Sunday, 29 March 2020

आनंदाचे सॅशे (Sachet)...

||श्री स्वामी समर्थ ||





काळ जसा बदलत गेला तसे जीवन गतिमान होत गेले आणि रोजच्या जीवनातील गरजा वाढतच गेल्या. आधुनिकीकरण झाले आणि नवनवीन गोष्टी प्रचलित होवू लागल्या. मध्यंतरी दुकानात खरेदीसाठी गेले असता तेथील एका कोपर्याने लक्ष वेधून घेतले . तिथे प्रत्येक मोठ्या वस्तुसोबत त्याच वस्तूचे लहान पाकीट ज्याला आपण सॅशे म्हणतो ते होते . म्हणजे मोठी खोबरेल तेलाची बाटली त्याच्या शेजारी लहान खोबरेल तेलाचे सॅशे, मोठा सर्फ चा पुडा त्याच्याशेजारी लहानसे सर्फचे सॅशे. असे प्रत्येक गोष्टीसाठी एकेक सॅशे होते. 

खरय आजकाल एकत्र कुटुंब इतिहास जमा झाली आहेत त्यामुळे काही घरातून खूप समान भरण्याची प्रथा आता मोडीत निघाली आहे . शिवाय आजकाल हाकेच्या अंतरावर सर्व गोष्टी लगेच उपलब्ध होतात. तसेच कधीकधी लहानसहान प्रवासासाठी साबण, टूथपेस्ट,पावडर, खोबरेल तेल ह्या वस्तूंचे सॅशे सामानात सहज सामावले जातात आणि न्यायला सोपे पडतात. आजकाल कुठलीही वस्तू घ्या त्याचे सॅशे मिळतातच .

तिथून निघाले पण हे सॅशे प्रकरण मनात रुंजी घालत होते. घरी येवून चहाचा घोट घेताना लक्ष्यात आले अरेच्च्या ..हे सॅशे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. नकळत मी ह्याची तुलना आपल्या दैनंदिन आयुष्यातील आनंदाशी केली . आपल्या आयुष्यात पावलोपावली हे “ आनंदाचे सॅशे ” आपल्याला भेटतात . दिसायला लहान असले तरी आनंदाचा मोठ्ठा ठेवा असतो त्यात.

मंडळी हे “ आनंदाचे सॅशे ” अगदी सतत आपल्याला भेटत राहतात पण आपल्याला त्यातील आनंद लुटताच येत नाही .लहान सहान गोष्टी जसे अनेक वर्षांनी आपला खास मित्र किंवा मैत्रीण रस्त्यात किंवा घरी अचानक भेटायला येते आणि मग चहाच्या घोटासोबत आपण कित्येक वर्ष मागे जातो. 

आपल्यासहचारिणी सोबत एखादा छानसा सिनेमा पाहून घालवलेले चार सुखद क्षण, परदेशातून आपल्या मुलांचा अत्यंत काळजीपोटी आलेला फोन , मुलांना शाळा कॉलेज मध्ये मिळालेली बक्षिसे,सगळ्यात पहिल्यांदा आपण आजी आजोबा होतो तो क्षण.

आता तुम्ही गमतीने म्हणाल ,अग अस्मिता हि जेव्हा माहेरी चार दिवस जाते ते दिवस आमच्यासाठी खरे आनंदाचे सॅशे असतात. हो हो खरय तेही असतात. थोडक्यात असे सुखद क्षण जे आपल्या अंतर्मनात ओतप्रोत आनंद भरतील ते सर्व क्षण म्हणजेच आपले आनंदाचे छोटे छोटे सॅशेच असतात. आपल्याला हवे असलेले तिकिटाचे बुकिंग तात्काळ मध्ये होणे, एखादा वेगळा पदार्थ सहज उत्तम होणे, न मागता आले घातलेला वाफाळलेला चहाचा कप हातात येणे, खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस अलगद ओंजळीत घेणे ,बाहेरून येताना उशीर झाला तरी आपल्या आवडत्या सीरिअल च्या आधी घरात पोहोचणे , आजूबाजूच्या विभागातील लाईट जाणे पण आपले असणे, बस किंवा ट्रेन मध्ये खिडकीजवळ बसायला मिळणे .मनासारखी साग्रसंगीत पूजा होणे, देवदर्शन होणे , सणांच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र हसतखेळत केलेले  सहभोजन. 

मुलांना नोकरी लागली कि त्यांनी पहिला पगार वडिलांच्या हातावर ठेवून आशीर्वाद घेणे (अर्थात आता हे फारच दुर्मिळ झाले आहे ) .आपल्या म्हातारपणी मुलाने काहीही न बोलता फक्त डोळ्यातूनच (आई बाबा मी आहे )दिलेला दिलासा . हिला न सांगता surprise म्हणून आणलेली साडी तिला प्रचंड आवडणे आणि मग तिच्या केसात माळलेला तो गजरा .एक न दोन असंख्य आनंदाचे हे सॅशे आपल्याला जगवत असतात, कित्येक दुक्खाच्या किंवा एकाकी क्षणी ह्यातील एखादा क्षण जरी आठवला तरी चेहऱ्यावरील उदासीनता , मरगळ निघून जाते . तुम्ही आम्ही सर्वच हे अनुभवत असतो ...

तर मंडळी, हे सर्व लिहित असताना माझ्याही मनात माझ्या आयुष्यातील अनेक अनेक आनंदाचे सॅशे रुंजी घालू लागले आणि डोळे पाणावले...मला मुलगा झाला आणि सर्वप्रथम मी त्याला हृदयाशी धरले ,लुकलुकत्या डोळ्यांनी त्याने मला आणि मी त्याला पाहिले तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण कारण त्या क्षणी त्याने मला “ आई ” केले होते. हे सर्व आनंदाचे सॅशे हृदयाशी कवटाळूनच माझा पुढील प्रवास मी करणार आहे ....

तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातील पावलापावलावर विखुरलेले आनंदाचे सॅशे ओंजळीत साठवून ठेवा कारण हेच आपली आयुष्याची संध्याकाळ सुखद ,आनंदी करणार आहेत.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .

Antarnad18@gmail.com