|| श्री स्वामी समर्थ ||
वीणाताई सोबत
|
“गणपती बाप्पा मोरया ,मंगलमूर्ती मोरया...उंदीर मामा कि जय .” अशी श्री गणेशाला मानवंदना देवून , आपल्या प्रत्येक टूरचा श्रीगणेशा करणारा वीणा वर्ल्ड चा सक्षम टूर लीडर “ हितेश सोनावणे ह्याचा “ व्यक्ती विशेष ”मध्ये परिचय करून घेवूया आणि त्याच्या टुरिझम मधील प्रवासाबद्दलहि जाणून घेवूया.
मास मिडीया मधील पदवीधर असलेल्या हितेशने आपल्या करियर ची सुरवात स्वतःच्याच जाहिरात कंपनीत सुरु झाली होती. पण काही कौटुंबिक समस्यांमुळे त्याला त्यातून बाहेर पडावे लागले .टुरिझम ची गोडी कशी लागली हे सांगताना हितेशने फार पूर्वीचा एक किस्सा सांगितला . ठाण्यात सरकारी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यास त्यावेळचे राष्ट्रपती माननीय श्री.शंकरदयाळजी शर्मा येणार होते आणि ते हेलिकॉप्टर मधून येणार ते पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती . खूप वेळ झाला पण हेलिकॉप्टर आलेच नाही शेवटी त्याचे बाबा त्याला शोधत कार्यक्रमाच्या ठिकाणी आले पण हेलिकॉप्टर पाहिल्याशिवाय मी येणार नाही असे हितेशने ठामपणे सांगितले . शेवटी बाबांनी दिलेल्या १० रुपयावर २-३ वडापाव (तेव्हा मिळत असत ) खावून शेवटी हेलिकॉप्टर डोळे भरून पाहूनच स्वारी घरी परतली.
हितेश आज त्याच्या टुरिझम मधील करियरच्या खूप उंचीवर आहे . सगळ्या प्रकारची विमाने, हेलिकॉप्टर ,जहाजे , इतरही अनेक वाहनातून प्रवास झाला आहे पण हि लहानशी आठवण उरी अजून तशीच ताजी आहे . कदाचित हीच त्याच्या टुरिझम मधील प्रवासाची प्रेरणा असेल.
टूर लीडर हे काम अगदी round d clock करावे लागते. बरेचदा रात्रीचाच विमानप्रवास असल्याने झोपेचे खोबरे हि नित्याचीच बाब असते . प्रत्येक ठिकाणचा वातावरणातील बदल आणि वेळी अवेळी मिळणारी झोप ह्या सर्वातहि ताजेतवाने राहायचे असेल तर स्वतःची तब्येतही सांभाळावी लागतेच आणि ह्यासाठी नित्याचा व्यायाम ,चालणे ह्याला पर्याय नाही . आपल्या ४-५ मित्रांच्या ग्रुप सोबत सकाळचा व्यायाम हा त्याचा दिनक्रम आहे. त्याच बरोबर आपला आहार सांभाळणे ,सकाळचा नाश्ता , तसेच वेळोवेळी समोर येणारे पदार्थ प्रमाणात खाणे हे हळूहळू त्याच्या सवयीचे होवू लागले. जेव्हा टूर नसेल तेव्हा सकाळी ५ वाजता उठून नियमित चालायला जाणे हे आवर्जून मी करतोच, हे सांगताना हितेश म्हणाला कि माझ्या ह्या नियमित चालण्यामुळे मला एकप्रकारची उर्जा मिळते ,माझा आत्मविश्वास तर वाढतोच पण उत्साह येतो ,कामाचा ताण जाणवत नाही. मी कधीही जिम मध्ये जात नाही ,निसर्गाच्या वातावरणात चालणे हे मी अधिक पसंत करतो.
टुरिझम बद्दल बोलताना तो म्हणाला ,इतके सर्व देश फिरल्यावर एक गोष्ट लक्ष्यात आली आहे कि आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत पण आपण त्या लोकांना दाखवत नाही .
