात कुठलाही दांभिकपणा नसावा. महाराजांनी सांगितलेच आहे भक्तांना “ माझा फोटो ठेवून बाजार मांडू नकोस ”.
स्वामी माझा मी स्वामींचा |
स्वामी कुठल्या परग्रहावर नाही राहत ते इथेच आहेत तुमच्या माझ्यात आणि त्यांचे बारीक लक्ष आहे आपल्या प्रत्येक भक्तावर , आपल्या प्रत्येक कृतीवर ह्याचा क्षणभरही विसर आपल्याला पडला नाही पाहिजे.
म्हणूनच रोज सकाळी उठल्यावर अंतकरणाने स्वमिनाम घ्यावे आणि झोपतानाही. दिवसभरातील आपले आचरण शुद्ध ,सात्विक असायला हवे. आपल्या असंख्य गोष्टीना रोज स्वामी माफ करत असतात अगदी तसेच आपले मनही मोठे करून इतरांच्या चुका त्यांना दाखवून वेळप्रसंगी पोटात घालता यायला हव्यात. हे सर्व सोप्पे नाही कारण कितीही भक्ती केली तरी आम्ही आरे ला कारे करणारच ...अरे वा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे तो. म्हणूनच रोज आत्मपरीक्षणाची सवय मनास लावून घ्यावी . आपले कुठे चुकतेय ते पाहिले आणि उमजले तर सर्वच सोपे होवून जायील. वय वाढते तसे क्षमाशील वृत्तीही वाढली पाहिजे. पण कधीकधी वयातीत माणसेही हि अत्यंत दुखावणार्या स्वरात इतरांशी बोलतात ,त्यांच्या चुकांवर बोट ठेवून त्यांना दुखावतात. विचार करा उद्या स्वामिनी आपल्या चुकांसाठी हातात त्यांचा सोटा घेतला तर आपली काय अवस्था होईल. विचारानेच गाळण उडेल आपली.
हम गया नहि जिंदा है |
म्हणूनच पुन्हा पुन्हा आत्मपरीक्षण गरजेचे आहे . दुसर्याने केलेली मदत विसरून जाणे आणि कामापुरती माणसे वापरणे हा आजकाल मनुष्यस्वभाव होत चालला आहे. सर्वत्र तेच आहे. समोरच्याने आपल्यासाठी काय केले आहे ह्याचा विसर ज्या क्षणी आपल्याला पडतो त्यावेळी समजावे आपली साधना निष्फळ आहे. आपल्याला आपलेच गुरु किती समजले आहेत हा ज्याचा त्यानेच अभ्यास केलेला बरा आहे. आपण सामान्य जीवन जगतो ,देविदेवता नाही त्यामुळे षडरिपू असणारच , त्यांची साथ अखेरपर्यंत पण आपली सेवा ,साधना भक्कम आणि भावनेने ओथंबलेली असेल तर ह्यातून परावृत्त नक्कीच होवू शकतो अर्थात त्यासाठी तितक्याच ताकदीचा मानस ,दृढ निश्चय असायला हवा.
आजकाल चार लोक एकत्र आली कि so call gossip सुरु होते. आपल्याला हेही समजत नाही कि तिथून आपण गेल्यावर आपल्याही बद्दल असलेले लोक हेच बोलणार आहेत. अगदी सहजपणे कुठलाही सारासार विचार न करता इतरांच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवतो. कुणाला पाण्यात पाहून ,त्याचा तिरस्कार , मत्सर करून आपण आपलीच पापे वाढवून घेतो .आपली प्रगती तर होत नाहीच उलट ह्या सर्वामुळे आपले अधपतन होते. आयुष्यातला किती वेळ अजून वाया घालवणार आहोत आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये ? ह्या सर्वामुळे कुणाचे कुटुंब विनाकारण उध्वस्त होवू शकते पण त्याहीपेक्षा जास्ती भविष्यात आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुक्खाच्या होळीला सामोरे जावे लागते. ह्या सर्वाला आपणच जबाबदार असतो त्यामुळे “ आधी विचार मग उच्चार ” हे जास्ती संयुक्तिक ठरेल .
मी आणि माझे स्वामी म्हणजे ..जसे दुग्ध शर्करा .इतके समरसून गेलो पाहिजे त्यांच्यात , तरच ह्या सर्व अनाठायी असणार्या गोष्टींतून बाहेर येवू . रोजची साधना वाढवली पाहिजे , श्वासागणिक नामस्मरण झाले पाहिजे ,गुरुतत्व काय ते समजून घेतले पाहिजे आणि आपण गुरु नेमके का केले ह्याचेही आत्मपरीक्षण करता आले पाहिजे.
