Wednesday, 25 March 2020

गुढी उभारू “ निरोगी आयुष्याची ”

|| श्री स्वामी समर्थ ||








मंडळी नमस्कार ,

भारतीय संस्कृतीत सणांची रेलचेल असते . इंग्रजी नवीन वर्ष सुरु झाले कि संक्रांत , होळी आणि मग अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे “ गुढी पाडवा “. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस अनन्यसाधारण असून अनेक कारणांनी विशेष लक्षवेधी आहे. चैत्र महिना आला कि चाहूल लागते वसंत ऋतूची. साडेतीन मुहूर्तातील हा मुहूर्त असल्याने गुढी उभारून मोठ्या उत्चाहात आणि आनंदमयी वातावरणात हा दिवस साजरा केला जातो.
प्रतिपदेला सूर्योदयानंतर गुढी उभारली जाते . बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर कडूलिंबाची, आंब्याची पाने ,फुलांची माळ , रंगीत साखरेच्या गाठ्यांची माळ बांधून त्यावर टोकाला तांब्याचे भांडे उपडे ठेवून गुढी तयार केली जाते. दारात रांगोळी काढून, फुले अक्षता वाहून , गोडधोडाचा नेवैद्य दाखवून, गुढीला ओवाळून पूजा करण्याची प्रथा आहे.
आपल्या आयुष्यातील सर्वांगीण प्रगतीचे सूचक म्हणजे हि गुढी. ह्या दिवशी आपले नवीन वर्ष सुरु होत असल्याने सर्व मंगल व्हावे आणि अधिकाधिक यश मिळून आपल्या प्रगतीचा आलेख उंचच उंच जावा ह्याचे प्रतिक म्हणून आपण गुढी उभारतो .
ह्यादिवशी सरस्वती पूजन करून पंचांगाची पूजा करावी आणि संवत्सर फलाचे वाचन करावे आणि त्यानंतर कडुलिंबाची चटणी प्राशन करावी अशी प्रथा आहे. ओवा ,हिंग , मीठ ,साखर आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून केलेली हि चटणी आरोग्यदायी असते. आपल्या आहारात गोड ,तिखट ह्यासोबत कडू रसाचाही समावेश असणे आवश्यक आहे. अनेक आयुर्वेदिक गुणांनी संपन्न असा कडुलिंब हा बहुगुणी असून तो पित्तशामक ,थंडावा देणारा , आरोग्य प्रदान करणारा आहे.
मंडळी , गुढी सूचक करते “आनंद ,सौख्य, मांगल्य आणि भरभराट”. आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळावे म्हणून गुढी उभारून त्याचे पूजन करण्याचे प्रयोजन. पण ह्या सर्वांच्याही आधी आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे ते आपले आरोग्य.
२०२० च्या अगदी प्राथमिक महिन्यापासून “ Corona Virus ” ने जगभर धुमाकूळ घातला आणि आपल्या सर्वाना सळो कि पळो करून सोडले. ह्या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आपण आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस “गुढी पाडवा ” साजरा करत असताना अनेक गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे किबहुना क्रमप्राप्त आहे. आज ह्या समस्येतून आपण नक्कीच बाहेर येवू पण अश्यासारखे प्रसंग पुन्हा भविष्यात उद्भवू नयेत म्हणून आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे ..निसर्गाचा कोप आपल्याला महागात पडू शकतो .आधुनिकीकरणाच्या नावावर आज टोलेजंग इमारती उभारताना केलेली जंगलतोड आणि प्रवाहाच्या विरुद्ध केलेल्या अश्या अनेक गोष्टीस आपणच जबाबदार आहोत ..निसर्गही आता त्याच्या तंत्राने वागत आहे आणि त्याचे जिवंत उदा. म्हणजे वेळीअवेळी पडणारा पाऊस ... आज निसर्गानेच आपल्याला “स्वच्छतेचा धडा गिरवण्यास भाग पाडले आहे. आजच्या परिस्थितीने नुसतेच आपल्या डोळ्यात अंजन घातले नाही तर त्यात  भविष्यातील घटनांची समर्पक सूचनाही आहे.  स्वच्छता पाळा ” हाच तर संदेश निसर्ग आपल्याला देत नसेल का ह्याचा विचार व्हावा.