टुरिझम हे २४ तास कार्यरत ठेवणारे क्षेत्र आणि त्यात यशस्वी दीर्घकालीन करिअर करायची असेल तर शारीरिक आणि मानसिक फिटनेस तितकाच आवश्यक आहे. त्याकडे कसे लक्ष्य देतोस हा माझा अर्थातच महत्वाचा प्रश्न होता.त्यावर त्याने सांगितले कि २१ जून हा “ योगा दिवस “ म्हणून जाहीर झाला तेव्हा आपणही ह्यात भाग घ्यायचा हे ठरवले. चैत्र गुढी पाडवा ते दिवाळीचा पाडवा हा काळ उत्तम असल्याने ह्यात जास्तीतजास्त वेळ व्यायामासाठी देण्याचा प्रयत्न करतो . रोज नित्य नेमाने सूर्य नमस्कार घालणे हितेशने कटाक्षाने पाळले आणि आज तो रोज १०८ सूर्यनमस्कार घालतो. सूर्यनमस्कार हा एक सर्वांगीण व्यायाम असून प्रत्येकाने निदान ५ तरी सूर्य नमस्कार रोज घातलेच पाहिजेत आणि हळूहळू त्यात वाढ केली पाहिजे असे त्याने आवाहनाच केले आहे .
शारीरिक फिटनेस साठी मी वेगवेगळे पर्याय ठेवतो म्हणजे त्यात तोचतोच पणा न येता नाविन्य येते. सव्वा तासात १२ किलोमीटर चालणे तसेच कधी ५-६ किलोमीटर चालणे , ४-५ किलोमीटर धावणे अश्याप्रकारे विविधता आणून त्यातील गोडी कायम टिकवली आहे .कधी कधी आपल्या घराच्या इमारतीचे जिने ४-५ वेळा चढणे उतरणे हा सुद्धा साधा सोप्पा व्यायाम आहे. अश्याने व्यायामाचा कंटाळा न येता त्यातील गोडी वाढत जाते तसेच आपल्या शरीराला नक्की काय मानवते आहे ह्याचा आपणच अभ्यास करू शकतो . इतके करताना अजून काही जड व्यायामप्रकार करायची खरतर गरजच उरत नाही. टूर वर असताना अर्थातच असे २ तास व्यायामासाठी देता येणे शक्य नसते पण त्यावेळी तिथे दिवसरात्र होणारी धावपळ सुद्धा पुरेसा व्यायाम देते असे म्हंटले तर वावगे ठरू नये. गेल्या काही दिवसांपासून हितेश १५ दिवसातून एक दिवस उपवास करून शरीराला ,पचनसंस्थेला थोडी विश्रांती देत आहे. भारतात आयुर्वेदाची पाळेमुळे खूप पूर्वापार खोलवर रुजली आहेत आणि त्याचा अभ्यास केला असता प्रकृतीसाठी लंघन म्हणजेच उपवास सर्वोत्तम असल्याचीच ग्वाही मिळते .
कुटुंबाचा पाठींबा असल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात तुम्ही उंच भरारी घेवूच शकत नाही. टूर लीडर ची करियर म्हणजे सतत वळकटी बांधून तयार आज इथे तर उद्या तिथे. देशोविदेशी प्रवास . ह्या सर्वासाठी घरच्यांनी कधी विरोध केला नाही का ह्यावर त्याने पूर्वीचा किस्सा सांगितला. सुरवातीला मी महाराष्ट्राबाहेर जाणार म्हणूनही खूप विरोध झाला ,जायचेच नाही ह्यावर सर्व ठाम होते . कामाच्या ठिकाणी सुरवातीला ५००० रुपये diposite भरायचे होते ,तेही मयुरेश राऊत ह्या मित्राने दिले. पण आजमात्र तसे नाही. आज माझ्या कुटुंबाचा नुसताच पाठींबा नाही तर त्यांना माझ्या कामाचा अभिमान सुद्धा आहे.आपल्या करियर बद्दल बोलताना हितेश म्हणाला कि मी करत असलेल्या कामाचा मला अभिमान आहे. माणसाने काम करावे पण त्यात आपला जीव ओतावा तरच ते सर्वांगसुंदर होते. कुठलेही यश असेच मिळत नाही त्यामागे परिश्रम , संयम आणि कष्ट लागतात . हे सर्व करणे म्हणजे एक प्रकारची साधनाच आहे आणि तीच तुम्हाला यशाची दालने खुली करून देते . अनेक देश पादाक्रांत केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि कुठलाही देश पाहताना तेथील लोकांशी संवाद साधायला चेहऱ्यावरील भाव सुद्धा पुरेसे काम करतात त्यासाठी तेथील बोलीभाषा आलीच पाहिजे हे बंधन नाही. समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीतून ,केलेल्या हावभावातून सुद्धा एकमेकांशी संवाद साधता येतो आणि तोही उत्तम .शालेय जीवनापासून अनेक संस्थांशी कार्यरत असल्याने समोरच्या व्यक्तीला काय सांगायचे आहे हे जाणून घ्यायची कला अवगत झाली आणि त्याचा माझ्या भटकंतीमध्ये खूप फायदा झाला...अनेक वर्ष ह्या क्षेत्रात काम केल्यामुळे हितेशकडे अनुभवांची शिदोरी मोठी आहे.