उपास, व्रतवैकल्ये , पूजापाठ , पारायणे ह्यांचा स्वामींवर पाऊस पडूनही आपल्यातील ठासून भरलेला अगदी पराकोटीचा अहंकार जात नाही . आपणच काय ते विद्वान आणि बाकीचे सर्व मूर्ख , आपल्याला कुणी सांगणारा राहिला नाही अश्याच अविर्भावात आपले वागणे बोलणे असते. प्रत्येक मनुष्यात देव आहे आणि त्याचा आदर ,योग्य तो सन्मान करता आला पाहिजे. कितीही अध्यात्म केले तरी आपल्या घरातील ,कुटुंबातील लोकांशी आपले आचरण कसे असते ह्याचा खोलवर विचार करा . आपल्याच माणसांची मने वाचता येतात का आपल्याला ? त्यांची मने .भावना समजून घेता येतात का आपल्याला ? तर नाही मग स्वामींच्या समोर ४ टिपे गाळून ते आपल्याला खरच समजून घेतील अशी अपेक्षा तरी कशी ठेवू शकतो आपण ? म्हणूनच म्हंटले ह्या सर्वाचे सिंहावलोकन करणे आज क्रमप्राप्त आहे. आपला आपल्या जिभेवर, वाचेवर, भावनांवर काश्यावरच ताबा नाही हे सत्य आहे . त्याची परिणीती म्हणून मागे लागतात कित्येक आजारपणे आणि बोलण्याने ओढवून घेतलेली संकटे .
श्री स्वामी समर्थ |
आपल्या शरीरात “ जिव्हा ” हा असा एकाच अवयव आहे ज्यावर ताबा मिळवता आला तर ९९% प्रश्न सुटू शकतात. रोजच्या जीवनात अनेकांना अनेक समस्या , वैफल्य आहे पण गुरुसेवा करणे हा त्यावर जालीम उपाय आहे हे माझे वैयक्तिक मत आहे. शेवटी काही आपले भोगही आहेत आणि तेही भोगूनच संपवायचे आहे . जन्ममृत्यूच्या फेर्यात महाराज कधीच दखल देत नाहीत पण ते आपल्याला आत्मिक बळ नक्कीच प्रदान करतात.
स्वामींचे अस्तित्व आहे आणि त्याचे भान ठेवले तर आपल्याकडून योग्यच आचरण होईल ह्यात दुमत नसावे. स्वामी जयंती ,पुण्यतिथी , आठवड्यातील गुरुवार ह्या आणि इतर दिवशी आपण केलेली सर्व सेवा ,प्रार्थना ,तोडकीमोडकी पूजा त्यांच्यापर्यंत निश्चित जातेच हा माझा विश्वास आहे पण हि करत असताना दुसर्या बाजूने इतरांचा केलेला पाणउतारा , लोकनिंदा , असभ्य वर्तन ह्यामुळे आपल्या साधनेत अनेक अडथळे येतात आणि मग त्याचे अपेक्षित फळ मिळणे दूरच आपल्या भोवती ह्या सर्व दुष्कृत्यांचा नकारात्मक ओरा(वलय) तयार होतो आणि तो आपल्या विनाशाला कारणीभूत ठरतो .आपले जीवन त्यात होरपळून निघते . कालांतरानी आपण ह्या गर्तेत इतके ओढले जातो कि त्यातून बाहेर येण्याचा मार्गही दिसेनासा होतो. वैफल्य ,व्यसने ह्या गोष्टींमुळे जीवन अधिकाधिक दुखी होत जाते ,आशा धूसर होत जातात. म्हणूनच वेळीच सावध होवून आपण कुठल्या संगतीत आहोत , आपली रोजची दिनचर्या काय आहे , आपण कुणाची निंदानालस्ती करत नाही ना, ह्या सर्व गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे म्हणजे पुढील आयुष्य सुखासमाधानात , गुरुसेवेत जाईल.
आजन्म आपण महाराजांकडे काहीना काही मागतच असतो, पण ते आपल्याकडे काहीच मागत नाहीत. त्यांना हवा असतो फक्त खरा भाव ,अंतकर्णातून त्यांना हाक मारली आणि ते हाकेला धावून आले नाहीत असे होणे नाही. . म्हणूनच आजच्या दिवशी आपण आपल्या सद्गुरुना गुरुदक्षिणा देवूया ..आपले वर्तन शुद्ध , सात्विक ठेवूया. परनिंदा न करण्याचे , शब्दाने कुणालाही न दुखावण्याचे आणि जास्तीतजास्त सेवा करण्यास वचनबद्ध होऊया. तरच खर्या अर्थाने आपले जीवन कृतार्थ होईल.कायम दुसर्यांच्या चुका काढणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वाना आज गरज आहे ती “ आत्मपरीक्षणाची ”. जगासमोर आपण कसेही वागू पण आपल्या सद्गुरुना मात्र आपला खरा चेहरा माहित असतो. त्यांच्यासमोर खोटे चालत नाही,एक सच्चा भक्तच त्यांच्या कसोटीवर खरा उतरू शकतो.ह्या सर्व अनाकलनीय शक्ती आहेत आणि त्या आपल्या आकलनाच्याही बाहेर आहेत .आपण फक्त त्यांच्यासमोर नतमस्तक होवू शकतो.
आज स्वतःशीच वचनबध्द होऊया आणि महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर मार्गस्थ होऊया.
|| श्री स्वामी समर्थ ||
अस्मिता
लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा
antarnad18@gmail.com