Saturday, 28 March 2020

हत्या,वैर आणि ऋण चुके न कोणा...

|| श्री स्वामी समर्थ ||


श्री गजानन भक्त भास्कर पाटील ह्यास त्रिवार वंदन


श्री दासगणू महाराजांनी लिहिलेला रसाळ ग्रंथ “ श्री गजानन विजय “ म्हणजे अमृतकुंभ आहे . त्यातली प्रत्येक ओवी प्रत्येक शब्द आपल्या जीवनाशी समरसून गेलेला आहे किबहुना जीवन कसे जगावे हेच महाराजानी त्यातूनभक्तांना शिकवले आहे .

ह्यातील प्रत्येक ओवीवर विचारमंथन व्हावे इतका खोलवर अर्थ त्यात दडलेला आहे. आपण पारायण करतो पण प्रत्येक वेळी त्यातून नवीन काहीतरी उलगडते आपल्या समोर इतके विविध पेहलु आहेत ह्या ग्रंथास. नुसतेच विचारमंथन नाही तर ते प्रत्यक्ष जीवनात आपल्याला उतरवायचे आहे ,जे कर्मकठीण आहे .

“ श्री गजानन विजय ” ह्या ग्रंथातील ११ व्या अध्यायातील “ हत्या , वैर आणि ऋण चुके न कोणा ” हि ओवी बघा. किती खोलवर अर्थ आहे ह्या ३ शब्दात ..आपले संपूर्ण जीवन ह्या ३ शब्दातच बंदिस्त केले आहे जणू.

महाराजांचा निस्सीम भक्त भास्कर पाटील कुत्र्याचे दुध प्यायला गेला आणि मग कुत्रे चावल्यावर त्यातच त्याचा अंत झाला. प्रत्यक्ष महाराजांनीही त्याला सांगितले कि कुत्रे हे निम्मित्त झाले पण मुळातच तुझा जीवन प्रवास आता संपला आहे त्यामुळे मी तुला अभय देवून काय साध्य होणार कारण हा जन्ममृत्यूचा खेळ असाच चालू राहणार.
आपल्या आयुष्यात आपल्या हातून कळतनकळत अनेक चुका , पापे हि घडतच असतात. कितीही अमान्य केली तरी आपल्या अंतर्मनात आपण त्याची ग्वाही स्वतःलाच देत असतो .आपल्या पायाखाली चालताना असंख्य किडा मुंगी मारले जात असतात. हत्यां म्हणजे उठून प्रत्येक वेळी कुणालातरी मारणे हा अर्थ अभिप्रेत नाही इथे तर कळतनकळत होणारे गुन्हे हा आहे. घरात येणार अनेक प्राणी आपण मारतोच कि. आपल्या पूर्व प्रारब्ध प्रमाणे आपला हा जन्म त्यामुळे काही अगदी अक्षम्य गुन्हेही घडतात आपल्या हातून . काही वेळा प्रत्यक्ष माणसाची हत्याही होते मग त्यामागे असंख्य कारणेही असतील पण तसे होते ह्यात दुमत नाही.

संपूर्ण जीवनात आपले कुणाशीच वैर नाही असे होत नसते . सगळ्यांनाच आपण आवडतो असेही नाही आणि सगळे आपल्या आवडतील असा नियम नाही . तुम्ही कितीही आंजरा गोंजारा कुणीना कुणी आपला वैरी असतोच. पूर्व जन्मात आपण त्याचे काहीतरी वाईट केले असावे म्हणून मग ह्या जन्मी आपला नातेवाईक , शेजारी , मित्र , सोबती , नोकरीच्या ठिकाणी आपला सहकारी अश्या कुठल्यातरी रुपात येवून तो आपल्याला त्रास देणारच ,आपल्याशी वैर करणारच . काही नात्यात तर अगदी हाडवैर असते कि एकमेकांची तोंडेही पाहत नाहीत .त्याला वडिलोपार्जित संपत्ती, धनदौलत , इर्षा  अशी अनेक कारणे असू शकतात. कधीकधी हे वैर प्राणावर पण बेतते . कित्येक कुटुंबात तर पिढ्यानपिढ्याचे वैर असते जमिनीची मालकी ,संपत्ती, भाऊबंदकी अनेक करणे असतात . आपण ऐकतो ना भावाने भावाचाच खून केला त्यापैकीच आहे हे. कलियुगात लहानसहान गोष्टी सुद्धा वैर करण्यास कारणीभूत होतात. म्हणून आपले एखाद्याशी पटत नसेल तर चार हात दूर राहावे हे उत्तम.

अगदी जन्मल्या पासून आपण ऋणात असतो. मातेने जन्म दिला म्हणून पुढे मात्यापित्यानी संगोपन केले ,संस्कार केले आणि पायावर उभे केले ..हे आईवडिलांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. मोठे झालो कि सहजपणे आपल्या विश्वात गुंततो ,आकाशात उंच भरारी घेतली कि आई वडिलांना उद्धटपणे बोलतो (सगळेच नाही काही अपवाद निश्चित आहेत )त्यांचा म्हातारपणी सांभाळ करणे सुद्धा आपल्याला जड जाते...लहानपणी आपल्या आजारपणात आईने रात्ररात्र आपल्या उशाशी बसून जागरणे केली , आपल्या शिक्षणासाठी आयुष्यातील आनंद बाजूला ठेवून प्रसंगी आपल्या शिक्षणासाठी कर्ज घेतलेल्या आपल्या वडिलांचा आपल्याला सोयीनुसार विसर पडतो . अशी कित्येक उदाहरणे देता येतील पण लेखाची व्याप्ती वाढेल. असो तर सांगायचे असे कि प्रत्येक ओवी आणि प्रत्येक शब्द हा असाच नाही लिहिलाय तिथे ..

आपल्या जीवनाचे सार दडले आहे त्या प्रत्येक शब्दात. आपल्याला जितक्या लवकर त्याचे अवलोकन होयील तितके उर्वरित आयुष्य सुखात व्यतीत होईल.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा 


Antarnaad18@gmail.com