आजकालची तरुणाई जी ह्या क्षेत्रात आपली करिअर घडवू पाहत आहे त्यांना तु काय सांगशील ह्या प्रश्नावर हितेश म्हणाला ह्यावर तर खूपच बोलण्या आणि सांगण्यासारखे आहे .टुरिझम हे एक नाविन्याने भरलेले ,ग्लामरस क्षेत्र असले तरी त्यात अनेक आव्हानेही असतात . फक्त विमानात बसून इथेतिथे फिरायला मिळेल ह्या विचाराने कुणीही ह्या क्षेत्रात येवू नये. कुठलेही क्षेत्र निवडताना त्या क्षेत्राचा आणि आपल्यातील गुणांचा ,क्षमतेचा नीट अभ्यास करावा. टुरिझम हे क्षेत्र अभ्यासपूर्ण तर आहेच पण इथे रोज काहीतरी नवीन घडत असते त्याचे Updates असणे गरजेचे आहे. रोज अनेक प्रकारची माणसे आपल्याला भेटत असतात आणि त्या सर्वांच्या स्वभावाशी मिळतेजुळते घेताना आपल्या संयमाचाही कस पणाला लागतो...वेळीअवेळी प्रवास ,जागरणे ह्या सर्व गोष्टीसाठी मनाची ,शरीराचीही तयारी असायला लागते. तसेच कुठलेही काम कमी मानू नये तसेच त्याची लाज बाळगू नये. टूर वर कधीकधी गेस्टना त्यांचे सामान काही कारणाने उचलून त्यांना मदत करावी लागते , कधी SNACKS वाटायला लागतात ,अनेक गोष्टी कधीही अचानक पुढ्यात येतात तेव्हा ह्या सर्व कामांची मानसिक तयारी असणे आवश्यक ...इथे कुठलीही चौकट नाही किबहुना मी हेच करीन ते करणार नाही हे चालत नाही. संकुचित राहून चालत नाही कारण समाजातील अनेक स्थरातून अनेक लोक टूरवर येत असतात . सर्वाना एकत्रित बरोबर घेवून जावून त्यांना तो १०-१२ दिवसाच्या टूर चा आनंद देणे हे खरे कौशल्य असते ..संपूर्ण टूरवर अचानक येणाऱ्या अनेक समस्या असू शकतात . कधी विमान उशिरा येते तर कधी हॉटेल च्या रूम मधील AC चालत नसतो आणि मग अश्यावेळी टूर लीडरवर सामान्यपणे सर्व राग निघतो. खरतर ह्या गोष्टीत त्याची काहीच चूक नसते पण त्याला हे सर्व निभावून न्यावे लागते.
मी आजवर जितक्या टूर केल्या त्यामध्ये जवळजवळ सर्वच टूर मध्ये मला गेस्ट कडून सहकार्य आणि आशीर्वादच मिळाले आहेत . तूच टूर लीडर असतानाच पुन्हा पुन्हा टूरवर यायला आवडेल असे उद्गार गेस्ट जेव्हा काढतात तेव्हा घेतलेले सर्व कष्ट एका क्षणात भरून निघतात असे हितेशने अभिमानाने सांगितले.