आज दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, फक्त मी आणि माझे असा स्वार्थी विचार न करता आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांचा , आजूबाजूच्या लोकांचा , सहकार्यांचा तसेच संपूर्ण समाजाचा विचार करणे आज गरजेचे आहे आणि त्याची पहिली पायरी म्हणजे घराबाहेर न पडणे. आज सोशल मिडिया तसेच अनेक द्रुकश्राव्य माध्यमातून सतत कोरोना विषयी जनजागृती करणारे संदेश दिले जात आहेत पण अजूनही संपूर्णतः त्याला यश आलेले दिसत नाही .. हे संकट जीवावरचे आहे आणि त्याचे गांभीर्य आज समजले नाही तर उद्या आपलेच आयुष्य धोक्यात येवू शकते. आज इटली किंवा चायना मधील परिस्थिती झोप उडवणारी , अंगावर काटा आणणारी आहे. बिनधास्त राहणे आपल्याला प्रचंड महाग पडू शकते . सरकार उत्तमरीतीने परिस्थिती हाताळत आहे, जनसामान्यापर्यंत सर्व सुविधा कश्या पोहोचतील हे सर्व जातीने पाहत आहे ,माननीय मुख्यमंत्री , प्रधानमंत्री कळकळीने विनंती करत आहे तेव्हा आता नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्यात कुठेही न चुकता प्रशासनाला सहकार्य करुया .आपल्याला आवश्यक तितक्याच गोष्टींचा साठा करा कारण इतरांनाही त्याची गरज लागू शकते. आपल्याला नवीन वर्षात असाच सतत भयभीत राहायचे आहे का? नाही ना? मग आज थोडी कळ काढा, घरातून बाहेर पडू नका आणि इतरांनी तसे केल्यास त्यानाही समजावून सांगा. भविष्यातही अनेक गुढी पाडवे येतील आणि आपण ते नक्कीच आनंदाने साजरे करू जर आज स्थिती नियंत्रणात राहिली तर नाहीतर भारताचा इटली व्हयायला कितीसा वेळ लागणार आहे ? हे वास्तव आहे, तेव्हा डोळे उघडा , संयम बाळगा ,परिस्थितीचे भान ठेवा आणि अर्थात परमेश्वराची आराधना करा.
आपले स्वतःचे आरोग्य आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे नक्कीच आपल्या हाती आहे आणि ह्याची सुरवात आपण स्वतःपासूनच केली पाहिजे. आपण परदेश दौरे करतो ,जगभर फिरतो. तेथील स्वछ्यता , शिस्त ,नीटनेटकेपणा ह्याची तोंडभरून स्तुती करताना आपण थकत नाही मग ह्याचे अनुकरण आपल्याकडे करावे असे का नाही वाटत आपल्याला ? परदेशात रस्त्यावर थुंकायची किंवा सिग्नल नसताना रस्ता क्रॉस करायची आपली हिम्मत होत नाही आणि आपल्या देशात ?
भारत भूमी हि संतांची भूमी समजली जाते . आपल्या देशाला अनेक भौगोलिक , ऐतिहासिक परंपरा, संस्कृतीचा लाभला आहे आणि निसर्गानेही आपल्याला भरभरून दिले आहे . कमतरता आहे ती फक्त शिस्तीची. शिस्त पाळण्यात आपला सुशिक्षित पणा कुठे जातो ?  परदेशातील लोकांनीही आपली शिस्त वाखाणावी असे वाटत नाही का आपल्याला ? आपल्याला एक सक्षम, आरोग्यसंपन्न समाजाची निर्मिती करायची असेल तर घरोघरी आज
“ आरोग्याची गुढी ” उभारण्याची गरज आहे. संपूर्ण जगाला सळो कि पळो करून सोडणाऱ्या ह्या “Corona Virus” च्या मागे विधात्याने भविष्यासाठी दिलेली आगाऊ सूचना आपल्याला आजच समजली तरच ह्या देशाचेच नाही तर संपूर्ण विश्वाचे आरोग्य आणि भविष्य उज्वल असेल ह्यात शंकाच नाही. नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या...तेव्हा आजच सावध होऊन झाल्या प्रसंगातून शिकणे गरजेचे आहे .
आज ह्या मंगलमय दिनी आपण अनेक शुभ कार्यांना प्रारंभ करतो, अनेक संकल्प करतो. तसेच आज आपल्या स्वतःची आणि आपल्या परिसराची ,देशाची स्वच्छता राखणे, आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास प्रयत्नशील राहणे हि आपलीच जबाबदारी आहे आणि त्यासाठीच आज एकत्र येवून “निरोगी आयुष्याची गुढी ” उभारू आणि हा आरोग्याचा , स्वच्छतेचा वारसा पुढील पिढ्यांना सुपूर्द करू.
आज गुढी उभारताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवूया तसेच ह्या स्थितीत ज्यांना आपले प्राण गमवायला लागले आहेत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थनाही करुया.
आपल्या सर्वाना हे नवीन वर्ष सुखाचे , भरभराटीचे, संकल्प पूर्तीचे आणि उत्तम आयुआरोग्याचे जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .


antarnad18@gmail.com