“ टूर लीडर ” हे प्रोफेशन नक्कीच सोप्पे नाही त्यामुळे त्याला सर्वप्रथम मान देणे हे अपेक्षित आहे..टूर लीडर तुमचा कंपनीने १० दिवसासाठी दिलेला नोकर नाही ,त्याचेही तुमच्याचसारखे कुटुंब असते ,आणि अगदी “तुमचे आमचे सेम असते “ असेच त्याचेही कुटुंब ,भावना असतात त्यामुळे त्याचा आदर करणे इतकी कमीतकमी अपेक्षा असते.
प्रवास मग तो कुठलाही असो त्यात कुठल्याही क्षणी कुठलेही आव्हान उभे ठाकते , एखाद्या गेस्ट ची तब्येत बिघडण्यापासून ते सामान ,पासपोर्ट गहाळ होण्यापर्यंत काहीही होवू शकते. तेव्हा संपूर्ण टूरवर ठेवायला लागतो तो “ संयम ” आणि तो ठेवण्याचे कौशल्य फक्त अनुभवातूनच येते. प्रवासाला येणाऱ्या लोकांना वर्षभराच्या त्यांच्या अत्यंत व्यस्त आयुष्यातून जेमतेम १०-१५ दिवस आपल्या कुटुंबीयांसोबत घालवायला मिळतात आणि त्यासाठी ते पैसा खर्च करून टूर कंपनीसोबत येतात, अश्या वेळी संपूर्ण टूरवर कुठल्याही कटकटी असू नयेत हि त्यांचीही माफक अपेक्षा असते. ह्या १०-१५ दिवसात त्यांना आराम ,शांतात हवी असते आणि म्हणूनच संपूर्ण टूर मध्ये आपल्या गेस्टची काळजी घेवून टूर यशस्वी करणे हे टूर लीडर साठी लीलया आव्हान असते . आपण ज्या प्रदेशात टूर करत आहोत तेथील इत्यंभूत माहिती ,तेथील सामाजिक जीवन, तेथील ठिकाणांची विस्तृत भौगोलिक माहिती आणि इतर अनेक बारकावे ह्याचा अभ्यास टूर लीडरचा असणे अत्यावश्यक आहे तसेच अनेक स्वभावाच्या लोकांशी मिळतेजुळते घेताना काही गोष्टी “Let Go ” करायला लागते ह्याचाही उल्लेख त्याने केला.
घड्याळ्याच्या काट्यावर असणारे हे काम करताना शरीरसंपदा असायलाच हवी.लहानपणापासून मी सगळे खेळ खेळायचो. टूरवर अनेक खेत्रातील लोक येतात .त्यांच्याकडून योगा ,फिटनेस ,आयुष्यातील आर्थिक नियोजन कसे करावे, शेअर मार्केट बद्दल माहिती , वैद्यकीय सल्ला ,आहार नियमन, ग्रुमिंग कसे असावा अश्या अनेक गोष्टींची माहिती आणि मार्गदर्शन अगदी विनामूल्य मिळते. ह्यागोष्टींसाठी बाहेर हजारो रुपये मोजायला लागतात त्या गोष्टी मला मी गेस्ट शी ठेवलेल्या ऋणानुबंधातून सहज मिळून जातात. वयाच्या ३५ नंतर आपल्या तब्येतीची काळजी वेळ काढून घ्यायलाच पाहिजे हे हितेशने आवर्जून सांगितले. निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम केल्याने त्यात तोचतोच पणा येत नाही . मी खवय्या आहे त्यामुळे खाण्यापिण्याची आवड जोपासताना वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ टेस्ट करायला आवडतात. त्यात तोचतोचपणा न राहता नाविन्य राहते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत नाविन्य शोधात राहिले तर खर्या अर्थाने जगण्याचा आनंद लुटता येतो.
हितेश प्रत्येक गोष्टीत इतका समरसून गेला आहे कि टुरिझम आणि त्याचे आयुष्य वेगळे राहिलेच नाही आहे. कुठल्याही विषयावर अगदी मोकळेपणाने बोलणार्या ह्या वल्लीसोबत गप्पा रंगल्या.
आजवर हितेशची ५९ देश आणि ५ खंड ह्यात मनसोक्त भटकंती झाली आहे हे सांगताना Antartica हा आवडता आणि खुणावणारा प्रांत राहिला आहे...त्याचाही योग येयीलच हि इच्छा त्याने बोलून दाखवली. जगभर भ्रमंती करूनही सर्वात आवडणारा प्रांत म्हणजे “ लेह लडाख ”. तेथील प्रवासाचा आणि विधात्याने उधळलेल्या निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद विमानप्रवासा पेक्षा Road Travel नेच जास्ती घेता येयील.
भारतापेक्षा भारताबाहेरील भ्रमंती अधिक झाल्यामुळे तेथील अनुभव जास्ती आहेत. आपली तब्येत उत्तम तर सर्व उत्तम त्यामुळे नियमित योगा मी करतोच पण त्याही पेक्षा निसर्गाच्या सानिध्यात मग ते हिमालयातील एखाद्या नदीकाठचे ठिकाण असो किंवा स्विझर्लंड मधील एखाद्या बागेतील शांत ठिकाण असो ,अगदी नरीमन पोईट चा कट्टा असो ,मला त्याठिकाणी एकटे शांतपणे काहीवेळ बसणे मनापासून आवडते. ह्या वेळात होणार्या उत्तम साधनेत माझा मीच मला नव्याने भेटत राहतो. टुरीस्ट म्हणून तुम्ही जगभर फिरा पण निदान एकदा तरी युरोप ला भेट द्या हे सांगताना हितेश म्हणाला कि युरोप आपल्याला खूप काही शिकवतो ,युरोपिअन लोकांनी आपल्या राजमहाराजांच्या वस्तू ,तेथील अनेक वास्तू , मुझियम ,संस्कृती कशी जतन करून ठेवली आहे हे अभ्यास करण्यासारखे आहे. तसेच युरोपचे आकर्षित करणारे अप्रतिम निसर्ग सौंदर्यहि पाहण्यासारखे आहे.
नियमित योगा, धावणे, चालणे, सूर्यनमस्कार ,सायकल चालवणे ह्या सर्व गोष्टीबरोबर कधीकधी उपवास सुद्धा तो करतो. आपले वय वाढत जाते तसे शरीरही बोलत जाते त्यामुळे आपल्या कितीही बिझी असणार्या दिनक्रमातून ह्या सर्वासाठी वेळ देणे अत्यावश्यक आहेच कारण ह्या सर्वांची पाळेमुळे भारतीय संस्कृतीत वर्षानुवर्ष रुजली आहेत. दिवसभरात काहीच व्यायाम केला नाही तर मनाला रुखरुख लागते इतके ते आता तनामनात रुजले आहे.
आपण आयुष्यात जे काही करतो ते पोटासाठी...शेवटी म्हन्त्लेच आहे ना कि .आपण नाही पण आपले पोट काम करत असते ..नियमित व्यायामासोबत सकस आहार सुद्धा सांभाळावा लागतो, कारण टूर वर प्रत्येक देशात वेगवेगळे पदार्थ मिळतात आणि ते खाण्याच्या वेळाही वेगवेगळ्या असू शकतात, दिवसरात्र प्रवास असतो त्यामुळे आहार महत्वाचा . भूक लागली म्हणून समोर आलेल्या पदार्थांवर तुटून पडणे असे न होता आवश्यक ते खावे. थोडे पोट रिकामेच राहिलेले बरे आणि अनुभवातून तेही होतेच. इतर वेळी मात्र जे मनाला आनंद देईल ,रुचेल ते सर्व खावे अगदी बिनधास्त ह्या मताचा मी आहे हे फक्त जे वाढलेले असते त्याचा मनापासून आनंद घ्या आणि अन्न फुकट घालवू नका. शेवटी अन्न हे पूर्णब्रम्ह.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो माणसात राहणे पसंत करतो त्यामुळे त्यास कुठलेही उपक्रम एखाद्या ग्रुपमध्ये करताना वेगळाच आनंद मिळतो .“ WIOTIO ” ह्या ग्रुप चा विशेष उउलेख करताना त्यांनी केलेल्या सर्व उपक्रमांचे त्यांनी मनापासून कौतुक केले . “ चाला आणि चालताना आलेले अनुभव शेअर करा ” हि संकल्पनाच मुळात अत्यंत स्तुत्य आहे . नेहा येवले ह्यांनी हि संकल्पना राबवली आणि आज इतक्या मोठ्या संखेने हा ग्रुप कार्यरत आहे ह्याचा अभिमान वाटतो.
त्याचे वीणा वर्ल्ड सोबतचे अनुभव न संपणारे आहेत...त्याला ह्या क्षेत्रात काम करताना अनेक दिग्गजांना भेटण्याचा योग आला. अमेरिकेत इशा फौंडेशन च्या “सद्गुरुना” आणि “ जगप्रख्यात खेळाडू “ सचिन तेंडूलकर ” ,“बाबासाहेब पुरंदरे ” ह्यांना भेटण्याचे विलक्षण योग आले , ह्यासाठी मी परमेश्वराचा सदैव ऋणी राहीन. ह्या माणसांकडून शिकावे तितके थोडेच आहे. ह्या सर्वाना भेटण्याचे भाग्य मला लाभले हे सांगताना त्याचे डोळे पाणावले .
जगभरचा हा प्रवासी कुटुंबाबद्दल बोलताना विलक्षण हळवा होवून गेला. आपले बाबा टूरवर निघून जाताना आपली भेट होणार नाही म्हणून माझी ३ वर्षाची मुलगी माझ्या Bag वर झोपत असे हि आठवण सांगताना हितेश मधील बाप सद्गदित झाला.
आपल्या प्रवासातून असंख्य अनुभव घेवून व्यक्तिगत जीवनातही हितेश प्रगल्भ होत गेला हे जाणवत होते . ह्या मुलाखतीच्या अनुषंगाने गेस्ट साठी काय सांगशील ह्या माझ्या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला. टूरला कुणीही आनंदासाठीच येत असतो पण त्याचबरोबर आपण ज्या देशात प्रवास करतो तेथील नियमांचे काटेकोर पणे पालन केले तर आपली आणि आपल्या देशाचीहि शान वाढते. प्रत्येक ठिकाणी आपले नियम ,हुकुम चालत नाहीत ह्याचे भान ठेवणे गरजेचे असते,विशेष करून युरोप अमेरिकेतील नियम कडक आहेत. मुळात टूरचा आनंद मनापासून घ्या जेणेकरून परत घरी गेल्यावरही ह्या आठवणी तुम्हाला कित्येक दिवस ताज्यातवान्या ठेवतील.
हितेश सोबतच्या गप्पा न संपणाऱ्या होत्या पण कुठेतरी थांबलेच पाहिजे...आज मलाही त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले . सदैव एकाच चौकटीत न जगता , प्रवास करत राहिले पाहिजे, विधात्याने ह्या धर्तीवर असंख्य सुरेख ठिकाणांची ,निसर्गाची उधळण केली आहे ,ते सौदर्य पाहण्यास आपण वंचित राहू नये . भटकंती म्हणजे नुसते शॉपिंग आणि काही ठिकाणे पाहणे नाही तर आपण भेट देत असलेल्या देशाचा अभ्यास झाला पाहिजे.. तेथील सामाजिक आणि राजकीय जीवन, तेथील समाजव्यवस्था, रोजचे सामान्य माणसाचे जीवन, तेथील प्रश्न, अगदी तेथील लग्नसंस्था ,हवामान , राहणी, लोककला , व्यवसाय , वाहतूक ,खाद्यसंस्कृती , त्या जागेचा इतिहास आणि ऐतीहासिक ठिकाणे ह्या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास म्हणजेच “टुरिझम” . आपण जितका प्रवास करू तितके शिकत राहू आणि जीवन समृद्ध होत राहील.
हितेशला त्याच्या पुढील आयुष्यासाठी आपल्या सर्वांकडून मनापासून खूप खूप शुभेछ्या.
लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .
Antarnad18.gmail.com